नार देखणी..(लावणी)

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
19 Jan 2011 - 10:22 pm

नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी
नजर कट्यारी, टंच उभारी, मुसमुसलेली ज्वानी
अहो राजसा, जवळी बसा, ऐकून घ्या मागणी
माझी... ऐकून घ्या मागणी..

मान वळविते, जरा झटकते, डौल हंसापरी
असा शिणगार, नव रत्नहार, गोर्‍या कांतीवरी
विशाल भाळी, आणा बिंदली, लखलख चंद्रावाणी
माझी... ऐकून घ्या मागणी..

गर्भ रेशमी, रंग कांचनी, शालू हा भरजरी
मखमल चोळी, निळी जांभळी, नक्षी काठावरी
कमर साजिरी, बंद चंदेरी, घाला मज आणुनी
माझी... ऐकून घ्या मागणी..

धुंद गारवा, मनी काजवा, लुकलुक करतो भारी
विडा केशरी, रंगतो परी, मैफ़िल सजते न्यारी
बसा पळभरी, देह कस्तुरी, लुटेल दुजा कुणी
माझी... ऐकून घ्या मागणी..

- प्राजु

शृंगारकविता

प्रतिक्रिया

वा! वाचतानाच ठेका आपोआप येत जातो.
कमर साजिरी, बंद चंदेरी, घाला मज आणुनी
इथं येऊन जरासे अडल्यासारखे वाटते पण तरीही लावणी जमली आहे.

टारझन's picture

20 Jan 2011 - 1:16 pm | टारझन

वा! वाचतानाच ठेका आपोआप येत जातो.

अगदी !! :) लावणी फक्कड आहे :)

-(चौफुल्या वरचा) नारायण नाद करी

लावणी जमून गेली आहे! जरा ठेक्यात वाचायचा प्रयत्न केल्यास रामजोशींच्या 'सुंदरा मनामध्ये भरली' प्रमाणे रचना आहे असं वाटून गेलं!
म्हणजे शाहीर पहिली ओळ म्हणतो आहे 'नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी' आणि मागाहून कोरस येतो आहे 'थिरके हिरव्या रानी'.... जमतंय खासच!! :-)
पण इथे शाहीर गात नसून स्वत: नर्तकी गाते आहे असा भाव आहे लावणीचा. ये ब्बात!!! पण केवळ, 'सुंदरा'चे संस्कार आहेत असं वाटल्याने शाहीर स्वत: गायले असते तर मजा आला असता!

मस्तच!

--असुर

दैत्य's picture

20 Jan 2011 - 3:38 am | दैत्य

फेटे उडाले!

प्रकाश१११'s picture

20 Jan 2011 - 5:52 am | प्रकाश१११

मान वळविते, जरा झटकते, डौल हंसापरी
असा शिणगार, नव रत्नहार, गोर्‍या कांतीवरी
विशाल भाळी, आणा बिंदली, लखलख चंद्रावाणी
मस्त लावणी. वा !!

अनामिक's picture

20 Jan 2011 - 8:36 am | अनामिक

लयदार लावणी आवडली!

राघव's picture

20 Jan 2011 - 11:23 pm | राघव

असेच म्हणतो! :)

राघव

दत्ता काळे's picture

20 Jan 2011 - 9:52 am | दत्ता काळे

नार देखणी, जणू मोरनी, थिरके हिरव्या रानी
नजर कट्यारी, टंच उभारी, मुसमुसलेली ज्वानी
अहो राजसा, जवळी बसा, ऐकून घ्या मागणी
माझी... ऐकून घ्या मागणी..

.. लावणीचा फिट्ट बाज जमलाय मस्तं.

छोटा डॉन's picture

20 Jan 2011 - 9:53 am | छोटा डॉन

मस्त रचना.
आवडली !

- छोटा डॉन

पियुशा's picture

20 Jan 2011 - 10:22 am | पियुशा

क्या बात !

पाषाणभेद's picture

20 Jan 2011 - 10:24 am | पाषाणभेद

एकदम मस्त

स्पंदना's picture

20 Jan 2011 - 11:01 am | स्पंदना

व्वा! मस्त जमले!!

प्राजु जोरदार शिट्या.
मस्तच ग. कोणाला लावण्या आवडत नसतील त्यांना ही लावणी वाचुन नक्कीच आवडायला लागतील.

प्रत्येक कडवे एक से बधकर एक आहे ..
सुरुवात अआणि शेवट तर खुपच सही आहे.

अप्रतिम लावणी ..

लिहित रहा .. वाचत आहे

महेश काळे's picture

20 Jan 2011 - 1:55 pm | महेश काळे

---------------------------------------------------------
गर्भ रेशमी, रंग कांचनी, शालू हा भरजरी
मखमल चोळी, निळी जांभळी, नक्षी काठावरी
---------------------------------------------------------

ठसकेबाज लावणी !!!

वाह वाह...

वा प्राजू! अगदी मस्त. नर्तिकेची छबी डोळ्यासमोर उभी केलीस.
शेवटी "म्हणे होनाजी हाssssssssssssssssss!" सारखी तुझ्या नावाची एक ओळ टाकता आली असती तर मजा वाढली असती! पण आहे तशी सुद्धा मस्तच जमली आहे.

अवलिया's picture

20 Jan 2011 - 6:13 pm | अवलिया

जबरा !!

मेघवेडा's picture

20 Jan 2011 - 6:24 pm | मेघवेडा

फ्फेटं उडलं च्याम्मारी.. लै लै खास!!

प्राजु's picture

20 Jan 2011 - 7:18 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार. :)

पुष्करिणी's picture

20 Jan 2011 - 7:32 pm | पुष्करिणी

लावणी मस्त झालीय, एकदम ठसकेबाज!

चित्रा's picture

21 Jan 2011 - 1:58 am | चित्रा

लावणी सुरेख आहे. लावणी पेश करणारीचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.

पण प्राजुकडून या नेहमीच्या माहिती असलेल्या (तशा जुन्या) विश्वापेक्षा वेगळ्या काहीतरी कविता लिहील्या जाव्यात असे वाटते. चांगल्या कवीवर जबाबदारीही जास्त असते. :)