चल चांदण्यात जाउ...

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जनातलं, मनातलं
29 Dec 2010 - 6:18 am

चल चांदण्यात जाउ...

अंगणातल्या गुलमोहराखाली आरामखुर्चीत बसून सतीश प्रवासाची आणखी काय काय तयारी राहीली ह्याचा विचार करीत होता. संध्याकाळची फ़िकट उन्हे अंगणात पसरलेल्या लाल पिवळ्या सड्यावर रेंगाळत होती. झाडावर असतांना दिमाखात डवरलेली ती चटपटीत शाल आता तुसे तुसे होऊन जमिनीवर विखुरली आहे असे वाटत होते. उद्या सकाळी बाई कचरा झाडून बाहेर फ़ेकून देईल.
“चहा थंड झालाय समोर. कुठल्या तंद्रीत आहेस?” सुमतीची हाक सतीशच्या कानाच्या बाजुने भिंत ओलांडून शेजारच्या रमाबाईंकडे पोहचली.
“ह्यांचे बरे आहे. दोन्ही मुलांची लग्ने हो़उन आपापल्या गावी सेटल झालीत. ह्यांना इथे काही व्याप ना ताप. आम्ही अजून रखडतोच आहे.” सतीशच्या टुमदार बंगलीकडे नाक मुरडीत पहात रमाबाई पुटपुटल्या. “ह्यांना बरे जमते रोज नवऱ्याच्या सेवेत वेळ द्यायला.”
सतीशची काही प्रतिक्रिया दिसली नाही, तशी सुमती तरातरा दारासमोरच्या ओट्यावर आली. आरामखुर्चीत रेलून विचारात मग्न असलेल्या सतीशला पाहून तिने पुढे हो़उन गारगोट्या झालेला चहाचा कप त्याच्या समोर केला. “प्यायचा नव्हता तर करायला कशाला सांगीतला? मला काय दुसरी कामे नाहीत कां?”
तंद्रीतून जागे झालेल्या सतीशनी सुमतीकडे क्षणभर ’ही कोण अनोळखी बाई कटकट करीत आहे’ अशा नजरेने पाहीले. लगेच बाजुची खुर्ची ओढून म्हटले “अग बस ना इथे थोडा वेळ. आपल्याला प्रवासाचे प्लॅनींग करायचे आहे नां?”
“आता आणखी काय राहीले आहे? तू एखाद्या प्रोजेक्टसारखेच तर सगळे आखले आहेस.”
“ते खरे गं, पण तुला सांगीतले होते त्याप्रमाणे तू सगळे महत्वाचे व्हिडीओ, स्टील फ़ोटोंच्या क्लीप्स सिक्युअर ट्रेज़रवर ठेवल्यात कां?” सतीशने आठवण करून दिली.
“हो ते सगळे झाले आहे. तुमची बॅंकेची कामे झालीत?”
“अजून काही गुंतवणुकींचे ट्रान्सफ़र व्हायचे आहेत. ते दोन दिवसात होईल. बाकीची कागदपत्रांची कामे झालेलीच आहेत.”
“म्हणजे आपण निघायला मोकळे.” सुमती्च्या आवाजातील कंप जाणवून सतीशने विचारले. “काय गं? तूच ह्या व्यापातून दूर जाण्यासाठी माझ्यामागे लकडा लावला होतास.”
“हो नां. पण पाय निघवत नाही हो. घराकडे कोण पाहील? शिवाय इतक्या वर्षांचे ऋणानुबंध गुंतलेले.”
“कसले आलेय ऋणानुबंध? मी वयाची पंच्यांशी अन तू ऐंशी पार केली. ज्यांच्याशी ऋणानुबंध आहेत असे वाटते ते आपापल्या बंधातच इतके गुंतलेत. कोणाला फ़ुरसत नाही. आपण तरी का अडकून रहावे? आपणही आपल्याच गरजा पहाव्या.” सतीश उदगारला.
सुमती जमीनीवरच्या म्लान पाकळ्यांमधे हरवून गेली. सायंकाळची उन्हे सावल्यांची सारवण करून जमिनीत विरून गेली होती.

त्यानंतरचा आठवडा उरलेली तयारी करण्यात गेला. जिथे जायचे होते ते ठिकाण हिमाचल प्रदेशच्या नयनरम्य चंबा खोऱ्यातले “चंद्रग्राम” हे पंचतारांकीत रिसॉर्ट होते. सतीश-सुमती सारखी सुस्थितीतली वयोवृद्ध जोडपी निसर्गाच्या सान्नीध्यात आयुष्याचा संधीकाल काही काळ तरी शांतपणे तिथेच घालवणे पसंत करायची. ज्यांना ही चैन परवडत नव्हती त्यांना अर्थातच ईतर कित्येक अशी ठिकाणे आपापल्या ऐपतीप्रमाणे उपलब्ध होतीच.
--------------
विमानात सतीशच्या खांद्यावर डोके टेकवून सुमती पंखाखालून हळूहळू मागे पडणाऱ्या ढगांच्या दुलयांकडे पहात होती. पन्नास वर्षे जोडून जोडून जमवलेले व्याप खाली दूर कोठेतरी ठिपक्यांमधे दृष्टीआड झाले होते. जणु स्वर्गाची यात्रा आत्ताच सुरू झाली आहे असा भास होत होता. “सतीश थॅन्क यू व्हेरी मच” ती अचानक उदगारली.
“ए वेडाबाई हे अचानक काय झाले तुला? इतकी सेंटी नको हो़उस.” तिच्या विरळ केसांवरून हात फ़िरवित तो म्हणाला.
“सेंटी नाही रे. पण तु इतकी वर्षे कर्तबगारीने आणि वेल प्लॅन्ड करून सगळा संसार केला. मला कशाची कमी पडू दिली नाहीस. त्यासाठी मला निदान येवढे तर म्हणू दे.”
“आणि तू जसे काहीच केले नाहीस!” दोन्ही मुले आज आपापल्या पायांवर उभी आहेत ती तर तुझीच कामगीरी आहे. मला वेळ कुठे होता त्यांच्याकडे बघायला?”
“पण त्य़ांना काही आहे कां? सुनां तर परक्याच घरच्या. पण आपल्याच मुलांना काही तरी ओलावा आहे कां? तरी बरे, आपण त्यांच्यावर कणभर देखील अवलंबून नाहीत. उलट आपल्यामागे जे आहे ते सगळे त्य़ांनाच मिळणार आहे.”
“जाउ दे गं. किती वेळा हा विषय? आपले ठरले आहे ना ह्या ट्रीपमधे फ़क्त चांगल्याच आठवणी काढायच्या?” सतीशने संत्रा ज्युसचा घुटका घेत म्हटले. मुलांच्या लहानपणापासूनचा चित्रपट डोळ्यांसमोर आणत असता केव्हा डोळा लागला तेही कळले नाही.
--------
“Good morning Sir. How was your journey?” चंद्र्ग्राम रिसॉर्ट्च्या स्वागतिकेमधे सतीश सुमतीचे चवदार थंड अननसाच्या रसाने स्वागत झाले. त्यांनी निवडलेली पुनमकुटी नदीच्या काठावर होती. जवळपास दुसरी कुटीही नव्ह्ती. समोर हिरवळ, त्यावर नैसर्गीक उगवलेली वाटावी अशा कौशल्याने लावलेली फ़ुलझाडे. त्यावर उगाच इकडून तिकडे नाचणारी रंगीबेरंगी फ़ुलपाखरे. नदीपल्याडचे हिरवेगार डोंगर पहाणाऱ्याला खुणावत होते. ’फ़ुलपाखरे पहात थबकलास कशाला? ये, नदी पार करून माझ्या अंगावर खेळायला ये!’ पक्षांचे थवे चारा आणायला बाहेर पडले होते. डोंगरांवर रेंगाळणारे ढग सोडल्यास सपाटीवर आकाश निरभ्र निळे!. “अशा निरभ्र आकाशात रात्री चांदण्यांची काय खैरात असेल नाही?” सुमतीच्या हातात हात घालून सतीश म्हणाला.

रिसॉर्टतर्फ़ेच तिथे उतरलेल्या लोकांसाठी अर्ध्या दिवसाची साईटसिईंग टूर होती. वातानुकुलीत बसमधे कलत्या खुर्च्यांवर आरामात बसून बाहेरचे अप्रतीम सौंदर्य चाखत सगळ्यांनी सकाळ घालवली. डोंगराच्या माथ्यावर ढगांच्या छपराखाली रंगीत कौलांच्या टपरीत साधे चवदार जेवण घेऊन मंडळी रिसॉर्टवर दुपारची वामकुक्षी करायला पोहोचली. पुढचे तीन दिवस ह्याच रिसॉर्टवर मुक्काम होता.

सतीशची पुनमकुटी बाहेरून एखाद्या पर्णकुटी सारखी दिसायची, पण आतमधे सगळ्या अद्ययावत सोयींनी सुसज्ज होती. मंद प्रकाशाचे दिवे, रेशमी मुलायम गाद्यावाले सागवानी पलंग. त्यासमोर पूर्ण भिंत व्यापणारा ऑप्टीकल पडदा. त्याचा आकार शिताफ़ीने असा बनवला होता, की समोरची भिंत नसून बाहेरचा देखावाच आपण पहात आहोत असे वाटावे. त्यावर सद्ध्या समुद्राच्या आतमधले सुरम्य चित्र दिसत होते. छोटे रंगीबेरंगी मासे जा ये करत होते. त्य़ांच्या लगटीने समुद्री शेवाळ लाजून थिरकत होते. मंद सौम्य संगीत खोलीतील हवेत झिरपत होते. मनाला खूप हळुवार बनवणारा कुठलासा शांत स्वर्गीय सुगंध पसरला होता.

पहिल्या दिवशी ही खोली पाहील्यावर सतीश-सुमती अवाकच झाले होते. हा रिसॉर्ट बूक करतांना इंटरनेटवर जरी विडीयो पाहीला होता, तरी त्य़ात ही नजाकत समजली नव्हती. नंतरचे दिवस त्या रिसॉर्टच्या आजुबाजुला फ़िरण्यात, जवळच्या मंदिरांमधे शांततेत ध्यान करण्यात आणि तिथला नंदनवनासारखा वाटणारा परिसर पहाण्यात भुरकन निघून गेले.

शेवटच्या दिवशी दोघेही खूप थकले होते. खोलीतला म़उ मुलायम बिछाना त्यांना बोलावत होता. त्यावर पडून दोघेही रिमोटने समोरच्या भिंतीवर वेगवेगळी दृष्ये पहाण्यात गुंगले.

“अरे, सिक्युअर ट्रेज़रमधले व्हिडीयोच लाव पुन्हा!” निसर्ग विडीयो पाहून सुमती कंटाळली होती. मुलांचे लहानपण कितीदा बघून झाले तरी समाधान होत नव्हते.
सतीशने सिक्युअर ट्रेज़र मधून एकएक आठवणींच्या लडी भिंतीवर उलगडायला सुरवात केली.
“अरे हा अनिकेत बघ! किती लबाड होता ना? सौरभला मारून स्वत:च रडतो आहे.”
“आणि तुझा काय अवतार आहे गं!”
“कशाला रे असले व्हिडीयो घेतले? तुला काय माहीत? दोन दोन भुतांना संभाळतांना माझी कीती तारांबळ उडायची!”
“ए ए, ह्या ट्रीपमधे भांडायचे नाही असे ठरलेय ना आपले? आणि अशा अवतारातच तू छान दिसतेस!” सुमतीला जवळ घेत सतीश म्हणाला.
लटक्याने त्याला दूर करीत सुमती म्हणाली “म्हणजे आत्ता नाही सुंदर दिसत?”
“छे! आत्ता कसली सुंदर? केस विरळ, सुरकुतलेले गाल...”
सतीशवर बुक्क्यांचा वर्षाव करीत सुमती म्हणाली “तुझी कांती मोठी नितळच आहे नां?”
अशा लटक्या भांडणांत, प्रेमात आयुष्यातले सोनेरी क्षण पुन्हा पुन्हा जगत दोघांचा उरलेला दिवस गेला. रात्री जेवण खोलीवरच मागवले. ते खाण्यात दोघांनाही रस नव्ह्ता. पौर्णीमेची रात्र होती. आजचा ट्रीपचा शेवटचा दिवस. व्हरांड्यात बसून पूर्ण चंद्राने नाहून निघालेले नदीचे पात्र आणि त्यापलीकडील चंदेरी पहाड बघण्यात वेळ कसा गेला कळलेच नाही. गारठा जाणवू लागला तशी दोघे भानावर आली. आत जायची ईच्छा होत नव्हती. ही छोटीशी सुट्टी आता संपत आली होती.
आत आल्यावर थोडावेळ स्तब्धतेत गेला. फ़ोनची घंटा किणकिणली.

“How was your stay Sir? Are you happy” पलीकडून रिसेप्शनीस्टचा मधूर आवाज आला. “Yes absolutely! Everything was nicely arranged. So what is our check out time?”
“Just past 12o clock. We will make it a smooth check out Sir. Do do wish to extend your stay by a day or two?”
“No! Just as planned.”
“Good night Sir and tell Madam also, our best wishes.”
“Yes I will. Good night and thank you.”

फ़ोन ठेवून सतीशने सुमतीकडे पाहीले.
भोगायची सारी मजा भोगून झाली होती. बोलायचे ते सारे बोलून झाले होते. भिंतीवरच्या जुन्या आठवणींचे चित्रपट आता विरले होते. उरला होता फ़क्त मरणाचा थकवा. मस्त गाढ झोप हवीहवीशी वाटत होती.
ही स्वर्गीय ट्रीप केवळ अविस्मरणीय झाली. ईश्वरा पुढचे सारे जीवन असेच आनंदाचे असू दे.

हेडबोर्डवरील सुगंधाचे बटन सतीशने ऑन केले. खच्चून भरलेल्या चांदण्या रात्रीचे चलचित्र त्याने एल सी डी भिंतीवर आणले. पलंगावर पहुडलेल्या सुमतीच्या हातात हात घालून तो तिच्या कानात गुणगुणला.......
“चलो दिलदार चलो, चांदके पार चलो”
शेकडो चांदण्यांचा सडा पडलेला प्रचंड आकाशपट दोघांनाही खुणवीत होता.
“हम हैं तैय्यार चलो” सुमतीने प्रत्युत्तर दिले....

.....................................................................
“Everything was neately and professionally arranged by the undertaker resort. Please arrange the funeral by tomorrow as planned.
Aniket Desai, 22 March 2086.”
चंद्रग्राम मोक्षसंचालकांच्या रजीस्टर मधे आई बाबांच्या ईच्छामरणाच्या नोंदीचे शेवटचे सोपस्कार उरकून अनिकेत बाहेर पडला. २०७५ मधे वृद्धांच्या वाढत्या लोकसंख्येचा प्रश्ण सोडवण्यासाठी ८५ च्या वरच्या पुरुषांना आणि ८० वरच्या स्त्रियांना ईच्छामरण अनिर्वाय केले गेले होते. त्यानंतर दशक उलटून गेल्यावर ह्या कायद्याचे चांगले परिणाम दिसायला लागल्याने लोकांमधे विषेश विरोध उरला नव्हता. सरकारच्या प्रगतीशील धोरणाचे कौतूक करत अनिकेतने कारचे ईंजीन सुरू केले. आता घरी परत गेल्यावर विल प्रमाणे सारी संपत्ती दोन्ही भावात व्यवस्थीत वाटल्या जाऊन ह्या प्रकरणाची सांगता होणार होती.
***********************

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

ईच्छामरण अनिवार्य?

एक पॉइंट आहे अरुणजी, अं , ८५ च्या वरील पुरुषांना, अन ८० च्या वरील स्त्रियांना असा भेदभाव का? नाही सहज वाटल म्हणुन विचारल.

लेख वाचुन भवितव्याची भिती वाटायला लागली.

अरुण मनोहर's picture

29 Dec 2010 - 8:36 am | अरुण मनोहर

स्त्री आणि पुरुष अगदी समान आहेत असा कितीही डंका पिटला, तरी, निसर्गानेच त्यांच्या मधे महत्वाचे फरक केलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे, स्त्री ही पुरुषापेक्षा लवकर मॅच्युअर होते, आणि (हे वाक्य लिहून मी मधमाशांचे मोहोळ माझ्यावर घालून घेणार आहे बहुदा) पुरुषांपेक्षा लवकर म्हातारी होते. म्हणून ८५ आणि ८० हा फरक.

बाकी भविष्याची भिती वाटायला नको, हा कायदा लोककल्याणासाठीच असेल .

नगरीनिरंजन's picture

29 Dec 2010 - 7:51 am | नगरीनिरंजन

छान कथा. आधी ऐकलीच होती, पुन्हा वाचली.
इच्छामरण अनिवार्य केल्यावर त्याला इच्छामरण म्हणणे बरोबर की चूक असा प्रश्न पडला.

अरुण मनोहर's picture

29 Dec 2010 - 8:09 am | अरुण मनोहर

अपर्णा आणि निरंजन,
"He was volunteered for the task" ही गमतीदार फ्रेज ऑफीसमधे ऐकली असेलच! तिथे गमती गमती मधे सत्य असते. परंतू जेव्हा असे कायदे होतील, तेव्हा इच्छामरण हेच नाव वापरेले जाईल कदाचित! आणि कोणाची इच्छा हा प्रश्न विचारलात तर उत्तर देखील मिळेल!

कथा आवडली वाचून बरे वाटले.

स्पा's picture

29 Dec 2010 - 4:54 pm | स्पा

मस्तच गोष्ट........
वेगळच वाटलं .. खरोखर असं होऊ शकलं तर खूप बरं होईल

धन्यवाद .. अशी सुंदर आणि मनोहरी गोष्ट लिहिल्याबद्दल

--मगरी दंतमंजन
(हे लावा आणि मजबूत दात मिळवा )

हम्म! काय प्रतिक्रिया लिहू समजत नाहीये.
मात्र एका संवेदनशील विषयाला घेऊन कथा लिहिल्याबद्दल आपले अभिनंदन.

अरुण मनोहर's picture

29 Dec 2010 - 8:11 am | अरुण मनोहर

धन्यवाद प्राजू. आयुष्यातला शेवटला दिवस सोन्यासारखा जावा ही इच्छा पूर्ण करण्याचे एक चांगले साधन भविष्यात निर्माण होवो!

उपास's picture

29 Dec 2010 - 9:14 am | उपास

बॉलीवूडपट 'दसविदानियां' आठवला.. चटका लागलाच..

५० फक्त's picture

29 Dec 2010 - 11:57 am | ५० फक्त

छान कथा, पण ८०-८५ फार जास्त होतंय, जरा ५० -५५ च्या आसपास बघा ना जमतंय का ?

८०-८५ म्हणजे उगीचच ड्रॉ होणारी टेस्ट खेळल्यासारखं वाटतंय, आपलं कसं ठरलेल्या एकदिवसीय खेळाव्या आणि आरामात मजा बघावी सगळ्यांची.

हर्षद.

आत्मशून्य's picture

29 Dec 2010 - 10:25 pm | आत्मशून्य

राजस्थान मधील एक इसम वयाच्य ९४व्या वर्षी पिता बनला....

"पन्नास वर्षे जोडून जोडून जमवलेले व्याप खाली दूर कोठेतरी ठिपक्यांमधे दृष्टीआड झाले होते " हि लाईन मनामध्ये खुप तरंग उठवुन गेलीच पण पुढील प्रवासात काय होयील कश्या आठवणी येतील याची नांदी पण नोंदवुन गेली.

तुमचे लिखान म्हणजे फक्त लेख नाही तर तुमची प्रत्येक ओळ ही कवितेच्या एका ओळी नंतर येणारी तीतकीच आदबशीर नाद असलेली पुढची ओळ जशी असते तसेच वाटले वाचायला ..

लिखान खुप म्हणजे खुप आवडले .. परंतु स्वताच्या मुलांमध्ये नसताना त्यांच्या छोट्याछोट्या गोष्टी पाहुन मन काय बोलत असेन ..कोणास ठावुक ? माझ्या ही डोळ्यात पाणी आले ..
काही ओळी खुप चटका लावुन गेली .. त्याबद्दल शब्दलेस

सूर्यपुत्र's picture

29 Dec 2010 - 5:08 pm | सूर्यपुत्र

वाटले की ही एखादी सेकंड हनीमून ची गोष्ट आहे की काय... खूप छान आणि सुंदर वर्णन केले आहे.
आणि हे थर्ड हनीमून सुद्धा अतिशय रोमँटीक आहे. खूप भावले मनाला..... असेच घडो..

गणेशा's picture

29 Dec 2010 - 5:32 pm | गणेशा

काय गं? तूच ह्या व्यापातून दूर जाण्यासाठी माझ्यामागे लकडा लावला होतास.”
“हो नां. पण पाय निघवत नाही हो. घराकडे कोण पाहील? शिवाय इतक्या वर्षांचे ऋणानुबंध गुंतलेले.”

हे वाक्य आधी वाचताना, वेगळाच अर्थ .. वेगळेच चित्र दिसले होते .
पुन्हा वाचताना त्यामागिल अभिप्रेत अर्थ मनात .. कळजात छेद देतो आहे..

-------

पुन्हा हे वाचताना कसेसेच झाले .. डोळ्यात पाणी आणनारा प्रसंग , तेंव्हाचे ते दिवस आयुष्याच्या शेवटी आठवताना कसे वाटत असेन .. आताही माझ्या अण्गावर शहारा आला हा प्रसंग वाचुन .. (कोणी मुलांनी आपल्या आईवडिलांना एकटे सोडुन जावु नये कोठे असे वाटते आहे )

सतीशने सिक्युअर ट्रेज़र मधून एकएक आठवणींच्या लडी भिंतीवर उलगडायला सुरवात केली.
“अरे हा अनिकेत बघ! किती लबाड होता ना? सौरभला मारून स्वत:च रडतो आहे.”
“आणि तुझा काय अवतार आहे गं!”
“कशाला रे असले व्हिडीयो घेतले? तुला काय माहीत? दोन दोन भुतांना संभाळतांना माझी कीती तारांबळ उडायची!”

मला कळली नाही गोष्ट. "इच्छा" मरण आणि "अनिवार्य" हे दोन शब्द परस्पर विसंगत नाही काय?
____________________________
बाकी कल्पना छान. पण आजार्‍यांनी मरावं ना, धडधाकटांना कशाला पाठवता?

श्रीगणेशा's picture

26 Jan 2022 - 10:35 pm | श्रीगणेशा

वाचनखूणा शोधताना ही कथा वाचली आणि भावलीही.

पन्नास वर्षे जोडून जोडून जमवलेले व्याप खाली दूर कोठेतरी ठिपक्यांमधे दृष्टीआड झाले होते.

So what is our check out time?”
“Just past 12o clock. We will make it a smooth check out Sir.

_/\_

चौथा कोनाडा's picture

29 Jan 2022 - 12:47 pm | चौथा कोनाडा

हृदयस्पर्शी आणि सुंदर !