सबला

कवितानागेश's picture
कवितानागेश in जनातलं, मनातलं
12 Jan 2011 - 8:27 pm

सबला

'स्त्री आणी तिची मुक्ती' अशा विषयावर सध्या चाललेल्या चर्चा वाचून मला राहून राहून एकाच स्त्रीची आठवण होत रहातेय.
माझी आजी.
मी तिच्याकडून कळतनकळत खूप शिकले. हे व्यक्तीचित्र मी आदर्श म्हणून अजिबात लिहीत नाहीये.
कारण कुणीच कुणासाठी 'आदर्श' असू शकते असे मला वाटत नाही. पण तरी तिच्याकडे बघताबघ्ता मला माझ्या आतल्याच खूप गोष्टी 'सापडल्या'.
तिचा 'स्त्रीमुक्ती' या शब्दाला कायम विरोध होता, कारण मुक्ती म्हणजे 'डायरेक्ट मोक्ष' हाच इतकाच अर्थ तिला पटायाचा. मुक्त होऊन 'स्त्री' नक्की करणार तरी काय, असा प्रश्न तिला कायम पडायचा.
पुरुष आणि स्त्री या दोघामधाला नैसर्गिक फरक संपणार नाही, तो संपवायची गरजही नाही, कारण तो फरकच त्याना पूरक असतो, याबद्दल तिची मते ठाम होती.
त्यामुळे तिने ना कधी पुरुषांना शत्रू मानले , ना स्त्रियांना. .
एकंदरीत पुरुषांची थट्टा मात्र पुष्कळ करायची ती. 'मुलांबद्दल बोलताना, तुझी मुले बघ कशी वागतायत , आणि लंगोट हरवला की 'आपला तो लंगोट कुठे गेला ग?' असे असतात पुरुष!
तश्या त्या पिढीतल्या बर्‍याच बायका तिच्यासारख्याच होत्या. म्हटले तर सरळ सध्या, म्हटले तर हिकमती! ना वैतागता, ना घाबरता पण न भांडता, समरसून जगणार्‍या.

तिच्या 'टिन एज' मध्ये तिनी भूमिगत स्वातंत्र्यसैनिकाना भाकर्‍या पोचवणे, त्याच्या पिस्तुली गोठ्यात लपवून रोज स्वच्छ करणे वगरै कामे केली होती. ती मेट्रिक झाली, हिंगण्याला होस्टेलवर राहून देखील शिकली. तिला मराठी इंग्लिश, हिंदी, तेलुगु आणि कानडी या भाषा वाचता, लिहिता, बोलता यायच्या. तिला उत्तम पोहता यायचे. गाण्याची, नृत्याची, नाटकाची उत्तम जाण होती. सुग्रणपणाला तर तिच्या पिढीत ऑप्शनच नव्हता!
तशी ती मुक्त कधीच नव्हती, पण ती 'बद्ध' पण नव्हती.
तिनी कधीही पैसे कमावले नाहीत, पण त्यामुळे ती कधीही दीनवाणी झाली नाही.
उलट तिचा हात कायम 'देणारा' होता. कसे काय कुणास ठाऊक?
ती आजोबांशी कधीही भांडली नाही, तिनी त्यांचे मन कधीही मोडले नाही;
पण त्यासाठी तिनी स्वत:चे मनदेखील मोडले नाही.
घरादारावर कायम तिच्याच नजरेचा वचक असायचा!
तिनी जे असेल त्यात संसार केला, पण तिचा चेहरा कधी कुणी उदास, रडका पहिला नाही.
पैशाची कायमच चणचण असायची, पण आनंदाची नसायची. तिनी कधीही आजोबांकडे त्यांनी अजून पैसे कमवावेत म्हणून हट्ट केला नाही. तिच्या वागण्यात मात्र कधीच गरिबी नसायची. आजोबाना अपमानास्पद वागणूक दिलेल्या, तिच्या २ जवळच्या नातेवाईकान्च्या घरात तिनी आयुष्यभर पाउल टाकले नाही. तिनी त्याबद्दल कडवटपण आणि द्वेषही बाळगला नाही. पण स्वत:चा पैसा आणि स्वत:च्या मालकीचे घर वगरै काहीही नसून, तिची मान कायम ताठ राहिली.
तिच्या आयुष्याची आणि तिच्या संसाराची ती कायम 'बॉस' होती.
आजोबा त्यावेळेसची 'अ‍ॅडव्होकेट' ची परिक्षा देऊन वकिली करत होते. आलेल्या अशीलाना कोर्टात नेण्याऐवजी बर्‍याचवेळेस ते काहीतरी मधला उपाय काढून , दोन्ही बाजूना बोलावून घेऊन, समजावून, तंटा सोडवून आनंदानी घरी परत पाठवून द्यायचे, ते देखील एकाही पैसा ना घेता. याबद्दल आजीची काहीही तक्रार नसायची.
घरात ७ मुले, सासर, माहेरचे विश्रांतीसाठी आलेले आजारी पाहुणे, इतर मित्रमंडळी, नातेवाईक सतत असायचे. घरातले, नातेवाईक, शेजारचे, मित्रमंडली, अगदी पाळलेली कुत्रे मांजरे यांच्यापैकी कुणालाही शुश्रुषेची गरज असेल, तर ती तिथे असायची. शिवाय चातुर्मासात, नादारीवर शिकणारे विद्यार्थी, एकटे रामादासीबुवा, पुजारी अश्या कुणालातरी जेवायला बोलवायची पद्धत तिनी अनेक वर्षे पाळली.
तिचे माहेर म्हणजे,कडक सोवळ्यातले वैष्णव, असल्यानी ती कधीच आंघोळीशिवाय स्वैपाकाला लागली नाही. पण ती सकाळी १०- १०.३० वाजता, अगदी सणावाराला सुद्धा, स्वैपाकघरातून मोकळी झालेली असायची!
तिचा स्वैपाक कधी बिघडला नाही, कधी कमी पडला नाही की कधी उरला नाही!
तिनी नोकरी केली नाही, पण कामे मात्र खूप केली. अगदी स्वत:च्या आवडीचीच केली. पुष्कळ कविता लिहिल्या, कथा लिहिल्या. साहित्य संमेलनातून काम केले. अनेक वर्षे दासबोध मंडळाच्या परिक्षांसाठी लोकाना घरोघर जाऊन माहिती देणे, शिकवणे, मदत करणे, पेपर तपासणे हे काम तिनी विनामोबदला केले. या सगळ्यात अनेक वेळेस अनेक ठिकाणी वेगवेगळ्या 'पुरुष'मंडळींबरोबरच कामे असायची. पण त्यातदेखील कधी तिला/ आजोबांना कुणाला काही चुकीचे वगरै वाटले नाही.
तिच्या ९२ वर्षांच्या आयुष्यात तिच्या तोंडून कधीही कुणीही 'कंटाळा' हा शब्द ऐकला नाही.
तिनी कधी वेळ वाया देखील घालवला नाही की कधी घाईगडबड, धावाधावही केली नाही. तिची सगळी कामे एका 'रिदम' मध्ये चालायची.
तीनी नोकारी करणार्‍या सुनेला सकाळी डबा करून दिलाय, नोकरी ना करणार्‍या सुनेला भरतकाम, विणकाम, आणि खास सुग्रणपणाचे जिलेबी, बालुशाही वगरै पदार्थ शिकवलेत. तिची ७ मुले, १५ भाचे, १८ नातवंडे, १४ पतवंडे इथपर्यंत सगळ्या तान्ह्या बाळांचे तेल-उटणे-आंघोळ-गुटी इ. सगळे प्रकार तिनी केले.
तिचा चेहरा कायम प्रसन्न असायचा. तिची हिम्मत जबरदस्त होती. तिच्या वयाच्या तिशीतच अचानक आलेल्या कर्जामुळे आजोबा डीप्रेस होऊन कुठेतरी रामाच्या मंदिरात जाऊन बसले होते. तिनी त्यांना शोधून काढून, समजावून परत घरी आणले आणि हिम्मत देऊन पुन्हां कामाला लावले. तिच्या वयाच्या पन्नाशीत, भर बाजारात उधळलेला बैल समोर आल्यावर, त्याची शिंग रोखून तिनी त्याला अडवले होते.
तिला कधीच आम्ही रिकामे बसलेले पहिले नाही. मेंगळटासारखे, दमलेले, थकलेले देखील पहिले नाही.
तिनी कायम कष्ट केले, पण त्या कष्टांनी ती कधीच 'गांजली' नाही.

तरी तिच्या एका स्त्रीयांना उद्देशून केलेल्या कवितेतल्या ओळी मला लहानपणी नेहमी खटकायच्या,

जात तुझी चंदनाची, असे झिजू दे ग अंग,
सये! मांडिलीस पूजा, होऊ देई यथासांग ........

माझ्या मुळातल्या आळशी स्वभावाला हे असे 'झिजणे' वगरै कधीच झेपण्यासारखे नव्हते. पण कदाचित, ते ओळखूनच, माझ्यावर स्वैपाक शिकण्यासाठी तिच्याकडून जास्त दट्ट्या असायचा. मला तर नारळ खवायचा सुद्धा कंटाळा यायचा. मग ती सांगायची, 'आपलयाला आवडते ना चटणी, छान लागते ना, मग त्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावेच लागणार. कंटाळत बसलीस तर काम लांबेल. आहे काय त्यात एवढे? करून टाक चटकीन!'
खरें तर तिचा सगळ्याच कामांसाठी हाच मंत्र असायाचा, "आहे काय त्यात एवढे? करून टाक चटकीन!" शिवाय काहीतरी 'मिळवण्यासाठी' काहीतरी 'द्यावे' लागते, हे शिकण्याची माझी हीच पहिली पायरी होती.
तशी ती बुरसटलेल्या विचारांची अजिबात नव्हती.
मुलांना नवीन , वेगळे असे काहीतरी आवडते हे तिला पक्के माहित होते. १९५० च्या दशकात तिनी घरीच पाव, बिस्किटे केके, वगरै केले होते- अर्थात बिना अंड्याचे. पपई, पेरू, अंजीर, जांभूळ अशा फळामध्ये अंगचेच 'पेक्तीन' असते हे शोधून काढले, आणि ती फळे वापरून ती घरीच जाम जेली वगरै करायची. अर्थातच शेजारीपाजारीपण वाटायची.
बॉबकटची फॅशन आल्यावर, मुलींना हौस असते हे ओळखून तिनी घरीच माझ्या मावश्यांचे अतिशय सुंदर हेअरकट केले होते. येकदम हिरवीण दिसायच्या दोघी! मी कोलेज मध्ये असताना तिनी एका माझ्या वाढदिवसाला मला 'तुला आवडते ना, तुझ्यासाठी जीन्स घे' असे सांगून पैसे दिले होते.
तशी विचारानीपण ती मोकळी होती. माझ्या मावशीच्या एका मैत्रिणीचे पती चाळीशीतच अचानक गेले. २ मुले होते. पण तिचे लग्न परत करून द्यावे, यासाठी तिनी स्वत: घरी जाऊन त्या मैत्रिणीच्या वडलांशी चर्चा केली होती. त्याचा काही उपयोग झाला नाही याबद्दल मात्र तिला कायम खंत होती. माझ्या बहिणीच्या एका जवळच्या मैत्रिणीचे परधर्मीय मुलाशी 'जमले' होते. तिच्या घरात 'वादळ' वगरै सुरु होते. ती बिचारी बहिणीकडे येऊन रडत बसायची.
आजीनी सरळ त्या मुलीच्या आईची कानउघाडणी केली, 'मुलगी कुठेतरी सासरी जाणारच ना शेवटी. धर्म वेगळा असला म्हणून काय झाले. नवरा तो नवराच, सासर ते सासरच! तिला दुखवू तरी नका. तिच्या मनाविरुद्ध जायचे नाही.' त्या मुलीलापण समजावले. 'मात्र आधी शिक्षण पूर्ण कर. दोघे नोकरी बघा नीट. ' आमच्या 'हिंदुत्ववादी' आजीकडून हे ऐकून आम्हाला सगळ्यांनाच धक्का बसला होता!
ती वयानुरूप आलेल्या शहाणपणाने फक्त शिकवत, सल्ले देत राहिली असेही नाही. उतार वयातदेखील तिच्याकडे स्वत:ला पारखण्याची हिम्मत होती.
माझी आई, मावशी, मामा वगरै , आमच्याशी मुलांशी भरपूर गप्पा मारतात हे बघून ती एकदा आईला म्हणाली, 'मला तुम्हा मुलांबरोबर कधीच असा इतका वेळ घालवता आला नाही. तेदेखील महत्त्वाचे आहे. माझे थोडे चुकलंच. '
तसे म्हटले तर तिची खूप गोष्टीत निराशाच झाले होती. ती स्वत:, आजोबा, तिची मुले यांच्यापैकी कुणाचेच त्याच्या गुणांच्या मानानी, नाव, करियर, प्रसिद्धी, कोतूक, वगरै गोष्टी झाल्या नाहीत. उलट जरा खडतरच योग आले. पण ती त्यामुळे कधी कावलेली दिसली नाही.
जे जे समोर येईल त्याला तोंड देणे, ते मनापासून, उत्तम करणे हे तिला पक्के माहित होते.
तिच्या अशा मृदू आणि लढाऊ अशा दोन्ही गुण दाखवणाऱ्या व्यक्तिमत्वाचा विचार केल्यावर एक गोष्ट स्पष्ट जाणवते, की तिनी स्वत:ला पूर्ण ओळखलेले होते, ती कशी आहे, तिला स्वत:ला काय हवय, ती काय करू शकते आणि तिच्या आणि तिच्या संसारातल्या सर्वांच्या संपन्न आयुष्यासाठी तिनी काय करायला हवय याची तिला पूर्ण जाण होती. तिनी तिचे चंदनाचे गुण पूर्ण ओळखले होते.
त्याच कवितेतल्या शेवटच्या ओळी होत्या,

चंदनाच्या अंगसंगे बाभूळाही गंध जोडी,
जात तुझी चंदनाची, तुझे 'मी' पण ना सोडी!

एक स्त्री म्हणून नैसर्गिकरीत्याच व समजव्यवस्थेचा भाग म्हणून, जमवून घेणे, कष्ट करणे, दु:ख सोसणे या गोष्टी वाट्याला येणार हे तिनी गृहीत धरले होते. पण सगळे निभावून नेण्याचे सामर्थ्य देखील स्त्री म्हणूनच वाट्याला आले आहे हेदेखील तिला पक्के माहित होते. तिनी आजोबांचे, मुलांचे, नातवंडांचे सगळे लहानमोठे हट्ट पुरवले, पण कधीही स्वत:ला किंवा कुणालाही पायाची दासी वगरै मानले नाही.
कुणासाठीही काही करताना ती नोकर, आया वगरै नसायची, ती 'दात्री' होती! ती ''सबला' होती!

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

अनामिक's picture

12 Jan 2011 - 8:40 pm | अनामिक

सुंदर लेख लीमाउजेट!

शुचि's picture

12 Jan 2011 - 8:43 pm | शुचि

सुरेख व्यक्तीचित्रण :)
>> 'आपलयाला आवडते ना चटणी, छान लागते ना, मग त्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावेच लागणार. >>
खरच साधसच वाक्य पण माझ्यासारख्या आळशी लोकांसाठी खूप मोलाचा संदेश आहे त्यात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Jan 2011 - 9:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

माझी एक आजी मी पाहिली नाही, एक आठवत नाही. पण शेजारची आजी थोड्याबहुत फरकाने अशीच होती. माझ्या आई-बाबांनाही तिचा खूप आधार वाटायचा. तुझा लेख आवडला आणि त्या आजीची आठवण आल्यामुळे जरा जास्तच भावला.

मी आणि माझा भाऊ "आपल्याला आवडतो अमका पदार्थ, छान लागतो ना, मग त्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावेच लागणार" असाच विचार करत प्राथमिक शाळेत असल्यापासूनच काही काही गोष्टी बनवायला शिकलो. फरक एवढाच तुझ्या आजीने तुला हे सांगितलं, आमच्या घरात आईची नोकरी, शिस्त आणि आमचा उचापाती स्वभाव याच्यामुळे आम्ही दोघे आपणहून शिकलो.

चंदनाच्या अंगसंगे बाभूळाही गंध जोडी,
जात तुझी चंदनाची, तुझे 'मी' पण ना सोडी!

सुंदर लेख !

अप्रतीम आणि ओघवतं लिहीलं आहेस माऊ. मस्तच.

रेवती's picture

12 Jan 2011 - 9:12 pm | रेवती

खूपच छान लिहिले आहेस!
कवितेच्या ओळीही सुंदर आहेत.
आजी सबला राहिली कारण आपापल्या मर्यादा ओळखून घरातल्यांनीही वागणे तसेच ठेवले. आईच्या पिढीत सबला नव्हत्या असे नाही पण त्या नव्या पिढीलाही नियम जुनेच लावले गेले. अश्याने दमछाक लवकर होते. गृहीणी असण्यात गैर काहीच नाही पण त्याव्यतिरिक्त बाईला काही करण्यास वेळ न ठेवणे यामुळे आईची पिढी लवकर थकली असे वाटते. तुझ्या आजीने लेख, कथा कविता लिहून मन ताजेतवाने ठेवले पण तसे करण्यास पुढच्या पिढीतील स्त्रियांना वेळ पुरला नाही.
माझी आजी तिच्यावेळची मॅट्रीक तर होतीच पण संस्कृतमध्ये चक्क सुवर्णपदक विजेती होती. तिने पुढे शिकण्याची इच्छा व्यक्त करताच तिच्या वडीलांनी सुवर्णपदक विहीरीत टाकून दिले व लगेच लग्न करून दिले. तशीही १६ वर्षाची म्हणून घोडनवरी झाली होती ती. त्यानंतर तिने माझ्या आईला चांगले संस्कृत शिकवले व आईलाही चांगले गुण मिळाले पण तेच सगळे माझ्यापर्यंत पोहोचवायला आईला संसाराच्या रगाड्यातून वेळ नव्हता. मनात नसताना जे आई किंवा काकूला करावे लागले त्याने त्या लवकर थकल्या. माझ्या चारही आत्या वयाची साठी पार करता करता गेल्या. अत्यंत अभ्यासू आणि हुषार असताना केवळ घरकाम करावे लागले. माझ्या मते त्यांनी तरीही इतकी वर्षं संसार मनाच्या शक्तीवर ओढले त्यामुळे त्याही वेगळ्याप्रकारे सबला होत्या.

शुचि's picture

12 Jan 2011 - 10:45 pm | शुचि

>> त्यानंतर तिने माझ्या आईला चांगले संस्कृत शिकवले व आईलाही चांगले गुण मिळाले >>
ये हुई ना बात!!!!आपल्या मुलांना आपल्या गुणांचा फायदा करून द्यायचा नाहीतर कोणाला?
रेवती ते पदक खूप खूप सुरेख रीतीने वापरले आज्जीने तुझ्या. एक सुसंस्कारीत पीढी निर्माण केली. ज्या पीढीने पुढे तो वारसा चालविला.
छान अनुभव.

अन्या दातार's picture

12 Jan 2011 - 9:12 pm | अन्या दातार

याच विषयावर लोकसत्ता नागपूरचे निवासी संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी रुचीच्या दिवाळी अंकात लिहिले आहे. त्याची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही. तुमचाही लेख तसाच मस्त आहे.

राजेश घासकडवी's picture

12 Jan 2011 - 9:12 pm | राजेश घासकडवी

उत्तम व्यक्तीचित्रण. तुमच्या आजीचं ताठ कण्याचं व्यक्तिमत्व वाक्यावाक्यातून जाणवतं. आपण कोण आहोत, आपली शक्ती काय आहे, मर्यादा काय आहे हे ओळखून घेऊन त्यात आनंदाने वावरणं ही त्यांची सकारात्मक भूमिका स्त्रियांनीच नव्हे तर सर्वांनीच अंगीकारण्यासारखी आहे. प्रत्येकच व्यक्ती इतक्या समर्थपणे, मानीपणे, डोळसपणे, व पुरोगामीपणे जगली तर खूप प्रश्न नष्ट होतील.

या कर्तृत्ववान बाईने संधी मिळाली असती तर एखादी कंपनी सहज चालवून दाखवली असती. एखाद्या स्त्रीला संधी व कर्तबगारी असूनही मनापासून घर चालवावंसं वाटत असेल तर प्रश्नच येत नाही. या बाईला कंपनी चालवण्याची संधीच मिळाली नाही हे दुर्दैव. अशी संधी अस्तित्वात असण्यासाठीच स्त्रीमुक्तीची गरज आहे.

कवितानागेश's picture

12 Jan 2011 - 11:15 pm | कवितानागेश

माझी आई नेहमी हेच म्हणते आजीबद्दल.
पण आजीला कधी तसे काही वाटले नाही. तिचं आणि आजोबांचे देखिल, व्यक्तीमत्व इतके प्रभावी होते, की एकदा भेटलेला माणूस आयुष्यात त्यांना विसरणार नाही. परत परत प्रेमानी आठवण काढत राहील.

आता ती नाही, तरीही आमच्यावर सगळ्यांवर तिचा इतका प्रभाव असतो की कधीही 'अत्ता आजी इथे असती तर काय म्हणाली असती' असा विचार दिवसातून कमीत कमी एकदा तरी डोकावून जातो.

स्वाती दिनेश's picture

12 Jan 2011 - 9:14 pm | स्वाती दिनेश

आजी आवडली,
स्वाती

प्रियाली's picture

12 Jan 2011 - 9:16 pm | प्रियाली

आजीचे व्यक्तिचित्रण आवडले. उत्तम लिहिले आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनीही यातून योग्य तो बोध घ्यावा.

चित्रा's picture

12 Jan 2011 - 11:24 pm | चित्रा

आजीचे व्यक्तीचित्रण खूपच आवडले.

चंदनाच्या अंगसंगे बाभूळाही गंध जोडी,
जात तुझी चंदनाची, तुझे 'मी' पण ना सोडी!

सुरेख! :) फार सुरेख लेख लिहिलेला आहे. अतिशय आवडला.

आदिजोशी's picture

12 Jan 2011 - 9:26 pm | आदिजोशी

ही खरी मुक्त स्त्री.

आजच्या सो कॉल्ड स्वयंपूर्ण, स्वतंत्र मुलींनी ह्यांच्याकडून धडे घ्यावेत.

सूर्यपुत्र's picture

12 Jan 2011 - 9:44 pm | सूर्यपुत्र

अतिशय छान आणि उत्कॄष्ट लेख. ठळकपणे लिहिलेली वाक्ये अजूनच आवडली. त्यामुळे ती वाक्ये अजूनच अधोरेखीत झाली. :)

मुलूखावेगळी's picture

12 Jan 2011 - 10:09 pm | मुलूखावेगळी

तिचा 'स्त्रीमुक्ती' या शब्दाला कायम विरोध होता, कारण मुक्ती म्हणजे 'डायरेक्ट मोक्ष' हाच इतकाच अर्थ तिला पटायाचा. मुक्त होऊन 'स्त्री' नक्की करणार तरी काय, असा प्रश्न तिला कायम पडायचा.
>>>>

पुरुष आणि स्त्री या दोघामधाला नैसर्गिक फरक संपणार नाही, तो संपवायची गरजही नाही, कारण तो फरकच त्याना पूरक असतो, याबद्दल तिची मते ठाम होती.
>>>>

बरोबर आहे. सध्या जे लेख मिपावर आले आहेत स्त्री-पुरुष मुक्ती वरचे त्याचा सुवर्नमध्य हा लेख आनि आजीची भुमिका आहे.
ज्याना कळालेय त्यानी समजुन शान्त बसावे नि बाकिच्याना वाद घालन्यासाठी सुट द्यावी.
आनि आजी आवड्ली

अर्धवटराव's picture

13 Jan 2011 - 4:29 am | अर्धवटराव

हॅट्स ओफ्फ !!
या आजीचं कर्तुत्व एखाद्या क्षेत्रात ठळकपणे जाणवलं नाहि, तिला तशी संधी मिळाली नाहि वगैरे ठीक पण तिनी आयुष्यभर असंख्य लोकांच्या मनात, विचारांत, जीवनात जी शाश्वत शक्ती पेरली त्याचं कलेक्टीव्ह कर्तुत्व किती प्रचंड असेल याची कल्पना करणे अशक्य आहे.
ज्यांनी ज्यांनी हा लेख वाचला त्यांना मनात काहितरी आश्वासक, सशक्त हुंकार जाणवला ना... आजीपासुन तिसर्‍या पिढीने केलेल्या व्यक्तीचित्रात ही ताकत असेल तर आजीचा प्रत्यक्ष सहवास किती मोलाचा असेल...

अर्धवटराव

प्राजु's picture

12 Jan 2011 - 11:05 pm | प्राजु

अतिशय सुरेख व्यक्तिचित्र!

अतिशय उत्तम आणि मनाला भिडणारे व्यक्तिचित्रण आहे..

- पिंगू

कवितानागेश's picture

12 Jan 2011 - 11:30 pm | कवितानागेश

वाहीदा's picture

13 Jan 2011 - 1:14 am | वाहीदा

तिच्या आयुष्याची आणि तिच्या संसाराची ती कायम 'बॉस' होती.
यात तुझ्या आजोबांचा ही मोठेपणा आहे की त्यांनी तिच्यावर 'बॉस'पणा दाखविला नसणार अन आज्जीवर आपले वर्चस्वही गाजविले नसणार.
'आपलयाला आवडते ना चटणी, छान लागते ना, मग त्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावेच लागणार. कंटाळत बसलीस तर काम लांबेल. आहे काय त्यात एवढे? करून टाक चटकीन!'
हे खूपच आवडले.
Overall तुझ्या गोड आजीचे व्यक्तिचित्रण आवडले तिच्याकडून खुप काही शिकण्याजोगे !!

कसली सुंदर आहे आज्जी :) दिसायला तर सुरेख आहेच, पण तिच्या स्वभावाचे प्रतिबिंब तिच्या चेहर्‍यावर आहे ते अधिक भावले.

विचारायचे कारण एकच , माझी अम्मी पण तेथेच हिंगण्याला शिकली होती. माझ्या अम्मी अन तुझ्या आज्जीमध्ये वयाचं अंतर आहे तरीपण आज अम्मी असती अन तिने हा लेख वाचला असता तर केवढी आनंदली असती !!
माझ्या अम्मीच्या शाळेतल्या(हिंगणे) व्यक्तीचे चित्रण परत परत वाचले.
मध्यंतरीच विक्रम कर्वेंशी (धोंडो केशव कर्वेंचे पणतू ) बोलणं पण झालं होतं.
अम्मीसाठी मला कधीपासून जायचं आहे ग हिंगणेला पण वेळच मिळत नाही
तुझ्या आज्जीच्या या व्यक्तिचित्रणाची लिंक त्यांना मी आजच पाठविते
खंबिर भक्कम आधार देण्यार्‍या स्त्रिया हिंगण्यातच घडू शकतात

मुक्तसुनीत's picture

12 Jan 2011 - 11:41 pm | मुक्तसुनीत

अतिशय परिणामकारक व्यक्तिचित्र.

एक गोष्ट विचारावीशी वाटते. एखाद्या स्त्रीचा आत्मसन्मान, तिला मिळणारे योग्य ते स्थान हा तिचा अधिकार आहे यात शंका नाही. आपल्या समाजव्यवस्थेत शतकानुशतके तो तसा उपलब्ध नव्हता म्हणूनच , ही मूलभूत गोष्ट आवर्जून सांगायची वेळ येते हेही खरेच. मात्र, ज्या घरात (लेखिकेच्या आजीसारख्या ) स्त्रियांना स्वतःची ओळख पटवून घेणे आणि कुटुंबात नि समाजात ती योग्य रीतीने मांडणे शक्य होते , त्या घरातल्या व्यवस्थेलाही थोडे श्रेय देता येईल. लेखिकेच्या आजीचे व्यक्तित्व सोन्यासारखे झळाळते आहे यात शंका नाही; परंतु ते तसे व्हावे म्हणून तसे वातावरण घरात होते; आजोबांनीही ऐन संसाराच्या काळात योग्य ती पावले उचलली असतील असे म्हणता येईल का ?

कुटुंबव्यवस्था समजूतदार असणे ही काही फार मोठी अचीव्हमेंट नव्हे हे खरे; परंतु अनेक दशकांपूर्वी जर का एखादे कुटुंब घरातल्या स्त्रीला सन्मानाने वागू देत असेल तर त्या कुटुंबातले वातावरणही उल्लेखनीय होते असे मानायला हरकत नसावी.

अगदी सहमत.
माझ्या वर दिलेल्या प्रतिसादात हेच लिहिले आहे. आपापल्या मर्यादा ओळखून कामे केली तर बघता बघता निपटतात. त्याचप्रमाणे विचारही मोकळे ठेवले तर घरातल्या 'बाई' या प्राण्यावर अतोनात काम पडत नाही. तसेही घरकाम करण्याचा उरक 'शक्यतो' बायकांना जास्त असतो पण ते कामही मर्यादीबाहेर दिले गेले म्हणूनच ओरडा सुरू झाला ना! आजोबांच्या मोकळ्या विचारसरणीलाही बरोबरीने श्रेय द्यायला हवे.

प्रियाली's picture

13 Jan 2011 - 12:52 am | प्रियाली

प्रश्न आहे साथ देण्याचा. जर तुमचा जोडीदार तुमच्या इच्छेला तुमची साथ देत असेल तर सबल होण्यात अधिक मदत होते. जेव्हा दोघांपैकी एकजण आडमुठेपणा करायचे ठरवतो तेव्हा दुसर्‍याला उसळावे तरी लागते किंवा दबावे तरी लागते.

चित्रा's picture

13 Jan 2011 - 5:40 am | चित्रा

सहमत. तसेच विचारांनी सुधारक आईवडिल किंवा इतर मिळालेल्या संधी यांचाही परिणाम होत असावा.
नाहीतर घरच्यांच्या /बाहेरच्यांच्या (आईवडिल, नातेवाईक) दबावाखाली एकतर उसळावे लागते नाहीतर दबावे लागते असे वाटते.

कवितानागेश's picture

12 Jan 2011 - 11:58 pm | कवितानागेश

सन्मान बाहेरुन नन्तर मिळतो. आधी 'आतमध्येच आत्मसन्मान' असावा लागतो.
आजोबा मनानी मोकळे होते यात वादच नाही. पण मूळात आजी स्वतःला कधी स्त्री म्हणजे 'कमी प्रतीची' असे कधी समजलीच नाही.
स्त्रियांकडेच जास्त पात्रता असते, त्यामूळे त्यांच्यावर जास्त जबाबदारी पडते, असे तिचे मत होते.
'स्त्रियाच समाज घडवतात' याबद्दल तिला पूर्ण खात्री होती.
तिनी तिच्या मुलींच्या केलेल्या 'बॉबकट' बद्दल तिला घरातुनच 'काय रुपाचे बेरुप केले पोरींचे!' अशी प्रतिक्रिया ऐकावी लागली होती. तिनी ती मनावर घेतली नाही. ती प्रतिक्रिया देणार्‍या व्यक्तीवरही राग ठेवला नाही.

चित्रा's picture

13 Jan 2011 - 5:21 am | चित्रा

>>तिच्या 'टिन एज' मध्ये तिनी भूमिगत स्वातंत्र्यसैनिकाना भाकर्‍या पोचवणे, त्याच्या पिस्तुली गोठ्यात लपवून रोज स्वच्छ करणे वगरै कामे केली होती. ती मेट्रिक झाली, हिंगण्याला होस्टेलवर राहून देखील शिकली. तिला मराठी इंग्लिश, हिंदी, तेलुगु आणि कानडी या भाषा वाचता, लिहिता, बोलता यायच्या. तिला उत्तम पोहता यायचे. गाण्याची, नृत्याची, नाटकाची उत्तम जाण होती. सुग्रणपणाला तर तिच्या पिढीत ऑप्शनच नव्हता!

तुमच्या आजीचे व्यक्तीमत्व खरोखरच लखलखीत आहे, आणि तुमच्या आजीच्या माहेराबद्दलही लिहायला हवे होते असे परत वाचताना जाणवले. पोहता येणे, लिहीता-वाचता येणे, मॅट्रिक होणे हे फार कमी बायका तेव्हा करू शकत असाव्यात. एकवेळ लिहीतावाचता येणार्‍या बर्‍याच असतील, पोहता येणार्‍या बायका खरोखरच कमी असाव्यात. हिंगण्याला त्या होत्या, त्या कशा तेथे गेल्या? तेथे कोणाचे मार्गदर्शन त्यांना मिळाले?

काही लोकांचा आत्मसन्मान आतूनच असतो हे जसे खरे, पण तसे ज्यांना तो नसतो त्यांना अशी लखलखीत उदाहरणे बघून, शिकून कल्पना येऊ शकते.

हिंगण्याला माझ्या मते महर्षी कर्व्यांची शाळा होती...कदाचीत त्यामुळे थोडा मोकळेपणा असेल.

लेख छान. मीही हेच म्हणेन कि जोडीदाराची साथ असावीच लागते...नाहीतर घरात तेच बाहेर तेच.

धनंजय's picture

13 Jan 2011 - 12:23 am | धनंजय

तुमच्या आजीची ओळख आवडली.

इन्द्र्राज पवार's picture

13 Jan 2011 - 12:48 am | इन्द्र्राज पवार

अगदी माझ्या मनातील माझ्या आजीचेच हे थोड्याबहुत फरकाने चित्रण केले आहे, लीमाउजेट यानी. तसे म्हटले तर प्रत्येक मुलाला मुलीला आजोबापेक्षा आजीच का हवीहवीशी वाटते त्याचे प्रत्यंतर वरील लेखातून स्पष्टपणे जाणवते इतके ते आपलेसे झाले आहे.

"....पण सगळे निभावून नेण्याचे सामर्थ्य देखील स्त्री म्हणूनच वाट्याला आले आहे हेदेखील तिला पक्के माहित होते. ..."

~ हे तर फार विशेष आहे. ही समज सर्व दु:ख आणि कष्ट निश्चितच हलके करते. जगण्याचे सुरेख तत्वज्ञानच आहे एक प्रकारे.

वैयक्तिक पातळीवर मला भावले ते तुमच्या आजीला 'उत्तम पोहायला यायचे' हे. मला माझा मामा पहाटे उठवून सक्तीने पंचगंगा नदीकडे न्यायचा त्यावेळी मी आईच्या कुशीत लपलो तरी मला तिथून आजी बाहेर काढायची आणि मामापेक्षा तीच जास्त पोहायला जाण्याची सक्ती करत असे. "पुढील आयुष्यात मासा खाल्ला नाहीस तर चालेल, पण आता माशासारखे पोहायला मात्र शिकलेच पाहिजे..." अशी तिची सक्त ताकीद आणि मी योग्य तितके पोहून आलो याची खात्री झाल्यावरच न्याहारी....मग मात्र ती अगदी ढीगभर, अगदी मायेने ओथंबून. सायकलवरून पडून आलो तरी ती अजिबात रागवत नसे, अगदी ओली जखम जरी दिसली तरी, "काय लागल्ये तरी...चिमणीच्या चोचीएवढं आणि दंगा बघा वाघ चावल्यासारखा...!"...म्हणजे जखम झाली ती झालेलीच नाही असे ती वातावरण आपल्या बोलण्यातून करत असे आणि खरंच तिच्या शब्दांनी त्या जखमेचा विसरच पडून जायचा.

आजी पाहिजेच !! थॅन्क्स लीमा

इन्द्रा

स्वाती२'s picture

13 Jan 2011 - 3:20 am | स्वाती२

आजी आवडली. :)

स्पंदना's picture

13 Jan 2011 - 8:09 am | स्पंदना

ही 'पुर्ण स्त्रि' . खंबिर भक्कम आधार देणारी.
ती बॉस होती कारण तीच्या कडे निर्णय क्षमता होती अन घेतलेले निर्णय तडीस नेण्याची खमक ती बाळगुन असावी.

आजी आवडल्या.

अवलिया's picture

13 Jan 2011 - 8:43 am | अवलिया

छान ओळख !

स्पा's picture

13 Jan 2011 - 8:43 am | स्पा

माऊ झकास लिहिले आहेस ग
आपल्याला आवडली ब्वा तुझी आजी

कुसुमिता१२३'s picture

13 Jan 2011 - 9:30 am | कुसुमिता१२३

खुप सुरेख व्यक्तीचित्रण! आजी खुप आवडली..

विजुभाऊ's picture

13 Jan 2011 - 11:02 am | विजुभाऊ

लीमाउजेट
हॅट्स ऑफ...
एका सशक्त मनाच्या व्यक्तीमत्वाचे तेवढेच सशक्त चित्रण केलेय.
मिपावर वाचलेल्या सर्वोत्तम लेखांपैकी एक लेख.
करारी /प्रेमळ/आयुष्यावर प्रेम करणारी अशी आज्जी मलादेखील लाभली होती.
तुम्ही फोटो न देतादेखील डोळ्यासमोर चित्र उभे राहिले.

sneharani's picture

13 Jan 2011 - 11:13 am | sneharani

मस्त व्यक्तिचित्रण !
:)

सुप्रिया's picture

13 Jan 2011 - 11:19 am | सुप्रिया

आजी आवडली.

-सुप्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2011 - 11:43 am | बिपिन कार्यकर्ते

आजी तर आवडलीच. पण लेखनही उत्तम केले आहे.

वरती राजेश घासकडवी आणि प्रियालीने जे लिहिले आहे तसेच वाटते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Jan 2011 - 12:45 pm | ज्ञानोबाचे पैजार

माउताई,
तुमची आजी खुप आवडली,

अनुराग's picture

13 Jan 2011 - 1:35 pm | अनुराग

लेख आवड्ला

तिनी कायम कष्ट केले, पण त्या कष्टांनी ती कधीच 'गांजली' नाही.

नंदन's picture

13 Jan 2011 - 1:39 pm | नंदन

व्यक्तिचित्र अतिशय आवडलं. मिपावरच मागे वामनसुतांनी लिहिलेल्या स्मृतिगंध ह्या लेखमालिकेची आठवण झाली.

सविता००१'s picture

13 Jan 2011 - 3:51 pm | सविता००१

मस्त. माझ्या आजिबद्दल वाचते आहे असे वाटले.

प्राजक्ता पवार's picture

13 Jan 2011 - 4:31 pm | प्राजक्ता पवार

सुरेख व्यक्तीचित्रण .

चंदनाच्या अंगसंगे बाभूळाही गंध जोडी,
जात तुझी चंदनाची, तुझे 'मी' पण ना सोडी!

लेख आवडला.

विसुनाना's picture

13 Jan 2011 - 5:41 pm | विसुनाना

व्यक्ती आणि व्यक्तीचित्रण दोन्ही आवडले.

प्रत्येक कालात अशा स्वतंत्र स्त्रिया असतात. स्वातंत्र्य ही मनाची अवस्था आहे. ती सर्वस्वी लिंगाबरहुकूम ठरते असे म्हणवत नाही.
उदा. माझ्या आईकडून पणजी असलेली स्त्री १८९०-१९०० सालाच्या आसपास (दररोज घोड्यावरून फिरून) पंचक्रोशीतील (तिच्या मालकीच्या) शेतजमिनींचा व्यवहार पहात असे. तालुकाभर तिला मान होता. बंदुकीचा धाक दाखवून तिने काही दरवडेखोरांना पळवून लावले होते. इ. इ.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Jan 2011 - 6:23 pm | परिकथेतील राजकुमार

सुंदर लेखन.
आजी एकदम आवडून गेली :)

पुष्करिणी's picture

13 Jan 2011 - 6:39 pm | पुष्करिणी

आजी खूपच आवडली.

कधीही न डगमगणारी माझी आजीही अशीच सबला होती.

तिमा's picture

13 Jan 2011 - 7:08 pm | तिमा

आजीचे व्यक्तिचित्रण ग्रेट! अशा व्यक्ति बघितल्या की आपल्या कमकुवतपणाची लाज वाटते.
तुमच्या आजीच्या बाबतीत हेच म्हणता येईल की 'जीवन त्यांना कळले हो.'

मदनबाण's picture

13 Jan 2011 - 7:32 pm | मदनबाण

सुरेख व्यक्तिचित्रण !!!

मृत्युन्जय's picture

14 Jan 2011 - 11:49 am | मृत्युन्जय

एकदम माझ्या आज्जीचे चित्र डोळ्यासमोर आले. ४८ सालच्या गोंधळाता आजोबांची नौकरी गेली. त्यात घरात स्वतःची ५ मुले, भावाची ४ आणि आजी आजोबा असा मोठा कुटुंबकबिला. पण आज्जीने दूध विकणे, शिवण करुन देणे असे सगळे करुन वेळ निभावून नेली. आल्यागेल्यांचे केले. लोकं राखली.

दूसरी आज्जी लग्नाच्या वेळेस मॅट्रिक झाली होती. मध्ये बराच खंड पडला. मग तिने आईबरोबर परत ग्रेज्युएशन करायला घेतले. आई आणि आज्जी एकत्रच बी ए झाल्या. त्यानंतर आज्जीने हिंदी पंडितची परीक्षा पण दिली आणि पास झाली. संगमनेर मधुन त्या वर्षी बरेच लोक बसले होते. त्यातली पास फक्त एकटी आज्जा झाली. घरदार, मुलं सांभाळुन हा व्याप.

कधीकधी आश्चर्य वाटते. आधीच्या पिढीतल्या लोकांकडे उरक खुप होता. आपण कुठेतरी कमी पडतो किंवा एकाच गोषात अडकुन पडतो.

लेख आवडल्या गेला आहे.

खुपच देखण व्यक्तीचित्र वाचायला मिळालं.
थँक्स माऊ ....

पैसा's picture

2 Jun 2012 - 7:57 am | पैसा

आजी फार आवडली!! मला वाटतं त्या पिढीतल्या सुशिक्षित बायका बर्‍याच अशाच होत्या.

हा लेख, का ते माहित नाही, पण राहूनच गेलेला वाटतं वाचायचा.

खोदून वर काढल्याबद्दल, पू नि पैसातै, थ्यान्कू....

मस्त लिहिलंयस हं माऊ.....