वदनी कवळ घेता … पुंडलिक वरदा हरी विठ्ठल

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in जनातलं, मनातलं
29 Dec 2010 - 3:48 pm

लहानपणापासूनची सवय : लग्नातल्या पंगतीत बसलं की फक्त ‘पुंडलिक वरदा’ म्हणेस्तोवर धीर धरायचा. एकदा त्या काकांचं ते जोरात म्हणून झालं की मग आपण जेवणावर अगदी अ‍ॅटॅक करायचा...!! एक मात्र आहे, की असं अन्नावर तुटून पडायला आधीच ठरवून ठेवावं लागतं. हल्ला आधी कश्यावर करायचा? जिलबी, लाडू, भजी, श्रीखंड, पुरी, पापड, मिरगुंड, आमटी, की उसळ? (अहो, लग्नात काय काय पक्वान्नं असतात ते आता मी तुम्हाला सांगायला नकोय ! उगीच यादी करता करता मलाच इथे भूक लागायची, काय?!)

सांगण्याच तात्पर्य हे की मी जन्मापासूनच खादाड. हो हो..!! अगदी कुणाला पण विचारून बघा. आमच्या आईला माझ्या लहानपणी अशीच कायम काळजी वाटायची की अमिताला कुणी खाऊची लालूच देऊन कुठे घेऊन तर नाही नं जाणार? आता मला कोण कुठे नेणार? पण आईच ती..!! तिला काळजी वाटायचीच. असो.

आता मी आधीच खादाड आणि त्यातून आमच्या घरी सगळेच तसे खवैय्ये. आमचे आजोबा तर, पैजा लावायचे म्हणे. आणि माझे बाबा हे अजून पण एका खादाड क्लबचे प्राउड मेंबर आहेत. तर नो वंडर की माझ्या खादाडपणाला भरपूर वाव होता. माझी आजी, आई, आत्या, मावशी सगळ्या सुगरणी. आईने कायम सगळं खायला शिकवलं (लावलं..!!) म्हणून मी लसूण पण आवडीने खायला शिकले. (नाही तर आमचे बाबा, अजून लसूण खात नाहीत… शश्श .. असं मी नाही म्हणत बर का!)

पुढे मी साहजिकच आहारशास्त्राचा अभ्यास सुरु केला आणि तो यशस्वीपणे पूर्ण केला. आज मी डायेट कौन्सेलिंग करते. पण कायम माझ्या खादाडपणाला माझ्याच आहार शास्त्राचा त्रास व्हायचा. लो कॅलरी - हाय कॅलरीच्या गोंधळात पोळी भाजीचा पण मूड जायचा. ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि मला इन्फोसिस कंपनीत नोकरी लागली. मग काय विचारता? अमिता पुण्याला एकटी राहायला लागली. स्वतः रोज छान छान जेवण बनवायची आणि खायची. परिणाम: अमिता एका मोठ्या टेंट (तंबू) सारखी दिसायला लागली.

आणि तेव्हा तिला अचानक ह्याची जाणीव झाली की मीच नं ती आहारशास्त्रज्ञ?
आणि म्हणून हा ब्लॉग लिहायचं ठरवलं. जशी माझी गत झाली तशी दुसर्‍या कुणाची होऊ नये, म्हणून.

पाकक्रियाअनुभव

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

29 Dec 2010 - 4:07 pm | छोटा डॉन

>>आणि तेव्हा तिला अचानक ह्याची जाणीव झाली की मीच नं ती आहारशास्त्रज्ञ?

लिहा लिहा , अवश्य लिहा !
सध्या मिपावर गणपा नामक एक भयानक इसम आहे, तो असेच काहीबाही सुंदर बनवुन पदार्थ बनवतो की ते 'मापात' खाणे अशक्य होऊन बसते, तेव्हा आता त्यापुढे तुम्हीच सल्ला द्या. गणपामुळे मिपाचे सरासरी वजन ३.५ किलोने वाढले आहे असे म्हणतात, खरे खोटे गणपा जाणे.
इथे स्वातीताई पण आहे, मी जेव्हा तिच्याकडे गेलो होतो तेव्हा तीनेही मला काही काही मस्त मस्त करुन एवढे खाऊ घातले की काय विचारु नका.

असो, तुम्ही लिहा, आम्ही वाचतो ... दुसरं काय करणार म्हणा, पण असो.

- छोटा डॉन

हाणा हाणा आम्हाला.
तसं पाहाता डॉन्या म्हणतोय ते कही खोट नाही. अरबट चरबट खाउन वजन वाढलय.
तुमच्या कडुन मस्त मस्त 'लो क्याल' वाल्या पाककृतींच्या अपेक्षेत आहे.
तसच जमल्यास पौष्टिक आहारा संबंधीत टीप्स मिळाल्या तर सोने पे सुहागा :)

गणेशा's picture

29 Dec 2010 - 4:44 pm | गणेशा

येवुद्या ... खादाड पण आहारतज्ञ असलेल्यांच्या पा.कृ. कडे लक्ष आहे

अवांतर :
मी पण खादाड आहे .. आधी काही परिनाम जास्त होत नव्हता , खेळ व्यायाम नियमित होता..
आजकाल मात्र हे आयटीतील ऐटीत राहण्यामुळे थोडा जाडपना जाणवत आहे, जीम लावावी म्हणतोय .. बघु ..
पण आहार बदलण्यापेक्षा लवकर आयटी क्षेत्रच बदलले पाहिजे असे वाटते ..

असो

पिंगू's picture

29 Dec 2010 - 6:14 pm | पिंगू

खादाड अमिता,

तुझ्या पाक कृतीचे पदार्थ खाउन वजन घटले तर जिंदाबाद.. नाहीतर खरडवहीत मुर्दाबाद व्हायचा... :-)

- (खादाड पण सध्या वजन कमी करण्यच्या चिंतेत असलेला खादाड) पिंगू

खादाड अमिता's picture

30 Dec 2010 - 9:26 am | खादाड अमिता

डिस्क्लेमर: माझ्या पाक्रु नी तुमचे वजन कमी होयील ह्याची अजिबात गेरंटी नाही. कारण तुम्ही फक्त मी दिलेल्या पाकृच करून आणि खाऊन बघणार ह्याची खात्री नाही. आपल्या कडे एवढी मस्त पाक कौशल्यवान मंडळी आहे, आपण त्यांच्या मेहनतीला न्याय द्यायलाच हवा. कसे?

अरे वा! आहारशात्राप्रमाणे योग्य अश्या पाकृ दिल्यास आवडतील.
माझे माझ्या वजनाकडे फार लक्ष असते म्हणून त्रासही होतो. ;)
घरगुती, मुलांच्या पाकृंचेही स्वागत आहे.

प्राजु's picture

30 Dec 2010 - 8:38 pm | प्राजु

+१
हेच म्हणते.

लवकर लिहा.. आमचे बरेच प्रश्न आहेत डाएटवर.. ;)

- सूर्य

शुचि's picture

29 Dec 2010 - 9:25 pm | शुचि

अमिता,

कृपया अशा पाकृ द्याव्या ज्या सोप्या असतील आणि ज्याने मेटॅबोलीझम रेट वाढेल तसेच ज्या पौष्टीक देखील असतील. तसेच भरपूर टीप्स द्याव्यात.

अनेक गल्लभरू "ओव्हरसिंप्लीफाय" करून सांगतात की कमी खा आणि जास्त व्यायाम करा. पण सगळ्यांना माहीत आहे - इट डझन्ट वर्क आऊट दॅट वे.

आपल्याकडून बर्‍याच अपेक्षा आहेत ;)

स्पा's picture

30 Dec 2010 - 11:31 am | स्पा

कृपया अशा पाकृ द्याव्या ज्या सोप्या असतील आणि ज्याने मेटॅबोलीझम रेट कमी होईल तसेच ज्या पौष्टीक देखील असतील. तसेच भरपूर टीप्स द्याव्यात.

अनेक गल्लभरू "ओव्हरसिंप्लीफाय" करून सांगतात की जास्त खा आणि कमि व्यायाम करा. पण सगळ्यांना माहीत आहे - इट डझन्ट वर्क आऊट दॅट वे.

आपल्याकडून बर्‍याच अपेक्षा आहेत

(आमचे येथे श्री कृपे करून २५ किलो वजन वाढवणे आहे )

मी-सौरभ's picture

30 Dec 2010 - 12:04 am | मी-सौरभ

गणपा शेट तुमी पाककृती लिहा अन मग खादाड मॅडम त्याची मापं काडतील.
चालेल का?

आमी आहोतच प्रतिसादायला.

समीरसूर's picture

30 Dec 2010 - 11:16 am | समीरसूर

लेख!

खादाडपणा हा जीवन जगण्याची (कंठण्याची नव्हे) दुर्दम्य इच्छा दर्शवणारा गुण आहे. ज्याचे लक्ष इतर गोष्टींसोबतच खाण्यात देखील असते त्या व्यक्तीला कधी निराशा गिळंकृत करू शकत नाही. (छान सुविचार आहे; माझाच आहे.)

दुसर्‍याच्या पानातला झणझणीत तांबडा रस्सा, लालभडक रश्शात डुंबत असलेला लुसलुशीत चिकनचा लेग पीस, आणि दह्याच्या आंबटपणात मुरलेल्या कांद्याच्या रसरशीत फोडी बघून ज्याच्या नजरेत अधाशीपणा दिसत नाही तो माणूस नसून कुणी ऋषितुल्य महापुरुष असावा असे बिनदिक्कत समजावे आणि त्याच्यापासून शक्यतो कमीत कमी २० फुटाच्या अंतरावरच रहावे. :-)

मला तर पुण्यातले डायनिंग हॉल्स खूप आवडतात. डेक्कनवरचे 'जनसेवा', टिळक रस्त्यावरचे 'दुर्वांकुर', भांडारकर रस्त्यावरचे 'पंचवटी गौरव', टिळक रस्त्यावरचेच 'बादशाही' या डायनिंग हॉल्समध्ये मी खूप वेळा जेवलेलो आहे. 'जनसेवा' हे माझ्या खास आवडीचे. जाऊन बूड टेकवत नाही तोच लखलखीत ताटे आणि वाट्या येतात. त्यामागोमाग चटणी, कोशिंबीरीपासून वाढणारे वीर भाज्या, खमण ढोकळा, वडे, पापड, चपाती, भाकरी वगैरे सटासट आणून वाढतात. पटकन हात धुऊन ताव मारायला सुरुवात करावी. पण अशा ठिकाणी जेवायचे तर काही गोष्टी पाळाव्या लागतात. या गोष्टी पाळल्यास जेवणाचा आनंद त्रिगुणित होतो.

१. आदल्या दिवशी रात्री लवकर जेवावे. साधारण साडेसात पर्यंत जेवण उरकून घ्यावे. जेवण हलके आणि थोडे करावे.
२. सकाळी फक्त एकच कप चहा घ्यावा आणि नाश्त्याला सुटी द्यावी.
३. पूर्ण दिवस मोकळा ठेवावा.
४. सकाळपासून काहीतरी शरीराला हालचाल होईल अशी कामे करावीत. कुठेतरी लांबवर फिरून यावे.
५. डायनिंग हॉलमध्ये जाण्यासाठी अंमळ उशीरा निघावे. साधारण दुपारी दोन वाजता निघावे. अडीच पर्यंत तिथे पोहोचून पाच मिनिटात जेवण सुरु करता येते. एव्हाना भूक खवळलेली असते. नजरेत खुनशीपणा आलेला असतो. केव्हा एकदा घास तोंडात घालतो अशी बेचैनी मनाला सुन्न करून जाते. मग छोट्या-छोट्या गोष्टीवरून थोडी-थोडी चिडचिड सुरु होते. रस्त्यात ट्रॅफिक लागणे ही खूप संताप आणणारी घटना वाटायला लागते. सिग्नल लागणे, गाडी बंद पडणे, पार्किंगला जागा लवकर न मिळणे अशा घटना पारा वाढवत जातात. लक्षात ठेवा, जेवणाचा आनंद हा त्याआधी होणारी चिडचिड, वैताग, पोटात उसळलेल्या आगडोंबाची तीव्रता या सगळ्या भावनांच्या समानुपाती (मराठीत डायरेक्टली प्रपोर्शनल) असतो.
६. पानावर बसल्यावर जे काही आधी वाढले जाईल ते गपकन तोंडात टाकू नये. त्यामुळे कोशिंबीरीसारख्या नेहमीच्या पदार्थामुळे भूकमोड आणि हिरमोड होण्याचा धोका असतो. अगदी मिनिटभर संयम ठेवावा. मग गरमागरम पोळ्या, पिवळाजर्द खमण ढोकळा, गरम सुरळीची वडी, वडा असल्या पदार्थांची वरात सुरु झाल्यावर त्या वरातीत थोडे नाचून घ्यावे. मग बटाट्याची रस्सा भाजी, फ्लॉवरची भेंडीच्या साक्षीने केलेली सुकी भाजी, आकर्षक आमटी, घट्ट दही अशा लज्जतदार पदार्थांना थोडा न्याय द्यावा. पान पूर्ण वाढून झाल्यावर मग आपल्याला काय आवडले आहे ते जोखून घ्यावे आणि उद्या कदाचित जेवायला मिळणार नाही असा विचार मनात घोळवत जेवणाचा येथेच्छ समाचार घ्यावा.
७. कपाळावर घर्मबिंदूंचे दव येईस्तोवर खाण्याचा हा रम्य बगीचा सोडू नये. घाम यायला सुरुवात झाल्यावर वेग थोडा कमी करावा आणि शेवटचा भात मागवावा.
८. शेवटचा भात संपवून मग दोन ते तीन मिनिटांचा अवधी जावू द्यावा आणि थोडे एकाग्र चित्त करून विचार करावा. अजून भूक आहे का? अजून थोडे खाता येईल का? उत्तर हो असल्यास कुठला पदार्थ अजून खाता येऊ शकतो याचा विचार करावा. अगदी थोडा घेऊन खाऊन बघावा. बघावे की उदराग्नी पुन्हा प्रज्वलित होतोय का. झाल्यास थोडी गरमगरम कढी ओरपावी आणि दोन-तीन ढोकळे रिचवावेत. यावेळेस सोबत कोण आहे याचा विचार न करता त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे. बायको सोबत असल्यास जसे शक्य असेल तसे परिस्थितीनुसार वागावे. (ही सूचना ज्याने-त्याने आपापल्या जबाबदारीवर पाळावी. न पाळल्यास उत्तम.)
९. १००% खात्री पटल्यावर मोठ्या आवाजात ढेकर द्यावा आणि बिल देऊन डुलत-डुलत बाहेर पडावे ते थेट पानवाल्या भैय्याकडे जावे. आवडीनुसार पान कोंबावे आणि जड डोळ्यानिशी घरी येऊन ताणून द्यावी.

परवा आम्ही 'पुरेपूर कोल्हापूर'ला याच थाटात जेवलो. तांबडा रस्सा आणि चिकन मसाला हादडतांना केव्हा डोळ्यांवरचे शटर खाली पडायला लागले ते कळलेच नाही. एक चिकन थाळी खात असतांना जेव्हा मी वेटरला अजून एक चिकन फ्राय सांगीतले तेव्हा त्याने थोड्या अविश्वासाने माझ्याकडे बघितले. शेवटची पोळी सांगीतली त्यावेळेस त्याच्या चेहर्‍यावर भूत पाहिल्यासारखे भाव होते. शेवटी त्याने भात आणल्यावर एका दमात सगळा भात ताटात ओततांना बघून मात्र त्याच्या चेहर्‍यावर आदराचे भाव आले. तो माझ्याकडे खूपच आदराने बघू लागला. शेवटी कसेबसे उठत आम्ही घरी पोहोचलो...

गवि's picture

30 Dec 2010 - 11:25 am | गवि

उत्तम प्रतिसाद...!!!

खादाड अमिता's picture

30 Dec 2010 - 11:44 am | खादाड अमिता

उत्तम प्रतिसाद

सहज's picture

30 Dec 2010 - 11:51 am | सहज

हा हा हा!
समीरसूर, प्रतिसाद आवडला!

स्पंदना's picture

30 Dec 2010 - 1:03 pm | स्पंदना

मिले सुर मेरा तुम्हारा, तो ऽ ऽऽ समीऽऽर सुर बने हमाऽऽरा !

यशोधरा's picture

30 Dec 2010 - 7:00 pm | यशोधरा

मस्तच प्रतिसाद.

अमिता, तुमच्या ब्लॉगची लिंक विचारली होती, पण दिसली. धन्यवाद.