हराच्या हाराच्या, किंवा कोडी हे गंमत म्हणून ठीक. पण त्यांची जागा ताटातील चटणी-कोशींबरीसारखीच. आज जरा
एका अशा विषयाकडे वळू जो शाळेत आपण शिकलो व आज जवळजवळ विसरलोच आहोत." काव्यालंकार". उपमा, उत्प्रेक्षा, यमक इत्यादि. जेंव्हा यांची नावेही माहीत नव्हती तेंव्हाही या अलंकारांमुळे आपल्या नकळत आपल्या मनात ते कवितेची गोडी निर्माण करत होते. कविता पाठ होत होत्या, त्यांच्यामुळे. पण त्यावेळी त्यांची किंमत होती परिक्षेतील ५-७ गुण. आज आपण त्यांचा आस्वाद जास्त जाणकारीने घ्यावयाचा प्रयत्न करणार आहोत.
उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अनुप्रास, यमक, व्यतिरेक, इत्यादी ५०-६० अलंकार मम्मटाच्या काव्यप्रकाशात दिले आहेत. त्यातही उपमेचे १०-१२ उपभेद, रुपकाचे ५-६ असे वाढवत गेले म्हणजे[संख्येने]गाडगीळांच्या दुकानातल्या दागिन्यांच्या पेट्यांसारखे जवळ जवळ अगणीत होतात. आता भरतमुनी, मम्मट,भामह, दंडी यांची नावे येतील, पण ती केवळ दबदबा निर्माण करण्याकरिता. मग प्रतिसादात हल्ला करावयाच्या आधी लोक जरा विचार करतात. आणि माणूस विचार करू लागला म्हणजे तो हल्ला वगैरे काही करत नाही. तरीही बुजुर्ग चुका शोधतीलच.पण " आपण मार्गदर्शन करावे " असे पहिल्यांदीच म्हटले की झाले. तर त्यांची अनुज्ञा घेऊनच सुरवात करू या.
काव्यात सर्वात महत्व शब्द व अर्थ यांनाच. नंतर इतर . संस्कृतात एक छान रुपक आहे.काव्य ही एक लावण्यवती स्त्री अशी कल्पना करून,शब्दार्थ तीचे शरीर, अलंकार हे तीला शोभा देणारे दागिने, गुण स्वभावाचे विशेष, रीती ही ठेवण, रस हा तीचा आत्मा असे सुचवले आहे. अर्थात लक्षार्थाने. हे विसरून उपयोग नाही.जशी सुन्दर स्त्री अलंकारांशिवायही सुंदरच असते तसे चांगले काव्यही अलंकारांशिवाय उत्तम असू शकते.[ मग त्याला स्वभावोक्ती म्हणून नावाजतात.] तर हे लक्षात ठेवूनच पुढील विवेचन.
सुरवात अगदी साध्या उदाहरणाने करू.एखाद्या स्त्रीचे वर्णन करतांना तीचे मुख सुंदर आहे असे न म्हणता ते चंद्रासारखे आहे असे म्हटले की वाचकाला जास्त आनंद होतो. का ? येथे वाचक काव्यात गुंततो. कसा? तर त्याने चंद्र पाहिलेला असतो, त्याला तो प्रिय असतो, त्या आवडलेल्या " चंद्रासारखे मुख " त्याला " सुंदर मुखा "पेक्षा जास्त आनंद देते. बस. सर्व अलंकारांचा उद्देश हाच.पद्धती निरनिराळ्या. नावे निरनिराळी. हेच वापरून वापरून चोथा झालेले उदाहरण परत बघू. येथे दोन गोष्टी आहेत. मुख व चंद्र. येथे मुख हे मुख्य. याचे वर्णन करणे हाच उद्देश. म्हणून त्याला प्रस्तुत म्हणावयाचे. या प्रस्तुताचे वर्णन करतांना चंद्र आला. म्हणून तो अप्रस्तुत.यानाच अनुक्रमे उपमेय व उपमान असेही म्हणतात.
शब्दालंकार व अर्थालंकार हे दोन भेद.शब्दांवरूनच त्यांचे अर्थ लक्षात येतात.आपण दोहोंचीही उदाहरणे बघणार आहोत. आता मिपाकार सहनशील आहेत, कबूल. पण त्यांचा आणि तुमचाही अंत पहावयाचा नाही म्हणून सगळे अलंकार सांगता येणार नाहित . [ किती जणांनी हुश्श्य केले ? ] थोडे बघू. आवडले तर इतर तज्ज्ञही मदतीला धावतीलच. हां, आणि एक. उदाहरणॆ तुम्हाला आवडतील याची खात्री देतो. शिवाय माझा आग्रह आहे की आपण जाणकार रसिकांनी त्यात भर घालावी. अधिकस्य अधिकं फ़लं !
शालेय पद्धतीने सुरवात करावयाची झाली तर प्रथम उपमा. पण आपण थोडेच शाळेत आहोत ? सुरवात अपह्नुतीने करतो. प्रस्तुताचा निषेध करून त्यावर अप्रस्तुताचा आरोप केला असतो तेव्हा हा अर्थालंकार होतो. थोडक्यात लपविणे, चकवणे.जेव्हा प्रस्तुत-अप्रस्तुत या दोघांना लागू पडणारे श्लिष्ट [द्य्वर्थी] शब्द वापरून ऐकणाऱ्याला गोंधळात पाडले जाते तेव्हा होते छेकापह्नुती.[छेक-चतुर]
येथे एक जण एक विधान करतो. ऐकणारा सरळ अर्थ काढून " असे का " विचारतो. मग पहिला " छे,छे,तसे नाही,असे " म्हणतो.
अंबरगत१ परि पयोधराते२ रगडुनि पळतो दुरी,
काय हा धीट म्हणावा तरी !
तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हया हरी,
नव्हे ग मारुत मेघोदरी.
सुवर्ण३ पाहुनि तनुवरी वंचक रात्रीं शिरतो घरीं,
टाकतो हस्त तसा तनुवरीं !
तो नंदाचा मुल काय गे सांग कन्हया हरी,
नव्हे हा दस्यु४ समज अंतरीं.
सुंदर रति५ जोगता मिळाला पति हे सुभगा खरी,
दुजीला असा मिळेल काय तरी !
तो नंदाचा मुल काय गे सांग कन्हया हरी,
नव्हे ग रतिला मन्मथ६ वरी .
राधेला सखीला सांगावयाचे आहे, आणि त्याच वेळी नाकारवयाचेही आहे. कन्हयाचीही तीच गत.
कंठी लपेटुनी सदा असावी सुभगा७ गुणशालिनी८
वाटते पुष्पवती९ शोभिनी !
वृषभानूची सुता काय ती राधा लिकुचस्तनी१० ?
नव्हे रे माळ आठवली मनीं.
अधरचुंबिनी वंशसंभवा११ लालसमधुरध्वनी,
असावी मुखासि मुख लावुनी !
वृषभानुची सुता काय ती राधा लिकुचस्तनी ?
नव्हे रे मुरली जगमोहिनी.
नखक्षताने मृदुक्वणन्ती१२ नवनवगुणरागिणी१३
धरावी वाटे कवटाळुनि !
वृषभानुची सुता काय ती राधा लिकुचस्तनी ?
नव्हे रे वीणा मृदुभाषिणी.
--राम जोशी
१. वस्त्र, आकाश, २.स्तन, ढग; ३.चांगला रंग, सोने; ४.चोर; ५. शृंगार क्रीडा, मदनाचे स्त्री; ६. मदन ; ७. प्रिया, सुंदर; ८. गुणी, दोरीत ओवलेली; ९. ॠतुमती, फ़ुले असलेली १०. विलायती फ़णस; ११. चांगल्या वंशात जन्मलेली,वेळुपासून बनविलेली; १२. नाजुक, गोड आवाज करणारी; १३. नवीन नवीन प्रेमाचे प्रकार दाखविणारी,नवीन नवीन राग गाणारी.
(हे सिंचे १,२ आकडे ओळीच्या वर कसे टाकावयाचे हो ?)
परत एकदा नम्र विनंती. हे चार-पाच लेख मी लिहत असलो तरी ही सुरवात आहे. आपणही आपल्याला माहीत असलेल्या या अलंकारातील उदाहरणांची भर घालावी. आता दादा कोंडक्यांची गाणी द्यावयाच्या आधी लक्षात ठेवा. केवळ द्व्यर्थी शब्द वापरले म्हणजे हा अलंकार होत नाही. वर दिलेली व्याख्या विसरू नका.
शरद
प्रतिक्रिया
17 Dec 2010 - 8:28 am | नगरीनिरंजन
_/\_. _/\_._/\_
त्रिवार नमस्कार रामजोशींना आणि तुम्हालाही.
17 Dec 2010 - 8:31 am | यकु
रामजोशींच्या ओरिगिनल रचनांचा खजिनाच दिसतोय तुमच्याकडे. :)
येऊ द्या ना असाच बाहेर!!
हिंदीमधील वाक्यानुप्राश, भावानुप्राश प्रकार छेकापन्हुती सारखेच आहेत काय?
प्राशचा रजनीश/ओशोंच्या व्याख्यानातील एक जोक आठवतो:
एका वैद्याच्या घरी सकाळीसकाळी त्याचा मुलगा व्याकरण पाठ करीत बसलेला असतो. वाक्यानुप्राश, भावानुप्राश वगैरे वगैरे. वैद्य त्याला म्हणतो -
"अरे गधड्या, च्यवनप्राश लक्षात ठेव, च्यवनप्राश! हे काय वाक्यानुप्राश, भावानुप्राश लावलंय?"
स्वयंपाकघरातून त्याची बायको ओरडते -
"तुम्ही गप्प बसा हो.. सारखं मेलं च्यवनप्राश, च्यवनप्राश... साधं आजारीसुध्दा पडता येत नाही...लगेच च्यवनप्राश सुचवतात..!!!"
18 Dec 2010 - 9:36 am | पैसा
विसर पडत चाललेल्या रचना देताय. आणखी येऊ द्या.
1 Feb 2013 - 2:08 am | बॅटमॅन
छेकापन्हुती वर काढतोय ;)
3 Feb 2013 - 6:46 pm | चैतन्य दीक्षित
हा धागा वर काढल्याबद्दल.
मला संस्कृतातली उदाहरणे असतील असे वाटले होते.. मराठीतले उदाहरण प्रथमच वाचले.
अनेक धन्यवाद ह्या लेखाबद्दल.
येऊ द्या बाकीचेही.
3 Feb 2013 - 6:49 pm | बॅटमॅन
दॅट रिमाईंड्स मी, संस्कृतातली छेकापन्हुतीची उदाहरणे कुठे मिळतील?
3 Feb 2013 - 7:16 pm | चैतन्य दीक्षित
काव्यप्रकाशात आहेत ना.
ऑनलाईन कुठे मिळतील ते शोधून सांगतो. मी कोणे काळी शिकलो होतो संस्कृतातून.
उपमा अलंकाराचं लक्षण आठवतंय फक्त आता- उपमा यत्र सादृश्यं उपमानोपमेययो: | :)
छेकापह्नुतीचं लक्षण जाम डोक्यात येईना. पुढचे लेख वाचून जरा उजळणी होईल अशी आशा आहे.
3 Feb 2013 - 7:44 pm | बॅटमॅन
धन्यवाद! तेवढ्यासाठी आता काव्यप्रकाश्पाहणे आले. :)
3 Feb 2013 - 9:56 pm | नितिन थत्ते
उच्च...
वाचायचा राहून गेलेला धागा वर काढल्याबद्दल बॅटमॅनचे आभार
4 Feb 2013 - 3:28 pm | तर्री
+१
वाचायचा राहून गेलेला धागा वर काढल्याबद्दल बॅटमॅनचे आभार