नमस्कार,
जयपूर घराण्याचे दिग्गज गायक पं. मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने 'मन्सूर संस्मरण मंच' आणि 'पुणे भारत गायन समाज' यांच्या वतीने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सर्व संगीत रसिकांसाठी खुला आहे. कार्यक्रमाचे पहिले सत्र शनिवार २५ डिसेंबर २०१० रोजी सकाळी १० वाजता भारत गायन समाजाचे प्रि. केतकर सभागृह (शनिपाराजवळ) येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या सत्रात विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर यांचे गायन होईल. दुसरे सत्र दिनांक २६ डिसेंबर २०१० रोजी सायंकाळी ५.३० वाजता एस. एम. जोशी सभागृह (पत्रकार भवन, गांजवे चौक, शास्त्री रस्ता, एस. एम. जोशी पुलाजवळ) येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी पं मन्सूर यांचे पुत्र व शिष्य पं. राजशेखर मन्सूर यांचे गायन होईल, तसेच पं. मन्सूर यांच्या गायनाच्या काही ध्वनिचित्रफीती दाखवण्यात येतील.
सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.
कार्यक्रमः
दिनांकः २५ डिसेंबर २०१० वेळः सकाळी १०.०० वाजता
गायिका: विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर
स्थळः पुणे भारत गायन समाजाचे प्रि. केतकर सभागृह (शनिपाराजवळ)
दिनांक: २६ डिसेंबर २०१० वेळः सायंकाळी ५.३० वाजता
गायकः पं राजशेखर मन्सूर
स्थळः एस. एम. जोशी सभागृह (एस. एम. जोशी पुलाजवळ, पत्रकार भवन शेजारी, शास्त्री रोड, नवी पेठ)
साथसंगतः मिलिंद पोटे (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी)
आमंत्रक
मन्सूर संस्मरण मंच.
प्रतिक्रिया
20 Dec 2010 - 3:34 pm | बिपिन कार्यकर्ते
क्या बात है!
जमेल असे वाटत नाही, पण तुमच्याकडून या कार्यक्रमाचा वृतांत ऐकायला / वाचायला आवडेल.
20 Dec 2010 - 4:04 pm | युयुत्सु
मी नक्की येणार...
20 Dec 2010 - 9:41 pm | विसोबा खेचर
माहितीबद्दल धन्यवाद..
श्रुती छानच गाते.. जयपूर गायकी अगदी प्रामाणिकपणे मांडते..
अवांतर -
मन्सूरअण्णांचं प्रेम आणि आपुलकी मला लाभली, हे मी माझं फार मोठं भाग्य समजतो..
एकदा काही कामनिमित्त दिल्लीला गेलो होतो. त्याच संध्याकाळी दिल्लीतच कुठेतरी मन्सूरअण्णांचं गाणं आहे, ही बातमी मला समजली आणि मी त्या मैफलीच्या ठिकाणी पोहोचलो. ग्रीनरूममध्ये जाऊन बुवांना भेटलो, त्यांच्या पाया पडलो..
मन्सूरअण्णांनीही एकदम, " अरे तू इथं दिल्लीत कसा काय? " अशी आपुलकीनं विचारपूस केली..
"मोकळाच आहेस ना ? मग बस की तानपुर्याला..!"
त्या मैफलीत मन्सूरअण्णांच्या मागे तंबोर्यावर बसायचं भाग्य लाभलं मला..!
मध्यंतरानंतर मी बुवांना बिहागडा गायची फर्माईश केली..तो बिहागडा इतका उत्कृष्ट जमला की आजही तो माझ्या कानी आहे..!
आता फक्त अश्या अनेक आठवणी तेवढ्या उरल्या आहेत..!
असो..देवाघरचा माणूस..! अगदी सुरीला आणि लयदार..! खूप खूप ऐकलं मन्सूरअण्णांना..!
तात्या.
20 Dec 2010 - 9:56 pm | चिंतामणी
अवांतर - सुमारे ३० वर्षापुर्वी पुण्यात दिवाळीचे सुमारास तिन दिवस तिन मैफली असा कार्यक्रम झाला होता. (मी संयोजक म्हणा स्वयंसेवक म्हणा होतो).
एक मैफल रात्रीच्या रागांची होती. दुसरी सकाळच्या आणि तिसरी संध्याकाळच्या रागांची.
अनेकांनी तारखा आणि वेळ बघीतल्यावर आणि एकच गायक गाणार म्हणल्यावर भुवया उंचावल्या होत्या.
परन्तु पुणेकर रसिकांनी भरभरून प्रतीसाद दिला आणि बुबांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. तिन दिसवात फराळाबरोबरच स्वरांची मेजवानी झाली.
21 Dec 2010 - 8:04 am | युयुत्सु
ही पु. ल. देशपाण्ड्यांनी आयोजित केलेली गरवारे कॉलेजमधली मैफल होती का? असेल तर त्या मैफलीचे काही रेकॉर्डींग पुलंच्या निवेदनासह माझ्या कडे आहे.
21 Dec 2010 - 10:21 pm | विसोबा खेचर
मला ते ध्वनिमुद्रण मिळेल का प्लीज.?
तात्या.