`भानुविलास' टॉकीजची परवाच्या अंकातली बातमी आणि आजचा म.टा.मधला अभिजित थिटेचा लेख वाचून माझ्याही आठवणींना धुमारे फुटले.
अभिजितनं "भानुविलास'च्या आठवणी छानच जागवल्या आहेत. आपली गोची हीच असते, की जुन्या आठवणी सोडवत नाहीत आणि नव्याही हव्याशा वाटतात. आपल्या बालपणाच्या वेळची शाळा, मित्र-मैत्रिणी, घरं, रस्ते, ते वातावरण, तो गणवेश, सगळं सगळं तसंच राहावंसं वाटत असतो. आपण मात्र खूप बदललेलो असतो. आणि ही बदललेली स्थिती आपल्याला सोडायची नसते. पण जुनंही सगळं हवंहवंसं वाटत असतं. "आम्ही लहान होतो ना, तेव्हा...' अशी आपली टेप सुरू झाली, की ती सध्याची पिढी कशी नालायक आहे आणि आपण कसे ग्रेट होतो, या तात्पर्यापर्यंत आल्याशिवाय थांबतच नाही! माझं गाव, माझं बालपण, माझ्या छोट्या-छोट्या गरजा...सगळ्याचं दळण दळायला आपल्याला फार आवडतं, पण पुन्हा त्या परिस्थितीत कुणी नेऊन ठेवतो म्हटलं, की लगेच आपण दोन पावलं मागे येतो. तर ते असो!
हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे "भानुविलास'वरून मला झालेली आमच्या रत्नागिरीतल्या "लता टॉकीज'ची आठवण. हेदेखील तिथलं "भानुविलास'च. अगदी, राजा गोसावींनी तिथे काम केलेलं नसूदे. पण आमच्या लेखी त्याचं माहात्म्य "भानुविलास'एवढंच! रत्नागिरीत तीन थिएटर होती. त्याआधी दोन होती. एक नाटकाचं थिएटर होतं. त्याचं नंतर "श्रीराम' चित्रमंदिर झालं. माझ्या लहानपणापासून मी लता, श्रीराम आणि राधाकृष्ण ही तीन थिएटर्स पाहत आलो आहे. "राधाकृष्ण'चा दर्जा जरा उजवा. तिथे नवे हिंदी सिनेमे लागायचे. नवे म्हणजे मुंबई-पुण्यातल्या रिलीजच्या नंतर साधारणपणे दीड ते दोन महिन्यांनी आलेले. त्याचं तिकीटही इतरांपेक्षा जरा जास्त होतं. "जरा' म्हणजे "जरा'च! मी कॉलेजात असताना, म्हणजे 90च्या दशकाच्या सुरुवातीलाही तिथलं सर्वांत जास्त तिकीट होतं सहा रुपये! तेदेखील आम्हाला जास्त वाटायचं. असो.
त्यानंतर "श्रीराम'चा नंबर लागायचा. इथे साधारणतः बरे मराठी किंवा दुय्यम दर्जाचे हिंदी सिनेमे लागायचे. कधीकधी तर "राधाकृष्ण'ला खूपच नवा आणि गाजलेला सिनेमा लागलेला असेल, तर "श्रीराम'लाही तोच लावला जायचा. गंमत म्हणजे, दोन्हीकडे रीळ एकच असायचं आणि सिनेमाच्या खेळाच्या वेळा बदलून मग मधल्या वेळेत एक रीळ संपल्यावर ते शेजारच्या "श्रीराम'मध्ये नेलं जायचं. गंमत होती सगळी.
नंतर नंतर हॉलिवूडचे सिनेमे भारतात डब होऊन यायला लागल्यानंतर त्यांनाही "श्रीराम'चाच बऱ्याचदा आश्रय मिळत असे. नाहीतर हमसें ना टकराना, मुकद्दर का बादशहा, जीते हैं शान से, वर्दी, कानून क्या करेगा, अशाच चित्रपटांशी "श्रीराम'च्या पडद्याची गट्टी जमायची. "श्रीराम'ने एखाद्या चित्रपटाचा दुसरा आठवडा पाहिलाय, असं क्वचितच झालं असेल!
"लता'चा नंबर तिसरा होता. एक तर हे थिएटर खूप छोटं होतं. साधारणतः सहाशे ते सातशे क्षमतेचं असावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे तिकीट अगदी कमी होतं. माझ्या लहानपणी एकदा त्याचं "रिनोवेशन' झालं, त्यानंतरचं तिकीट होतं एक, दोन, तीन आणि चार रुपये! आमच्याकडे कमल नावाची मोलकरीण होती. तिलाही इथेच सिनेमा बघायला परवडायचं! एक रुपयात! त्या वेळी एक रुपया ही तिची एका घरची दिवसाची कमाई होती!! मी कॉलेजात असतानाही अनेकदा इथे साडेचार ते पाच रुपयांत सिनेमे पाहिले आहेत! "लता' म्हणजे मराठी सिनेमांचं माहेरघर होतं. नवे हिंदी सिनेमे इथे लागलेले मी क्वचितच पाहिलेत. अनेकदा इंग्रजी ढिशूम ढिशूम छाप सिनेमेही लागायचे.
लता टॉकीजमध्ये मी "फुकट चंबू बाबूराव', "जखमी वाघीण', "ठकास महाठक' असे अनेक सिनेमे पाहिलेत. "आज का अर्जुन'ही इथेच पाहिलेला. "लता'मध्ये एक छोटी बाल्कनीदेखील होती. "राधाकृष्ण' आणि "श्रीराम' ही मोठी थिएटर असूनही, तिथे बाल्कनीची सोय नव्हती. त्याउलट "लता'मध्ये ही लक्झरी मिळायची. ही बाल्कनी जेमतेम पाच ते सहा रांगांची होती. आपल्या "लक्ष्मीनारायण'च्या "मॅजेस्टी'पेक्षा थोडीशी मोठी. शिवाय तिथे पुढे (माझ्यासारखा) उंच माणूस बसला, की मागच्याला दिसायचं नाही. मग त्याला वाकून, दोन खुर्च्यांच्या आणि डोक्यांच्या मधून कसाबसा सिनेमा पाहायला लागायचा. मग मागच्याला दिसावं म्हणून मला खुर्चीत जवळपास झोपूनच सिनेमा पाहण्याची शिक्षा होत असे. (परवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये फुकटात आर-डेक्कनमध्ये बसून (झोपून) सिनेमा पाहिला, तेव्हा ही शिक्षा नाही, हे कळलं! असो.)
घरच्यांच्या धाकात त्या वेळी सिनेमा बघणं म्हणजे दुर्मिळ मेजवानीच असायची. साधारणपणे अकरावीनंतर आम्ही घरच्यांना न जुमानता, न सांगता आणि न सांगण्यासारखे (!) सिनेमे बघायला सुरुवात केली, तेव्हा "लता' आणि "श्रीराम'चाच मोठा आधार मिळाला. "लता'ला तेव्हा इंग्रजी ऍडल्ट सिनेमे लागायला सुरुवात झाली होती. ग्रुपनं जाऊन सिनेमावर भरपूर कॉमेंट करत तो पाहणं हा मोठा सोहळा असे!
चौथीत असल्यापासूनच सिनेमाची गोडी...गोडी कसली, व्यसनच म्हणा...लागलं होतं. शाळेपासून थिएटर जवळच असल्यानं मी आणि एक मित्र मधल्या सुटीत पळून थिएटरवर सिनेमाची पोस्टर बघायला जायचो. "राधाकृष्ण'मध्येच तिथे आणि "श्रीराम'मध्ये लागलेल्या सिनेमातली पोस्टर खिडकीतून दिसायची. "पोस्टर' म्हणजे मोठी नव्हेत. साधारण ए-3 आकाराची, एका काचेच्या चौकटीत लावलेली सिनेमातल्या दृश्यांची चित्रं. आता आपण टीव्हीवर "प्रोमो' पाहतो ना, त्याचं छायाचित्ररूप. ती बघून आम्ही तो सिनेमा "भारी' आहे की नाही, हे ठरवायचो. "लता'मध्ये मात्र ही सुविधा नव्हती. तिथे पोस्टर असायची, पण ती बाहेरून तिकीट न काढता दिसायची नाहीत. सिनेमासाठी तिकीट काढून आत गेल्यावरच ती पाहता येत असत. मग सिनेमा सुरू व्हायच्या आधी आणि मध्यंतरातही ती पोस्टर पाहून, कुठला सीन दाखवायचा राहिलाय, याची शहानिशा मी करायचो.
"लता'चे मध्यंतरी काही वाद झाले. त्यानंतर थिएटर बंद पडलं. मग तिथे वेगवेगळी प्रदर्शनं भरायला लागली. आता तर तिथे कायमस्वरूपी कार्यालयच झालं आहे!
आपल्या बालपणातली आठवणींची एकेक स्मारकं उजाड, भकास होताना पाहिली, की काळजात कुठेतरी चरचरतं...