ऋतू बदलतात...

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
31 Jan 2011 - 10:08 pm

ऋतू बदलतात, ऋतू हरवतातही... आणि हरवलेल्या प्रत्येक ऋतूबरोबर हरवतं मनही....येताजाता सळसळून हात उंचावत अभिवादन करणारा तरुण वृक्ष जेव्हा एका ऋतूला निरोप देताना अचानक संन्याशाची वस्त्र लेवुन समोर उभा ठाकतो तेव्हा स्तंभित होतं मन..एक एक पान गळताना बघुन गोठत जातं मन.. झाडावरचे पक्षीही भटके पंख घेऊन अज्ञातात जातात कुठेतरी...आभाळातून गळणार्‍या बर्फाच्या चुर्‍यासारखं सैरभैर पांगतं मन...बर्फाच्या त्या चुर्‍यावर पहिलं पाऊल टाकताना हलतं मन... आपलीच पाऊलनक्षी बघत गिरकी घेतं मन..पनगळ बघताना सुन्नाट झालेलं मन हरवतंच मग नकळत..

त्या पाऊलनक्षीचं एवढं वेड लागतं की तिथे एक पायवाटच बनते..मग पावलं उमटत नाहीत त्या घट्ट झालेल्या बर्फावर..आणि मग एक दिवस तिथूनही मन निसटतं !

अचानक त्याच्या लक्षात येतं, सूर्य हरवलाय ! म्हणून सावलीही ! हळुहळू काळोखाची चादर सवयीची होते. मऊ भासते. ओळखीच्या गंधात आपल्यातच घुटमळत रहातं मन...

रोजच्या वाटेवरचं झाड तपश्चर्या करताना बघणं हा एक आपला खेळ...तेवढंच त्या झाडाला गोंजारणं, कधीतरी त्याला हात लावून धीर देणं..

आणि एक दिवस झाडाच्या अंगावर कसलेले बारीक रोमांच दिसतात..झाडही कसल्याशा लाजर्‍या आनंदात हात अजून उंचावलेले दिसते ! पाखरं परतलेली दिसतात एक दिवस.. मनाची भुवई उंचावते...झाड आपल्याच नादात...आणि उंचावलेली भुवई खाली येईपर्यंत लक्ष लक्ष कोवळी पानं झाडाच्या अंगाअंगातून डोळे उघडताना दिसतात..लाट फुटावी तसे झाड नाचायला लागते...प्रत्येक पदन्यास पानांना आश्वस्त करत खुणावतो..बाहेर या, नाचूया... ! पक्षीही साथ देतात नि मग ते झाड एक गाणं होतं..बदललेल्या ऋतूचं गाणं....

ओह्ह..अंधाराचं पांघरूण विरतंय नि नवनवे गंध पसरतायत अवतीभवती..सावली परतली..म्हणजे सूर्यही...

मन स्वार होतं पाखरांच्या निळ्या पंखांवर..आणि सज्ज होतं हळुच फुलणार्‍या हजारो कळ्यांच्या स्वागतासाठी..
ह्म्म... ऋतू बदलतात..हरवतातही....सापडतातही !

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

31 Jan 2011 - 10:13 pm | स्वाती दिनेश

किती छान लिहिलं आहेस ग, हे ऋतुचक्र शब्दांमध्ये खूप सुंदर उभं केलं आहेस,
स्वाती

स्वाती२'s picture

31 Jan 2011 - 10:26 pm | स्वाती२

सुरेख!

कच्ची कैरी's picture

31 Jan 2011 - 10:29 pm | कच्ची कैरी

मितान ताई आहेत होय ,मी तर मितान दादाच समजत होते .लेखात केलेले निसर्ग्सौदर्याचे वर्णन अप्रतिमच्!चित्र हुबेहुब डोळ्यांसमोर उभे राहिले ,मस्त्च!

५० फक्त's picture

31 Jan 2011 - 10:38 pm | ५० फक्त

मितान, पुन्हा एकदा अतिशय सुरेख, खुप विचार करुन आणि एक एक शब्द तोलुन मापुन वापरता तुम्ही.

या निसर्गाचे हे सोहळे तुमच्या शब्दाशब्दातुन साजरे होत आहेत.

हर्षद.

असुर's picture

31 Jan 2011 - 11:06 pm | असुर

सुंदर!!! केवळ सुंदर!!!

--असुर

रेवती's picture

31 Jan 2011 - 11:44 pm | रेवती

अगदी छान लेखन.
फॉलमधली झाडं.....सन्याशाची वस्त्र्......अगदी पर्फेक्ट.

पिवळा डांबिस's picture

1 Feb 2011 - 12:36 am | पिवळा डांबिस

छान स्फुट लेखन केलंय. आवडलं!

येताजाता सळसळून हात उंचावत अभिवादन करणारा तरुण वृक्ष जेव्हा एका ऋतूला निरोप देताना अचानक संन्याशाची वस्त्र लेवुन समोर उभा ठाकतो तेव्हा स्तंभित होतं मन..
पानगळ करत असण्यार्‍या वृक्षाला दिलेली सन्याशाची उपमा खूप आवडली. उत्तर भागांत हे दृष्य दरवर्षी बघायला मिळतं. त्यावेळच्या त्या सुवर्ण वैभवाकडे पाहून मन हरखतं....

मग पावलं उमटत नाहीत त्या घट्ट झालेल्या बर्फावर..आणि मग एक दिवस तिथूनही मन निसटतं !
अगदी अगदी खरंय!!
कधीकधी त्या घट्ट झालेल्या बर्फावरून चालतांना पाऊलही निसटतं....
आणि मग पुढे काही दिवस दुखणारं ढुंगण त्या बर्फाला शिव्याशाप देत रहातं!!
स्नो लाडका, आईस दोडका!!
सॉरी, भरकटलो!! म्हणतात ना, मन वढाय वढाय!!
:)

झाड आपल्याच नादात...आणि उंचावलेली भुवई खाली येईपर्यंत लक्ष लक्ष कोवळी पानं झाडाच्या अंगाअंगातून डोळे उघडताना दिसतात..लाट फुटावी तसे झाड नाचायला लागते...
अरे खरंच की!! हांहां म्हणता आत्ता पालवी फुटायला लागेल!!!
अजून गेल्या वर्षीची वाढ कटिंग करायची आहे...
झाडांभोवतालची जमीन सैल करायची आहे....
शेणखत आणून ठेवलंय ते घालायचं आहे....
बुरशी-कीड लागू नये म्हणून फवारणी करायची आहे....
पानफुटी व्हायच्या आधी हे सगळं करून झालं पाहिजे!!!
अहो, काय सॉलिड टेन्शन देताय हो, मितानबाई?
:)

शुचि's picture

1 Feb 2011 - 3:00 am | शुचि

मितान नेहमीच छान लिहीतेस. तुला लेखनाचे, काव्याचे अंग आहे.
हे बघ तुझ्यासारखच थोडसं माझ्या लाडक्या कवयित्रीने येथे लिहीलेले -

I feel quite fortunate to have a number of trees in my yard. One of them in particular is bringing me smiles at the moment. For some reason it will not give up its leaves as the other trees have done. Although I have trees who will hold their leaves until the first frost, this is not one of them. So this is poem is for 'her'... yes I refer to the tree as a female...)

Modesty

Amid barren arms
Of her naked companions
She jealously guards
Modesty, remaining clothed
Her glory fading and worn

She proudly displays
Tattered lace, falling hemlines
Shivering slightly
Beneath an indigo sky
Rippling within autumn's wind

But still her dress clings
Along those curvaceous lines
Of long outstretched arms
Painting shimmering patterns
In shadows of modesty

शुचितै, फार सुंदर आहे कविता ! तुझ्यामुळे वाचायला मिळाली. धन्यवाद :)

नंदन's picture

1 Feb 2011 - 3:13 am | नंदन

फार छान. गद्य कवितेसारखं तरल लेखन!

प्राजु's picture

1 Feb 2011 - 3:28 am | प्राजु

अप्रतिम!!!

नरेशकुमार's picture

1 Feb 2011 - 5:20 am | नरेशकुमार

मनापासुन आवडले.

सूर्यपुत्र's picture

1 Feb 2011 - 8:40 am | सूर्यपुत्र

खूपच छान.

sneharani's picture

1 Feb 2011 - 1:33 pm | sneharani

मस्त लिहल आहेस!
अप्रतिम! :)

खूपच सुंदर.....
मन एकदम फ्रेश झालं :)

असं काहीतरी डोळ्यासमोर आलं

धमाल मुलगा's picture

1 Feb 2011 - 2:08 pm | धमाल मुलगा

हॅट्सऑफ..हॅट्सऑफ..हॅट्सऑफ..!

अप्रतिम आणि चित्रदर्शी लिहिलंयस. आवडलं.
सुंदर आणि केवळ सुंदर!!!!

गणपा's picture

1 Feb 2011 - 2:12 pm | गणपा

छोटेखानी मुक्तक आवडल. :)

खरंच सुपर्ब! खूप छान लिहिलंयस. बारकंसंच पण प्रभावी.

कालपासून तुझ्या या काव्यात्म गद्याला एखादी छानशी पद्यात्म प्रतिक्रिया काय देऊ म्हणून विचार करतोय पण तुझं लिखाण खरंच 'यासम हेच'!

चिगो's picture

1 Feb 2011 - 3:20 pm | चिगो

>> मनाची भुवई उंचावते...झाड आपल्याच नादात...आणि उंचावलेली भुवई खाली येईपर्यंत लक्ष लक्ष कोवळी पानं झाडाच्या अंगाअंगातून डोळे उघडताना दिसतात.

केवळ अप्रतिम लिहीलं आहे तुम्ही.. व्वा..

टारझन's picture

1 Feb 2011 - 3:22 pm | टारझन

वा माया .. अगदी मायावी लेखन आहे गं !!

अवांतर : बालपनी गावाकडे असतांना आम्ही सकाळच्या पारी जेंव्हा 'जायचो' तेंव्हा मोठ्या सुरात सगळे मित्र ओरडायचो .. " हिरवा हिरवा ऋतु .. हिरवा हिरवा ऋतु .. "

- हिरवंटोळ

प्रीत-मोहर's picture

1 Feb 2011 - 3:31 pm | प्रीत-मोहर

मस्तच लिव्तेस ग तै .......

स्मिता.'s picture

1 Feb 2011 - 3:41 pm | स्मिता.

किती सुरेख लिहिलंय गं मितानताई!
हिवाळ्यात पानगळ झालेल्या झाडाला उदास रूप न देता त्याला संन्याशी म्हणून वेगळा मूड आणलाय.

आणि एक दिवस झाडाच्या अंगावर कसलेले बारीक रोमांच दिसतात.................. मन स्वार होतं पाखरांच्या निळ्या पंखांवर..आणि सज्ज होतं हळुच फुलणार्‍या हजारो कळ्यांच्या स्वागतासाठी...

हे वसंताचं आगमन तर खासच!!

ह्म्म... ऋतू बदलतात..हरवतातही....सापडतातही !

निव्वळ अप्रतिम!! अतिशय साध्या शब्दात खूप मोठा अर्थ...

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Feb 2011 - 5:07 pm | बिपिन कार्यकर्ते

जय हो!

मन१'s picture

1 Feb 2011 - 5:14 pm | मन१

सुरेख.

आपलाच,
मनोबा.

गणेशा's picture

1 Feb 2011 - 7:51 pm | गणेशा

लेखाच्या पहिल्या ओळी पासुनच हे गद्य नाही तर कविता आहे असेच भासत होते .. अगदी तसाच रिप्लाय देणार असे म्हणालो आणि काही जनांनी तोच रिप्लाय दिल्याने खुपच छान वाटले.

आपण खुपच छान लिहिले आहे. मला तरी ही कविताच वाटते आहे.. सरळ .. नादमय .. निसर्गाला हळुच कुशीत घेवुन नाचणारी ..
बघा बरे ..

ऋतू बदलतात, ऋतू हरवतातही...
हरवलेल्या प्रत्येक ऋतूबरोबर हरवतं मनही....
तरुण वृक्ष जेव्हा एका ऋतूला निरोप देताना
अचानक संन्याशाची वस्त्र लेवुन समोर उभा ठाकतो
तेव्हा स्तंभित होतं मन..
एक एक पान गळताना बघुन गोठत जातं मन..
झाडावरचे पक्षीही भटके पंख घेऊन अज्ञातात जातात कुठेतरी...
आभाळातून गळणार्‍या बर्फाच्या चुर्‍यासारखं सैरभैर पांगतं मन...
बर्फाच्या त्या चुर्‍यावर पहिलं पाऊल टाकताना हलतं मन...
आपलीच पाऊलनक्षी बघत गिरकी घेतं मन..
पानगळ बघताना सुन्नाट झालेलं मन हरवतंच मग नकळत..

पाऊलनक्षीचं त्या मग एवढं वेड लागतं
की तिथे एक पायवाटच बनते..
मग पावलं उमटत नाहीत त्या घट्ट झालेल्या बर्फावर..
आणि मग एक दिवस तिथूनही मन निसटतं !

अचानक त्याच्या लक्षात येतं, सूर्य हरवलाय ! म्हणून सावलीही !
हळुहळू काळोखाची चादर सवयीची होते. मऊ भासते.
ओळखीच्या गंधात आपल्यातच घुटमळत रहातं मन...

पाखरं परतलेली दिसतात एक दिवस..
मनाची भुवई उंचावते...
झाड आपल्याच नादात...
आणि उंचावलेली भुवई खाली येईपर्यंत
लक्ष लक्ष कोवळी पानं झाडाच्या अंगाअंगातून डोळे उघडताना दिसतात..
लाट फुटावी तसे झाड नाचायला लागते...
प्रत्येक पदन्यास पानांना आश्वस्त करत खुणावतो..बाहेर या, नाचूया... !
पक्षीही साथ देतात नि मग ते झाड एक गाणं होतं..
बदललेल्या ऋतूचं गाणं....

ओह्ह..अंधाराचं पांघरूण विरतंय
नि नवनवे गंध पसरतायत अवतीभवती..
सावली परतली..म्हणजे सूर्यही...

मन स्वार होतं पाखरांच्या निळ्या पंखांवर..
आणि सज्ज होतं हळुच
फुलणार्‍या हजारो कळ्यांच्या स्वागतासाठी..
ह्म्म... ऋतू बदलतात..हरवतातही....सापडतातही !

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Feb 2011 - 8:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सुंदर लिखाण मितान.

प्रत्यक्ष "त्यात" वेळ घालवलेला दिसत नाही.

आणि हा पराच्या चित्रपट परिक्षणासारखा आहे. वाईट गोष्टीचे इतके रम्य वर्णन की सामान्य माणसाला भुरळ पडेल.

बेसनलाडू's picture

2 Feb 2011 - 6:07 am | बेसनलाडू

खूपच आवडले.
(ऋतूपटाईत)बेसनलाडू

नगरीनिरंजन's picture

2 Feb 2011 - 8:24 am | नगरीनिरंजन

सुंदर आणि भारलेलं!!