किती वर्षाने असे निवांतपण
स्वच्छ आभाळ नि असे मोकळेपण
खिडकीवर बसलेली चिमणी
नि तिचे एकटेपण
खिडकीतून दिसणारे चिमणीच्या मागचे
गुलमोहराचे झाड
ते आभाळ
तो ढगांचा शुभ्र कल्लोळ
आभाळात शांत विहरणारी घार
कसे शांत ,स्वच्छ निवांत
ध्यान लावून बसलेय हे वातावरण
बायको बसलीय देवघरात देवाजवळ
काय मागतेय देवाजवळ कुणास ठाऊक ?
चेहऱ्यावरचा शांत भाव
प्रसन्नपणा
सगळे मिळाल्याची तृप्तता
तृप्तीचा हा अनोखा क्षण
तो सेव्ह करून ठेवतोय
कितीतरी वेळा सेव्ह न केल्यामुळे डिलीट होऊन गेल्यात
कितीतरी घटना ,प्रसंग
आयुष्याच्या ऊतरवंडीवरचे हे क्षण
हे निवांतपण
कोठे हरवून गेले ते क्षण
ते सुख
नि ते तारुण्य ....
ती सळसळ
तो आदिम उत्साह
नि आता .....
कधी कधी
ह्या विचारांचा कल्लोळ
अशा शांत वातावरणात
आतला दुख्खाचा लाव्हारस
दबा धरून बसलेला
कधी उफाळून येईल
कुणास ठाऊक ...?
सुखाची देखील भीती वाटतेय ...
आजकाल ..का ..?
कुणास ठाऊक ...??
प्रतिक्रिया
5 Jan 2011 - 5:09 pm | गणेशा
विचार करायला लावणारी कविता .. खुप साध्या सरळ शब्दात खुप काही बोलुन जाणारे शब्द ...
आयुश्याच्या पुर्वसंध्येवरचे मन खुप स्पष्ट जाणवते आहे.. आणि असंख्य विचारांना अस्तव्यस्त करत आहे.
----
अवांतर :
थोडेशे काहीतरी लिहावेशे वाटले म्हणुन उगाच एक स्वैर प्रयत्न ..
ध्यान लावुन बसणारे वेडे मन
अजुनही माझ्याकडे आहे
ती शांत खिडकी अन
त्यातुन दिसणारे माझे चौकोनी आकाश...
निखळलेत अनेक तारे त्या चौकोनी आकाशातुन
आणि राहिलेल्या तार्यांच्या अबोल कहाण्या
असंख्य दु:ख उफाळुन आणत आहेत ..
तरीही खिन्न पणे खिडकीवरची चिमनी पहात
मी ध्यानस्त बसलो आहे..
घारी प्रमाणे माझे मन ही पंखांची हालचाल न करता
शांतपणे एकाच लक्षाकडे बघुन
त्या भोवती घिरट्या घेत आहे
खिडकी तीच ..
आकाशाचा तुकडा ही तोच
चिमनीची चिवचिव ही तीच आणि
घारीच्या घिरट्या ही त्याच ..
फक्त काळाच्या घोड्याबरोबर
बदलले आहेत सारे अर्थ .. संधर्भासहित..
6 Jan 2011 - 11:55 am | पाषाणभेद
खरोखर असे निवांतपण मिळत नाही हल्ली.
6 Jan 2011 - 1:21 pm | नगरीनिरंजन
सुखाची देखील भीती वाटतेय ...
आजकाल ..का ..?
कुणास ठाऊक ...??
ह्म्म... असं होतं खरं पण ती सुखाची भीती नाही तर सुख संपण्याची आहे.
छान लिहीलंय.
6 Jan 2011 - 4:56 pm | पियुशा
मस्त मस्त मस्त