ना वा टिळक यांची अतिशय सुंदर आणि कारुण्यरसाने ओतप्रोत भरलेली रचना म्हणजे "केवढे हे क्रौर्य!". ही कविता वाचून , डोळ्यात पाणी न आलेला माणूस विरळाच. ही कविता खूप चटका लावते. माझ्या आवडत्या कवितांपैकी ही एक कविता आहे.
अतिशय चित्रमय वर्णन असलेल्या या कवितेच्या पहील्या कडव्यात कवीने एका जखमी पक्षीणीच्या वेदनामय आणि करुण शारीरीक स्थितीची वर्णन रेखाटले आहे. ही पक्षीण बाणाने विद्ध झाल्याने तिच्या कोमल शरीरातून भळभळा रक्त वहात आहे. अतिरक्तस्त्रावामुळे तिला वारंवार ग्लानी येत आहे आणि तरीही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ही पक्षीण आपले घरटे शोधीत उडत आहे. आणि शेवटी एकदाची धडपडत ती घरट्यात आलेली आहे.
क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.
घरट्यात पाऊल टाकताक्षणी नेहमीच्या सवयीने तिची इवलीशी पिल्ले किलबिलाट करून आनंद व्यक्त करतात, घरट्यात एकच आनंदाची लहर उठते आणि गोजीरवाणी पिल्लं आ वासून आईला खाऊ मागतात. तेव्हा ती त्यांना म्हणते- बाळांनो आजच्या या दुर्देवी दिवशी माझ्याच्याने फार बोलवत देखील नाही. पण हा शेवटचा घास मी तुमच्याकरता आणला आहे तो मी भरवते आणि आपण देवाची आठवण काढू यात कारण माझ्यापश्चात तुम्हा आनाथ पिल्लांचा तोच त्राता आहे.
म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!
पण ती देखील आई आहे मरण्याआधी देखील ती अनुभवाचे २ शब्द तिच्या लेकरांना सांगते आहे. माणूस हा तिच्या मते क्रूर आहे, अमानुष आहे आणि फक्त स्वतःचा स्वार्थ पहाणारा प्राणी आहे. तिच्या पिलांना कदाचित आत्ता ती सांगते त्याचे गांभीर्य कळणार नाही पण पुढे लक्षात येईल म्हणून ती मरण्याच्या आधी त्यांना स्वानुभव सांगते आहे. बोलायचे जरी तिला श्रम होत असले तरी, त्यांना सावध करते आहे.
अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं
निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!
म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.
एवढं बोलून आता तिच्या प्रयाणाची वेळ जवळ आली आहे. पण त्या क्षणादेखील आपल्या बाळांची मऊ कापसाची शय्या स्वतःच्या रक्ताने भीजू नये म्हणून ती वात्सल्यमूर्ती पक्षीण झाडाखाली चिरनिद्रेकरता देह ठेवते आहे. थकून, आपल्या पिल्लांना आशीर्वाद देत देत कायमची झोपी जात आहे. आणि केवळ माणसाच्या क्रौर्यामुळे एक सुंदर जीव, लहानग्या , निरागस पिल्लांची आई देवाघरी गेलेली आहे. ती पिल्लंदेखील आता जगतील का नाही ते केवळ देवच जाणतो. केवढा हा निसर्गाचा र्हास!! केवढे हे क्रौर्य!!!
असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.
मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!
प्रतिक्रिया
13 Jan 2011 - 7:57 am | स्पंदना
वाचली आहे. पक्षिण म्हण वा मातेच ह्र्दय म्हण दोन्ही पद्धतीने कविता उलगडता येते.
शुची थोड रस्ग्रहणात्मक आल असत तर?
13 Jan 2011 - 9:54 am | शिल्पा ब
:( शब्द नाहीत.
13 Jan 2011 - 9:57 am | स्पा
केवळ अप्रतिम
13 Jan 2011 - 9:58 am | यशोधरा
मस्त लिहिलेस शुचि. आवडले.
13 Jan 2011 - 9:59 am | स्वानन्द
खूप छान आणि हृदय्स्पर्शी कविता आणी तितकीच सुंदर ओळख.
13 Jan 2011 - 10:06 am | चिंतामणी
शाळेच्या दिवसांत कवीत शिकत असताना डोळ्यात पाणी आले होते आणि आत्तासुद्धा आले. :(
13 Jan 2011 - 10:36 am | गवि
खूपच करूण.
:(
13 Jan 2011 - 11:13 am | नन्दादीप
फक्त अर्धीच वाचू शकलो. खूपच करूण.
13 Jan 2011 - 12:40 pm | नाटक्या
शाळेच्या दिवसांत कवीत शिकत असताना माझ्याही डोळ्यात पाणी आले होते पण कारण जरासे वेगळे होते.. मास्तरांनी ही संपुर्ण कविता पाठ करून यायला सांगीतले होते आणि ज्यांची (त्यात मी सुध्दा आलो) पाठ नव्हती त्याला प्रत्येकाला स्वतंत्र पणे पुढे घेऊन झोडपून पाठ शेकून काढली होती. वरून १०० उठाबशा आणि उरलेला आख्खा दिवस ओणवे उभे केले होते म्हणून.
केवढे हे क्रौर्य? - वा. वा. मास्तर...
च्याXXXX या कविता पाठांतराने सगळे बालपण नासले.
13 Jan 2011 - 12:48 pm | परिकथेतील राजकुमार
हृदयद्रावक.
शब्दच संपले...
आजकाल असे लेखन खुप दुर्मिळ झाले आहे. अर्थात कुणी कसे लिहावे हे सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले.
13 Jan 2011 - 12:53 pm | मितान
उत्तम रसग्रहण !
बाकी ही कविता आम्हाला अभ्यासक्रमात होती त्यामुळे तेव्हा प्राध्यापकांनी तिचे रसग्रहण न करता नुसतेच विच्छेदन केले होते :(
13 Jan 2011 - 1:45 pm | Nile
अरे ह्या रडणार्या बायकांना रुमाल द्या रे कुणीतरी.
कविता महापुर ओसरल्यावर वाचतो.
14 Jan 2011 - 12:19 am | सेरेपी
रुमालाने महापूर कसा ओसरणार? चाळणी घेऊन या बाई :P
बादवे...वर रडणारे बरेच आयडी पुरुषमाणसांचे वाट्टायत नै?
शुचितै रसग्रहण आवड्ले!
13 Jan 2011 - 2:01 pm | समीरसूर
छान लिहिले आहे. खरंच डोळ्यात पाणी आले.
ही कविता आम्हासदेखील होती अभ्यासक्रमात.
पण समजायला खूप अवघड आहे. क्लिष्ट आणि जडजंबाल शब्द वापरून केलेले लिखाण समजायला अवघड जाते.
13 Jan 2011 - 8:27 pm | शुचि
प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद.
13 Jan 2011 - 8:55 pm | गणेशा
दुसर्या कडव्यातील पिल्लांसाठीची तळमळ पाहुन खरेच खुप वाईट वाटले ..
शेवटच्या कडव्यात तर अगदी आपल्या शेजारी निरपराध चिमना आई मृत पावली आहे की काय असा भास होतो आहे.
खुपच टच करुन गेली कविता.
प्रथमच हि कविता वाचायला मिळाली.
मनापासुन आभार
14 Jan 2011 - 12:59 am | धनंजय
ना वा टिळकांच्या कित्येक कविता मला आवडतात. शुचि यांनी केलेले रसग्रहण छानच आहे.
परंतु वरील कविता ... :-( भिन्नरुचिर्हि लोकः!
वर अपर्णा अक्षय म्हणतात की
मातेचे हृदय म्हणून ही कविता मला उलगडली. या मातृहृदयाबाबत अतिशय करुणा देखील वाटली.
पण पक्षीण म्हणून ही कविता उलगडली नाही. "पक्षिणी", "निजकोटरे" "चंचू" वगैरे पक्षिजगातील भरपूर शब्द असूनसुद्धा या कवितेने कुठल्या पक्ष्याबद्दलच्या कल्पनासृष्टीत मला नीट नेले नाही. (म्हणजे पहिल्या कडव्यात नेलेही, पण मग पुढल्या कडव्यांतही तिथे राहाण्यात मी कमी पडलो.) माझ्या आस्वादक्षमतेची त्रुटी स्वीकारून "मला करंट्याला ही कविता भावली नाही" असे म्हणण्याशिवाय काही गत्यंतर नाही.
- - -
आस्वादक म्हणून माझ्यापुरते पाहिले, तर पहिले कडवे, आणि नंतर थेट शेवटची दोन कडवी, अशी छोटेखानी तीन-कडव्याची कविता असती तर माझ्यावर मातृहृदय आणि पक्षीण या दोन्ही पद्धतींनी फार परिणाम झाला असता. काहीतरी करून मधली चार कडवी विसरता आली, तर ही कविता सुद्धा "ना वा टिळकांच्या आवडत्या कवितांपैकी" म्हणून यादीत रुजू होईल. तसे झाल्यास शुचि यांना द्विगुणित धन्यवाद.
14 Jan 2011 - 4:24 pm | गवि
मातेचे हृदय म्हणून ही कविता मला उलगडली. या मातृहृदयाबाबत अतिशय करुणा देखील वाटली.
पण पक्षीण म्हणून ही कविता उलगडली नाही.
+१
अर्थात कविता मातेच्या हृदयाविषयीच आहे. पक्षिणीविषयी नाहीच मुळात..
एका तळ्यात होती बदके पिले अनेक .. मधे आपण काय खरेच बदक म्हणून बघतो का?
आपले वेगळेपण न समजलेल्या गिफ्टेड मनुष्यांविषयीच आहे ना..
प्रत्यक्ष राजहंसाला बदकांमधे राहूनही कुरुप बिरुप असणे वगैरे वाटणार नाहीच.. त्याला माहीतच असेल की आपण "ते" नाही.
तसेच.
14 Jan 2011 - 7:20 pm | चित्रा
"पक्षिणी", "निजकोटरे" "चंचू" वगैरे पक्षिजगातील भरपूर शब्द असूनसुद्धा या कवितेने कुठल्या पक्ष्याबद्दलच्या कल्पनासृष्टीत मला नीट नेले नाही. (म्हणजे पहिल्या कडव्यात नेलेही, पण मग पुढल्या कडव्यांतही तिथे राहाण्यात मी कमी पडलो.) माझ्या आस्वादक्षमतेची त्रुटी स्वीकारून "मला करंट्याला ही कविता भावली नाही" असे म्हणण्याशिवाय काही गत्यंतर नाही.
कल्पना पक्षिणीबद्दलची वाटत नाही, म्हणून आवडली नाही? का पक्षिणीचे रूपक गरज नसताना उगाचच घेतले आहे असे वाटते? का मधली कडवी वाजवीपेक्षा जास्त माहिती देतात असे वाटते?
मला कविता परत वाचताना अधिकच आवडली. शुचि यांचे रसग्रहणही उत्तम आहे.
फक्त ही कविता मला पक्षिणीबद्दलची वाटत नाही, हेही तितकेच खरे.
धन्यवाद, शुचि.
14 Jan 2011 - 11:05 pm | धनंजय
पक्षिणीच्या रूपकाची "गरज नव्हती" असे नाही. रूपक सांगायची उत्कट आंतरिक गरज कवीला होती म्हणून कवीने कविता रचण्याचे विशेष प्रयत्न केले, हे माझे गृहीतकच आहे. कवीच्या त्या उत्कट रूपकाने माझे मन चेतवावे, या इच्छेनेच मी कविता वाचतो/गुणगुणतो आहे.
येथे "उत्कट" म्हणजे काय? तर दीर्घ-रूपकात उपमेय आणि उपमान प्रत्येक स्वतःहून जिवंत वाटले पाहिजे. येथे फक्त मातृहृदय हे उपमेयच पटते आहे, पक्षीण हे उपमान पटत नाही.
(आणि "पक्षीण मराठी बोलते" वगैरे बद्दल कुठलाच आक्षेप नाही. ही सर्व कल्पनारम्यता आस्वाद घेताना मान्यच आहे. तुम्ही सुद्धा म्हणता "कविता मला पक्षिणीबद्दलची वाटत नाही", तोच अनुभव मलाही आला, आणि त्या अनुभवाच्या अभावामुळे आस्वादात पोकळी वाटते आहे.)
मधली कडवी वाजवीपेक्षा जास्त माहिती देतात असे नेमके नाही. पण पहिल्या कडव्यात मला "पक्षीण" आणि "मातृहृदय" हे दोन्ही अनुभव जिवंत वाटू लागले होते, त्यापैकी "पक्षीण" हा अनुभव मधल्या कडव्यांमध्ये भंग पावतो. कवीने वाटेल तेवढी माहिती द्यावी. पण एकदा का कविताभर टिकेल इतके दीर्घ रूपक रचण्याचा प्रकल्प हातात घेतला, तो प्रकल्प अर्धवट टाकून चालायचे नाही. ती व्याज माहिती देताना रूपकाचा जिवंतपणा (म्हणजे उपमेय-अपमान दोहोंचा जिवंतपणा) ठेवण्याचे भान असले पाहिजे.
- - -
हाच उपप्रतिसाद कमीअधिक तपशिलांनी गगनविहारी यांच्या प्रतिसादाला सुद्धा लागू आहे. मला वाटते "एका तळ्यात होती", किंवा इसापाच्या बोधकथा, किंवा पंचतंत्रातल्या कथा - या सर्व ठिकाणी "हे रूपक म्हणून फारसे चांगले नाही, यातील प्राण्यांची नावे त्या प्राण्यांशी मुळीच संबंधित नसून प्रवृत्तींची नावे आहेत" असे काहीसे सांगून टाकलेले असते. उगीच वाढीव अपेक्षा नसतात, आणि ज्या सुमार अपेक्षा असतात, त्या पुर्यासुद्धा होतात.
येथे "आपण निव्वळ एकांगी बोधकथा नाही, तर उत्कट आणि जिवंत रूपकाचा अनुभव घेणार" असे ना वा टिळकांनी जवळजवळ आश्वासन दिलेले आहे. (म्हणजे कविताशैलीची निवड, पहिल्या कडव्यात पक्षिणीचे वर्णन जिवंत करण्याबाबत घेतलेली काळजी, वगैरे, यातून आश्वासन दिलेले आहे.) एकदा का असे आश्वासन दिले, तर मग शब्द फिरवून "याला इसापाच्या कथेसारखे वरवरचे रूपक माना" असे म्हटले, तर माझ्या आस्वादात विरस होतो.
15 Jan 2011 - 12:11 am | गवि
आवडले.. खूप सेन्सिबल बोललात..
अगदी छान समजावलेत..पटले..
14 Jan 2011 - 1:59 pm | अप्पा जोगळेकर
शेवटंच कडवं अक्षरशः खलास आहे. नारायणराव टिळक म्हणजे खरोखरच सलाम करावा असा माणूस.
राम गणेश गडकरी यांच्या 'एकेकाचे नशीब' या कवितेचे सुद्धा ताईंनी असेच रसग्रहण करावे अशी विनंती आहे. नेटवर मागे एकदा कुठेतरी वाचली होती.
14 Jan 2011 - 2:51 pm | प्राजक्ता पवार
छान लिहिले आहे.
14 Jan 2011 - 6:25 pm | वेताळ
किती हे कौर्य..........................
काही उपाय असल्यास सांगणे.
15 Jan 2011 - 12:58 am | प्राजु
कविता पाठ आहे.. अतिशय आवडती आहे कविता.