✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दत्तजयंतीच्या निमित्ताने...

अ
अवलिया यांनी
Mon, 12/20/2010 - 12:28  ·  लेख
लेख
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्टिचे निरुपण माझ्या बुद्धीने देत आहे. हे निरुपण असेच असेल किंवा असावे असा आग्रह नाही. हे निरुपण तुम्ही मानावेच असाही आग्रह नाही. मानल्यास माझी हरकत नाही. या विषयावर चर्चा करण्यास माझी ना नाही.. मी त्यात भाग घेईलच असे नाही. असो. सदर निरुपण मिपावर अंधश्रध्दा फैलावणारे आहे असा संपादकांचा समज होत असल्यास सदर लेखन उडवले तरी माझी हरकत नाही. ही कथा माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. कथा ठळक टाईपात असुन त्यावरचे माझे निरुपण नेहमीच्या ठशात आहे याची नोंद घ्यावी. एका प्रसंगी आंबेजोगाईच्या परिसरात काही ब्राह्मण दत्तदर्शनाच्या इच्छेने तप करत होते. समर्थांना ओळखून त्यांनी आपला हेतू सांगून त्यांचे साह्य मागितले. समर्थांनी त्यांना "भाव दृढ करा" असे सांगून ते ही त्यांचेजवळ बसले. कोणताही मनुष्य देवभक्ति ज्या अनेक हेतुंनी करत असतो त्यात देवाचे दर्शन, देवाची माहिती त्याचप्रमाणे मनातल्या सुप्त इच्छांची पूर्ती, कुठे द्वेष भावनेवर आधारीत कुणाचे वाईट व्हावे ही इच्छा तर कुठे सगळ्यांचे चांगले व्हावे ही इच्छा असते. मनातील अनेक भावनांचा विचार करता मनुष्य ज्या काही विविध इच्छा मनात बाळगतो त्या सर्वांचे प्रतिबिंब देव भक्ति या भावनेच्या आविष्कारात आढळते. परंतु वरकरणी मनुष्य मला देवदर्शनाचीच आस आहे, बाकी ऐहिक सुखाची लालसा अजिबात नाही असेच दाखवत गुरुला मार्ग विचारतो. गुरु अशा विविध पद्धतीच्या साधकांना चांगला ओळखुन असल्याने त्यांच्यातले योग्य साधक कोणते हे परिक्षेने ठरवतो. याकथेत सुद्धा हे रुपकाच्या माध्यमातुन सुचवले आहे. गुरुकडे शरण आलेल्यांकडे हौशे, गवसे, नवसे असतात. त्यातले नक्की कसे कोण आहेत हे काही काळ गेल्यावर समजते. गुरु सर्व साधकांना, शिष्यांना परमेश्वरापाशी भाव दृढ करा असे सांगतात. स्वतः त्यांच्याबरोबर असतात. विविध दृष्टांत आणि कथांच्या सहाय्याने मुल तत्वज्ञानाचा उपदेश देतात. कित्येक शिष्य अशा प्रसंगी आपण गुरुला विचारले काय आणि गुरु सांगतो काय या विचाराने गडबडून जातात. देव आपल्याला शक्ती देईल, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करेल या आशेने आपण आलो पण इथे गुरुने ही तर वेगळीच पोपटपंची लावली असा अनेक शिष्यांचा ग्रह होतो आणि ते शिष्य अशा गुरुला सोडून जातात. मात्र खरा गुरु त्यांचे सुद्धा भलेच होवो असाच आशीर्वाद देतो. कसे घडते हे आता आपण रुपककथेत पाहू. एक प्रहर रात्र उलटल्यावर दत्तप्रभू गारुड्याच्या रूपात पत्नी, पाच मुले, हल्यावर लादलेली गोणी,हातात पाच कोंबडे व बोकड अशा परिवारासह तेथे येऊन थांबले. गुरु शिष्याला या विश्वाचे रहस्य, जीव कोण, ईश्वर कोण आहे हे सांगणार आहे. पण त्याची तयारी आहे का हे पण पाहिले पाहिजे. केवळ काही ऐहिक वस्तुंच्या लालसेने देवाची भक्ती करणारा शिष्य यथार्थ स्वरुप समजुन घेण्यास पात्र नसतोच पण त्याला स्वस्वरुप सांगून काही उपयोग नसतो. म्हणून गुरु त्याला मायेचे स्वरुप समजावुन सांगायचा प्रयत्न करतो. कधी कैवल्याद्वैताच्या मायावादाच्या सहाय्याने किंवा कधी सांख्ययोगाच्या सहाय्याने गुरु समजावुन सांगतो. गारुड्याचे रुपक वापरुन गुरु मूळ पुरुष गारुडी असुन त्याची पत्नी ही प्रकृती आहे असे रुपक मांडतो. पंच ज्ञानेंद्रिये म्हणजे कोंबड्याचे रुपच. कधी कोंबडा पाहीला आहे... दिसेल त्या कोंबडीशी संग करत सतत खाणे, हिंडणे यातच वेळ घालवणारा. पण दुसरा कोंबडा तिथे येताच भांडण करणारा. मनुष्याची पंचेद्रिये विषयांचा भोग घेण्यासाठी अशीच सदैव आतुर असतात. त्यात आडकाठी आली की भडकतात. अजुन हवे अजुन हवे हा सतत घोष चालू असते. कधीही तृप्त न होणारी इंद्रिये अगदी त्या कोंबड्याप्रमाणेच असतात. माणसाचे मन मोठे विचित्र असते. मी केले मी करेन या अहंभावनेने सदैव ग्रासलेले मन अतिशय अहंकारी आणि उद्दाम असते. कर्तृत्वाचा डांगोरा पिटतांना मूळ स्वभावाशी फारकत घेत मी माझे यात मनुष्य अगदी बोकडाप्रमाणे वर्तन करतो. आपल्याच मस्तीत मश्गुल, संपूर्ण रस्ता स्वत:च्याच बापाच्या मालकीचा आहे हा उद्दाम पणा अंगी बाळगत, उग्र दर्प सोडत बोकड रस्त्याने जातांना बघा म्हणजे तुम्हाला पटेल नक्की काय म्हणायचे आहे ते ! पाच मूले म्हणजे पंचतत्वे. ज्यांच्या सहाय्याने हे विश्व आकाराला आले आहे ते स्थुल आणि सुक्ष्मपंच तत्वे. हल्या हे प्रपंचाचे प्रतिक असुन त्यावर लादलेल्या गोण्या म्हणजे मनुष्याच्या इच्छा आकांक्षाची असलेली गोळाबेरीज. त्या वेळी बरोबरच्या स्त्रीला "भूक लागली" असे म्हणून स्वयंपाक करायला सांगीतले. गुरु त्याच्याकडे आलेल्या शिष्याला जगाचे स्वरुप रुपकाच्या माध्यमातुन सांगत आहेत. मूळ पुरुष जेव्हा प्रकृतीच्या सहाय्याने स्थुल आणि सूक्ष्म पंचतत्वाच्या सहाय्याने शरीररुपाने जगात येतो तेव्हा पंचेद्रियांच्या आणि मनाच्या कचाट्यात सापडून त्याचा ठिकाणी कामना जागृत होते. भुक लागली या वाक्याने मला हे हवे, मला ते हवे ही मनुष्याच्या मनात जागृत होणारी सुप्त इच्छा जी पुढे विचार बनुन कृतीला प्रेरणा देते ती जागृत होते असे सांगतो. तिने एक चूल मांडून तीवर एक हंडी चढविली व कोंबडे , बोकड त्यात कापून घातले तरी हंडी भरत नाही असे पाहून क्रमाक्रमाने तो हल्या व पोरेही कापून त्यात घातली. जेव्हा मनुष्य आपली इच्छापुर्ती व्हावी म्हणुन धडपडू लागतो तेव्हा विषयांचा भोग घेता घेता त्याला त्यातच गोडी वाटु लागते. भोग संपता संपत नाहीत आणि इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. एक इच्छा पूर्ण होते न होते तोच दूसरी इच्छा आ वासून उभी रहाते. अक्राळ विक्राळ असा इच्छेचा हा पगडा जणू समस्त प्राणीजगतावर अनादी अनंत काळापासून आहे. इच्छा पूर्ण झाली असे वाटुन सुख वाटते तोच दुसरी इच्छा पूर्ण नाही म्हणुन दु:ख वाटु लागते. ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तो पहिलीचे सूख संपते आणि त्यातले दु:ख समोर येते. एक धरावे तर दुसरे सुटते. अक्षरशः जीवाचे रान करावे आणि हातात शून्य यावे अशी अवस्था होत जाते. स्वामी विवेकानंदांच्या शब्दात सांगायचे तर जे तरुण आहेत, ज्यांच्या डोळ्यासमोर भव्य दिव्य स्वप्ने आहेत त्यांना हे लक्षात येणार नाही, पण ज्यांनी चार पावसाळे पाहिले आहेत त्यांना कळेल मला काय म्हणायचे आहे ते. हीच माया. सगळ्यांना जखडून टाकणारी पण त्याचवेळी कर्म करण्यास प्रवृत्त करणारी माया ती हीच. तरी हंडी भरेना तेव्हा ते पलिकडे बसलेले परदेशी (तपाला बसलेले ब्रह्मण) आहेत असे त्याचे बोलणे ऐकून ब्राह्मण पळून गेले. अशा प्रकारे गुरु जगाचे स्वरुप सांगतात पण देवभक्ती, गुरुभक्ती केवळ ऐहिक लालसे पोटी आणि काही तरी लाभ व्हावा याच हेतुपोटी करणारे भक्त अशा गुरुला काही कामाचा नाही असे समजुन सोडून जातात. पळून जातात. त्यांना देवाला भेटायचे नसते. देवाचे यथार्थ स्वरुप त्यांना जाणून घ्यायचे नसते. त्यांना हवे असते फक्त इंद्रियांना सुखावणारे सुख. त्याचसाठी ते देवाची भक्ती करत असतात. खरोखर जगात असेच कितीतरी भक्त असतात देवा मला हे दे, देवा मला ते दे असे म्हणत त्याच्याजवळ याचना करणारे. पण देवा मला तु भेटच अशी आर्त विनवणी करणारे किती दुर्मिळ असतात हे आपण जाणतोच. समर्थ मात्र शांतपणे बसून राहीले, कारण हे कोण आहेत हे त्यांनी ओळखले होते.तेव्हा ते सर्व दृष्य नाहीसे होऊन तिथे श्री दत्तस्वरूप प्रकट झाले. त्यावेळी समर्थांनी त्या ब्राह्मणांनाही दर्शन द्यावे अशी प्रर्थना केली.पण ते सकाम भक्त आहेत त्यांची आत्मसाक्षात्काराची योग्यता नाही असे दत्तप्रभूंनी सांगीतले.पुढे श्रीसमर्थांच्या वाक्यास्तव त्या ब्राह्मणांचे स्वप्नात समाधान केले असे वर्णन आहे. समर्थांच्या रुपाने एका खर्‍या भक्ताची, ज्ञानी मनुष्याची आपल्याला ओळख पटते. मायेचे यथार्थ स्वरुप जाणुन सृष्टीतील मिथ्यात्व जाणून लपलेल्या सत्य तत्वाची ओळख अशा भक्ताला पटते. आणि मग मागे लपलेले तत्व त्याला कुणी ब्रह्म म्हणते, कूणी ईश्वर म्हणते, कूणी देव तर कुणी अल्लाह म्हणते ते समोर येते. नव्हे ते काय आहे हे जाणले जाते. समजणे आणि जाणणे ह्या खूप भिन्न गोष्टी आहेत. असा भक्त परमदयाळू असतो, त्याला असे वाटते मला जे समजले, मी जे जाणले ते इतर लोकांना कळावे. भले त्यांच्या इच्छा, आकांक्षा ऐहिक जगातील असु द्या पण त्यांना हे परम तत्व जाणवावे, आकळावे. पण जोपर्यंत मन बाह्य विषयात गुंतले आहे तोपर्यंत हे तत्व जाणवणार नाही. केवळ दिव्यातील तेल संपले म्हणुन जशी ज्योत शांत झाली तसेच केवळ मनातील भावनांना खतपाणी न घालुन संयम केला मन शांत होते. आणि जोपर्यंत मन शांत होत नाही तोपर्यंत मूलतत्व समजणे अतिशय अवघड आहे. अशक्य आहे.
***
संत एकनाथ दत्ताचे स्वरुप सांगतात. हा दत्त म्हणजे सत्व, रज, तम या त्रिगुणांनी युक्त, निर्माता ब्रह्मदेव, रक्षण कर्ता विष्णू आणि लयकर्ता शिव यांचे एकत्रित रुप आहे. हा संपूर्ण विश्वाचा नियंता, राजा असून ह्याच्यापाशी अज्ञान अजिबात नाही. असे म्हटले जाते की ते अद्वितीय, अनादी अनंत चैतन्य म्हणजेच विश्वाचे सत चित् आनंद स्वरुप कसे आहे हे विचारले की श्रूती केवळ हे नाही हे नाही असे नकारार्थी उत्तर देते कारण ते कसे आहे याचे वर्णन करण्यास मानवी वाणी असमर्थ आहे. तेव्हा मानवी वाणीतुन उगम पावलेली श्रुती हे नाही हे नाही असेच सांगते. पण याच्यापाशी असे अज्ञान नाही इतकेच काय याचे स्वरुप कसे आहे हे देव, मुनी, योगी यांना ध्यान वा समाधीतुन सुद्धा कळत नाही. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेति नेति शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥१॥ बाह्य विश्वात आणि आंतर विश्वात तुच केवळ आहेस. पण मी अभागी आहे मला हे समजत नाही, उमजत नाही. विचारांचे सुक्ष्म स्वरुप मनात उगम पावते आणि तिथेच त्याच्यापासुन निरस्त होत मूल स्वरुपाची ओळख न पटल्याने जन्म मरणाच्या फेर्‍यात अडकुन जातो. अज्ञान हेच जन्ममरणाचे कारण आहे. विवेकाने ज्ञान प्राप्ती झाली की जन्म मरणापासुन मुक्ती मिळते. पण हा विवेक सहजसाध्य नाही. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी न कळे ही मात पराही परतली तेथे कैचा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥ असा दत्त अचानक माझ्या समोर आला आहे. निर्गुण निराकार परब्रह्म मला सगुण रुपाने समोर दिसल्याबरोबर माझ्या मनाच्या सर्व शंका फिटल्या. त्याने प्रसन्न होऊन मला आशीर्वाद दिला आणि माझा जन्ममरणाचा फेरा संपवला. ज्ञानाने, विवेकाने ते निर्गुण निराकार ब्रह्म माझ्या डोळ्यासमोर साकार झाले. आता कुठला जन्म कुठला मृत्यु ! अनादी मी अनंत मी ! दत्त येऊनिया उभा ठाकला भावे साष्टांगेसी प्रणिपात केला प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥३॥ मात्र ते निर्गुण निराकार माझ्यासमोर साजिरे रुप घेउन आले आणि आता मला त्याचीच गोडी लागली आहे. माझे मन आता जागृत्,स्वप्न, आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलिकडे गेले आहे. या अवस्थेत माझे मन उन्मन झाले आहे. यात आता माझे तुझे मी तू हा विषय विषयी हा भेदच उरला नाही. जे जे चेतन असो वा अचेतन, जीव असो वा जड ते सर्व मीच आहे हा भाव आता माझ्या ठि़काणी एकवटला आहे. आणि माझ्या मनात केवळ दत्त असुन त्याचेच निरंतर ध्यान करत आहे. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ॥४॥ असे हे सर्व घडले ते केवळ त्या गुरुदेव दत्तामुळे. चला त्याची आरती करु त्याला ओवाळु ! आपल्या सर्व प्रपंच्याच्या चिंता त्याच्यामुळे हलक्या होतील, लयाला जातील यात संशय नाही. जय देव जय देव जय गुरुदत्ता श्री गुरुदत्ता , आरति ओवाळिता हरली भवचिन्ता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ! श्री गुरुदेव दत्त !!
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19737 वाचन

💬 प्रतिसाद (89)

प्रतिक्रिया

_____/\______

स्पा
Mon, 12/20/2010 - 12:35 नवीन
_____/\______
  • Log in or register to post comments

जबरदस्त रे नाना

परिकथेतील राजकुमार
Mon, 12/20/2010 - 12:49 नवीन
जबरदस्त रे नाना ___/\___ अतिशय सुरेख. हा लेख वाचतानाच आज सकाळीच सकाळ मध्ये आलेल्या श्री. बालाजी तांबे ह्यांच्या दत्तगुरुंवरील लेखाची आठवण झालीच झाली.
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Mon, 12/20/2010 - 12:52 नवीन
श्री गुरुदेव दत्त! मस्त लिहलय निरूपण!!
  • Log in or register to post comments

खुप छान . धन्यवाद अमोल केळकर

अमोल केळकर
Mon, 12/20/2010 - 12:57 नवीन
खुप छान . धन्यवाद अमोल केळकर
  • Log in or register to post comments

धन्य...

गवि
Mon, 12/20/2010 - 13:01 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

फारच छान

रोमना
Mon, 12/20/2010 - 13:09 नवीन
फार उत्कृष्ट लिहिले आहे. भले शाब्बास. पराही परतली तेथे कैचा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥२॥ "पराही परतली" याचा अर्थ सांगु शकाल का कृपया?
  • Log in or register to post comments

भारतीय तत्वज्ञानानुसार "परा",

अवलिया
Mon, 12/20/2010 - 13:15 नवीन
भारतीय तत्वज्ञानानुसार "परा", "पश्यंती", "मध्यमा" आणि "वैखरी" ही वाणीची चार रुपे आहे. वैखरी म्हणजे आपण जे उच्चार करुन बोलतो, दुसर्‍याला ऐकु जाते ते रुप. परा हे अतिशय सुक्ष्म मनात असलेल्या विचाराचे पहिले रुप. हा विचार सुद्धा विचार करता करता माघारी फिरला, म्हणजेच विचार त्या ब्रह्माच्या स्वरुपाचा विचार करण्यास असमर्थ ठरला असे "पराही परतली" या शब्दाने सांगितले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोमना

धन्यवाद

रोमना
Mon, 12/20/2010 - 13:28 नवीन
तुम्हि खरचं अवलिया आहात. धन्यवाद तुमचा ब्लोग असेल तर लिन्क द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+१ 'परा' या सूक्ष्म वाणीने

llपुण्याचे पेशवेll
Wed, 12/22/2010 - 09:00 नवीन
+१ 'परा' या सूक्ष्म वाणीने ब्रम्हाचा जप करणारे सत्पुरुष एका कुळात होऊन गेले. त्यांचे वंशज आता परांजपे असे उपनाम धारण करतात. असे मी मराठी आडणावे या कोणीतरी लिहीलेल्या एका पुस्तकात वाचले होते. लेखकाचे नाव आठवत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

अतिशय सुंदर!!! सिद्धहस्त

शुचि
Mon, 12/20/2010 - 13:11 नवीन
अतिशय सुंदर!!! सिद्धहस्त लेखणी. इनसाईट ( इनर आय) ____ धन्यवाद!!!
  • Log in or register to post comments

इतके सुरेख निरुपण वाचावयास

गांधीवादी
Mon, 12/20/2010 - 13:31 नवीन
इतके सुरेख निरुपण वाचावयास मिळाले, धन्य झालो. अवांतर : आपण शुची यांच्या लेखनातील 'एक काळा ठिपका' काढून नाही टाकला तर त्या काळ्या ठीपक्याला अश्या प्रकारे सजविले कि आता 'तोच काळा ठिपका' एक डाग बनून न राहता त्या कथेतील एक सौंदर्य दागिना झाला. व्वा. आता नव्याने जव्हा हि कथा वाचीन तेव्हा अजून आनंद होईन. कथाकार शुची आणि निरुपण कर्ते अवलिया यांचे मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान निरुपण. आवडले.

विलासराव
Mon, 12/20/2010 - 13:46 नवीन
छान निरुपण. आवडले.
  • Log in or register to post comments

४ शब्द

कवितानागेश
Mon, 12/20/2010 - 14:14 नवीन
वेगळा धागा काढणार होते, पण इथेच लिहिते आता; दत्तकथा: या गोष्टीची किल्ली 'भाव दृढ' ठेवा ही आहे. पोराना मारा अशी अजिबातच नाही. ते केवळ दर्शानार्थींची परिक्षा पाहण्यासाठी 'गारुड्याने'( = स्वत: दत्तागुरुनी/ समर्थांनी) उभे केलेले गारुड होते. दर्शनार्थींची इतर कुठली परिक्षा( सुंदर स्त्री पाठवणे वगरै) घेणे योग्य ठरले नसते, बाकीच्या मोहांपासून ते सुद्धा 'तप' करून मोकळे झाले असतील. त्यांच्या 'बेसिक इन्स्टिन्क्ट' ला हात घातला. सरव्हायवल इन्स्टिन्क्ट! इतके बीभत्स दृश्य समोर उभे केले की खरोखरच त्यांच्या 'भक्तीभावाच्या दृढतेची' कसोटी लागेल. मुळात सगळेजण 'जप-तप' करायचे सोडून त्या गारुड्याच्या गारुडात अडकलेच कसे? शिवाय समर्थांवाराच्या श्रद्धेची सुद्धा परीक्षा होईल. जर का या ब्राम्हणाना खात्री होती की समर्थ प्रत्यक्ष दत्तगुरूंचे दर्शन घडवून देऊ शकतात, मग ते आपले प्राण सहज वाचवतील, हा विश्वास का नाही ठेवला. इथेच ती किल्ली लागते, 'भाव दृढ' ठेवा! म्हणजेच विश्वास ठेवा. स्वत:वर, गुरुवर. ही किल्ली प्रत्येक परिक्षेसाथीच आवश्यक असते. इथे एक किस्सा आठवतो, युरी गागारीनची प्रशिक्षनाच्या दरम्यान एकदा परिक्षा होती. त्याला एकट्याला एका छोट्या खोलीत कोंडले, पेपर दिला, भयंकर मोठा पेपर आणि खूप कमी वेळ, असे होतंच. शिवाय पेपर सुरु झाल्यावर त्याच पेपरातल्या प्रश्नांची बरोबर व चुकीची देखील उत्तरे स्पीकरवर मोठमोठ्यानी सुरु केली. हा देखील त्या पातळीवरचा दुष्टपणाच आहे. पण त्यांनी 'भाव दृढ' ठेवला, मन खंबीर केले, एकाग्र केले पेपर चांगल्या पद्धतीनी सोडवून पुढे गेला. जसजशी परिक्षा वरची, तसतसा परिक्षकांचा 'दुष्टपणा' अधिक! आता अंधश्रद्धा: इथे कुठेही 'पोरे मारल्यामुळे दत्तगुरू दिसले' अशा प्रकारचा संदेश येत नाहीये. कशाला साप समजून भुई धोपटायाची! 'अंधश्रद्धा पसरतील' असा आरडाओरडा करणार्यांच्या 'भोळेपणा'बद्दल मला नेहमीच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटते! ;) एकंदरीत माणूस ( शिक्षित/अशिक्षित) हा इतका इरसाल प्राणी आहे, की खरोखरच असे कुणी कुणावर विश्वास ठेऊन कुणालाही मारेल असे वाटत नाही. माणूस हा अत्यंत स्वार्थी प्राणी आहे. स्वत:च्या 'सोयीची' जी तत्वे असतील, ती तो अंगीकारतो. जीव वाचावायचाय, लेकाराबाळाना खायला मिळेल, थोडा मान मिळेल, चला 'धर्म' बदला! अशी माणसाची वृत्ती असते. ( इथे 'धर्म' चा अर्थ 'कुठलीही तत्वप्रणाली' - कम्युनिझ्म सुद्धा- असा आहे.) शेवटी माणूस स्वत:ला सोयीचे असेल तेच 'आदर्श' म्हणून घेतो. या श्रद्धा-अंधश्रद्धा वादाला काहीही अर्थ नाही! जाता जाता, आपल्या स्वत:च्या 'स्टेटस च्या भूकेपायी' स्वत:च्याच मुलांवर (कधी कधी आत्महत्या करेपर्यंत) अभ्यासाचा ताण आणाणारे पालक/समाज अंधश्रद्ध नसतात, पण क्रूर नक्कीच असतात! सगळीच माणसे आपापल्या 'कपॅसिटी' प्रमाणे कधी न कधी कमी-जास्त क्रूरपणा करतच असतात. त्यामूळे ही गोष्ट ( दत्तकथा) बिभत्स जरी असली, तरी २ जागतिक महायुद्धे बघितलेल्या अत्ताच्या मानवसमाजाने 'बोम्बाबोम्ब' सुरु करण्याइतकी भयानक नक्कीच नाही.
  • Log in or register to post comments

छान प्रतिसाद, अनुमोदन. अजून

पुष्करिणी
Mon, 12/20/2010 - 15:58 नवीन
छान प्रतिसाद, अनुमोदन. अजून एक म्हणजे खेड्यातली आणि शालेय शिक्षण कमी झालेली लोकं मूर्ख असतात असा काहींचा प्रचंड गैरसमज असतो. माझ्या माहितीतली या कॅटेगिरीत (खेडूत आणि कमी शिक्षित ) येणारी सगळी लोकं साधी आहेत पण त्याचबरोबर अत्यंत प्रॅक्टीकल आणि चतुर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

सुरेख प्रतिसाद. अवलिया

यशोधरा
Mon, 12/20/2010 - 16:50 नवीन
सुरेख प्रतिसाद. अवलिया ह्यांचा लेखही खूप आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अतीशय उत्तम धागा आणी तितकाच

स्वानन्द
Mon, 12/20/2010 - 17:11 नवीन
अतीशय उत्तम धागा आणी तितकाच उत्तम प्रतीसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

माउ तुझा प्रतिसाद # १

शुचि
Mon, 12/20/2010 - 21:06 नवीन
माउ तुझा प्रतिसाद # १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

त्यांच्या 'बेसिक

Pain
Tue, 12/21/2010 - 07:08 नवीन
त्यांच्या 'बेसिक इन्स्टिन्क्ट' ला हात घातला. सरव्हायवल इन्स्टिन्क्ट! इतके बीभत्स दृश्य समोर उभे केले की खरोखरच त्यांच्या 'भक्तीभावाच्या दृढतेची' कसोटी लागेल. मुळात सगळेजण 'जप-तप' करायचे सोडून त्या गारुड्याच्या गारुडात अडकलेच कसे? आयुष्यात सर्वसंगपरित्याग करून देवभक्तीला लागणे सगळ्यांना जमतेच असे नाही ( आणि जमावे असेही नाही). जर या लोकांनी ते एकदा केले असेल, आणि जर देव भेटायच्या आत मेले, तर पुढच्या आयुष्यात ते जमेलच याची काहीच खात्री नाही. तेव्हा हे कसोटीच चुकीची आहे. अर्थात देव नेहेमीच बरोबर नसतो, त्यामुळे फारसे आश्चर्य वाटले नाही. आता अंधश्रद्धा: इथे कुठेही 'पोरे मारल्यामुळे दत्तगुरू दिसले' अशा प्रकारचा संदेश येत नाहीये. कशाला साप समजून भुई धोपटायाची! 'अंधश्रद्धा पसरतील' असा आरडाओरडा करणार्यांच्या 'भोळेपणा'बद्दल मला नेहमीच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटते! एकंदरीत माणूस ( शिक्षित/अशिक्षित) हा इतका इरसाल प्राणी आहे, की खरोखरच असे कुणी कुणावर विश्वास ठेऊन कुणालाही मारेल असे वाटत नाही. तसे नाही. पण पुराणात असे बळी दिल्याचे उल्लेख आहेत असा हवाला देउन व्यवसायवृद्धी, अपत्यप्राप्ती या समस्येने पीडलेल्या लोकांना भोंदू लोक बळी देण्यास प्रवृत्त करू शकतात, केल्याची उदाहरणे आहेत. लेटेस्ट उदाहरण १ महिन्यापूर्वीचे आहे. शिकायचेच असेल तर इतर हजारो गोष्टी आहेत. अशा गोष्टी डीलीट करू शकत नसलो तरी निदान पसरवू तरी नये असे अनेकांना वाटते. माणूस हा अत्यंत स्वार्थी प्राणी आहे. स्वत:च्या 'सोयीची' जी तत्वे असतील, ती तो अंगीकारतो. कुठला प्राणी नाहीये ? आणि स्वतःच्या प्रगतीसाठी स्वतः कष्ट करण्यात कसला आलाय स्वार्थीपणा ? जीव वाचावायचाय, लेकाराबाळाना खायला मिळेल, थोडा मान मिळेल, चला 'धर्म' बदला! अशी माणसाची वृत्ती असते त्यात काहीही चूक नाही. स्वसंरक्षण, अपत्यांची काळजी या आदिम आणि योग्य अशा नैसर्गिक प्रेरणा आहेत. बर्‍याचदा गोष्टी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात. प्रत्येक ठिकाणी संघर्ष करत राहिले तर केव्हाच संपून जाउ. लाखो वर्षांपूर्वी आपले पूर्वज पर्वतकाय टायरॅनोसोरसच्या अंगावर धावून न जाता गुहेत लपून राहिले म्हणूनच आज मानवजात शिल्लक आहे. त्यामूळे ही गोष्ट ( दत्तकथा) बिभत्स जरी असली, तरी २ जागतिक महायुद्धे बघितलेल्या अत्ताच्या मानवसमाजाने 'बोम्बाबोम्ब' सुरु करण्याइतकी भयानक नक्कीच नाही. (स्वतःची) लहान मुले कापून चुलीत घातली ही दारू/ सिगरेट/ ड्रग्स प्रमाणे कालातीत, वादातीत वाईट गोष्ट आहे. तुम्हाला जर त्यात फारसे वावगे वाटत नसेल तर तो तुमचा आणि आसपासच्या मुलांचा प्रश्न आहे. इंटरनेटवर फक्त आक्षेप घेता येतो आणि लोकांनी तेच केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

परत एकदा....

कवितानागेश
Tue, 12/21/2010 - 13:16 नवीन
जर देव भेटायच्या आत मेले, तर पुढच्या आयुष्यात ते जमेलच याची काहीच खात्री नाही.>>> अग्गो बाय, कित्तीदा सांगू, ते स्वप्न असतंय ग! खरें नसतंय. ललू नको, उगी उगी! ;) अवांतरः मेल्यानन्तर पुढचे आयुष्य म्हणजे काय? तुम्ही पुनर्जन्म मानता की काय??? सगळ्या अंनिसकाकांनो, वाचवा वाचवा! ;) पुराणात असे बळी दिल्याचे उल्लेख आहेत असा हवाला देउन व्यवसायवृद्धी, अपत्यप्राप्ती या समस्येने पीडलेल्या लोकांना भोंदू लोक >> पुराणातल्या कथांचा इथे उल्लेख कशाला? आणि पुराणातल्या सर्व कथा रूपकात्मक आहेत हे कुणीही शहाणा माणूस सांगेल. तुम्हाला शब्दश: अर्थ घ्यायचा असेल तर नवीन स्वैपाक शिकानार्यांप्रमानेच गत होईल. ( ड्रेस द चिकन असे वाचल्यावर चिकनला फ्रॉक घालायचा,... वगरै) लेटेस्ट उदाहरण १ महिन्यापूर्वीचे आहे. शिकायचेच असेल तर इतर हजारो गोष्टी आहेत.>> तेच तर मी सांगतेय, माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी कशाचाही काहीही अर्थ लावू शकतो. पुराणे, समाजव्यवस्था, कायदा, ........इ. एकदा ठरवले की सगळ्याचे वाट्टेल ते अर्थ काढले जाऊ शकतात. वकील देखील कायद्यातून पळवाटा काढतात, तिथे अश्या रूपकात्मक गोष्टी तर काय, माकडाच्या हाती कोलितच! पण आपण 'माकड' व्हायचे की 'माणूस' हे मात्र त्या त्या माणसाची सद्सद्विवेकबुद्धी किती जागी आहे त्यावर ठरते. भावार्थ बघायचा की शब्दार्थ हे आता प्रत्येकानी आपले आपण ठरवा. लहान मुले कापून चुलीत घातली ही दारू/ सिगरेट/ ड्रग्स प्रमाणे कालातीत, वादातीत >>> पुन्हा तेच . तो 'भास' होता. या भयानक गोष्टीचे 'समर्थन' कुणीही कुठेही केले नाहीये. आणि ती भितीदायकच गोष्ट होती. म्हणून तर तपस्वी देखिल पळाले. अवांतर: 'चिकन' ला गुलाबी फ्रॉक शोभून दिसेल नै?! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

भारी

यशोधरा
Tue, 12/21/2010 - 13:19 नवीन
भारी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

शिबीराचा बराच फायदा झालेला

शिल्पा ब
Tue, 12/21/2010 - 14:04 नवीन
शिबीराचा बराच फायदा झालेला दिसतोय ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

लवकरच म्हणजे नवीन वर्षाच्या

इंटरनेटस्नेही
Wed, 12/22/2010 - 02:17 नवीन
लवकरच म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हेच शिबीर करायला आम्ही देखील रवाना होणार आहोत. तेव्हा आमचा इंटरनेटवरील स्नेह जरा कमी होईल अशी आशा बाळगतो! ;) (आणि श्री पेन यांच्या सारख्या एकाच गोष्टीवर दीर्घकाळ अडुन बसण्यार्‍या मंडळीशी देखील प्रतिसादरूपी युद्ध खेळण्याची ताकद येईल अशी देखील आशा बाळगतो!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

लै भारी. ह.ह.पु.वा.

चिंतामणी
Tue, 12/21/2010 - 23:09 नवीन
तुम्हाला शब्दश: अर्थ घ्यायचा असेल तर नवीन स्वैपाक शिकानार्यांप्रमानेच गत होईल. ( ड्रेस द चिकन असे वाचल्यावर चिकनला फ्रॉक घालायचा,... वगरै) च्या मारी. कसे सुचले हे? लै भारी. ह.ह.पु.वा. ह्यामुळे तरी कुठेही बालके, बोकड, हल्या कापायच्या गोष्टी चालू आहेत त्या कमी होतील अशी भाबडी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

अवांतरः मेल्यानन्तर पुढचे

Pain
Wed, 12/22/2010 - 08:47 नवीन
अवांतरः मेल्यानन्तर पुढचे आयुष्य म्हणजे काय? तुम्ही पुनर्जन्म मानता की काय??? सगळ्या अंनिसकाकांनो, वाचवा वाचवा! मी काय मानतो किंवा काय मानत नाही याचा इथे काहीच संबंध नाही. विषय त्या तप करणार्‍या लोकांचा आणि श्रीदत्ताचा आहे. ज्याअर्थी ते देवदर्शनासाठी (धर्म/ पुराणातल्या प्रमाणे) तप करत होते, त्याअर्थी त्यांच्या त्यातील सर्व किंवा किमान महत्त्वाच्या गोष्टींवर विश्वास असणारच. तो होता म्हणून तर ते तपाला बसले. अग्गो बाय, कित्तीदा सांगू, ते स्वप्न असतंय ग! खरें नसतंय. गोष्टीत ते स्वप्न होते असे कुठेही म्हटलेले नाही. दत्तगुरु रुप घेउन आले असे लिहिलेले आहे. तुम्हाला गोष्टीचे सांगितले गेलेले तात्पर्य वाचून तो आभास/ माया होती हे कळत असले तरी त्या परिस्थितीत असणार्‍याला ते खरेच वाटणार (सापेक्षतावाद), त्याच्यासाठी ते खरेच असेल. (देवाने निर्माण केलेली सृष्टी खरी वाटते तर त्याचीच बनवलेली माया का वाटणार नाही?) पुराणातल्या कथांचा इथे उल्लेख कशाला? आणि पुराणातल्या सर्व कथा रूपकात्मक आहेत हे कुणीही शहाणा माणूस सांगेल. तुम्हाला शब्दश: अर्थ घ्यायचा असेल तर नवीन स्वैपाक शिकानार्यांप्रमानेच गत होईल. ( ड्रेस द चिकन असे वाचल्यावर चिकनला फ्रॉक घालायचा,... वगरै) लेटेस्ट उदाहरण १ महिन्यापूर्वीचे आहे. शिकायचेच असेल तर इतर हजारो गोष्टी आहेत.>> तेच तर मी सांगतेय, माणूस स्वत:च्या स्वार्थासाठी कशाचाही काहीही अर्थ लावू शकतो. पुराणे, समाजव्यवस्था, कायदा, ........इ. एकदा ठरवले की सगळ्याचे वाट्टेल ते अर्थ काढले जाऊ शकतात. वकील देखील कायद्यातून पळवाटा काढतात, तिथे अश्या रूपकात्मक गोष्टी तर काय, माकडाच्या हाती कोलितच! पण आपण 'माकड' व्हायचे की 'माणूस' हे मात्र त्या त्या माणसाची सद्सद्विवेकबुद्धी किती जागी आहे त्यावर ठरते. भावार्थ बघायचा की शब्दार्थ हे आता प्रत्येकानी आपले आपण ठरवा. मला किंवा कुठल्याच मिपा वाचकाला यात शब्दश: अर्थ काढायचा नाही. प्रश्न भोळ्या भाबड्या जनतेचा आहे जी या आणि अशा कुठल्याही भूलथापांवर विश्वास ठेवून फसते. अनेक लोक असे फसलेले आहेत आणि मुलांचे बळीही गेलेले आहेत. वृत्तपत्र वाचत असाल तर माहिती असेल. ते थांबवण्यासाठीच अं.नि.स. चा जन्म झालेला आहे. आक्षेप घेणार्‍यांचे असे म्हणणे आहे की जर याचा प्रसारच थांबवला तर पुढे होउ शकणारा गैरवापर टळेल. अशी वर्णने वाचवतही नाहीत. तुम्हाला माझे प्रश्न किंवा म्हणणेच समजलेले नाहीये. असो. ज्यांना ते जमू शकेल अशी मंडळी आहेत, त्यांची वाट बघेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

+१

शिल्पा ब
Wed, 12/22/2010 - 08:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

++

गवि
Wed, 12/22/2010 - 09:42 नवीन
++
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

पास

कवितानागेश
Wed, 12/22/2010 - 21:50 नवीन
तुम्हाला माझे प्रश्न किंवा म्हणणेच समजलेले नाहीये. असो. ज्यांना ते जमू शकेल अशी मंडळी आहेत, त्यांची वाट बघेन.>> कुणाचीही वाट बघताना 'भाव द्रुढ ठेवा' ही गोष्ट विसरु नका! ;) तरीसुद्धा पुन्हा एकदा, लोक भोळे नसतात!! शिवाय आभास, माया, सत्य, सत, असत, भास स्वप्न वगरै गोष्टींविषयी इथे बरेच गोंधळ दिसतायत. (स्वगतः आणि त्याबद्दलची 'शिक्रेट्स' मी इथे कशाला फोडू? ;)) असो, अनुभवाशिवाय श्रद्धा नाही हे मी स्वानुभवानी सांगू शकते, त्यामूळे मीसुद्धा इथे कळफल़क बडवत माझा वेळ वाया घालवत नाही. दुसरे बकरे शोधत असल्याबद्दल धन्यवाद! माझा पास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

<<<शिवाय आभास, माया, सत्य,

शिल्पा ब
गुरुवार, 12/23/2010 - 02:11 नवीन
<<<शिवाय आभास, माया, सत्य, सत, असत, भास स्वप्न वगरै गोष्टींविषयी इथे बरेच गोंधळ दिसतायत. (स्वगतः आणि त्याबद्दलची 'शिक्रेट्स' मी इथे कशाला फोडू? Wink) अशा गोष्टी शिक्रेट ठेवायच्या असतात हे माहीती नसल्याने घोळ झाला असेल...ते शिक्रेट माहीती करुन घ्यायला कोणाच्या शिबीराला जावे लागेल? का ते पण शिक्रेटच ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

तुम्ही एकाही प्रश्नाचे सरळ

Pain
गुरुवार, 12/23/2010 - 06:45 नवीन
तुम्ही एकाही प्रश्नाचे सरळ उत्तर दिलेले नाही. फक्त फाटे फोडणे आणि विषयाशी संबंध नसलेल्या गोष्टी आणून त्यांची सरमिसळ करणे (सायकोबॅबल) एवढेच करता येते असे दिसते. प्रत्य्क्षात घडलेल्या गोष्टी (गेलेले बळी, अंनिसचे कार्य वगैरे) नाकारून श्रद्धेबद्दल बोलणे अयोग्य. सगळ्यांना सगळे येत नाही. स्वत:ला एखादी गोष्ट येत नसेल तर तसे कबूल करण्याचा प्रांजळपणा दाखवा आणि अपरिचित लोकांशी बोलाताना किमान शिष्टाचार पाळायला शिका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

लिमाउजेट

आमोद शिंदे
Wed, 12/22/2010 - 00:08 नवीन
सावरकरांच्या धाग्यावर हिरिरिने लिहिणार्‍या तुम्हीच ना त्या? वा! सावरकरांचे विचार अगदी सार्थकी ठरले म्हणायचे!! चालू द्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

कमाल आहे!

कवितानागेश
Wed, 12/22/2010 - 23:26 नवीन
हे बघा मास्तर, इतरांची 'ऑन सावरकर' पुस्तके वचून सावरकर 'कळले' असा ग्गोगोड गैरसमज करुन घेण्यापेक्षा सरळ 'फ्रॉम सावरकर' वाचून चिन्तन करा. भले होइल.( अर्थात आमचे सगळ्यांचे! तुमचे मला माहित नाही.) या कवितेपासून सुरुवात करा. अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला मारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।। अट्टाहास करित जईं धर्मधारणीं मृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणीं अग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितो भिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतो खुळा रिपू । तया स्वयें मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।। लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मला नम्र दाससम चाटिल तो पदांगुला कल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरी हटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावली आण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तें यंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकते हलाहल । त्रिनेत्र तो मी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।। अवांतरः जरा बीभत्सच वाटते नै ही कविता!! आता रडतील की काय इथली भित्री, भोळी पोरे?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

वा! सावरकरांची ही कविता आणि

आमोद शिंदे
Wed, 12/22/2010 - 23:32 नवीन
वा! सावरकरांची ही कविता आणि इथली भाकड कथा तुम्हाला एकाच पंक्तित बसवासे वाटलेले पाहून धन्य झालो. पोरे कापून शिजवायची कथा वाचून सावरकर काय म्हणाले असते हो? भाव दृढ करा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

स्वा. सावरकरांची "सांत्वन" ही कवीता माहीत आहे का?

चिंतामणी
गुरुवार, 12/23/2010 - 00:31 नवीन
माहीत असण्याची शक्यता कमी वाटते म्हणून त्यातील काही ओळी येथे देतो. धन्य अपुला वंश/सुनिश्चये इश्वरी अंश की रामसेवा-पुण्य-लेश/ आपुल्या भाग्यी लाभला (उदा. म्हणून एव्हडे पुरे असावे) आपण स्वा.सावरकरांचे नाव वापरुन कोणाचिही खिल्ली उडवताना त्यांचे विचार आणि लेखनाचा पुन्हः अभ्यास करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

काय हो अमोदमामु, उगाच

शिल्पा ब
गुरुवार, 12/23/2010 - 02:15 नवीन
काय हो अमोदमामु, उगाच सावरकरांचे नाव कारण नसताना का घेताय? सावरकर भल्याभल्यांना अजूनही समजले नाहीत तर सामन्यांची काय कथा? जरा विचार करून लिहित चला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आमोद शिंदे

@ लीमाउजेट : फार खोलवर्चे ४

डावखुरा
Tue, 12/21/2010 - 11:00 नवीन
@ लीमाउजेट : फार खोलवर्चे ४ शब्द.. (तुम्हाला माउली ही पदवी द्यावी का विचार झाल्यावर मिपा मंडळाकडे शिफारस करीन म्हणतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

तुम्हाला माउली ही पदवी द्यावी

टारझन
Tue, 12/21/2010 - 12:18 नवीन
तुम्हाला माउली ही पदवी द्यावी का विचार झाल्यावर मिपा मंडळाकडे शिफारस करीन म्हणतो
एका संपादिकेचा ह्याला आक्षेप असु शकतो =)) उगाच विडंबण वाटेल म्हणुन :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

@टार्झण : कोण बॉ???

डावखुरा
Tue, 12/21/2010 - 23:43 नवीन
@टार्झण : कोण बॉ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

_____/\______

मूकवाचक
गुरुवार, 12/23/2010 - 03:14 नवीन
_____/\______
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

या प्रकारच्या कथा अशा

गवि
Mon, 12/20/2010 - 14:53 नवीन
या प्रकारच्या कथा अशा निरुपणासहितच सांगितल्या जाव्यात. कारण सर्वसामान्यांना आगोदरच ते गर्भितार्थ कळतील न कळतील.. आणि जे अर्थ घेतले जातील ते वेगळेच / चुकीचे समजले, घेतले जाण्याची शक्यता मूळ गूढार्थ समजण्यापेक्षा अधिक असेल. एखादे महाराज नेहमी थोबाडीतच मारतात, किंवा मिठी मारतात, हाच त्यांचा प्रसाद असतो (पर्टिक्युलर महाराजांची नावे माहीत नाहीत याबद्दल क्षमस्व..उदाहरण म्हणून गृहित धरावे..) पण तो प्रसाद आहे हे काही भक्तांना माहीत असते तर बर्‍याच नव्या सामान्य अनोळखी लोकांना ते माहीत नसू शकते. त्यामुळे आपल्यातला वाईटपणा, खलत्व घालवणे अशा प्रतीकात्मक उद्देशाने जरी महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी कोणा नागरिकाच्या थोबाडीत मारली तर तो त्याला "थोबाडीत"च समजेल, तो "प्रसाद" आहे /ते महाराज आहेत हे कोणीतरी तिथल्यातिथे उलट हात उठायच्या आत त्याला सांगावे लागेल कारण बोलूनचालून तो सामान्य आहे. समर्थचरित्र पूर्वीच वाचले आणि त्यात गळू चोखण्यापासून कफदाणी पोटात थारा देउन मोकळी करण्यापर्यंत शिष्यत्वाच्या परीक्षेच्या कथा / उल्लेख आहेत. (अशा अनेक आवृत्त्या असल्यास आणि त्यातल्या काही जेन्युईन नसल्यास माहिती नाही पण कॉमनली वाचली जाणारी एक आवृत्ति वाचली होती.) कफ, गळू यातही प्रतीकात्मक अर्थ असतीलही पण ते तिथल्या तिथे समजावून सांगणारी आवृत्ती असावी. अन्यथा एका चांगल्या विचाराबद्दल अकारण किळस अज्ञानी वाचकांना (भक्त नव्हेत) वाटू शकते. वाद उत्पन्न करायचा म्हणून नाही तर फक्त वरील पहिले वाक्य अधिक स्पष्ट व्हावे म्हणून उदाहरण दिले. उलट लेख आवडला आहे आणि हीच काही समजावून सांगण्याची योग्य पद्धत आहे हे आधीच म्हटले आहे.
  • Log in or register to post comments

छानच हो नाना!!! अवांतर:

बिपिन कार्यकर्ते
Mon, 12/20/2010 - 15:09 नवीन
छानच हो नाना!!! अवांतर: भगवद्गीता वाचून झाली की बोला आमच्याशी! ;)
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर

पुष्करिणी
Mon, 12/20/2010 - 15:50 नवीन
अतिशय सुंदर निरूपण. नानानहाराज की जय _____/\______
  • Log in or register to post comments

दत्तात्रय हरे

डावखुरा
Mon, 12/20/2010 - 15:53 नवीन
दत्तात्रय हरे कृष्णा..उन्मत्तानंद दायाकाll दिगंबरा मुनीबाला..पिशच्चा ज्ञानसागराll Image removed. आपण अवलियाच आहात.. मन:पुर्वक धन्यवाद..
  • Log in or register to post comments

वा नाना! सुरेखच हो, प्रसन्न

मेघवेडा
Mon, 12/20/2010 - 15:54 नवीन
वा नाना! सुरेखच हो, प्रसन्न वाटलं.
  • Log in or register to post comments

सुंदर निरुपण

कवितानागेश
Mon, 12/20/2010 - 17:07 नवीन
अतिशय सुंदर निरुपण केले आहे. अवलिया, तुम्ही 'रेग्युलर' किर्तनकार/ प्रवचनकार आहात का हो? इतके सगळे शब्द सुचतात कसे?
  • Log in or register to post comments

_____/\______

मूकवाचक
Mon, 12/20/2010 - 17:18 नवीन
_____/\______
  • Log in or register to post comments

नाना एकदम मस्त................

वेताळ
Mon, 12/20/2010 - 17:30 नवीन
आवडल हो तुमचे निरुपम कितीची सुपारी घेता तुम्ही?
  • Log in or register to post comments

मनुष्य योनीत याला निरुपण असे

शिल्पा ब
Tue, 12/21/2010 - 08:47 नवीन
मनुष्य योनीत याला निरुपण असे म्हणतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

:)

आत्मशून्य
Mon, 12/20/2010 - 20:55 नवीन
  • Log in or register to post comments

धन्यवाद

आनंदयात्री
Mon, 12/20/2010 - 21:29 नवीन
धन्यवाद रे नाना.
  • Log in or register to post comments

सुरेख! निरूपण फार सुरेख केले

प्राजु
Mon, 12/20/2010 - 21:39 नवीन
सुरेख! निरूपण फार सुरेख केले आहे. लिमाउजेट, चा प्रतिसादही अतिशय सुंदर आहे. मात्र ते निर्गुण निराकार माझ्यासमोर साजिरे रुप घेउन आले आणि आता मला त्याचीच गोडी लागली आहे. माझे मन आता जागृत्,स्वप्न, आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांच्या पलिकडे गेले आहे. या अवस्थेत माझे मन उन्मन झाले आहे. यात आता माझे तुझे मी तू हा विषय विषयी हा भेदच उरला नाही. जे जे चेतन असो वा अचेतन, जीव असो वा जड ते सर्व मीच आहे हा भाव आता माझ्या ठि़काणी एकवटला आहे. आणि माझ्या मनात केवळ दत्त असुन त्याचेच निरंतर ध्यान करत आहे. हे वाचताना, संत ज्ञानेश्वरांच्या कानडा ओ विठ्ठलू, कर्नाटकू या गाण्यातील भाव आठवला. :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा