कोण्या सुस्त दुपारी असता भानू धरा जाळीत
कोणी अर्ध जागृत पहुडले कोणी सुरा ऐकीत
रस्ते एकले झळा झेलीता पसरुनी सुस्तावले
छाया किंचीत कुठे तरी तिच्या उष्म्याने ताडीयले
झिजल्या पायतणाला ओढीत महिला फ़ळे घेउनी
भिजल्या पदराशी घट्ट धरुनी शिरभार सांभाळुनी
संत्री घ्या संत्री वदे अविरत आवाजही चिरकला
घर्मे अंग पाणी ते निथळता शुष्कावला कि गळा
नसे मुळीच जाणीव तिजला नव्हती भूक तहान
विकतील का फ़ळे थोडी, घरी निजले बाळ लहान
संत्री संत्री स्वरांमुळे उघडले गृहद्वार कोणी तरी
निद्रा नष्ट झाली यास्तव तो वदिला क्रोधित स्वरी
भाव काय बोल गे झडकरी का झोप तू मोडिली
संत्री स्वस्त चांगलीही नसता घेणार नाही मुळी
आशा जागृत जाहली चमकली नजरेत काकुळता
घ्या साहेब संत्री मस्त दिधली सौदा असे स्वस्तसा
काही फ़ोडी चाखिल्या न काही वरचे वरी दाबुनी
यजमाना पटला नाही सवदा उतरला मनामधुनी
गेली गेली क्षणी हवेत विरली रात्रीची ती भाकरी
द्या साहेब थंड जल मी असे तहानली दिनभरी
दर्शवून अंगुली नळाकडे मग घरामाजी तो परतला
वाळ्याच्या गारव्यात पोटभरुनी मधुर तक्र प्यायला
उष्णाउष्ण जळास ओंजळुनिया घटघटा ती प्यायली
घेउनी शिरभार डोईस महिला ग्रीष्मात ती हरवली
रस्त्याच्या छायेतही पसरला वैशाखवणवा जसा
यजमाना घरी गारवा परी मनी, ग्रीष्मायु तो शुष्कसा
प्रतिक्रिया
18 Jan 2011 - 7:01 am | शुचि
सुंदर चित्रदर्शी कविता आहे.
फक्त ग्रीष्मायु चा समासविग्रह (फोड, अर्थ) काही कळला नाही : (
ग्रीष्म + आयु मनी कसा?
18 Jan 2011 - 7:05 am | अरुण मनोहर
धन्यवाद.
घाईमधे चुकले आहे. "ग्रीष्म्वायु" म्हणता येईल, अर्थात हा समास प्रचलित नाही म्हणा!
18 Jan 2011 - 10:49 am | स्पंदना
नाही काका. कवीला शब्द फिरवण्याचा असलेला अधिकार घेउन आहे तोच शब्द मला बरोबर वाटतो.
18 Jan 2011 - 5:55 pm | पाषाणभेद
सुचीताई म्हणतात तशी एकदम चित्रदर्शी कविता.
"यजमाना घरी गारवा परी मनी, ग्रीष्मायु तो शुष्कसा" या ऐवजी
"यजमाना घरी गारवा, परी मनी ग्रीष्मायु तो शुष्कसा" असे पाहिजे होते असे वाटते.
18 Jan 2011 - 6:04 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त !
वैशाख वणवा माहिती होता पण हि छाया पण सुरेख.
18 Jan 2011 - 7:22 pm | गणेशा
छान कविता