आज अॅश मजेत होती. आपल्या आई-बाबांनी आपलं नाव ऐश्वर्या ठेवल्याच्या आनंदात आज ती होती कारण त्यांच्या गॅदरींगमधे ऐश्वर्या-अभिषेक-करिष्मा अश्या पात्रांभोवती फिरणार्या नाटकात तिला स्वतःच्या नावाचा रोल करायला मिळणार होता. शाळा सुटल्यावर अॅश पळतच घराकडे निघाली. नीट बांधलेल्या फुटपाथपरून ती थेट घरी येऊ शकते त्यामुळे आईला तीला शाळेत घ्यायला जावं लागतंच नाही.
तसं पुण्यात रहायला आल्यापासून अॅशची आई बरीच सुखावली होती. कारणंच तशी होती, इथे पाण्याचा प्रश्न नाही, २४ तास वीज आहे, घराजवळच मेट्रोही आली आहे, वस्तुंचे भाव इतर शहरांच्या तुलनेने स्वस्त आहेत, दवाखाने, हॉस्पिटलं कमी आहेत पण त्याचं कारण इथे मुळात रोगराईच कमी असण्यात आहे हे तिच्या लक्षात आलं होतं.
अॅशचे बाबाही पुण्यात आल्यानंतर खुश आहेत. प्रत्येक वॉर्डात असलेली सुसज्ज उद्याने त्यांना संध्याकाळी फिरायला सोयीची आहेत. शिवाय प्रत्येक वॉर्डातील स्विमिंग पूल त्यांचे आरोग्य उत्तम ठेवत आहेत. प्रशस्त रस्त्यांमुळे ऑफीसला जाणे जराही तापदायक नाही. सरकारी कामे तर सरकारी नोकर फोन करताच आपणहून घरी येऊन करून देत आहेत. अनधिकृत बांधकामे हटवून वसवलेल्या सुपरमार्केटमुळे बरीचशी खरेदी होलसेल भावात जवळच होते, आणि मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच कलात्मक शिक्षणाची सोयही महानगरपालिकेनेच केल्यामुळे त्या क्लासेसचा खर्चही वाचला आहे.
असो.तर काय सांगत होतो.. अॅश घरी आनंदात आली. नेहमी हसतमुखाने अभिवादन करणार्या ट्रॅफिक हवालदाराला नमस्ते करून नुकत्याच २ महिन्यांत बांधून पूर्ण केलेल्या फ्लायओव्हरजवळच तिची इमारत होती, तिथे ती वळली. कधी एकदा घरी जाऊन आईला ही बातमी सांगते असे तिला झाले होते. इमारतीत पोचली तर ती थक्क झाली. सबंध इमारत गजबजली होती. लोक नवे कपडे घालून मिरवत होते. काळे आजोबांनी तर नावाला शोभेल म्हणून की काय कोण जाणे केस काळे करून घेतले होते. आपल्याला नाटकात काम मिळालं याचा एवढा आनंद झाला की काय असा विचार करून अॅश घरात गेली. घरात तर उत्सवी वातावरण होते. आईने गोडाचे पदार्थ केले होते. बाबांना ऑफीसने सुट्टी दिली होती व त्यांचे मित्र घरी जमले होते.. आता मात्र अॅशला चक्करच यायची बाकी होती
"आईऽऽऽ"
तिने हाक मारली
"अरे ये ये.. बरं झालं आलीस.. कसा गेला दिवस"
अॅशने आनंदान येऊन सगळा वृत्तांत घरी सांगितला.. पण आईचं विषेश लक्षच नव्हतं.. आई म्हणाली "अरे वा! मस्तच नीट प्रॅक्टीस कर हं!" मग बाबांकडे वळून म्हणाली "आज बघितलं का! एकापाठोपाठ एक चांगल्या बातम्या मिळताहेत"
"म्हणजे?" अॅशला कळलं नाही
"अगं आज पुण्यातला एकमेव उरलेला प्रश्न महापालिकेत सोडवला गेला. आता पुण्यास सर्वत्र सुबत्ता, स्वास्थ आणि स्थैर्य नांदणार बघ!"
"पुण्याचा प्रश्न? कोणता?"
"अगं कोंडदेवांचा पुतळा. जो काढण्याचं केव्हाचं चाललं होतं.. काल रात्री काढला एकदाचा! आता कसं पुण्यातले सगळे सगळे प्रश्न सुटले! म्हणून तर हा जल्लोष चालु आहे!"
अॅश आईच्या आनंदाकडे बघतच राहिली
प्रतिक्रिया
28 Dec 2010 - 9:07 am | मनिम्याऊ
इथे पाण्याचा प्रश्न नाही, २४ तास वीज आहे, घराजवळच मेट्रोही आली आहे, वस्तुंचे भाव इतर शहरांच्या तुलनेने स्वस्त आहेत, दवाखाने, हॉस्पिटलं कमी आहेत पण त्याचं कारण इथे मुळात रोगराईच कमी असण्यात आहे हे तिच्या लक्षात आलं होतं.
अॅशचे बाबाही पुण्यात आल्यानंतर खुश आहेत. प्रत्येक वॉर्डात असलेली सुसज्ज उद्याने त्यांना संध्याकाळी फिरायला सोयीची आहेत. शिवाय प्रत्येक वॉर्डातील स्विमिंग पूल त्यांचे आरोग्य उत्तम ठेवत आहेत. प्रशस्त रस्त्यांमुळे ऑफीसला जाणे जराही तापदायक नाही. सरकारी कामे तर सरकारी नोकर फोन करताच आपणहून घरी येऊन करून देत आहेत. अनधिकृत बांधकामे हटवून वसवलेल्या सुपरमार्केटमुळे बरीचशी खरेदी होलसेल भावात जवळच होते, आणि मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच कलात्मक शिक्षणाची सोयही महानगरपालिकेनेच केल्यामुळे त्या क्लासेसचा खर्चही वाचला आहे.
ह्म्म...
दिल को खुश रखने को गालिब ये खयाल अच्छा है..|
28 Dec 2010 - 9:43 am | अमोल केळकर
आज खुप जोरात जल्लोष पुण्यात चालू आहे असे एकंदर सकाळच्या ( पेपर नव्हे ) बातम्यांवरुन दिसत आहे
अमोल
28 Dec 2010 - 10:49 am | अवलिया
कॉग्रेसचे (सर्व तर्हेच्या आणि त्यांचे पुरस्कृत पक्ष, संघटना, इत्यादी इत्यादि) यांचे हार्दिक अभिनंदन !!
शिवाजी महाराजांचा गनिमी कावा त्यांनीच चांगला आत्मसात केला आहे...
फरक फक्त एवढाच की त्यांनी परकीयांविरुद्ध वापरला आणि हे स्वकीयांविरुद्ध त्याचा वापर करत आहेत.
28 Dec 2010 - 11:07 am | महेश-मया
वाचुन आनंद वाटला पुण्यात खुपच सोयी आहेत, आणि लेकीचे येवडे कौतुक बघुन मन भरुन आले.
धन्य ते पुणेकर