अ ख्रिसमस मिरॅकल

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
25 Dec 2010 - 4:06 pm

सुजीत, मनिषा आणि अर्णवला बाय करून अनंतराव घरात आले. बाहेरच्या बर्फाळ हवेतून घराच्या हीटर लावून उबदार ठेवलेल्या पोटात आल्यावर त्यांना जरा बरं वाटलं. किचनमध्ये जाऊन त्यांनी हॉट चॉकोलेट ओतून घेतले आणि पुढच्या खोलीत येऊन गुबगुबीत सोफ्यावर अलगद बसले. दोन दिवस एवढ्या मोठ्या बंगल्यात आता एकट्यानेच राहायचं या विचाराने त्यांच्या मनावर गरम दुधावर साय जमा होते तसा एक उदासवाणा तवंग जमा झाला. त्यांना वत्सलाबाईंची आठवण झाली. तशी ती इतरवेळीही दिवसातून पन्नासवेळा होतच असे. वत्सलाबाई जाऊन आता वर्ष होत आलं असलं तरी इकडे आल्यापासून त्यांची आठवण खूपच यायला लागली होती. भारतात असताना वत्सलाबाई नसल्याचं इतकं वाईट वाटत होतं की नाही हे त्यांनी आठवायचा प्रयत्न केला पण त्यांना नक्की ठरवता आले नाही. त्यांना भारतातल्या आपल्या घराची तीव्रतेने आठवण झाली आणि पोटातून आतून कोणीतरी चिमटा काढल्यासारखं पिळवटलं गेलं. "उणीपुरी तीस वर्षं काढली असतील त्या घरात. मनिषाचं बालपणही त्याच घरात गेलं. तिला येत असेल का त्या घराची आठवण? वाटत तर नाही. इतकी मस्त रमली आहे या देशात. आपण मात्र सहा महिन्यात कंटाळलो. सकाळी सगळी आपापल्या कामाला गेली की दिवस खायला उठतो. वाचून वाचून तरी किती वाचणार? ना कोणी मित्र ना कोणी सोबती. संध्याकाळी फिरायला जाऊन गप्पा मारत बसावं असंही कोणी नाही. सकाळ संध्याकाळ आपलं घर, नाहीतर लायब्ररी किंवा मग एकट्यानेच फिरणे. शनिवार रविवार घर भरलेले असते खरे पण मनिषा-सुजीत-अर्णव त्यांच्या त्यांच्या व्यापांमध्ये मग्न असतात, मुद्दामहून कोण येऊन बोलत बसणार? वत्सला असती तर थोडी सोबत तरी झाली असती. दोघं एकमेकाना धरून राहिलो असतो. ती गेल्यावरही तिकडे एकटा रहिलो असतो खरं म्हणजे पण पोरीने ऐकलं नाही. अजून हातपाय धडधाकट आहेत तरी किती काळजी.आता असं एकट्याचं जिणं आलं नशीबी जावयाच्या दारात. तसा तो चांगला आहे पण आपण तरी किती लुडबूड करणार? सगळीकडे आपल्याला घेऊन जाणं कसं शक्य आहे? म्हणूनच म्हटलं या वेळी तुम्ही तिघेच जा."
मनातल्या विचारांपासून सुटका म्हणून अनंतरावांनी उगाचच टीव्ही लावला आणि हॉट चॉकोलेट संपेपर्यंत निरर्थकपणे त्याच्याकडे पाहत बसले. मग टीव्ही बंद केला आणि रिकामा कप किचन सिंकमध्ये विसळून पुन्हा बाहेरच्या खोलीत आले. पुन्हा सोफ्यासमोर उभे राहून आता पुढे काय करावे या विचारात आपल्या थोड्याशा सुरकुतलेल्या गालावरचे दाढीचे खुंट उगाचच खाजवत उभे राहिले. आत्ता कुठे दहा वाजत आलेत आणि आख्खा दिवस समोर आ वासून पडला आहे. त्यात परत हिवाळा असल्याने चारपाच वाजताच अंधार पडणार. या कडाक्याच्या थंडीत बाहेर जायची इच्छासुद्धा होत नाही. लायब्ररीत जावे की घरीच वाचत बसावे यावर काही वेळ विचार केल्यावर त्यांनी शेवटी घरीच बसायचे ठरवले. मग उगीचच आळोखेपिळोखे देत ते स्टडीमध्ये आले आणि बुकशेल्फ समोर उभे राहून वाचायला एखादे छानसे पुस्तक शोधू लागले. बरीचशी पुस्तके एक-दोनदा वाचून झाली होती. कोणतेही पुस्तक पाहिले की त्यांना त्यात कायकाय आहे ते आठवायचे आणि मग नको ते पुन्हा वाचायला असा विचार करून पुढे जायचे असा खेळ बराच वेळ झाल्यावर त्यांनी एक त्यातल्या त्यात हलकेफुलके असे पुस्तक निवडले आणि ते घेऊन खोलीत जाऊन बेडवर पडून वाचू लागले. एका हातात पुस्तक धरून दुसर्‍या हाताने दुलई गळ्यापर्यंत ओढून घेत ते लगेचच पुस्तक वाचण्यात गुंगुन गेले.
नेहमीच्या सवयीने शेजारचे रामभाऊ त्यांच्या खांद्याला सारखा स्पर्श करीत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाबद्दल आणि भारताच्या बोटचेपेपणाबद्दल तावातावाने बोलत होते आणि अनंतराव नेहमीप्रमाणे मान डोलावून हो हो म्हणत होते; तितक्यात वरून वत्सलाबाईंची हाक ऐकू आली. अनंतरावांनी वर पाहिले तर वत्सलाबाई गॅलरीतून वाकून काहीतरी ओरडून सांगत होत्या. बहुतेक कोपर्‍यावरच्या दुकानातून काहीतरी आणायला सांगत असाव्यात. त्यांच्या हातात पिशवी दिसत होती. त्यांनी ती पिशवी खाली फेकली. पिशवी खाली पडून खराब होऊ नये म्हणून अनंतराव ताडकन उठले आणि पिशवी झेलायला तरातरा जाऊ लागले. अचानक त्यांचा पाय कशात तरी अडकला आणि फटकन त्यांच्या तोंडावर काहीतरी पडले.... दचकून अनंतरावांनी डोळे उघडले, तोंडावर पडलेले पुस्तक बाजूला करत त्यांनी आपण नक्की कुठे आहोत त्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला. कुठे आहोत ते कळल्यावर पुन्हा ते एकटेपणाचे आणि निराशेचे काळे पांघरूण त्यांच्या मनावर ओढले गेले आणि स्वप्नात नुकतेच पाहिलेले मस्त प्रखर ऊन, आपले घर आणि वत्सलाबाईंना आठवत ते चेहर्‍यावर बावळट भाव घेऊन पडून राहिले. थोडावेळ तसेच पडून राहिल्यावर त्यांनी घड्याळात पाहिले. फक्त एक-दीड तासच गेला होता. या वेगाने जर वेळ जात असेल तर दोन दिवसात वेड लागेल असे त्यांना वाटले. सुजीत-मनिषाचा आग्रह मोडून उगाचच घरी एकटा राहिलो असे त्यांना वाटू लागले. त्यांच्या प्रायव्हसीची, एन्जॉयमेन्टची काळजी करून फुकाचा मोठेपणा घेतल्याबद्दल त्यांना आता थोडासा पश्चात्ताप होऊ लागला. गेलो असतो बाहेर त्यांच्याबरोबर तर वेळ तरी मजेत गेला असता असे त्यांना वाटले. दोन-तीन मिनिटे त्याच वाक्यावर विचार करत बसल्यावर त्यांच्या डोक्यात काही तरी चमकले. बाहेर जायचं तर सुजीत-मनिषाबरोबरच जायला पाहिजे असं थोडीच आहे? आपलं आपणही जाऊ शकतोच की.शिवाय ख्रिसमस म्हणून दुकानं इतकी गजबजली आहेत, काय हरकत आहे एक चक्कर मारून यायला? एका माफक धाडसाच्या थ्रीलींग कल्पनेने त्यांचा चेहरा एकदम उजळला. हातापायात एकदम जोर आल्यासारखं त्यांना वाटलं आणि ते ताडकन उठले. उत्तेजितपणे हातावर हात चोळत बाथरूममध्ये गेले.
अर्ध्या तासातच मस्तपैकी गुळगुळीत दाढी करून, गरम पाण्याने आंघोळ करून, पोलो टी शर्ट, चिनोज, पायात स्पोर्ट शूज,अंगात नुकतेच मनिषाने घेतलेले जर्कीन आणि डोक्यावर काळी कानटोपी घालून ते पुढच्या खोलीत सोफ्यावर बसलेले होते. उत्साहाने आणि उत्तेजनेने त्यांचा एक पाय तडतड उडत होता आणि ते लॅपटॉपवर शहरात जाण्याचे आणि येण्याचे बस रूट्स वगैरे शोधण्यात मग्न झाले होते. सगळी माहिती काढून झाल्यावर, पाकीटात पुरेसे पैसे आहेत याची खात्री झाल्यावर आणि मनिषाने दिलेल्या घराबाहेर जातानाच्या सूचनांची उजळणी करून झाल्यावर ते अखेर बाहेर पडले. बाहेर कडाक्याची थंडी असूनही बर्फ मात्र अजून पडले नव्हते. दोन्ही हात खिशात घालून अनंतराव बसस्टॉपकडे चालू लागले. उपनगरात फिरण्याची त्यांना चांगलीच सवय झाली होती पण आज पहिल्यांदाच ते एकट्याने पन्नास मैलांवरच्या मुख्य शहरात जात होते. बसस्टॉपवर जाऊन खिशातून कागद काढून बसस्टॉपच्या नंबरची खात्री करेपर्यंत बस आलीसुद्धा. काहीही विचार करायचा अवसर न मिळता काही क्षणातच अनंतराव बसच्या दारात उभे होते. पाकीटातून चिल्लर काढून तिकीटाच्या खोक्यात टाकताना आपल्या स्वभावाच्या विपरीत, उगाचच ते ड्रायव्हरकडे पाहून प्रसन्नपणे हसले. ड्रायव्हरनेदेखील हसून उगाचच "काय कसं काय?" वगैरे विचारून आपुलकी दाखवली. तोंडावर ते हसू तसंच ठेवत अनंतराव इतर प्रवाशांकडे बघत बघत एका सीटवर जाऊन बसले आणि खिडकीतून बाहेर एखाद्या लहान मुलाच्या उत्सुकतेने पाहू लागले. बस मार्गस्थ झाल्यावर आजूबाजूला दिसणारी मनिषाच्या घरासारखी घरे, रस्ते, झाडे आणि नंतर हळू हळू दिसू लागलेल्या उंच इमारती पाहत पाहत पाऊण-एक तास निघून गेला. शहरातल्या त्या भव्य चौकात बस आली तेव्हा ते लगबगीने उतरले. सगळीकडे माणसांची लगबगीने ये जा चालू होती. रस्ते वाहनांनी भरून गेले होते आणि हवेत गारठा असूनही चांगले लख्ख ऊन पडले होते. अनंतरावांनी एकदा सगळा चौक न्याहाळला. लखलखणार्‍या काचेरी इमारती, मोठे स्वच्छ रस्ते आणि चकाकणार्‍या गाड्या. सगळं निरखून पाहून मग त्यांनी आपला मोर्चा चौकातल्या एका बाजूला असलेल्या मॉलकडे वळवला. पाच-सहा मजली उंच आणि भव्य इमारतीत तो मॉल होता आणि त्या इमारतीवर चहू बाजूंनी दिव्यांच्या माळा सोडलेल्या होत्या. हे रात्री भलतंच सुंदर दिसत असेल असा विचार करत अनंतराव त्या मॉलमध्ये प्रवेशले. बाहेरच्या थंड हवे पेक्षा आत बरेच उबदार होते. दारातच मध्यभागी ठेवलेला मोट्ठा ख्रिसमस ट्री, सगळीकडे केलेली लाल-पिवळ्या रंगातले तारे, झिरमिळ्यांची सजावट, शुभेच्छांचे फलक, सांतासारख्या टोप्या घातलेल्या सुंदर कर्मचारी मुली, मुलांच्या सेक्शनमधला सांताक्लॉज आणि अगणित वस्तूंनी ठासून भरलेला तो मॉल पाहताना ते गुंगुन गेले. खरं तर मनिषा-सुजीतने त्यांना एकदा सगळं शहर फिरवून आणलं होतं पण एकट्याने फिरताना त्यांना ते सगळं जास्तच सुंदर आणि आकर्षक वाटत होतं. मॉलमध्ये फिरत खेळणी, कपडे, खाद्यपदार्थ आणि इतर लहानमोठ्या वस्तू पाहत पाहत दोन-तीन तास कसे गेले ते त्यांना कळालेच नाही. पोटात आता भूक लागली होती पण मॉलमधल्या फास्टफूड जॉईंटमध्ये जाऊन खाणे त्यांना नको वाटले. आता घरीच जाऊन खावे असा विचार करून ते तळमजल्याकडे जाणार्‍या लिफ्टमध्ये घुसले. दुसर्‍या मजल्यावर लिफ्ट थांबली आणि एक डब्बल हाडाची, त्यांच्याएवढीच उंचीची, पन्नाशीची बाई ट्रॉली ढकलत लिफ्टमध्ये शिरली. अनंतरावांकडे पाहून तिने स्मितहास्य केले आणि वळून तळघरात असलेल्या वाहनतळाचे बटन दाबण्याचा प्रयत्न केला पण ट्रॉलीवरून तिला ते जमले नाही. ते पाहून अनंतरावांनी पटकन पुढे होऊन बटन दाबून दिले. तिने पुन्हा एकदा हसून त्यांच्या कडे पाहिले आणि आपले सोनेरी केस मागे उडवत,"थँक यू" म्हणाली. तिच्या हसर्‍या निळ्या डोळ्यांकडे पाहत अनंतरावही हसले आणि कसेबसे "वेलकम" म्हणाले. ती मोबाईल मध्ये काहीतरी पाहू लागली आणि अनंतराव डोळ्यांच्या कोपर्‍यातून तिचे निरीक्षण करू लागले. पांढरे स्वेटर आणि गुलाबी स्कर्ट घातलेली ती स्त्री बरीच खरेदी करून घरी निघालेली दिसत होती. तळमजल्यावर लिफ्ट थांबली तरी अनंतरावांना कळाले नाही. दार उघडून लागले आणि लिफ्ट तळघराकडे गेली. लिफ्टचे दार उघडल्यावर अनंतराव भानावर आले आणि त्यांना चूक कळली. ती स्त्री बाहेर जाण्यासाठी ट्रॉली ढकलू लागली पण ट्रॉली ढिम्म हलेना. अनंतरावांनी पुन्हा तत्परतेनं दरवाजा उघडण्याचे बटन दाबून धरले. थोडी झटापट करूनही ट्रॉली हलत नाही हे पाहून तिने त्यांच्याकडे पाहिले आणि इंग्लिशमध्ये उद्गारली,"काय झालंय काही कळत नाहीय".
"थांबा, मी बाहेरून ओढतो", अनंतराव म्हणाले आणि लिफ्टच्या दारात उभे राहून त्यांनी ट्रॉली ओढायला सुरुवात केली. बरीच ताकद लावल्यावर ती ट्रॉली सरकत सरकत लिफ्टच्या बाहेर आली. तिची दोन चाके अडकून बसल्याने फिरत नव्हती.
"अचानक कशी काय बिघडली कोण जाणे?", ती स्त्री म्हणाली.
"चाकं अडकलेली दिसताहेत".
"तू कृपया मला गाडीपर्यंत सामान न्यायला मदत करू शकशील का? "
"हो हो का नाही? द्या मी घेतो काही पिशव्या", असं म्हणून अनंतरावांनी तिने दिलेल्या जड पिशव्या आपल्या हातात घेतल्या आणि तिच्याबरोबर तिच्या गाडीकडे चालू लागल्या.
"मी मार्था. मार्था वॉटसन", ती म्हणाली.
"अच्छा. मी अनंत देशपांडे."
"भारतातून आलास का?"
"होय. सहा महिने झाले. इथे मुलीकडे राहतोय."
"नशिबवान आहेस.", ती म्हणाली.
गाडीपर्यंत आल्यावर तिने गाडीची ट्रंक उघडली आणि त्यात तिच्याकडच्या आणि अनंतरावांकडच्या पिशव्या ठेवल्या.
"धन्यवाद. तुझी खूपच मदत झाली. तुझी गाडी आहे का की मी तुला कुठे सोडू ?", तिने विचारले.
"नाही नाही. मी पार त्या तिकडे राहतो", अनंतरावांनी उपनगराचे नाव सांगितले.
"अरे! मी ही तिकडेच राहते. तिथे नक्की कुठे?"
अनंतरावांनी मनिषाने लिहून दिलेला पोस्टल अ‍ॅड्रेस पाठ म्हणून दाखवला. मार्थाच्या डोळ्यात मिस्कील हसू उमटले.
"अरे वा! काय हा योगायोग! तिथून फक्त दोन ब्लॉक अंतरावर राहते मी. आपण शेजारी आहोत म्हणायचे", ती मनमोकळेपणे हसून म्हणाली, "चल मी सोडते तुला घरी."
अनंतराव थोडे संकोचले पण बसची वाट पाहावी लागणार नाही आणि पैसेही वाचतील या विचाराने सुखावलेही. त्या भल्या मोठ्या गाडीत चढून ते मार्थाशेजारी बसले. सफाईदारपणे गाडी बाहेर काढून मार्थाने वेगात रस्त्यावर आणली आणि घराकडे दामटली.
गाडीत दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. अनंतरावांनी आपली कहाणी इत्यंभूत सांगितली,
"अबक कंपनीत नोकरीला होतो. दोन वर्षांपुर्वी रिटायर झालो. गेल्या वर्षी बायको गेली, सहा महिन्यांपुर्वी कायमचा मुलीकडे आलो" वगैरे.
मार्थानेही आपली कहाणी सांगितली, "एकुलता एक मुलगा आणि त्याची मी घटस्फोटित आई. मुलगा सैन्यात. दोन वर्षांपुर्वी कुठल्याशा देशातल्या मोहिमेत गेलेला. आता मी एकटी. एका लोकल फर्ममध्ये काम करून जगतेय.", वगैरे.
मग आवडीनिवडींवर बोलणं झालं. आपण कसे एकटे आहोत, कंटाळलो आहोत याचा पाढा अनंतरावांनी वाचला. त्यावर मार्थाने कम्युनिटीक्लब जॉईन करण्याचे वगैरे सुचवले. एकंदरीत बरीच बडबड करत तो पाऊण-एक तासाचा प्रवास संपला. घरासमोर गाडी थांबली आणि "अच्छा, भेटू पुन्हा", म्हणून अनंतरावांनी दार उघडले. मार्थाने एक-दोन क्षण विचार केला आणि एकदम म्हणाली, "तुला माझ्या घरी यायला आवडेल? नाहीतरी तू एकटाच आहेस आत्ता. काहीतरी पिऊया, गप्पा मारूया."
अनंतरावांनी एकदा घराकडे पाहिले आणि जरा विचार केला. त्या सुनसान घरात जायची त्यांची इच्छा झाली नाही. काही न बोलता ते पुन्हा गाडीत चढले आणि दार लावून घेतले. पाच मिनीटांनी ते मार्थाच्या घरात प्रवेशले. घर फार मोठं नव्हतं पण टापटिपीने ठेवलेलं होतं. कोपर्‍यात एक न सजवलेला ख्रिसमस ट्री होता आणि शेजारी टेबलावर काही फोटो. मार्थाचे आणि तिच्या मुलाचे.
"बीअर घेणार?", मार्थाने विचारले.
अनंतराव एकदम गडबडले,"न...नाही,नको"
"मग काय घेशील? अजून मला एगनॉग करायचाय, नाही तर तोच दिला असता. तू वाईन घेशील?"
आताही नाही म्हणणे म्हणजे फारच भोमटपणा वाटेल असे अनंतरावांना वाटले आणि त्यांनी मूकपणे मान हलवूनच होकार दिला. बाहेर आता अंधार दाटू लागला होता. मार्थाने दिवे लावले आणि वाईनचे ग्लास आणि खायला सँडविचेस घेऊन आली.
वाईनचे एक-दोन घुटके उपाशीपोटी घेताच अनंतरावांना एकदम तरल वाटू लागलं. ते एकदम सैलावले. इतके की सँडविचमध्ये मांस वगैरे आहे की नाही याची चौकशी न करता बिनधास्त एक उचलून त्यांनी लचका तोडला. त्याची चवही त्यांना अप्रतिम वाटली. मग त्या दोघांच्या अशा काही गप्पा रंगल्या की बस. रात्रीचं जेवणही त्यांनी तिच्याकडेच घेतलं आणि मग त्यानंतरही तास-दोनतास गप्पा ठोकून शेवटी नाईलाजाने घरी जायला निघाले.
मार्थाने त्यांना रस्ता समजावून सांगितला आणि दारापर्यंत सोडायला आली. काय बोलावे अनंतरावांना कळेना. खरं तर पुन्हा कधी भेटू या असं त्यांना विचारायचं होतं पण त्यांचा धीर होत नव्हता. नुसतेच स्मितहास्य करत त्यांनी तिच्याकडे पाहिले आणि निरोपादाखल मान हलवून ते जड पावलांनी निघाले. ती दारातच उभी होती. तीन-चार पावले टाकल्यावर आपसूकच त्यांनी पुन्हा वळून तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा हात हलवून जायला वळले.
"अनंत", मार्थाचा आवाज आला, "उद्या संध्याकाळी मी ट्री डेकोरेशन पार्टी ठेवली आहे. तुला यायला आवडेल?"
एकदम आपल्याला खूप हसू फुटणार असे अनंतरावांना वाटले पण ते दाबत शांतपणे ते वळले आणि आवाज स्थिर ठेवत म्हणाले, "अर्थातच.मी नक्की येईन."
दोघेही एकमेकांकडे पाहून हसली आणि अनंतराव वळून चालू लागले. घराघरांवर दिवे लुकलुकत होते आणि हळुवारपणे बर्फ पडायला सुरुवात झाली.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

रन्गराव's picture

25 Dec 2010 - 4:37 pm | रन्गराव

साधा-सुधीच गोष्ट, पण लिहलय अप्रतिम :)

एकाद्या दिवाळी अंकात वगैरे ?

शुचि's picture

25 Dec 2010 - 6:13 pm | शुचि

सुंदर.

अवलिया's picture

25 Dec 2010 - 6:14 pm | अवलिया

मस्त रे !!

स्वाती२'s picture

25 Dec 2010 - 6:26 pm | स्वाती२

आवडली.

अवांतर: एकदा बियरला नको म्हटल्यावर पहिल्याच भेटीत वाइन नाही जमत त्यापेक्षा कॉफी/सोडा पॉप ऑफर केला हे शिष्टाचाराला धरुन वाटते.

नगरीनिरंजन's picture

25 Dec 2010 - 7:16 pm | नगरीनिरंजन

कथेवरच्या अभिप्रायाबद्दल सर्वांचेच आभार!

>>अवांतर: एकदा बियरला नको म्हटल्यावर पहिल्याच भेटीत वाइन नाही जमत त्यापेक्षा कॉफी/सोडा पॉप ऑफर केला हे शिष्टाचाराला धरुन वाटते.

अनंतराव फक्त बीअरला नाही म्हणताहेत की अल्कोहोलला नाही म्हणताहेत हे मर्थाला स्पष्ट झालेलं नाहीय.

वेताळ's picture

25 Dec 2010 - 7:17 pm | वेताळ

मस्त कथा लिहली आहे....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Dec 2010 - 7:28 pm | निनाद मुक्काम प...

कथा छान आहे .कथेचा शेवट हि एका सुरवातीची नांदी आहे पण एका माजी लष्करी भारतीय अधिकार्याचा एक लेख सकाळ मध्ये आला होता .त्यात ते पोरीच्या घरी अमेरिकेत डोहाळजेवणाला गेले होते .व अमेरिकन डोहाळ जेवणाचे त्यांनी वर्णन केले .त्यावर पुणेकरांच्या प्रतिक्रिया वाचून जी धमाल आली .तो लेख प्रतिक्रियेने गाजला .
अर्थात हि कथा आवडली .क्रमश ... असते तर अजून मजा आली असती .

निनाद मी थोडीशी असहमत आहे. मला वाटतं शक्याशक्यतेच्या धूसर सीमारेषेवर ही कथा सोडण्यातच लेखक यशस्वी झाला आहे. थोडं "लेफ्ट टू इमॅजिनेशन" असावं. मी तर म्हणेन हा या कथेचा एक प्लस पॉईंट (वन ऑफ मेनी) आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Dec 2010 - 12:29 am | निनाद मुक्काम प...

अलबत शुची पण ...
पण उगाच डोक्यात किडा वळवला कि समजा ह्या दोघांचे पुढे जमले किंवा नुसती निखळ व गाढ मैत्री झाली .( ह्या दोन्ही नात्यामध्ये ह्या दोधांना कळले कि त्यांच्यात खूप काही शेअर करण्यासारखे आहे .)
अश्यावेळी त्यंची मुलगी व जावई ह्यांची प्रतिक्रिया काय असेल ? मुलीच्या सासरी भारतातून काय प्रतक्रिया असेले ? त्यांच्या प्रतिक्रिया सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात .पण ह्यावर कथेच्या नायकाच्या प्रतिक्रिया कशी असेल ? म्हणजे आपले नवीन नाते तो संपवेल कि जपेल .(येथे कथा कोणत्याही अंगाने जाऊ शकते .अमेरिकन संस्कृती व अनिवासी भारतीय संस्कृती व भारतीय संस्कृती ह्यातील बारकावे दाखवायला ह्या कथेत खूप स्कोप आहे .असे मला वाटले .
पण उगाच डोक्यात किडा वळवला कि समजा ह्या दोघांचे पुढे जमले किंवा नुसती निखळ व गाढ मैत्री झाली .( ह्या दोन्ही नात्यामध्ये ह्या दोधांना कळले कि त्यांच्यात खूप काही शेअर करण्यासारखे आहे .)
अश्यावेळी त्यंची मुलगी व जावई ह्यांची प्रतिक्रिया काय असेल ? मुलीच्या सासरी भारतातून काय प्रतक्रिया असेले ? त्यांच्या प्रतिक्रिया सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात .पण ह्यावर कथेच्या नायकाच्या प्रतिक्रिया कशी असेल ? म्हणजे आपले नवीन नाते तो संपवेल कि जपेल .(येथे कथा कोणत्याही अंगाने जाऊ शकते .अमेरिकन संस्कृती व अनिवासी भारतीय संस्कृती व भारतीय संस्कृती ह्यातील बारकावे दाखवायला ह्या कथेत खूप स्कोप आहे .असे मला वाटले .

तिमा's picture

25 Dec 2010 - 8:23 pm | तिमा

अनेक उथळ धागे व त्यावरील तसलेच प्रतिसाद वाचून कंटाळलो होतो.
तुमच्या कथेने परत चांगले वाटू लागले.

अतिशय सुंदर गोष्ट.....
मांडणी झकास..
एका रिटायर्ड आणि ते सुद्धा परदेशात राहणाऱ्या, वृद्ध नाही म्हणणार पण प्रौढ माणसाची मनस्थिती अतिशय सुंदर हाताळली आहे...
गोष्ट संपवली ती सुद्धा एका झकास 'नोड' वर

एकदम रिफ्रेश वाटलं, गोष्ट वाचून.
धन्यवाद ननि

गोष्ट वाचून छान वाटलं.
आमच्या ओळखीचे आजीआजोबा आहेत.
बॉब आणि जस्टिन्.....ते आमच्याकडे आले कि अगदी मोकळेपणाने वावरतात.
माझे आईबाबा आणि त्यांची मैत्री झाली होती.
जस्टिनला वेगवेगळे मानसिक आजार केवळ एकटेपणामुळे झाले आहेत ते आठवून गेले.

आनंदयात्री's picture

25 Dec 2010 - 11:58 pm | आनंदयात्री

बेष्ट. कथा आवडली.

सविता००१'s picture

25 Dec 2010 - 11:59 pm | सविता००१

अतिशय सुंदर गोष्ट वाचायला मिळाली.
धन्यवाद.

साधे सुधे कथानक पण काय सुरेखपणे मांडले आहे
मान गए उस्ताद !
फडतूस धाग्यांमध्ये हा एक सुंदर धागा वाचल्यावर, खुपच ताजेतवाने वाटायला लागले
नगरीनिरंजन धन्यवाद !

राजेश घासकडवी's picture

26 Dec 2010 - 1:50 am | राजेश घासकडवी

सरळसोट, कंटाळवाण्या आयुष्याच्या रिकाम्या रस्त्यावर अचानक आलेलं हे वळण, हळुवारपणे नवीन मार्ग दाखवणारं - छान टिपलेलं आहे. पुढचा प्रवास काय होईल याबद्दल वाचकांच्या मनात शक्यता निर्माण होतात हेच या कथेचं शक्तीस्थान आहे. त्यामुळे कथा योग्य ठिकाणी संपलेली आहे.

स्मिता.'s picture

26 Dec 2010 - 10:47 am | स्मिता.

राजेशजींशी सहमत आहे. आधी थोड्याश्या निराश वाटणार्‍या कथेचा छान प्रसन्न शेवट केलाय.
सुंदर कथा.

मस्तानी's picture

26 Dec 2010 - 6:47 am | मस्तानी

फारच हळुवार आणि सुंदर लिहिलंय.

अरुण मनोहर's picture

26 Dec 2010 - 8:59 am | अरुण मनोहर

सुंदर कथा. चित्रदर्शी वर्णन.

पियुशा's picture

26 Dec 2010 - 10:16 am | पियुशा

मस्त मस्त लिहिले आहे पु.ले.शु.

मैत्र's picture

26 Dec 2010 - 12:24 pm | मैत्र

रिफ्रेशिंग...

वर अनेकांनी लिहिल्या प्रमाणे अनेक कंटाळवाणे धागे आणि जवळ जवळ सर्व धाग्यांवर वेळ असलेल्या लोकांनी केलेल्या अत्यंत अवांतर चर्चा, बरेचदा धाग्याशी संबंध नसलेल्या.. बरेचदा एखाद्या प्रतिसादातल्या एका एका ओळीवर दहा प्रतिसाद.. काहीही निष्पन्न न होणारे, धाग्याशी कसलाही संबंध नसलेले... कुठल्याही कारणाशिवाय...
असे काही तरी चालू असताना...

अचानक एक नवीन... उत्तम... आणि विचार करायला ओपन सोडलेली तरीही जास्त न ताणणारी उत्तम कथा...
मस्त...

लिहित रहा...

स्मृती's picture

26 Dec 2010 - 9:40 pm | स्मृती

छान... शेवट मस्त!

विलासराव's picture

26 Dec 2010 - 11:45 pm | विलासराव

लेख आवडला.