अंतर

जयवी's picture
जयवी in जनातलं, मनातलं
30 Apr 2008 - 12:34 am

कितीक हळवे…. कितीक सुंदर
किती शहाणे अपुले अंतर

आत्ताच ह्या गाण्याच्या ओळी ऐकल्या…..अगदी आत पर्यंत भिनत गेल्या. दोघांमधले हे अंतर कितीवेळा असे शहाणे असते….!! कधी हे अंतर अगदी आरपार छेदून जातं तर कधी युगं लोटून जातात पण पार करता येत नाही. कधी हे अंतर ..अंतर वाटतंच नाही. इतकी दोघं एकमेकांच्या जवळ येतात. एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात. कधी एकमेकांच्या जवळ पोचायला सुद्धा कोणी तरी बांधून दिलेल्या पुलाची….सेतूची गरज लागते. कित्येकदा तो बांधून दिलेला पूल मोडकळीस येतो….. त्याला गोंदण-शिंपण करुन नेटका करता करता जीव मेटाकुटीला येतो. सगळी धडपड त्या सेतूच्या डागडुजीसाठी. पण ती डागडुजी करताना ती पलीकडली व्यक्ती कितीतरी दूर निघून गेलेली असते. मग पुन्हा धडपड त्या कशाबशा सावरलेल्या पुलावरुन तोल सांभाळत "त्या"च्याजवळ पोचायची.

कधी हे अंतर हवंहवंसं वाटतं. थोडी दूरिया भी नजदीकिया लाती है असं म्हणतात ना…..! अंतर हे असतंच पण ते किती असावं म्हणजे ते शहाणं म्हणता येईल….! जेव्हा तो अनोळखी असतो तेव्हाचं अंतर….. जेव्हा तो थोडा कळायला लागतो तेव्हाचं अंतर….. जेव्हा तो आपला होतो तेव्हाचं अंतर ……जेव्हा तो कळूनही कळला नाहीये हे जाणवल्यानंतरचं अंतर…. तो जवळ असूनही ते फ़क्त एका कुशीचं जीवघेणं अंतर….. !!

तसं म्हटलं तर आपण सगळे हे अंतरच पार करत असतो. सगळी धडपड ह्या अंतरासाठीच तर असते. वेगवेगळ्या नात्यातल्या अंतरामधले वेगवेगळे पूल सतत बांधत असतो, त्याची डागडुजी करत असतो तर कधी स्वत:च्याच हाताने तो मोडून सुद्धा टाकत असतो. कधी काही पूल तुटत असतात तर कधी नवे सेतू तयार होत असतात. कधी पडझड तर कधी नवी उभारी. पण त्या प्रत्येक पडलेल्या पुलाची एक तरी वीट असतेच जपून ठेवलेली नव्या पुलाच्या उभारणीसाठी. त्या पडझडीतून वाचलेली एक तरी अशी भिंत असतेच तडा न गेलेली. ती कायमच तयार असते नव्या बांधासाठी. कदाचित त्या भिंतीचाच आसरा शोधत असतो एखादा नवा पूल…….!!

कधी एक अंतर पार केल्यावर असं लक्षात येतं की हे अंतर पार करायच्या नादात आपण बाकी अंतरं फ़ारच वाढवलीयेत. फारच ताणल्या गेलेत बाकीच्या पुलांचे दोर……!! तो ताण सैल करायला जावा तर जवळचा असलेला तो दूर जाणार….! कधी हा सगळाच ताण असह्य होतो….!! सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! त्यांच्यात कसलंतरी जबरी संमोहन असतं जे सगळ्यांना त्याच्याशी चुंबकासारखं बांधून ठेवतं. मग धडपड सुरु रहाते ती बाकीच्यांची……त्याच्यासोबत चालत रहाण्याची. हे असं जगता यायला हवं….!! म्हणजे पूलही बांधायला नकोत…. त्याची डागडुजीही करायला नको.

अंतर अपुले असे निरंतर
जरा हसावे.. जरा रुसावे
कधी ओलावा कधी दुरावा
शोधत जावे… गवसत जावे

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मीनल's picture

30 Apr 2008 - 4:53 am | मीनल

वयाच्या तरूणपणात मन जुळली असो नसोत,नैसर्गिक नियमानुसार शरीरांमधले अंतर कमी करण्याकडे कल असतो.
नंतर मन जुळली तर एकमे़कांच्यातले अंतर इतक कमी होत की ,`तू और मै एक जान` स्थिती होऊन जाते.
जोडीदाराच्या अगदी हृदयातच निवास असतो.
मग त्यान /तीन स्व:ताच्या ह्रुदयात बोललेले ही जोडीदाराला ऐकू येते.अंतर राहतच नाही.
पण मन जुळली नाही तर मात्र मानसिक अंतर मैलोंन मैल वाटत.शारिरिक अंतर सुखावह वाटते.

विसोबा खेचर's picture

30 Apr 2008 - 9:53 am | विसोबा खेचर

एकदा ही जवळीक साधली की मात्र बाकीचे फार दूर वाटायला लागतात.

पण त्या प्रत्येक पडलेल्या पुलाची एक तरी वीट असतेच जपून ठेवलेली नव्या पुलाच्या उभारणीसाठी. त्या पडझडीतून वाचलेली एक तरी अशी भिंत असतेच तडा न गेलेली. ती कायमच तयार असते नव्या बांधासाठी. कदाचित त्या भिंतीचाच आसरा शोधत असतो एखादा नवा पूल…….!!

वा जयू! छोटेखानी, परंतु अतिशय सुरेख प्रकटन! जियो...! मस्तच लिहून गेली आहेस...

अंतर अपुले असे निरंतर
जरा हसावे.. जरा रुसावे
कधी ओलावा कधी दुरावा
शोधत जावे… गवसत जावे

क्या बात है.....

तात्या.

आनंदयात्री's picture

30 Apr 2008 - 3:32 pm | आनंदयात्री

कधी एक अंतर पार केल्यावर असं लक्षात येतं की हे अंतर पार करायच्या नादात आपण बाकी अंतरं फ़ारच वाढवलीयेत. फारच ताणल्या गेलेत बाकीच्या पुलांचे दोर……!! तो ताण सैल करायला जावा तर जवळचा असलेला तो दूर जाणार….! कधी हा सगळाच ताण असह्य होतो….!! सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….!

छान झालेय प्रकटन, वरिल ओळी विशेष आवडल्या !

जयवी's picture

1 May 2008 - 1:31 pm | जयवी

मीनल, तात्या, आनंदयात्री........ तहे दिल से शुक्रिया :)

स्वाती दिनेश's picture

1 May 2008 - 1:53 pm | स्वाती दिनेश

प्रकटन आवडले,
स्वाती

शितल's picture

1 May 2008 - 6:34 pm | शितल

सगळी अंतरं राखून तोल सांभाळत जाणं प्रत्येकालाच शक्य होत नाही. काही मात्र मज्जेने जो भेटेल त्याला आपल्याशी बांधून ठेवून चालू शकतो…..चक्क गाणी गुणगुणत….! त्यांच्यात कसलंतरी जबरी संमोहन असतं जे सगळ्यांना त्याच्याशी चुंबकासारखं बांधून ठेवतं. मग धडपड सुरु रहाते ती बाकीच्यांची……त्याच्यासोबत चालत रहाण्याची. हे असं जगता यायला हवं….!! म्हणजे पूलही बांधायला नकोत…. त्याची डागडुजीही करायला नको.

क्या बात है, जयवी ताई , मनाचा ठाव घेतलात, ह्रदयात भिडले.
नेहमी प्रमाणे छान . (तुमच्या लिखानाची फॅन)