३८१ वी स्मरण यात्रा.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जनातलं, मनातलं
13 Feb 2011 - 12:52 pm

सप्रेम नमस्कार मंडळी !
येत्या १९ फेब्रुवारीला आपल्या सार्‍या लोकांच्या २ आराध्यदैवतांपैकी (छ.शिवाजी अणि छ.संभाजी) छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८१ वी जयंती ! त्या निमित्ताने माझ्या आगामी ४ पिढ्यांचा इतिहास सांगणार्‍या आणि छत्रपती संभाजी महाराजांवरील "झंझावात" या कादंबरीतील एक लेख इथे देत आहे.आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात (मि.पा. वर आणि खेरीज माझ्या वैयक्तीक ई.मेल वर पण : sudayan2003@yahoo.com)

जय भवानी जय शिव-शंभू !
-----------------------------------------------------------------------------------------

विश्वासराव्,नारोपंत,बाळकृष्णपंत,गोमाजी नाईक पानसंबळ यांनी शास्त्रीबुवांना पाचारण केलं.श्रमलेल्या जिजाऊंनी कष्टाने पण अतीव श्रद्धेने जागेवरूनच हात जोडले.ते पाहून स्मित करून आशीर्वाद देत शास्त्रीबुवा पंचांग आणि बाळाची कुंडली घेऊन आसनस्थ झाले.

जिजाऊम्हणाल्या , "बोला शास्त्रीबुवा , आम्हांस घोडदौड आणि शस्त्रात्रांचे डोहाळे लावणार्‍या या बाळाचे भविष्य सांगा !"

शास्त्रींबुवा म्हणाले , "अल्बत्! या बाळाचं भविष्य सांगावयास मिळाले हे आम्ही आमचे सातां जन्मांचे पुण्य स्मजतो ! ऐका......

हा पुत्र नव्हे , हा योगीराज आहे.
हा साहसी वीर आहे पण हा वेळ आणि शक्ती यांचा अपव्यय करणारा नाही.
'शिसं गरम करून बांधकाम करतात' ते जेव्हढं घटट आणि अभेद्य असतं त्यापेक्षा जास्त अभेद्य बांधकाम - माणसांची मनं जोडण्याचं - हा करेल !साक्षात् सरस्वतीच याच्या मुखी आहे.जे काम वर्षानुवर्षे चाललेल्या लढाईनं साध्य होत नाही ते काम याच्या दोन शब्दांनी होईल !
हा सुपुत्र माणसात देव पाहील.
याची दोन धारदार शस्त्रं म्हणजे याची कुशाग्र बुद्धी आणि माणसांवरचं प्रेम !
याच्या स्वभावामुळे माणसं स्वतःपेक्षाही जास्त याच्या शब्दावर विश्वास ठेवतील.
सर्व सुखसाधने समोर असली तरी हा निरिच्छ असेल. हा मर्यादा पुरुषोत्तम असेल.
हा धर्माचा मान वाढवील पण हा अंधश्रद्धाळू किंव धर्मांध नसेल!संतांवर अपार श्रद्धा ठेवील पण प्रत्येकाचा कस पहिल्याखेरीज हा कुणावरही विश्वास टाकणार नाही !
हा मूर्तीमंत संयमाचा पुतळा असेल्.अतिशय कठीण अशा प्रसंगातही स्वतःचा धीर, आई-वडील-साधू-संत,थोरा मोठ्यांचा आशीर्वाद , गुरुकृपा आणि चतुरस्त्र बुद्धी या बळावर हा मार्ग काढील ! हा चक्रव्यूह भेदून जाणारा कली युगातील अभिमन्यु आहे !
हा वेळेचा भोक्ता - त्यामुळे प्रसंगी टोकाच्या शिस्तीचा,गुणग्राहक,उत्तम शासक होईल.एक थोर राजकारणी आणि मुत्सद्दी होईल.याच्या मनातील विचार कुणालाही - प्रसंगी तुम्हालाही कळणार नाहीत.
हा अखंड सावधान चित्ती असेल.एकपाठी असेल, उत्तम नकला करेल, सोंगे आणिल, बहुरूपी होईल! जे ठरवेल ते केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ! अखंड त्रिभुवनांत याची कीर्ती होईल ! आपले उद्दीष्ट साध्य होण्याकरता हा साम, दाम, दंड आणि भेद या चारही नीतींचा उपयोग करील.याच्या कुंडलीत राजयोग ,परंतु वागण्यात भक्तीयोग दिसतो.
हा परस्त्री ला मातेसमान वागवील्.याचे शत्रुसुद्धा प्रसंगी "शीलवान"म्हणून याची मिसाल देतील.
याच्या तेजस्वी डोळ्यांत आणि मिठ्ठास वाणीत लोकांना वश करण्याचं सामर्थ्य असेल. हा शत्रूंसाठी कर्दनकाळ असेल , हा जे निर्माण करेल त्याला या पॄथ्वीतलावर मानवजात युगानुयुगे वंदन करील !याचे केवळ अस्तित्व हा जिथे जाईल तिथे पावित्र्य निर्माण करील.याच्यासाठी मोठमोठ्या साधकांची लेखेणी झिजेल ! आणि आईसहेब , विश्वास ठेवा , याच्या नुसत्या नावाच्या उच्चाराने पण कोट्यावधी लोक मान तुकवतील !
हा क्षत्रियांचे देवत्व : शस्त्रं , त्यात पारंगत होईल ! सदाचारणी होईल , वेळप्रसंगी माशांप्रमाणे डोळे न मिटता झोपण्याची किमया साधू शकेल ! हा कुळासाठी, धर्मासाठी, गोरगरीब आणि सामान्य जनतेसाठी स्वतःचे बलिदान करू शकणारा थोर सेनानी होईल ! जनतेच्या सुखासाठी हा वेळप्रसंगी किंबहुना वारंवार भेद,घात,कारस्थानं पण करेल! हा स्वतः एक उत्तम हेर असेलच पण तितकेच उत्तम आणि चाणाक्ष हेर निर्माण करील ! हा अष्टावधानी होईल , चराचर सृष्टीतील प्रत्येकाकडून हा काही ना काही शिकेल आणि आदर्श असा विश्वासपात्र राजा होईल !
याचं स्वतःचं असं काहीतरी नवनवीन निर्माण करील , पण सगळ्यात असूनही तो कशातच नसेल ! हा सुपुत्र तुमचे सातां जन्मांचे पांग फेडील. हा उत्तम योजक होईल.
मात्रूवत् परदारेषु परद्रव्याणी लोष्ठवत्
आत्मवत् सर्वभूतानि यः पश्यति सः पण्डितः
अर्थात् : जो परस्त्रीला मातेसमान , परसंपत्तीला मातीसमान आणि सर्व पदार्थांना आत्म्यासमान समजतो तोच खरा पंडित होय! हा भोसल्यांचा कुलदीपक ज्ञानी पुरुष होईल !
कामं क्रोधं तथा लोभं स्वादं शृंगार कौतुके
अतिनिद्रेsतिसेवे च विद्यार्थी हृष्ट वर्जयेत्
अर्थात् : काम्,क्रोध्,लोभ्,स्वाद्,रति-शृंगार,मनोरंजन्,अतिनिद्रा आणि अतिसेवन ह्या आठ गोष्टी विद्यार्थ्याला वर्ज्य असतात. हा मातृ-पितृ-गुरु भक्त असा आदर्श विद्यार्थी होईल !
दातृत्वं प्रिय्वक्तृत्वं धीरत्वमुचितज्ञता
अभ्यासेन न लभ्यन्ते चत्वार सहजा गुणा:
अर्थात् : दान देण्याची, गोड बोलण्याची सवय, संयम राखण्याची, योग्य-अयोग्य जाणण्याची क्षमता हे माणसाचे स्वाभाविक गुण आहेत.
हे अभ्यासाने किंवा शिकवून येत न्हीत , हृदयाच्या गाभ्यातून हे यावं लागतं ! हृदयाचा गाभारा बुलंद असलेला हा पुत्र म्हणजे जणु एक देवालय आहे !
न देवो विद्यते काष्ठे न पाषणे न मृण्मये
भावे ही विद्यते देवस्तस्माद् भावो ही कारणम्
अर्थात् : ईश्वर लाकडामधे, दगडामधे ही नाही तर तो माणसात असलेल्य भावनेमधे निवास करतो ! या भावनेमुळेच ईश्वराची कृपा प्राप्त होते.
हे या सुपुत्राच्या जीवनाचे अखंड सार असेल !
यथा चतुर्भि: कनकं परीक्ष्यते , निघर्षण-च्छेदनं-ताप ताडनै:
तथा चतुर्भि: पुरुषः परीक्ष्यते , त्यागेन,शीलेन,गुणेन,कर्मणा:
अर्थात् : ज्याप्रमाणे सोन्याची परिक्षा चार प्रकारे केली जाते : कापणे,घासणे,तापविणे व ठोकणे.त्याचप्रमाणे पुरुषाची परिक्षा चार प्रकारे केली जाते : त्याग,चारित्र्य,गुण व कर्मांनी !
हा पुत्र म्हणजे या चारच नव्हे तर जगातल्या सर्व परिक्षा व कस लावून जन्माला आलेलं शंभरी बावनकशी नाणं आहे.
गेल्या कित्येक शतकांत झालेल्या अन्यायाचं निर्दालन करून हा आपलं राज्य , आपला ध्वज निर्माण करील.
स्वतःच्या स्वप्नांसाठी सगळेच जगतात ; पण राणीसाहेब , हा आपला सुपुत्र तुमच्या आणि महाराज साहेबांच्या , सामान्य माणसाच्या स्वप्नांसाठी आपलं जीवन वेचेल ! याच्या कुठल्याच गोष्टीला जगात तुलना नसेल !
तिन्ही सांजेला जन्मलेल्या या नरकेसरीला - नृसिंहाला आम्ही वंदन क्रतो आणि अशा सुपुत्राला जन्म देणार्‍या मातेला - आपणाला आम्ही त्रिवार वंदन करतो माते !
आज अमचं जीवन कृतार्थ झालं माते आणि तुझ्या स्वप्नपूर्तीच्या दिवशी तुझं धन्य झालेलं जीवन पहाण्याएव्हढं आयुष्य आम्हांस लाभावं म्हणून परमेश्वराकडे हात जोडतो !
शुभम् भवतु ! सकल मनोरथ पूर्णात् भवतु !

अव्याहत बोलणार्‍या शास्त्रीबुवांचा चेहेरा डोळ्यावरील पाण्याच्या पडद्यांमुळे जिजाऊ मासाहेबा<ना धूसर दिसत सतानाच शास्त्रीबुवांनी उठून बाळराजांची इवलीशी पावले आपल्या मस्तके लावली आणि त्यानंतर त्यंनी जिजाऊंसमोर अक्षरशः लोटांगण घातलं !
आपल्या लाडक्य शंभूबाळांना त्यांच्या आबासाहेबांच्या जन्माची कथा सांगणार्‍या जिजाऊंना आज उण्यापुर्‍या तीन दशकांनंतरही भरून आलं होतं !
-----------------"झंझावात"या आगामी कादंबरीतून - लेखक : उदय गंगाधर सप्रे-ठाणे------------------

इतिहासआस्वाद

प्रतिक्रिया

अनामिका's picture

19 Feb 2011 - 11:43 am | अनामिका

तव शौर्याचा एक अंश दे !
तव धैर्याचा जरा स्पर्श दे !
तव तेजांतिल एक किरण दे !
जीवनांतला एकच क्षण दे !
त्या दीप्तीतुनि दाहि दिशा द्रुत उजळुनि टाकू !
पुसू पानिपत ! पुन्हां लिहाया अमुचे भारत,व्यास-वाल्मिकी येतील धावत !!"
राजवंदना"-बाबासाहेब पुरंदरे

अविनाशकुलकर्णी's picture

19 Feb 2011 - 11:49 am | अविनाशकुलकर्णी

तारिख कि तिथि>
वाद संपला का?