एका माणसाची कथा....
मिपावरचा पहीलाच प्रयत्न...प्रचंड धाकधुक चालू आहे. आपण तज्ञ मंडळींना हा लेख कसा वाटला ते जरूर सांगा.
आज मी तुम्हाला एका माणसाची कथा सांगणार आहे. विलक्षण स्वाभिमानी, करारी, निर्मळ, प्रामाणिक आणि प्रसंगी रागीट सुद्धा. मी असा एक माणुस पाहिलाय जो अतिशय तत्त्वशील, बुद्धीमान पण तरीही प्रसिद्धी पासून प्रयत्नपुर्वक दूर.
==========================================================================================
स्वातंत्र्यापुर्वीचा काळ. कोल्हापुर पासून जवळ जवळ ३०/४० कि.मी. आत चिकोडी जिल्ह्यात संकेश्वर नावाचं एक गाव आहे. तिथे पुर्वी एक अण्णा सरंजारदार होते. अण्णा म्हणजे एकदम करारी, हुशार आणि देवभोळा माणुस. ऊभी गार शेतं, कामाला प्रचंड गडी माणसं, ७ पिढ्या बसुन खातील इतकं खानदानी वैभव. असं म्हणतात की सरंजारदारबाई जेवण झालं की हात दुधानं धुत. तर ह्या अण्णांना ३ मुलं होती. पहिली २ ज्यांना शेतीमधे रस होता तर तिसरा गोविन्द होता ज्याला शिक्षणात रस होता. तिघांमध्ये गोविंदाला बापासारखीच करारी, हुशारी आणि तल्लख बुद्धिमत्ता परमेश्वरानं भरभरून दिलेली. सतत काहीतरी भारी आणि वेगळं करायची हौस त्याला. त्यापायी त्यानं त्या काळात एम.ए. (एन्ग्लिश) केलं. मंडळी, हा काळ म्हणजे स्वातंत्र्यापुर्वी जवळ जवळ ७० वर्षे असा आहे. एम.ए. झाल्यावर इंग्रज सरकारनं जिल्हाध्यक्ष केलं. बापाची छाती अभिमानानं भरून आली. बापानं गावाला जेवण घातलं इतका वडिलानां आनंद झाला. पण देशाभिमान खुप. म्हणुन महीना ५०० रू. पगाराची नोकरी सोडली. ह्यातच वडिल गेले आणि सगळ्या घराची जबाबदारी अंगावर येऊन पडली. हे काय कमी होतं म्हणुन मोठ्या दोन भावांनी मालमत्ता वाद सूरू केला. गोविंद अतिशय स्वाभिमानी होता. त्याला हे पटेना म्हणुन त्यानं सगळं भावांच्या हवाली केलं आणि पत्नीला घेऊन मजल दरमजल करत सातार्याजवळ क्षेत्र माहुलीमध्ये येऊन पोहोचले. तात्पुरता मंदिरामध्ये आसरा घेतला. गावच्या पाटलाला खबर लागली की कुणी विद्वान गृहस्थ देवळात आलाय. पाटिलबाबा जातीनं आले आणि हाताला धरून घरी घेऊन गेले. योगायोग असा की गोविंद रावानां कळलं की सातारा भागात एकही इंग्रजी शाळा नाही, म्हणुन मग सातारा शहरात पहिलं इंग्रजी विद्यालय सुरू झालं. मंडळी, त्या काळी ही गोष्ट खरचं मोठी होती. शाळेचा नियम म्हणजे गरिबांना फुकट आणि श्रीमंतांना फी. शिक्षण सगळ्यांना सारखंच. ह्या काळापर्यंत गोविंदरावांना ४ मुलं झालेली. ३ जगली आणि १ मुलगी गेली. उत्तरोत्तर शाळा वाढू लागली आणि गोविंदरावाचं नाव संपुर्ण सातारा जिल्ह्यात घेतलं जाऊ लागलं. शाळाविस्तारासाठी गोविंदरावानी कर्ज काढलं. तर पहिला मुलगा वामन, शकु, विष्णु अशी तीन मुलं. तर मी तुम्हाला ह्या विष्णुची कहाणी सांगणार आहे. अचानक गोविंदराव हृदयविकाराच्या झटक्यानं गेले. गोविंदरावाची पत्नी आणि मुलं उघड्यावर आली. इथेच ह्या कुटुंबाची फर्फट सुरू झाली. त्यावेळेस विष्णु अवघा दीड वर्षाचा होता. कर्ज मिटवण्यासाठी ह्यांना शाळा विकावी लागली आणि ३ लहान मुलं घेऊन परत ह्या कुटूंबाचा प्रवास पुण्याकडे सुरू झाला. पुण्यात आल्यावर पासोड्या विठोबाच्या देवळात मुक्काम केला. गोविंदरावाची पत्नीनं( ह्यांना आपण आता काकु म्हणुयात) ४ घरची कामं धरली आणि वामनांन शिक्षण आणि एका दुकानात नोकरी धरली. असचं २ वर्षांपर्यंत चाल्लं. ह्यात काकुंच्या डोक्यावर परिणाम झाला आणि काम मिळेनाशी झाली. मोठ्या भावाचा शिक्षणाचा खर्च वाढु लागला तसं छोट्या विष्णुवर घराबाहेर पडुन पोटाची व्यवस्था करण्याची वेळ आली. तेव्हा त्याचं वय होतं ४ - ४.५. ह्या वयात त्याला कुणी नोकरी पण देइना. मग जगायचं कसं म्हणुन मधुकरी मागुन २ वेळचं पोट भरू लागला. ॐ भवती भिक्षां देही....मंडळी, हे ऐकतानाही माझ्या अंगावर काटा उभा रहातो आणि डोळे भरून वाहु लागतात. काय झालं असेल त्या मुलाचं याचा विचार जरी केला तरी मन प्रचंड अस्वस्थ होत. कर्मठ लोकांच्या त्या पुण्यात त्या वेळेला त्याला काय काय ऐकावं लागलं असेल भिक्षा मागताना.
क्रमशः
============================================================
आज इथेच थांबतो..ह्या पुढील भाग लिहिण्यास घेतला आहे. तयार झाला की टाकीनच. तोवर प्रिय मिपाकरांनी हा लेख कसा वाटला हे जरूर कळवावे. ह्या कथेमधील नावे बद्लण्यात आली आहेत.
प्रतिक्रिया
26 Apr 2008 - 3:32 am | चतुरंग
मि.पा.वर सर्वप्रथम तुमचे स्वागत!
लेखाची सुरुवात उत्सुकता वाढविणारी आहे हे नक्की. पुढील भाग लवकर येऊदेत.
(अवांतर - लिहीत जा, वाचक मिळत जातील हा इथला मूलमंत्र समजा! शुभेच्छा!!)
चतुरंग
26 Apr 2008 - 5:25 am | नंदन
चतुरंगरावांशी सहमत आहे. सुरुवात उत्सुकता वाढविणारी आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
26 Apr 2008 - 5:54 am | सुनील
वाचनीय. पण पहिला भाग अगदीच त्रोटक वाटला. जरा भरभरून लिहा.
पुलेशु
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
26 Apr 2008 - 6:53 am | हेरंब
छान लिहिताय, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!
26 Apr 2008 - 7:12 am | शितल
दमदार एन्ट्री.
छान लिहिताय, पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत!
26 Apr 2008 - 4:30 pm | आनंदयात्री
छोट्या विष्णुची पुढची कथा वाचण्याची उत्सुकता आहे !
26 Apr 2008 - 7:57 am | प्रभाकर पेठकर
श्री. मुकुल,
तुमचे लिखाण सुंदर आहे. त्यामागची तळमळ आणि आदराची भावना विशेष जाणवली. पुढील भागांच्या प्रतिक्षेत आहे.
26 Apr 2008 - 4:05 pm | विसोबा खेचर
तुमचे लिखाण सुंदर आहे. त्यामागची तळमळ आणि आदराची भावना विशेष जाणवली.
हेच म्हणतो!
मुकुलराव, मिपावर स्वागत आहे. भाग थोडे मोठे लिहा असे मीही म्हणतो...
क्रमश: वाल्या लेखकांसारखे करू नका या स्वातीच्या म्हणण्याशी सहमत...:)
तात्या.
26 Apr 2008 - 11:27 am | स्वाती दिनेश
तुमच्या कथेची सुरुवात चांगली झाली आहे,पण जरा मोठे भाग लिहा आणि क्रमशः वाल्या लेखकांसारखे करु नका बरं.हे क्रमश: वाले फार वाट पहायला लावतात,तुम्ही जरा लवकर टाका पुढचे भाग.:)
पुढे वाचायला उत्सुक.
स्वाती
26 Apr 2008 - 4:49 pm | भडकमकर मास्तर
सुरुवात छान झाली आहे....
प्रयत्न छान आहे....
परंतु
१.योग्य जागी परिच्छेद पाडा.... अधिक सुलभ रित्या वाचता येईल...
२. खरंच क्रमशः ची सवय लावून घेऊ नका...
वाटेल तेवढा वेळ घ्या पण पुढील सम्पूर्ण गोष्ट एकत्र पोस्ट करा...
26 Apr 2008 - 11:34 pm | मदनबाण
छान लिहिता तुम्ही.....
कथेचा पुढील भाग लवकर लिहा.....
(कथा प्रेमी)
मदनबाण
27 Apr 2008 - 8:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या कथेने पुढचा भाग वाचण्याची उत्सुकता वाढवली आहे.
प्रतिक्रियेत आलेल्या सुचना विशेषतः स _भडकमकर यांनी दिलेल्या सुचना नक्की पाळा !!!
>>मिपावरचा पहीलाच प्रयत्न...
मिपावरील आपला पहिला प्रयत्न यशस्वी झाला आहे असे वाटते.
>>प्रचंड धाकधुक चालू आहे. .
मिपावर लेखन करतांना चांगल्या चांगल्याला धाकधुक होते त्याचा विचार करायचा नाही ,आवडेल असे लिहिल्यावर कौतुक करणारे इथे नक्कीच आहेत.
>>आपण तज्ञ मंडळींना हा लेख कसा वाटला ते जरूर सांगा
तज्ञ मंडळी सांगतीलच लेखन कसे झाले आहे,पण सामान्य वाचक म्हणुन आम्हाला कथालेखन आवडले. आपल्या पुढील लेखनाला मनापासुन शुभेच्छा !!!! :)
27 Apr 2008 - 1:36 pm | वेदश्री
सुरूवात खूपच सुंदर झाली आहे. पुढील भाग वाचण्याची खूपच उत्सुकता आहे. कधी टाकताय पुढला भाग?
28 Apr 2008 - 6:54 pm | वाटाड्या...
प्रिय मित्रांनो,
चतुरंग, नंदन, हेरंब, शितल , पेठकर साहेब, तात्या, स्वाती , मदनबाण , प्रा.डॉ. बिरुटे जी , स _भडकमकर, आनंदयात्री , सुनील ह्यांचा मी ऋणी आहे.
प्रतिसाद वाचुन आनंद वाटला. पुढ्चा भाग लिहायला घेतला आहेच. झाला की लगेच टाकतो. जेव्हा मी ही कथा ऐकत आणी लिहित होतो तेव्हा कधी कधी मी त्यांच्यातील एक होतो तर कधी कधी मी तटस्थ बनून बघत होतो. तेव्हा ही कथा चारही अंगानी फिरते आहे अस समजा.
अंती, सुचनांबद्दल सर्वांचेच आभार. पुढ्च्या लेखात जास्त काळजी नक्की घेइन.
कळावे,
आपला,
मुकुल.
17 May 2008 - 9:00 pm | अनिता
मुकुल,
लवकर टाका की भाग २
17 May 2008 - 9:41 pm | बिपिन कार्यकर्ते
मुकुल... एन्ट्री जोरात... त्यामुळे जबाबदारी वाढली आहे तुमची. खूप उत्सुकता आहे पुढे काय झाले ते वाचण्यासाठी. भाग जरा मोठे लिहा. हा खूपच लहान वाटला.
बिपिन.
(क्रमशः मुर्दाबाद :))
17 May 2008 - 11:51 pm | मन
भावला लेखनातला.
पुढल्या भागांसाठी उत्सुक.
आपलाच,
मनोबा