सावलीतला कोलाहल

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
20 Jan 2011 - 7:11 am

रोज संध्याकाळी फ़िरून परत येण्याच्या वाटेवरच शॉप अ‍ॅन्ड सेव्ह सुपरमार्केट आहे. त्यामुळे अचानक लागलेले किंवा अचानक आठवलेले वाणसामान तिथून आणण्याची सोय आहे. एकदम मोठी यादी वगैरे बनवून दोन तीन आठवड्यांचे सामान जरा दुरच्या मार्केटमधून आणून टाकलेले असतेच. तरीही वाटेवर हे जास्त वर्दळ नसलेले दुकान दिसले, की पाउले तिकडे उगाचच वळतात. मग आलोच आहोत तर माझे उगाच अबरचबर खादाडीचे जिन्नस टोपलीत टाकणे, त्यावर चित्राचे ठरलेले भाष्य ऐकणे वगैरे प्रसंग नेहमीचेच. आज देखील हा मराठीतला प्रेमळ संवाद ऐकून तिथे नेहमी दिसणारी चायनीज म्हातारी मंदसे हसली. मध्यम उंची, बारकुडी काया, इथल्या पधातीचा गुडग्याच्या थोडे खाली येणारा झगा घातलेला. केसांचा आखुड बॉयकट. आमची भाषा ओळखीची नसली, तरी आम्ही आतापर्यंत तिच्या ओळखीचे झाले होतो. “सॉरी सू, आज पण आम्ही तुला स्टॅम्प्स देऊ शकणार नाही.” तिने विचारण्याआधीच चित्राने तिला समजेल अशा सिंग्लीशमधे सांगून टाकले. नेहमीच्या ओशाळवाण्या स्मितामागे सूने तिची निराशा लपवली. ते पाहून चित्राला राहवले नाही. तिला चीअर अप करण्यासाठी चित्राने सू बरोबर थोड्या गप्पा सुरू केल्या. मला विनाटोक अबरचबर खादाडी जमा करायची मोकळीक मिळताच मी त्यांना तिथे सोडून सुपरमार्केटच्या फ़ळ्या शोधू लागलो. पण उगाचच खाण्याची इच्छाच कोण जाणे कुठे नाहिशी झाली. उगाच इकडे तिकडे फ़िरून मी दुकानाच्या बाहेर उभा राहून झाडावर जमलेल्या हजारो साळुंक्यांचा कलकलाट ऐकत राहिलो.

दहा एक मिनटात चित्रा तिच्याशी बोलून जुजबी खरेदी करून बाहेर आली.
“काय म्हणत होती सू?”
“काही नाही, नेहमीचेच! हे सुपरमार्केट छोटेसे असल्यामुळे विस डॉलरच्या वर खरेदी करणारे खूप कमी लोक भेटतात. आज देखील पाच सहा तास वाट बघून चार पाच स्टॅप्सच मिळाले म्हणे.”
“मला एक कळत नाही चित्रा, इथे वेळ घालवण्या ऐवजी ती पलीकडच्या मोठ्या सुपरमार्केट मधे का जात नाही?”
“अरे इथल्या सारखे तिथे जास्त खरेदी केली की फ़्री परचेस स्टॅम्प्स कुठे मिळतात!” चित्राने आठवण करून दिली.
“अरे खरच की! पण येवढा वेळ वाट पाहून चार पाच स्टॅम्प्स मिळणार. कधी तेही नाही. त्यात ती असे काय घेऊ शकणार आहे?
“खरयं. वीस डॉलरवर एक स्टॅम्प फ़्री. दिवसभर उभे राहून तीन चार डॉलरचे सामान सुद्धा तिला मिळत नसावे.! अरे कधी कधी मी मुद्दामच इथून वीस डॉलरच्या वर खरेदी करून तिला मिळालेले स्टॅम्प्स देते. पण इथले भाव इतर ठिकाणपेक्षा जास्तच आहेत. नेहमी असे कसे करणार?

बोलता बोलता आमची पावले आपसुकच घराच्या दिशेने वळली. “ही सू आपल्याच ब्लॉकसमोर रहाते ना? तिने काय घर भाड्याने वगैरे घेतले आहे का?” मी विचारले.
“अरे, भाड्याने कसले! तिचे स्वत:चे अपार्टमेंट आहे.”
“येवढे मोठे स्वत:चे अपार्टमेंट असतांना ही लोकांना रोज दुकानात स्टॅम्प्स मागत कशाला बसते?”
“अगदी स्वत:चे अपार्टमेंट असले, तरी त्याच्या भिंती चाटून पोट थोडीच भरू शकते?”
“एक खोली जरी भाड्याने दिली, तरी बऱ्यापैकी मासिक उत्पन्न विनासायास मिळेल!”
“तिच्या घरी हे दोघे म्हातारा म्हातारी, मुलगी, मुलगा, सून आणि त्यांची तीन नातवंडे इतका गोतावळा रहातो माहीत आहे? तीनही बेडरूम फ़ुल्ली ऑक्युपाईड. कुठली खोली देणार भाड्याने?”
“येवढे लोक रहाणार, हे दोघे म्हातारा, म्हातारी. मग मिळवतं कोण आहे?”
“तेच आज ती बोलत बसली होती. मुलाची नोकरी आहे. सुनेला आधी होती, ती रिट्रेंच झाल्यापासून घरीच आहे. मुलाची कमाई जेमतेमच असावी बहुतेक. हिचा नवरा रिटायर होउन पाच वर्षे झाली. हिची एका फ़ॅक्टरीत नोकरी होती, तीही आता नाही. वय झालं, सतत असेंब्ली लाईन वर बसून पाठ दुखते. हिचही वय आता सदुसष्ट आहेना!”
“आणि मुलगी? एका मुलाबरोबर दिसायची मागे. लग्न झाले नाही का तिचे?”
“मुलीचेच तर दु:ख तिला छळते आहे.”
“म्हणजे काय?”
तेवढ्यात घरी पोहोचलो तेव्हा दार बंद करून मुलगा बाहेर जातांना दिसला. कुठे जातोय, केव्हा येणार ह्या चौकशात सुपरमार्केट म्हातारीचा विषय राहूनच गेला.

एक दिवस रात्री अकरा नंतर नुकतीच झोप लागत होती, अचानक बाहेरून खूप जोरजोराने आरडा ओरडा ऐकू येउन झोप मोड झाली. बेडरूमच्या खिडकीतून पाहिले तर समोरच्या अपार्टमेंट मधूनच आवाज येत आहेत असे लक्षात आले. बरेच लोक खाली जमले होते. थोड्या वेळातच एक अ‍ॅम्ब्युलन्स कर्कश सायरन वाजवत आली. बरोबर आलेल्या महिला मदतनीस भराभरा वर गेल्या. वरच्या फ़्लॅटमधून एका मुलीला घेऊन सगळे खाली आ्ले. ती मुलगी जोरजोरात हिसडे देऊन सुटायचा प्रयत्न करीत होती. तिला स्टॅम्पवाल्या बाईच्या मदतीने कसेबसे व्हॅनमधे बसवले. सायरनच्या भणभणाटात आली तशीच ती व्हॅन रस्त्याला लागली. जमलेले लोक कुजबुज करीत पांगले. पुन्हा एकदा रात्रीच्या शांततेने सगळ्या कॉलोनीचा कबजा घेतला.

सकाळी शेजारणीकडून चित्राला सगळी हकीगत कळली. म्हातारीच्या मुलीला वेडाचा जोराचा झटका आला होता. मागेही एक दोनदा असे झाले होते म्हणे. मुलीच्या बॉयफ़्रेंडनी तिला फ़सवले होते. तिच्याबरोबर आधी नेहमी फ़िरायचा. लग्नाआधी जरा सेटल होउ, एकत्र बिझीनेस काढू म्हणून तिला नादाला लावले. मुलीने नोकरीत थोडाफ़ार पैसा साठवला होता. तो सगळा गेला. वर कर्ज काढून गळ्याभोवती पाश आणखी आवळला. कर्ज चुकवणे अशक्य होते. दिवाळे काढावे लागले. भावाचाही पैसा गेला. मग त्या मुलाने एक दिवस म्हातारीच्या मुलीला सोडून दिले. हे कुटुंब आधीच बेताच्या परिस्थितीतले. म्हातारीचे राहते घर हाच एक आसरा सगळ्यांना उरला. ह्या सगळ्या तणावाने मुलीला वेडाचे झटके येऊ लागले. घरीच रहायची. जास्त हाताबाहेर गेले तर अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून इलाज करवून परत आणायचे. मुलाच्या कमाईवर रोजचे खर्च भागायचे. त्यात हॉस्पीटलमधे रहाण्याचा खर्च परवडणे शक्यच नव्हते.

ही चित्तरकथा ऐकून हळहळण्यापलीकडे आम्ही काय करू शकत होतो? त्यानंतर महिनाभराने पुन्हा ती बाई सुपरमार्केटमधे दिसली. चित्राने तिच्याजवळ मुलीची चवकशी केली. सध्या बरी आहे म्हणली.
“अग तिचे लक्ष हळुहळु इतर गोष्टीत रमव. आपोआपच तिला जुन्या दु:खाचा विसर पडेल. घरबसल्या काही उद्योग का नाही करत तुम्ही? चार पैसे मिळतील” चित्राने सुचवून पाहिले.

“घरी मला शांततेत रहाता आले असते, तर मी स्वत: ह्या आधीच नसता का सुरू केला काही उद्योग!” सू उद्वीग्न होउन म्हणाली. “सुनेला अजूनही नोकरी मिळालेली नाही. ती घरीच असते. कामावर देखील तिचे कोणाशीच पटत नाही. नाहीतर तिच्याबरोबरच काही केले असते ना? मला देखील ती काही करू देत नाही. सारखी भांडणे, त्यात मुलीचा हा प्रॉब्लेम! काही शांतता लाभत नाही घरात. उद्योग कसला करणार!”

“अग मग, निदान एखादी नोकरी तूच का करीत नाहीस? सुपरमार्केटमधे उभे राहून लोकांकडून असे कितीसे स्टॅम्प्स तू जमवणार? कुठल्याही नोकरीत यापेक्षा नक्कीच जास्त कमावशील.” तिचे दिवसभर
दुकानात लोकांना मागून स्टॅम्प्स जमवणे अजुनही चित्राच्या पचनी पडले नव्हते.

“किती ठिकाणी काम मागून पाहीले. माझ्यासारख्या म्हातारीला कोणीच काम देत नाही. आणि मी इथे खूप कमवण्याच्या उद्देशाने येतच नाही. स्टॅम्प्स मिळो न मिळो. मला काही फ़रक पडत नाही. निदान इथे येऊन घरातल्या कटकटींपासून घटकाभर मुक्ती मात्र नक्कीच मिळते. शिवाय जे काही स्टॅम्प्स मिळतात, त्याचे समाधान वेगळेच! ह्या लहानशा गोष्टीच मनाला खूप शांतता देऊन जातात!”

बाहेरच्या झाडांवरच्या सावल्यां दुकानातल्या प्रकाशात विरून जात होत्या. घरातल्या छाये्तील कोलाहलात तिला मनस्वाथ्य सापडले नव्हते. झाडावरच्या असंख्य साळुंक्यांचा कलकलाट तिची शांती भंग करीत नव्हता. तो कोलाहाल कानामागे टाकण्यासाठी आम्ही बाहेरच्या सावल्या मागे टाकून घरचा रस्ता धरला. सावल्यांचे सावट मनावर पडू न देण्याचा हाच एक उपाय आम्हाला माहित होता.

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

रेवती's picture

20 Jan 2011 - 7:32 am | रेवती

असे लोक पाहिले की दया येते.
बरेच वयस्कर टोल नाक्यांवर काम करतात.
कार तिथे गेली आणि सुरकुतलेला, किंचित थरथरणारा हात बाहेर आला कि मी मनुष्याकडे पहायचं टाळते.
कथा छान आहे. शेवट जास्त आवडला.

काम करत करत प्रतिष्ठेने जगणारे म्हातारे लोक पाहीले की एक प्रकारे त्यांना काम आणि प्रतिष्ठा आहे याचं बरं वाटतं. कथा आवडली.

नगरीनिरंजन's picture

20 Jan 2011 - 8:05 am | नगरीनिरंजन

अशा गोष्टी पाहून काळजाला घरं पडतात आणि मग कळतं की आपण किती सुखी आहोत ते.
गोष्ट छान लिहीली आहे.
>>तो कोलाहाल कानामागे टाकण्यासाठी आम्ही बाहेरच्या सावल्या मागे टाकून घरचा रस्ता धरला. सावल्यांचे सावट मनावर पडू न देण्याचा हाच एक उपाय आम्हाला माहित होता.
हे अगदी खरं. स्वतःच्या सुरक्षित निवार्‍यात बसून बाहेरचे नागडे, भयाण दु:ख आपल्या मनापर्यंत पोचू न देता जगणारी आपण मध्यमवर्गीय माणसं.

मुलूखावेगळी's picture

20 Jan 2011 - 11:24 am | मुलूखावेगळी

+१

आपल्याला जमतय तेव्हढ करण हेच आपल्या हातात असत. तुम्ही अन चित्रा ताईंनी तेव्हढ केल हेच खुप झाल नाही का?

सहज's picture

20 Jan 2011 - 11:22 am | सहज

>सावल्यांचे सावट मनावर पडू न देण्याचा हाच एक उपाय आम्हाला माहित होता.

कसलं काय? अजिबात नाही उलट कथेच्या सावलीचा वापर करुन पार 'वायांग कुलीत ' दाखवलेत आम्हाला.

अरुण मनोहर's picture

20 Jan 2011 - 12:16 pm | अरुण मनोहर

वायांग कुलीत ची उपमा आवडली. आयुष्य हीच एक वायांग कुलीत (नौटंकी) आहे नाही का?

भीडस्त's picture

20 Jan 2011 - 11:53 am | भीडस्त

छानच..

यशोधरा's picture

20 Jan 2011 - 12:41 pm | यशोधरा

ह्म्म..

५० फक्त's picture

20 Jan 2011 - 2:23 pm | ५० फक्त

>>तो कोलाहाल कानामागे टाकण्यासाठी आम्ही बाहेरच्या सावल्या मागे टाकून घरचा रस्ता धरला. सावल्यांचे सावट मनावर पडू न
देण्याचा हाच एक उपाय आम्हाला माहित होता.
हे अगदी खरं. स्वतःच्या सुरक्षित निवार्‍यात बसून बाहेरचे नागडे, भयाण दु:ख आपल्या मनापर्यंत पोचू न देता जगणारी आपण मध्यमवर्गीय माणसं.

+१ नगरीनिरंजन, अगदी मनातलं बोललात, आपण ही कधीहि आपल्यावर हल्ला करु शकणारी दुखः फक्त दुर्लक्ष करुन बाजुला करतो, पण त्यानं ती नाहीशी होत नाहीत याची आपल्याला जाणिवच नसते.

हर्षद.

पैसा's picture

20 Jan 2011 - 4:29 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच सुंदर कथा. शेवट खूप आवडला. ज्या प्रश्नाना आपण उत्तर देऊ शकत नाही, त्यांच्यापासून दूर आपल्या कंफर्ट झोनमधे पळून जाण्याशिवाय आपण काय करू शकतो?

निशब्द ..

तरीही अशी कथा वाचुन प्रत्येक्षात काहीच करु न शकणार्या प्रत्येकाने जरी अशे ठरवले की, आपल्या घरातील सुरकुतलेल्या चेहर्‍यांवर कायम आनंदाची.. सुखाची एक लकीर उमटवली पाहिजे तरी खुप सार्थक वाटेल.

अरुण मनोहर's picture

20 Jan 2011 - 4:49 pm | अरुण मनोहर

>>आपल्या घरातील सुरकुतलेल्या चेहर्‍यांवर कायम आनंदाची.. सुखाची एक लकीर उमटवली पाहिजे तरी खुप सार्थक वाटेल.<<

गणेशा, तुमचे हे विचार खूप आवडले आणि अगदी समर्पक आहेत.

प्रतिसाद चूक आणि त्यामुळे त्याची प्रशंसाही.

कारण गोष्टी वाचून बोध घेणारे असे करत नाहीत आणि करणारे लोक मिपासारख्या गोष्टींच्या भानगडीत पडत नाही.

वृद्ध स्त्रीबद्दल सहानुभूती आणि लफंग्यावर विश्वास टाकणार्‍या मुलीची दुर्दशा बघून बरे वाटले.

अवलिया's picture

20 Jan 2011 - 6:25 pm | अवलिया

हं....

लवंगी's picture

20 Jan 2011 - 7:57 pm | लवंगी

काल इथे वालमार्ट मध्ये काम करणार्‍या ७५रीच्या हसर्‍या ताठ म्हातार्‍या माणासावर, एक बाई तो थोडा संथ होता म्हणून वाटेल तशी ओरडत होती.. खरच इतका संताप आलेला मला त्या बयेचा, पण त्या माणसाच्या चेहर्‍यावरच हसू काही मावळल नाही.. माझ्या चेहर्‍यावरचे भाव पाहून त्याने मलाच उलट "चालयचच" म्हणून माझच सांत्वन केल.. बाहेर निघताना स्टोअरमानेजरला त्या बाईच्या उद्धटपणाबद्दल सांगण्यापलीकडे मी काहिच करू शकले नाही..

या वयात पण स्वावलंबनाने जगणारी माणस पाहिली कि खरच खूप समाधान वाटत.. वाईट तेंव्हाच वाटत जेंव्हा त्यांना वाईट वागणूक मिळते.

>> या वयात पण स्वावलंबनाने जगणारी माणस पाहिली कि खरच खूप समाधान वाटत.. वाईट तेंव्हाच वाटत जेंव्हा त्यांना वाईट वागणूक मिळते.

बरोबर आहे..

आणि यांना काही नको असते , फक्त काका , मामा आपुलकीने बोलले तरी त्यांना खुप आनंद होतो , इतका की त्यांचा मुलगाच जणु त्यांच्या पुढे उभा राहुन आपौलकीने बोलतो आहे.

काल इथे वालमार्ट मध्ये काम करणार्‍या ७५रीच्या हसर्‍या ताठ म्हातार्‍या माणासावर, एक बाई तो थोडा संथ होता म्हणून वाटेल तशी ओरडत होती.

वॉलमार्ट मध्ये खूप वेळा हे बघितलं आहे....सुरुवातीला खूप त्रास व्हायचा. वाटायचं की इथे लोक त्यांच्या वडिलांच्या वयाच्या व्यक्तीला मान देत नाहीत. पण हे ही तितकंच खरं आहे की कोणत्याही वयाच्या व्यक्तीला समान वागणूक मिळते. आपल्या आणि त्यांच्या मान देण्याच्या पद्धतीत फरक आहे. इतक्या वयस्कर व्यक्तीला तिथे काम करण्याची संधी देणं हे पण एक प्रकारे मान देण्यासारखं आहे.
फक्त वॉलमार्ट मध्येच नव्हे तर अनेक नॅशनल पार्क्स किंवा स्टेट पार्क्स मध्ये खूप म्हातार्या व्यक्ती आढळून येतात. त्यांनी तिथे नोकर्या करण्याची कारणं, लेखात सांगितल्याप्रमाणे खूप वैयक्तिक आहेत.

लेख सुंदर आहे!

मनीषा's picture

21 Jan 2011 - 7:29 am | मनीषा

++१

हेच काही घरांमध्ये सुद्धा बघायला मिळते ..

आपल्या स्वतः च्या च्या आई वडिलां प्रमाणेच सासू सासरे वृद्ध आहेत ..आणि त्यांनीही आपल्या मुलांसाठी आयुष्यभर भरपूर कष्ट आणि त्याग केले आहेत, हे विसरून त्यांच्याकडून म्हणावी तितकी मदत मिळत नाही म्हणून तक्रार करणार्‍या आणि त्यांच्याकडे नसलेल्या पैशांवरून त्यांची अवहेलना करणार्‍या बायकांचा सुद्धा मला असाच राग येतो ..

लवंगी's picture

21 Jan 2011 - 8:16 pm | लवंगी

अशावेळी म्हातारपण शाप वाटू लागत..

सर्वसाक्षी's picture

20 Jan 2011 - 8:34 pm | सर्वसाक्षी

नकळत आपल्याला गुंतवतात. आपण त्यांचा विचार सहजी हटवु शकत नाही.
नाईलाजाने उतारवयातही अनेकांना काम करावे लागते. खरेतर सरकारी कचेर्‍यांमध्ये ज्या गतीने काम चालते त्यापेक्षा हे वयोवृद्ध बरे. पण नियमाने त्यांना काम देता येत नाही. त्यांना किमान मानाची वागणुक द्या.

वास्तविकतः ज्येष्ठांना आदराची वागणुक द्या हे समाजातील सुशिक्षित लोकांना सांगायला लागावे हे दुर्दैव आहे. निवृत्तिवेतनाची चौकशी करायला आलेल्या एखाद्या म्हातार्‍याला जेव्हा बँकेचे कर्मचारी हिडीस फिडीस करतात वा उर्मट उत्तरे देतात तेव्हा त्यांची कॉलर धरुन सांगावेसे वाटते की बाबारे, तुलाही एक दिवस निवृत्त व्हायचे आहे.

कसं तरीच होत असं काही पाहिलं की.
इथे सुस्थितीत असणारी म्हातारी लोकं, शाळांमध्ये, लायब्ररी मध्ये व्हॉलेंटीयर करताना दिसतात.. पण स्टोअर्स मध्ये चेकाअऊट काऊंटर वर अशा म्हातार्‍या स्त्रिया पुरूष पाहिले की, मनांत दोनच गोष्टी येतात.
१. एक तर जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत काम करणार.. अशी यांची वृत्ती, खूप चांगली आहे असे वाटते. आणि त्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये "आम्ही केलं आयुष्यभर आता मुलाने आमच्यासाठी करावे.. अशी अपेक्षा/हट्ट करून राहणारे काही पालक डोळ्यांसमोर येतात.

आणि दुसरे
२. ही लोकं इथे काम करतात्/किंवा यांना करावं लागत असावं.. कारण इथली कुटुंब व्यवस्था. मुले मोठी झाली की वेगळं घर घेऊन रहाणे.. वगैरे. आणि त्या पार्शभूमीवर भारतीय कुटुंब व्यवस्था चांगली आहे अजूनतरी असं वाटतं.

नेमकं काय चांगलं हे ठरवताना मात्र नेहमीच गोंधळ होतो मनाचा.