एअरपोर्ट..

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
16 Jan 2011 - 12:16 pm

काल्पनिक. साम्य आढळल्यास योगायोग वगैरे.. नेहमीचंच..

ऑनलाईन पूर्वप्रसिद्धी: मोगरा फुलला दिवाळी अंक.

तिथे ज्यांनी वाचली नसेल त्या मिपाकरांसाठी..

ज्यांनी ऑलरेडी वाचली असेल त्यांना इथे रिपिटिशनबद्दल सॉरी.. आवडली असेल अशी आशा..

-गवि.

.......................................................................................................................

तसा हा एअरपोर्ट एअरफोर्सचा आहे. आम्ही, म्हणजे माझी अन्नदाती एअरलाईन, स्पेशल परमिशन घेऊन दिवसाला चार पॅसेंजर फ्लाईटसाठी त्यांचा रनवे आणि एका साईडचं टर्मिनल वापरतो. फी भरून. त्या छोट्या टर्मिनल बिल्डींगमध्ये पार्टिशन टाकून अरायव्हल आणि डिपार्चर वेगवेगळे केलेत.

त्याच टर्मिनलमध्ये एक छोटी खोली घेऊन आमच्या कंपनीनं तीन लोकांना बसता येईल एवढं छोटं ऑफिस बनवलं आहे. उपकार आमच्यावर..नाहीतर मी ऑपरेशन्सवाला असूनही पूर्वी तिकीट काउन्टरच्या आतच बसायचो एक खुर्ची टाकून.

मला "बेस ऑपरेशन्स ऑफिसर" अशा उद्देशानं या बेस वर पाठवण्यात आलं.

"तुला हा बेस एस्टॅब्लीश करायचाय स्क्रॅचपासून.. सुरुवातीला तू एकटाच असशील आणि लवकरच तुला आणखी ऑफिसर्स मदतीला येतील" अशा बोलीवर मी इथे आलो आणि ते "आणखी" ऑफिसर्स इतक्या वर्षांत कधीच आले नाहीत. त्यामुळे मीच इथे सगळी फ्लाईट ऑपरेशन्स पाहतो.

पॅसेंजर्स च्या हँडलिंगसाठी वेगळा स्टाफ आहे. पण त्यात कोणी कमी पडले तर मी अनाउन्समेंट,बोर्डिंग पास फाडून पॅसेंजर्स न विमानात चढवणे वगैरे कामंही करतो. कारण त्यात दिरंगाई झाली तर फ्लाईट्चा मी शेड्यूल केलेला टाईम टळतो आणि मलाच क्लीअरन्सेस परत घेत बसावे लागतात.

मर्सिडीझ वगैरे मोठ्ठ्या गाड्यांची मिनीएचर मोडेल असतात तसा आमचा हा छोटासा एअरपोर्ट. एवढ्याशा जागेत सगळं अव्हेलेबल आहे. एस.टी.डी. बूथ, कॉफी मशीनयुक्त स्नॅक स्टॉल, इव्हन एक छोटंसं गिफ्ट शॉप सुद्धा.

बाकी एअरपोर्ट आहे म्हटल्यावर तिकीट काऊन्टर, बोर्डिंग काऊन्टर, पडदानशीन बाईसारखं बॅगेज एक्स रे मशीन, काळपट अजगरासारखा लांब कन्व्हेयर बेल्ट, पब्लिक अनाउन्समेंट बूथ हे आलंच.

तसा एअरपोर्टवर दिवसभर शुकशुकाट असतो. भल्या पहाटे येणारी एक फ्लाईट उगीच सगळ्या एअरपोर्टला उठवून ठेवते. झोप न येणारे पेन्शनर म्हातारे जसे उगीच सक्काळी सक्काळी तरुण पोरांची पांघरूणं खेचत बसतात तसं..

त्या फ्लाइट्च्या आधी तीन तास उठून मला वेदर रिपोर्ट घ्यावाच लागतो. पहाटेच्या अंधारात चाचपडत मी हपीस उघडतो. किल्ली माझ्याकडेच आहे. मेटार म्हणून जो विमानांसाठी खास बनवलेला वेदर रिपोर्ट असतो तो मी एअरफोर्सच्या टॉवरला फोन लावून खरडून घेतो. तिथला पेंगुळलेला कॉर्पोरल झोपेतच रिपोर्ट बरळतो आणि परत झोपतो. मला मात्र तसं करता येत नाही. कारण लगेचच मला फ्लाईट प्लॅन फाईल करून सर्व क्लीअरन्सेस घ्यायचे असतात. मी त्या वेदर रिपोर्टमध्ये व्हीजीबिलीटी दोन हजार फुटांपेक्षा जास्त आहे ना ते फक्त बघतो आणि मग शांत होतो.

आणि तो रिपोर्टही मी उगीच बघतो कारण रनवे व्हीजीबिलीटी मी बाहेर नुसत्या डोळ्यांनी बघून ठेवलेली असतेच.

त्यासाठी मी अंधारातच रनवेवर चालत जातो आणि त्याच्या लांबच्या टोकाला असलेला एक ठराविक दिवा बघतो. तो दिसला की व्हीजीबिलीटी एकदम मस्त आणि पुरेशी असतेच.

पायलट्सनाही तेवढीच माहिती हवी असते. व्हीजीबिलीटी चांगली तर बाकी सर्व चांगलंच..

पूर्वी फ्लाईंग शिकलेलं असल्यानं मला ते नीट माहिती आहे. आपण पायलट असूनही पुढे करिअर न करता आल्यानं ग्राउंडवर्क करतो याचा मला कुठेतरी गंडही आहेच.

ढग काय? क्युम्युलोनिम्बस डेंजरस.. तेही अगदी लँडिंग झोन मध्ये असतील तर. एरव्ही विमान सगळ्या हवामानाच्या खूप वरूनच उडत असतं.

बाकी ते वा-याचा वेग आणि दिशा वगैरे यंव यंव हजार गोष्टी तशाही क्षणाक्षणाला बदलतात आणि त्या खूप आधी माहीत होऊनही त्यात पायलट काहीच करू शकत नाही. रनवेच्या ज्या टोकाला उतरायचं त्या टोकाचा वा-याचा जमिनीलगतचा लँडिंगच्या क्षणी असू शकणारा वेग आणि दिशा आधीच सांगायची तर प्रत्येक ओब्झर्वेट्रीमध्ये मिस्टर ब्रह्मदेव यांनाच बसवून ते शक्य आहे. पण आपण आपली सुरक्षाकंडुशमनार्थ सगळी माहिती मागवायची बस्स.

आणखी एक माहिती म्हणजे मी याच एअरपोर्टवर राहतो. म्हणजे रात्री झोपायला जवळच एका ठिकाणी मी सोय ठेवली आहे. पण पहाटेच्या अंधारापासून रात्रीच्या अंधारापर्यंत मी इथेच असतो. हेच माझं घर आहे. कारण सकाळी आलेलं तेच ते विमान मी इथून दिवसभर वेगवेगळ्या सेक्टर्सवर पिदवतो आणि रात्री शेवटची फ्लाईट बनवून त्याला मूळ बेस वर परत पाठवतो. रात्री मुक्कामाला विमान ठेवायला एअरफोर्सची परवानगी नाही.

मग त्या दिवसभराच्या सर्व फ्लाइट्ससाठी टेकऑफ पूर्वी आमच्या नवसाच्या एकुलत्या विमानाचं काजळ, तीट, अंगडं-टोपडं करणं आणि ते फिरून परत आल्यावर त्याची शी शू काढणं यासाठी मला सर्व वेळ तिथंच असावं लागतं.

दुपारी मी दोन फ्लाईट्सच्या मधल्या वेळात कार्गो रूमच्या बाजूला आमची इंजिनीअरिंग रूम आहे त्यात झोपतो. तिथे कोणीच येऊ शकत नाही कारण परवानगीच नाही. तिथे जायला दरवाजा नाही. खूप लांब फिरून जावं लागतं. म्हणून मी कन्व्हेयर बेल्टवर बसून कार्गोत पोचतो आणि मग झोपायला जातो. ती माझी एक सिक्रेट गुहा आहे.

आमचा चीफ इंजीनीअर म्हणजे बंगाली म्हातारा सेनगुप्ता. पण तो स्वत:च फोनवर वगैरे "शेणगुत्ता हियर" असा स्वत:चा उल्लेख करत असल्यानं मग इथला मराठी वर्ग म्हणजे लोडर्स, सिक्युरिटी गार्डस वगैरे त्याला शेणगुत्ताच म्हणतात. किंवा नुसतंच गुत्ता.

गुत्ता एअरफोर्सचा रिटायर्ड सार्जंट आहे. पूर्वी एअरफोर्स मध्ये टेक्निशियन किंवा इंजीनिअर असावा. कंपनीने त्याला आमच्या विमानाची दुरुस्ती शिकायला झेक रिपब्लिकला पाठवलं होतं. तेव्हापासून जेव्हा तेव्हा "व्हेन आय वॉज इन चेकलीबाब्लिक...यु नो" करून बोबडं बोलत राहतो. मला तो "चेकलीबाब्लिक" ला म्हणजे नक्की कुठे होता हे कळायलाच खूप महिने लागले होते.

आमचे सर्व म्हणजे एकूण एक पायलट्स एक्स- एअरफोर्स ऑफिसर्स आहेत. दलबीर हा माझ्याच बेसवर असतो. तो पूर्वी एअरफोर्समध्ये ग्रुप कॅप्टन होता. त्याच्या शौर्य कथा सगळ्या फोर्समध्ये सांगितल्या जायच्या. मिग आणि सुखोईवर त्याची कमांड होती. खूप मोठा स्टाफ एकेकाळी हवाई दलात त्याच्या हाताखाली होता. फायटर विमानाच्या टेक ऑफ नंतर लगेचच बिघाड होऊन त्याचे आफ्टर बर्नर्स इंजिनसहित ब्लास्ट झाले तरी दलबीरनं काहीच न झाल्याप्रमाणे शांत मनाने लँड केलं. त्या नंतरच्या मेडिकलमध्ये त्याचं बी.पी. आणि पल्स सुद्धा एकदम नॉर्मल होतं. इतर कोणी हबक्यांनंच मेला असता.

तो आता फोर्समधून रिटायर होऊन आमच्या एअरलाईनमध्ये छोटं पॅसेंजर विमान उडवतो.

बाकीचेही सगळे तसेच. कोणी विंग कमांडर तर कोणी आणि काही.

को-पायलट्स मात्र सगळी तरुण पोरं. सिव्हील सेक्टर मधली नवी नवी पायलट झालेली. बड्या बापाची पोरं. नाईटलाईफ, मौजमजा हे सर्व त्यांचं मेन लाईफ आहे. फ्लाईंग हा टाईमपास.

आमचं विमान खूप छोटं आहे. म्हणजे बीचक्राफ्टचं एक मॉडेल. वीस सीटर आणि टॉयलेट बसवलं तर दोन सीट आणखी कमी. माझ्या बेसवर येणारं विमान बिना टॉयलेटचं आहे.
आणि आमचे सेक्टर्ससुद्धा छोट्या आणि मिडीयम आकाराच्या शहरांना जोडणारे आहेत. म्हणजे नागपूर, इंदोर, गोवा वगैरे. तसा आमच्या कंपनीचा जीव छोटा आहे.

या विमानात दोन पायलट आणि एकच होस्टेस असते.

सकाळची तब्बल दीड तासाची केवढी तरी मोठ्ठी फ्लाईट करून थकून आलेल्या दोन पायलट्स आणि सुंदरीला हॉटेलवर सोडायला मी गाडी तयार ठेवलेली असते. ड्रायव्हरला चिठ्ठी देऊनही तो पिकअप आणि ड्रॉपचे घोळ करतोच.

माझ्याकडे, माझ्या बेसवर एकूण तीन एअर होस्टेस आहेत. बस्स तीनच. आणि त्यांच्यावर मला दोन फ्लाईट दिवसभरात चालवायच्या असतात.

सकाळी बेस वरून विमानासोबत आलेली सुंदरी संध्याकाळी शेवटची फ्लाईट घेऊन परत जाते. मधल्या काळात ती हॉटेलमध्ये जाऊन मस्त झोपा काढते. फ्लाईंग क्रूच्या ड्युटीअवर्सना कायद्याची बंधनं आहेत. आम्हा जमिनीवर सरपटणा-यांना ती नाहीत.

मग मधल्या दोन फ्लाईट्ससाठी मला लोकल सुंदरींची नितांत जरुरी पडते. इथे माझे कोअर इश्यूज सुरु होतात. प्रत्येकीला आठवड्यातून दोन सुट्ट्या द्यायच्या. आठ तासाहून जास्त ड्यूटी सलग द्यायची नाही. वगैरे वगैरे मी मॅनेज करतोच. पण त्यांनी दांड्या मारल्या की माझी वाट लागते. रजेचं कारण विचारलं की माझ्या कानाला लागून हळूच "पीरीयड्स" असं कुजबुजतात. मला त्यावर काही म्हणजे काहीच बोलता येत नाही. हे आता इतकं कॉमन झालंय की मुलींना महिन्यातून कितीदा "पीरीयड्स" येतात याविषयी मला शंका यायला लागली आहे. मी शेवटी नाईलाजानं तिघींच्या सायकल्सचं गुप्त रेकोर्ड ठेवलं आहे. एकाच सुंदरीचा पिरीयड पंधरवड्यात दुस-यांदा आला की मी सरळ हरकत नोंदवतो आणि रजा नाकारतो.
हे विचित्र आहे पण कंपनी मला याहून एकही सुंदरी जास्त द्यायला तयार नाही आणि म्हणून ज्या आहेत त्यांना खूप रजा देणं मला शक्यच नाही.

दीप्ती सावर्डेकर, रिटा मेनन आणि निकिता सबरवाल या तिघी मुळात एअरहोस्टेस नाहीतच.
आधी सकाळच्या फ्लाईटसोबत मेन बेस वरून दुपारची होस्टेस पॅसेंजर म्हणून यायची आणि पुढचे दोन सेक्टर करायची. पण त्यात एक सीट कायमची अडायची. बुकिंग वाढायला लागलं आणि सीट ठेवणं परवडेना. तेव्हा मला माझ्याच बेसवरच शहरातल्या लोकल मुलींतून तीन मुली ताबडतोब शोधून आणण्याची ऑर्डर आली. आकर्षक व्यक्तिमत्व आणि कमी पगारात काम करायची तयारी एवढंच हवं होतं. बाकी कोर्सबीर्स काही नको.

मी हडबडून कुठून कुठून कुंथून कुंथून दोन मुली आणल्या. दीप्ती एका बर्गरवाल्या हॉटेलमध्ये काउन्टर गर्ल होती, आणि रिटा एका एअरहोस्टेस ट्रेनिंग स्कूलची ड्रॉपआउट. त्यांना झटपट दोन आठवड्याचं ट्रेनिंग देऊन कामाला लावून टाकलं. तिसरी निकिता म्हणजे गोरी ब्लू आईड ब्यूटी.. सोळा सतराची असेल. ती एका लष्करी अधिका-याची मुलगी होती. ती कोणातरी पायलटच्या ओळखीनं आली.
निकिताला तर मी कधीच लीव्ह देत नाही. एक तर तिला आपल्या बापाच्या पोझिशनचा माज आहे. आणि रजा मागताना ती शर्टाची वरची दोन बटणं उघडी ठेवून रजा मागते. तिचं प्रत्येक बाबतीत क्लीव्हेज वापरणं मला आजीबात आवडत नाही. सरळ मागेल तर मी देईनसुद्धा.

दीप्ती पहिल्या दिवशी आली तेव्हा खूप बावरलेली होती. एकदम मध्यम वर्गीय मराठी मुलगी. थरथर कापतच होती बोलताना. नंतर मात्र सरावली. रिटा मेनन काळीच होती. पण देखणी एकदम. ती ही खूप साधी सुधी होती.

मग त्या तिघी कामात सरावल्या. आम्ही त्यानंतर मैत्री केली.

कंपनी ड्रायव्हर शिवाजी..शिवा..त्याची गाडी त्याच्यासकट आम्ही कॉन्ट्रॅक्टवर घेतली आहे. शिवा चांगला आहे खूप. पिकअपचे घोळ करतो. ब-याचदा दलबीरला किंवा निकिताला विसरून येतो. मग मी दलबीरचा आणि शिवा माझा ओरडा खातो. पण मनानं खूप चांगला. आम्ही त्याच्या गाडीत स्वत:च्या खर्चानं पेट्रोल टाकून त्याला कधीकधी पिकनिकला नेतो.

आम्ही म्हणजे मी रिटा आणि दीप्ती. निकिताला आम्ही घेत नाही.

जवळच्याच किल्ल्यावर शिवाच्या गाडीतून जाऊन एका रविवारी आम्ही मजा केली. पाऊस होता. धुकंही जाम. सर्वांनी व्होडका घेतली होती. वाटेतच. मी सिगारेट ओढत नाही. शिवा पण. पण दोन्ही मुली एकामागून एक सिगारेटी ओढत होत्या. मला रिटाला सांगावंसं वाटलं नाही. ती खूप पूर्वीपासूनच स्मोक करते. पण दीप्ती हल्लीच निकिता आणि रिटाच्या नादानं किंवा दबावाखाली ओढायला लागली होती. म्हणून दीप्तीला मी म्हटलं की मला तू सिगारेट ओढलेली आवडत नाहीये.
फक्त तिच्याच बाबतीत मी असं म्हटलं म्हणून तिला छान वाटलं असावं. तिनं मग मला प्रॉमिस केलं की नाही ओढणार म्हणून.

मग त्या प्रॉमिसच्या निमित्तानं धरलेला हात हातात तसाच ठेवून आम्ही धुक्यात लांब फेरी मारून आलो.

त्यानंतर आम्ही जवळ येतच गेलो. आता तर मी तिला दिपूच म्हणतो.
मध्ये एक इन्सिडन्स झाला...
गावातच राहणारे एक हॉबी पायलट गृहस्थ आपल्या बायकोला घेऊन जॉयराईड कम भटकंती म्हणून त्यांचं छोटं दोन सीटर विमान घेऊन नाशिक जवळच्या त्यांच्या गावी निघाले होते. त्यांनी त्यांच्या शेतातच त्यांच्या छोट्या सी वनफाईव्हटू विमानासाठी छोटी एअरस्ट्रिप बनवली होती. हेवा करण्यासारखीच लाईफस्टाईल होती त्यांची.

त्यांचं छोटं विमान आमच्या मोठ्या विमानाच्या वाटेच्यामध्ये उभं होतं आणि त्यामुळे आमच्या विमानात बोर्डिंग होऊनही ते रनवेवर नेता येत नव्हतं. दलबीरनं कॉकपिटच्या काचेतून खूण करून मला आत बोलावलं. मी पाय-या चढून विमानात गेलो आणि कॉकपिट मध्ये डोकावलो. दलबीरचा चेहरा इतका फ्युरीयस झाला होता की बघून माझं पाणी झालं. त्यानं मला सांगितलं की ते मच्छर विमान वाटेतून काढायला सांग आणि नाही ऐकलं तर तू धक्का मारून ते बाजूला ढकलून दे.

मी अर्थात असं करणार नव्हतो. मी फक्त त्या गृहस्थांना सांगितलं की "प्लीज जरा लवकर काढा तुमचं वाटेतून. आमच्या फ्लाईट्चा खोळंबा होतोय."

ते गृहस्थ हट्टी निघाले. ते ऐकेनात. असेही त्यांना क्लीअरन्स नव्हताच. आम्हालाच तो आधी मिळाला होता. पण त्यांनी वाटेत घुसवलेलं विमान काढेपर्यंत आम्ही निघू शकत नव्हतो.

तेवढ्यात हा तिढाझाम सोडवण्यासाठी एअर ट्राफिक कंट्रोलरनं स्वत: डिसिजन घेतला आणि त्या गृहस्थांना आधी "क्लीअर्ड फॉर टेक ऑफ" सांगितलं. आमचा क्लीअरन्स रद्द केला.

आणि एकदम अचानक दलबीर आमच्या बीचक्राफ्टमधून उद्या मारत उतरला आणि मादारचोद वगैरे अर्वाच्य शिव्या ओरडत त्या छोट्या विमानाकडे धावला. त्यानं त्या विमानाच्या कॉकपिट मधून पायलट गृहस्थांना लिटरली बाहेर खेचलं आणि जमिनीवर पाडलं. मला कळेना की हा काय वेडा झालाय का? की वात झालाय? पिऊन आलाय की काय?

कारण आम्ही प्रत्यक्ष प्री-फ्लाईट मेडिकल टेस्ट कधीच करत नाही. आम्ही सर्व फ्लाईट्साठी नुसते फॉर्म भरून ठेवतो. अल्कोहोल ओडर - निगेटिव्ह. बी.पी. -नॉर्मल. वगैरे असा.

मग एक म्हातारे डॉक्टर संध्याकाळी कधीतरी येऊन एकदम दिवसभराच्या मेडिकल टेस्टचे फॉर्म "ओके" म्हणून साईन करून जातात.
गुत्ता तिथेच उभा होता. तो बोबड्या आवाजात समजुतीचं काही बोलत मध्ये पडायला गेला. त्यालाही दलबीरनं ढकलून दिलं. तो खाली टारमॅकवर आपटला. त्याच्या टकलाच्या जागी चांगलंच रक्त आलं. मग मी त्याला धरून एका टेक्नीशियन पोराबरोबर टूलरूममध्ये पाठवलं. हातातल्या वॉकीटॉकीवरून ऑफिसात कळवलं आणि फर्स्ट एड बॉक्स आणायला एका लोडरला पिटाळलं.

मग दलबीर त्या गृहस्थांवर टिपेच्या आवाजात ओरडला. "यू ब्लडी बास्टर्ड. हाऊ डेअर यू ब्लॉक माय वे..? व्हू ब्लडी गेव्ह यू लायसेन्स टू फ्लाय..?? आय विल सी हाऊ यू गो फर्स्ट.."
आणि मग त्यानं जे केलं त्यानं मी भोंचक्का झालो. त्यानं जवळ उभ्या असलेल्या आमच्या टूल ट्रॉलीतून एक मोठा स्क्रू ड्रायव्हर काढला आणि छोट्या सी वनफाईव्हटूच्या टायरमध्ये भोसकला. टायर फडाड करून फुटला.

मग काय..एअरफोर्सचे मोठे ऑफिसर्स आले. आमची फ्लाईट पुढे चार तास डीले झाली. दोघांनी एकमेकांविरोधात फिर्यादी घातल्या.
त्या गृहस्थांनी "प्राणघातक हल्ल्या"चा आरोप दलबीरवर केला.

एअर फोर्स मध्ये दलबीर विषयी आदर आणि दबदबा असल्यानं त्या लेव्हलवर ते प्रकरण कोणी वाढवलं नाही. पण एअरपोर्ट वर घडलेला असा कुठलाही प्रकार डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशनला सिरीयसली घ्यावाच लागतो आणि त्याच्या चौकशीचा ठराविक प्रोटोकॉल असतो.

त्यानंतर मग दिल्लीहून सरकारी चौकशीचा तमाशा सुरु झाला. माझीही ऑपरेशन्स ऑफिसर म्हणून चौकशी झाली. मलाही क्लिअरन्सेसच्या घोळाबद्दल पुन्हा पुन्हा खोदून खोदून विचारण्यात आलं. दलबीरची मेडिकल आणि इतर डॉक्युमेंटपण खूप उकरायला लावली. कंपनीला प्रकरण वाढू द्यायचं नव्हतं.

मला माझी कंपनी आणि सरकारी चौकशी कमिटी या दोघांकडून खूप प्रेशर होतं. पण एकूण ते प्रकरण दाबलं गेलं आणि दलबीर फ्लाईंग करतच राहिला.

त्या वेळी खूप मनस्ताप झाला. दिपू त्या फ्लाईट मध्ये होस्टेस होती. तिचीही विटनेस म्हणून चौकशी झालीच. तिनं मला या सर्व चौकशीत खूप आधार दिला. आम्ही खूप खूप म्हणजे आणखीच जवळ आलो.
आणि एकातून सुटतोय तेवढ्यात नंतर ते विमानाच्या नोजव्हीलचं प्रकरण झालं..

मी माझं हे काम मनापासून करतो. बेसवर गुत्ता सारखा इंजिनीअर असूनही मी स्वत: विमानाच्या इंजिन चेकच्या वेळी हजर असतो. बाहेरून तरी प्रत्येक पार्ट घासून पुसून लख्ख केलाय की नाही ते पाहतो.

त्या दिवशीही मी सगळं नीट बघितलं होतं. फ्लाईट एकदम वेळेवर गोव्याला गेली. दलबीर इन कमांड होता. दीप्ती होस्टेस.

मी आणि गुत्ता दुपारी आडवे झालो. पण गुत्ता काही झोपेना. तो एकदम अस्वस्थ दिसत होता.

मी म्हटलं, " सर, परेशान लग रहे है आज?"

गुत्ता म्हणाला, "देअर इज लॉट ऑफ प्रेशर टू कीप द मशीन एअरबोर्न. कंपनी एकदम लॉस में है आजकल."

हे तर मलाही माहीत होतं. कंपनीला ब-याच सेक्टर्सवर मार खावा लागत होता. बुकिंग घसरलं होतं. विमान पार्क करण्याचा खर्च ही सुटत नव्हता. आणि फक्त माझ्या बेसचे सेक्टर तुडुंब भरून चालले होते.

सेनगुप्ता पुढं म्हणाला, "कंपनी बोल रही है की जहाज पंदरह मिनट से ज्यादा जमीन पर नही रखो. अब इस प्रेशर में प्रीफ्लाईट चेक्स भी पूरे नाही हो पाते.. सर्व्हिसिंग और स्पेअर पार्ट चेंज की तो बात ही छोड दो."

मी गप्प बसलो.

गुत्ता मग स्वत:हूनच म्हणाला, " आज फ्लाईट गयी तो है लेकीन नोजव्हील थोडा हल्का जॅम है. वैसेही ले गया दलबीर."

मग मी गंभीर झालो. ती माझी फ्लाईट होती. माझी दिपू होती त्या फ्लाईट्वर.

कालच मी तिच्याशी सरळ लग्नाचंच बोललो होतो. दोघांनाही सगळं माहीत असूनही ती लाजली तर होतीच.

आधी आम्ही डिनरसाठी एकत्र "कपिला"मध्ये गेलो. दीप्ती हल्ली एकदम खूप प्यायला लागली आहे. तिनं तीन लार्ज भरून जीन घेतली. मी नेहमीचीच आर.सी.

जेवणानंतर तिला घेऊन मी सरळ कंपनी गेस्ट हाउसमध्ये गेलो. सरळ बेडरूम मध्ये गेलो आणि टी.व्ही. लावला. हळू हळू ती माझ्याजवळ सरकून बसली. मग म्हटलं आता कशाला उगीच मन आवरत बसायचं..आम्ही एकमेकांचे होणारच आहोत ना?

ओठांवर ओठ हळूच टेकून सुरुवात झाली आणि शेवट ज्यात व्हायचा त्यातच झाला होता. आता जवळ येण्यातली सगळीच अंतरं संपली होती. अर्थातच हे सर्व प्लॅन केलेलं नसल्यामुळे काही प्रोटेक्शन जवळ नव्हतंच. पण आता आम्हाला त्याची पर्वा नव्हती.

मग मी तिच्या कानात म्हटलं, "लग्न कर माझ्याशी.."

"बघू", ती म्हणाली..झोपाळलेली होती.

लगेच तिला घरी घेऊन जायचं असं मी ठरवलं. पण त्यासाठी रजा कशी टाकणार. मी तिची रजा सँक्शन करीनच. पण माझी कोण करणार?

एकटाच आहे ना मी इथे.. मी हा बेस सोडायचा म्हटला तर फ्लाईट कशा उडणार?

मी माझ्या आईबाबांनाच इथे बोलावून घ्यायचं ठरवलं. मग दिपू आणि मी एकमेकांच्या कुशीत शांत झोपलो.

आणि आज हा सेनगुप्ता म्हणत होता की नोजव्हील जाम आहे म्हणून..दलबीर का घेऊन गेला तशीच फ्लाईट..ओव्हर कॉन्फीडन्समुळे जीव घेईल एके दिवशी. हे काय मिग वाटलं का रे तुला थेरड्या.
गोव्यातच जर काही प्रॉब्लेम झाला तर? आणि तिथेही कसंतरी दामटून दलबीरनं विमान परत आणलं तरी इथे लँड झाल्यावरही इश्यू होऊ शकतोच. वाटेत नोजव्हील अजूनच जॅम होऊन बसलं असेल तर? आईस फॉर्मेशन किंवा कशामुळेही ? शिट..!!

मी प्रचंड अस्वस्थ होऊन फ्लाईट यायच्या आधीच कंट्रोल टॉवरमध्ये जाऊन उभा राहिलो. तिथून विमान दूर असतानाच दिसायला लागतं. रडारवर ब्लीप ब्लीप करून एक ठिपका पुढे सरकत होता.

दूरवर आमच्या विमानाचा निळा फ्लॅश दिसला. मी श्वास रोखून बघत होतो. खरा प्रश्न लँडिंग नंतरच होता. मला एकदम काहीतरी विचित्र व्हायला लागलं. मी रनवेकडे पळत सुटलो. अर्थातच तिथल्या एका कॉर्पोरलनं मला अडवलं, "अरे सरजी जहाज लँड हो रहा है. मत मारी गयी है आप की?"

मी तसाच तडफडत रनवेजवळ उभा राहिलो. विमान रनवेला टच झालंसुद्धा. नंतर नोजव्हील वळत नसल्याचं मला दिसलं. म्हणजे आता विमान जरा जरी वाकड्या दिशेत वळलं तर सरळ कुठेतरी रनवे बाहेर जाउन क्रॅश होणार होतं. जितका शक्य आहे तितका रडर पेडलचा वापर करून विमानाचं नाक समोर ठेवायचं हे करायला लागणार होतं. पण एकदा व्हील वळलेल्या अवस्थेत जाम होऊन बसलं असतं तर अवघड होतं. मी मनानं ती फ्लाईट चालवत होतो. यावर उपाय एकच होता की लँड होतानाच अगदी सरळ नाकासमोर रनवेच्या मध्य रेषेवर टचडाऊन करायचा आणि स्पीड कमी होईपर्यंत सरळ जात राहायचं रनवे न सोडता. दलबीरनं नेमकं तेच केलं होतं आणि सरळ रेषेत तो भरधाव निघाला होता. जरा वेळाने विमान थांबलं आणि मग मी मोठ्ठा श्वास बाहेर सोडला. आम्ही रनवे वरच विमान मोकळं केलं. गुत्तानं मग टो करून ते आत आणलं असणार.

या सगळ्यामुळे मी एक मात्र सुरु केलं की मी रोज दिवसरात्र एअरपोर्ट मधेच रहायला लागलो. माझ्या टूलरूम मध्ये. तिथूनच सगळं काम. झोपेचं प्रमाण वाढलं होतं. पण असं करून चालणार नव्हतं. सतत अलर्ट राहणं हे विमानाच्या सुरक्षित सर्विसिंग आणि मेंटेनन्स साठी एकदम आवश्यक होतं. तिथे राहायला परवानगी नव्हती पण मी तसाच घुसून बसायचो. मग गार्डस काही बोलायचे नाहीत.

दिपूशी लवकरात लवकर लग्न करायचं असं मी ठरवलंय. ती त्या नोजव्हील प्रकरणाच्या दिवशी रनवेवरच विमानातून उतरताना मला दिसली. दलबीरनं मोठ्ठा क्रॅश वाचवला होता. मी तिला जाऊन मिठीत घेतलं घट्ट. मग मला कोणीतरी मागे ओढून घेतलं.

आता ती मला इथेच भेटते. टूलरूममध्ये. "हाय" करून स्माईल देउन जाते ड्यूटीवर. कधी कधी गप्पा मारत पण बसते वेळ मोकळा असला की. हातात हात घेऊन. मलाच वेळ नसतो.. मी सकाळी विमान आलं की हातातलं काम टाकून आधी त्याचं नोजव्हील बघतो. रॉड सारखा मोठा आर्म लावून ते व्हील नीट रोटेट होतंय ना ते बघतो. हो..चान्स नाही घ्यायचा परत. जाम वाटलं तर गुत्ताच्या मानगुटीवर बसतो की ग्रीस घाल ग्रीस घाल म्हणून..सोडतच नाही घालेपर्यंत.

दलबीरशी बोलताना मला हल्ली एक जाणवायला लागलंय की तो मराठी अस्खलित बोलायला लागलाय. गुत्ता पण इथे राहून राहून बहुतेक असेल, पण मराठीच बोलतो माझ्याशी.

आणि ते दोघे मिळून माझी खेचतात. वेड्यात काढतात. म्हणजे मध्ये एकदा फ्लाईट गेली म्हणून मधल्या वेळेत मी कनव्हेयर बेल्टवरून उकिडवा बसल्या बसल्या कार्गो कडे चाललो होतो, तर गुत्ता तिकडून आला आणि म्हणे इथे कुठे पॅसेज मध्ये बसलायस रस्त्यात?
मी म्हणालो, "सरजी..मस्करी बस हां. मैं सोने जा रहा हूं कार्गो में.."

तेव्हा त्यानं हाक मारून एका लोडरला बोलावलं.
"चल हो आत.." असं म्हणत लिटरली हातांना पकडून त्यानं आणि लोडरनं मला ऑफिसच्या रूम मध्ये नेऊन झोपवलं.

गुत्ता तर वयानं खूप मोठा आहे. पण लोडरनं माझ्या अंगाशी चेष्टा म्हणूनही अशी मस्ती करणं मला सहन होईना. मी त्याला एक लाफा ठेवून दिला. मग त्यानं मला रूममधल्या टेबलवर दाबून धरलं. गुत्तानंही माझे हात दाबून धरले. ही काय फालतूगिरी आहे. "सरजी..ये क्या मजाक है..?" मी जोर लावून हातपाय सोडवायला लागलो.

तेवढ्यात गुत्तानं माझ्या हातात काहीतरी टोचलं. "गुत्ता. कमीने..बुढ्ढे.." मी किंचाळलो.
वयाचा सगळा मान वगैरे गेला खड्ड्यात..माझं भान सुटलं होतं..

"ही हॅज गॉन व्हायोलंट अगेन..", गुत्ता कोणालातरी सांगत होता.

मला एकदम झोप आली. झोपेचं प्रमाण वाढलंय म्हटलं ना मी.. पण गुत्ता कोणाशी बोलतोय ते मला बघायचं होतं. बघतो तर माझे आई बाबा. आई रडत होती. मग मला अर्धवट झोप लागली. डोळे मिटलेले होते पण ऐकू सगळं येत होतं.

गुत्ता आईशी बोलत होता. "तो मला सरजी अशी हाक मारतो. कधी कधी गुत्ता अशी पण.."

"काय करता येईल डॉक्टर?", बाबांचा आवाज आला.

..च्यायला गुत्ता डॉक्टर कधी झाला..?

"सांगता येत नाही. क्रॅशच्या शॉक मधून तो जो एकदम डीनायल मध्ये गेलाय त्यातून आधी बाहेर आला तरच."

"एकच मुलगा आहे हो आमचा डॉक्टर", आईला रडू आलं होतं, "तीन महिने झाले इथे त्याला..नेमकं काय डायग्नोसिस आहे ?" तिनं गुत्ताला विचारलं.
अरे गुत्त्या,हरामखोरा आईला कशाला रडवतोस तुझ्या प्रँक्स मध्ये?

..आणि आई बाबांची गुत्ताशी ओळख कशी?

गुत्ता म्हणाला, "जागा असतो तेव्हा तो डायरी लिहित बसतो. म्हणजे आम्हीच देतो डायरी अशा पेशंटना. तेवढीच पॉसिबिलिटी असते काहीतरी इनसाईट मिळण्याची. त्यात बघून आम्हाला कळतं की त्यानं अजूनही मनानं एअरपोर्ट सोडलेलाच नाहीये. त्याने ही सगळी पात्रं स्वत:भोवती बनवली आहेत. दलबीर, सेनगुप्ता वगैरे.."

ही बघा त्याची डायरी, तो पुढं म्हणाला..

"नाउ इट अ‍ॅपिअर्स की तो त्या एअर होस्टेसमध्ये खूप इन्व्हॉल्व झाला होता. ज्या गोष्टी त्याच्यासमोर घडल्या त्या अजून त्याने अ‍ॅक्सेप्ट केलेल्याच नाहीत. म्हणजे रनवेवर क्रॅश झाला..त्यात ऑल वेअर किल्ड.. ते कॅप्टन दलबीर गेले.. आणि ती एअर होस्टेससुद्धा..हे सगळं त्याला लक्षात आलेलं नाही, किंवा ते लक्षात घ्यायला त्याचा जबरदस्त रेझीस्टन्स आहे. आय मीन, हल्ली हल्ली तर तो खूप जास्त डीरेल झालाय."

"डॉक्टर, आपण बाहेर जाउन बोलूया का? त्याला ऐकू येत असेल तर?", बाबा म्हणाले.

"नाही तो झोपलाय आता गाढ. सीडेटिव्ह दिलंय", गुत्ता म्हणाला.

खाकरून गुत्ता पुढे बोलायला लागला..

"तो हॉस्पिटललाच एअरपोर्ट समजून दिवसभर काहीतरी काम करत बसतो. हॉस्पिटलच्या बूथवरून फोन लावून मेटार वगैरे बोलतो. वेगवेगळ्या रूम मध्ये जाउन झोपतो. अंधारात ट्रॉलीच्या पायाच्या व्हीलला गोल गोल फिरवत बसतो विचारलं तर नोज व्हील चेक करतोय वगैरे अशी उत्तरं देतो. मध्ये मला पकडून धरलं. ग्रीस घाला ग्रीस यात. असं म्हणून व्हायोलंट झाला एकदम"

"इतका कसा शॉक बसला असेल त्याला? डिनायलमध्ये कसा गेला ?" बाबा म्हणाले, "व्हाय इज ही नॉट एक्सेप्टिंग द फॅक्ट? दॅट होस्टेस इज डेड. डॉक्टर, त्यानं स्वत: तिथेच क्रॅशसाईटवर तिची बॉडी प्लेन मधून खाली काढली होती. तरीही?"

काय स्टोरी बनवतात बे गुत्ता आणि बाबा पण... हे गुत्ता आणि कंपनी नवे नवे खेळ काढतात आणि माझी झोप खलास करतात. म्हणे हा सगळा एअरपोर्ट माझ्या मनाचा खेळ आहे. टूलरूम, कॉफीशॉप, टारमॅक, रनवे, एवढं दोन इंजिनवालं विमान, माझा कन्व्हेयर बेल्ट..सगळं सगळं खोटं. रोज भेटायला येणारी दिपू..ती पण माझ्या मनाचा खेळ..आणि गुत्ताच्या या फालतू चेष्टा मात्र ख-या..म्हातारा चळलाय..रिटायर करा थेरड्याला ..

मग मात्र मला खूप खूप झोप आली..जबरदस्त झोप...दुपारच्या फ्लाईटला वेळ आहे. मधल्या वेळात झोप.

हल्ली झोप वाढलीय हे मात्र नक्कीच..
...

...
--00----00----00----00----00----00----00----00----00----00----00----00--

कथालेख

प्रतिक्रिया

पियुशा's picture

16 Jan 2011 - 12:40 pm | पियुशा

बरेच शब्द नविन वाचायला मिळाले
मस्त आहे कथा
आवडलि :)

नरेशकुमार's picture

16 Jan 2011 - 6:51 pm | नरेशकुमार

सुन्न् !
.
.
.
.
.
.
.
.
एक शंका.
हे काय खरे-बिरे नाही ना ?

-------------------------------------------------
गवि एक विनंती, 'विमान दुर्घटना' या विषयीच्या कथा झाल्यावर 'विमान प्रवास कसा सुरक्षित आहे' हे सुद्धा सांगत चला. तुमचे लेख वाचुन विमानात बसल्यावर धडकी भरते (तुमच्या लेखनात तेवढि ताकत आहे हे मान्य, पण जिवाचे काय हाल होतात ते आम्हालाच माहीती)

मुलूखावेगळी's picture

16 Jan 2011 - 10:06 pm | मुलूखावेगळी

ही खरी आहे क?
बाकि गुन्तुन ठेवनारी कथा
बेस्ट
असेच लिहित रहा

विनायक बेलापुरे's picture

16 Jan 2011 - 2:05 pm | विनायक बेलापुरे

छान लिहिलिये.

मस्त कलंदर's picture

16 Jan 2011 - 2:40 pm | मस्त कलंदर

कथा आणि तिची मांडणी आवडली हेवेसांनल..

नगरीनिरंजन's picture

16 Jan 2011 - 2:41 pm | नगरीनिरंजन

जबरदस्त!! जाम गुंतून गेलो वाचताना!

स्वानन्द's picture

16 Jan 2011 - 3:19 pm | स्वानन्द

सुन्न झालो! 'A Beautiful Mind' ची आठवण झाली.

गवि, तुम्हाला सलाम!

जे.पी.मॉर्गन's picture

12 Jul 2012 - 1:01 pm | जे.पी.मॉर्गन

ब्यूटिफुल माइंडची आठवण झाली. अप्रतीम कथा. ग वि ना _/\_.

जे पी

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Jan 2011 - 6:35 pm | बिपिन कार्यकर्ते

छान कथा. वाचली होती... तेव्हाही आवडली होतीच.

स्वाती दिनेश's picture

16 Jan 2011 - 7:45 pm | स्वाती दिनेश

छान कथा. वाचली होती... तेव्हाही आवडली होतीच.
बिपिन सारखेच म्हणते,
स्वाती

अमोल खरे's picture

16 Jan 2011 - 8:26 pm | अमोल खरे

फक्त शेवट चांगला करायला हवा होता.

कथा पहिल्यांदाच वाचली.
आवडली.

ईन्टरफेल's picture

16 Jan 2011 - 9:30 pm | ईन्टरफेल

छान लिहिलिले आहे

एकदम मस्त !

चिंतामणी's picture

16 Jan 2011 - 11:00 pm | चिंतामणी

कदाचीत क्रमश:चा ब्रेक न लावल्यामुळे जास्त परीणाम करून गेली.

मी-सौरभ's picture

17 Jan 2011 - 12:16 am | मी-सौरभ

लै भाहारी
ग. विहारी :)

सन्जोप राव's picture

17 Jan 2011 - 6:18 am | सन्जोप राव

कथा आधी वाचली नव्हती. आवडली. भाषा धीट पण संयत आहे.

सहज's picture

17 Jan 2011 - 6:56 am | सहज

कथा आवडली.

प्रचंड खिळवून ठेवणारी कथा आहे. जबरदस्त!

शिल्पा ब's picture

17 Jan 2011 - 8:55 am | शिल्पा ब

शेवटपर्यंत न थांबता वाचावी अशी कथा...छानंच.

उल्हास's picture

17 Jan 2011 - 9:12 pm | उल्हास

.......

परत वाचली

परत आवडली

चिगो's picture

17 Jan 2011 - 11:33 pm | चिगो

काय खतरा लिहीता हो...
मस्त कथा... कलाटणी एकदम छान..
आवडली.

मस्तच गोष्ट. शेवटचा ट्विष्टपण भारी. अजुन येउद्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Jan 2011 - 3:09 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच गोष्ट. मांडणीही आवडली.

सुनील's picture

18 Jan 2011 - 4:19 am | सुनील

खतरनाक कलाटणी!

एका वेगळ्या दुनियेची माहितीदेखिल झाली.

पुलेशु

सुनील's picture

11 Jul 2012 - 11:52 pm | सुनील

असेच (पुन्हा) म्हणतो!

सेरेपी's picture

18 Jan 2011 - 4:33 am | सेरेपी

मस्त आहे कथा...शेवटच्या ३-४ पॅराज पर्यंत कळलं नव्हतं असा शेवट असणार ते.

मस्त आहे कथा गवि. मांडण्याची शैली पण उत्तम.
शेवटची कलाटणी मस्तच. (देवराईची आठवण झाली).

टुकुल's picture

18 Jan 2011 - 8:57 am | टुकुल

एक नंबर कथा... शेवट एकदमच वेगळा.

--टुकुल

Pearl's picture

18 Jan 2011 - 9:14 am | Pearl

Excellent! मस्तच.

पिवळा डांबिस's picture

19 Jan 2011 - 2:56 am | पिवळा डांबिस

एका वेगळ्या पार्श्वभूमीवरील कथा...
आवडली!!

प्रसाद_डी's picture

19 Jan 2011 - 10:42 am | प्रसाद_डी

यार खरच शब्द नाहीत माझ्या जवळ .... अप्रतीम लिखान. मझ्या आजुबाजुला घडतय असं वाटत होत यार.
: गगनविहारी जी.
सलाम.

जबरस्त! सुरवातीला कितीदा तरी हसले, अन त्यामुळेच शेवट अंगावर काटा आला.

प्रास's picture

2 Feb 2011 - 10:36 am | प्रास

गविजी,

तुमचं 'चूकचक्र' वाचतानाच तुमच्या लेखन-कौशल्याची कल्पना आली होती पण आता मिपातील इतर लेखांचा आढाव घेताना तुमची ही कथा दिसली आणि एका बैठकीतच वाचली. सुख आणि दु:ख, हास्य आणि करुण यांचा उत्क्रुष्ट तोल यात सांभाळल्याचं दिसतंय.

गविजी, तुमच्या लिखाणाचा फ्यान झाल्याचा मला अभिमान आहे.......

साबु's picture

21 Nov 2011 - 5:05 pm | साबु

ही वाचायची राहुन गेलेली...मन१ याना धन्यवाद..

धन्यवाद गवि..

अप्रतिम कथा.. आणि एका वेगळ्या जगाची ओळख...

माझीही शॅम्पेन's picture

11 Jul 2012 - 7:20 pm | माझीही शॅम्पेन

वाह वाह

____/|\______

सुन्न

अप्रतिम कथा !

शेवट तर निशब्द करणारा ...

असेच लिहित रहा... वाचत आहे .. मनापासुन

तिच्यायला गविंची कथा म्हणजे स्पेसटाईममधल्या लपलेल्या एक्स्ट्रा डायमेन्शनचे दारच जणू.

श्रीरंग's picture

12 Jul 2012 - 10:52 am | श्रीरंग

ज ब र द स्त
हा धागा वर आणणार्यांचे शतशः धन्यवाद..

+११११११११११११११११११११११११११११११११

हे राहिलेलं वाचायचं.

गवि हॅट्स ऑफ.

सुमीत भातखंडे's picture

12 Jul 2012 - 11:36 am | सुमीत भातखंडे

कथा होती.
प्रचंड आवडली

आर्य's picture

12 Jul 2012 - 1:55 pm | आर्य

मस्त वाटलं वाचून, लेख एका बैठकीत वाचला - शेणगुप्ता, दिपु , दलबीर आणि बेल्ट लक्षात राहिला..
"हल्ली झोप वाढलीय हे मात्र नक्कीच......."
हि शेवटी कलाटणी फार .... झकास होती ! मस्त लेख !

स्वप्निल घायाळ's picture

13 Jul 2012 - 3:33 pm | स्वप्निल घायाळ

जबरदस्त !!!!! कालच मी " A Beautiful Mind " बघितला ......त्यामुळे अजून छान वाटली

मुक्त विहारि's picture

24 Jan 2015 - 3:27 am | मुक्त विहारि

आयला,

ह्या असल्या सुसाट कथा वाचायला मिळतात, म्हणूनच मिपावर येण्यात मज्जा आहे.

(एक डू-आय-डी सोडले तर, मिपासारखे उत्तम व्यासपीठ नाही.)

एस's picture

24 Jan 2015 - 1:08 pm | एस

बादवे, त्या डुआयडींचीपण एक गंमत असते. आपला इतर सगळा ताण तणाव यांच्यावर जाळ काढून शमवता येतो आणि ही मंडळीपण नाटकीपणानं उगीचच आपली तक्रार करत बसतात. :-)

मुक्त विहारि's picture

25 Jan 2015 - 12:05 am | मुक्त विहारि

आणि इतका लोचट-पणा आपल्या स्वभावात नाही, ह्याचा अभिमान पण वाटतो.

बोका-ए-आझम's picture

25 Jan 2015 - 11:42 am | बोका-ए-आझम

निव्वळ अप्रतिम!

खमक्या's picture

25 Jan 2015 - 7:31 pm | खमक्या

गवि द ग्रेट... गवि दा जवाब नही...

गविपंखा खमक्या

खमक्या's picture

25 Jan 2015 - 8:25 pm | खमक्या

गवि द ग्रेट... गवि दा जवाब नही...

गविपंखा खमक्या

अत्रन्गि पाउस's picture

26 Jan 2015 - 12:47 am | अत्रन्गि पाउस

बर झालं आत्ता तरी वाचली ...
वा गवी अप्रतिम !!

अभिदेश's picture

26 Jan 2015 - 1:02 am | अभिदेश

सुन्न करणारि कथा... असे खरच होत असेल का..

खटपट्या's picture

26 Jan 2015 - 5:35 am | खटपट्या

जबरदस्त कथा !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jan 2015 - 10:28 am | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कथा. शेवटची कलाटणी खासच आहे !

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

26 Jan 2015 - 2:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सुन्न!!

एक एकटा एकटाच's picture

24 Mar 2016 - 8:16 am | एक एकटा एकटाच

जबरदस्त

शेवट एकदम जबरा

उल्का's picture

24 Mar 2016 - 6:53 pm | उल्का

कथा आताच वाचली. मस्तच!

Rahul D's picture

24 Mar 2016 - 11:30 pm | Rahul D

जबरदस्त

जव्हेरगंज's picture

25 Mar 2016 - 12:12 am | जव्हेरगंज

क्लास!!!

खूप आवडली !!!

पण मला 'रात्रआरंभ' या चित्रपटाची आठवण झाली. यावरूनच तुम्ही प्रेरणा घेतली आहे किंवा कसे ? त्यातही सेम टू सेम ट्विस्ट आहे.