बंडूच्या स्वप्नातच येते स्वर्गामधुनी छान परी
झोपेमधला हीरो बंडू मौजमजा धम्माल करी ।१।
खात ‘ बुढ्ढीका बाल ’ शंभर बंडू होतो लालीलाल
चोखत लॉलीपॉप शंभर बंडू करतो पहा कमाल ।२।
ट्वेंटी-ट्वेंटित बंडू ऐटित ठोकी शतके चार
बळी दहाही घेऊन करतो शत्रूला बेजार ।३।
खुशालचेंडू मिळवी बंडू गुण शंभरपैकी शंभर
निकालात ना कधीच सोडी तो अपुला पहिला नंबर ।४।
ऑलिंपीक वा एशियाड ती असो कोणतीही स्पर्धा
प्रतिस्पर्ध्यांची उडवी बंडू क्षणात भलती त्रेधा ।५।
बंडू वरचढ ठरतो नेहमी - खेळ असो मारामारी
कुस्तीमध्ये डाव बंडुचा धोबीपछाडच भारी ।६।
मारी शाळेला तो बुट्टी स्वप्नामधला बंडू
देतो अभ्यासा तो सुट्टी खेळत विट्टीदांडू ।७।
- - - गजर घड्याळाचा ऐकुन करि बंडूला परी टाटा
लवकर निजून उशिरा उठता बंडू खाई धपाटा ।८।
प्रतिक्रिया
19 Dec 2010 - 12:16 am | राजेश घासकडवी
बालगीत हा प्रकार कोणी हाताळताना दिसत नाही. अशा वेगळ्या प्रकारची कविता लिहिल्याबद्दल धन्यवाद. वेगवेगळ्या कडव्यांमध्ये बंडूला वेगवेगळ्या गमती दिसतात.
प्रत्येक कडव्यात गेयता आली असली तरी प्रत्येक कडवं वेगवेगळ्या वृत्तात झालेलं आहे. तेवढं सुधारता येतं का पहा.