कवितेचं झाड लावलेय त्याने
अंगणात पारिजातकाचे झाड आहेना.. ?
त्याच्याच बाजूला...!
पारिजातकाचे झाड चांगलेच डवरलेय
सकाळी सकाळी फुलांचा सडा घणघोर पडतो
ओंजळ ओंजळ भरल्या तरी संपतच नाही
त्याने कवितेचं झाड लावलेय अगदी शेजारीच
कदाचित त्याच्या शब्दांना पण येईल सुगंध
आणि कोणीतरी जाईल वेडावून
तो वाट बघतोय कोणीतरी
दाद देईल कवितेला
नि घेईल खोल श्वास
छाती घेईल गच्च भरून ....
त्याच्या अंगणातील पारिजातकाचे झाड
आणि एक आजोबा सकाळी सकाळी
कुंपणाच्या बाहेर सांडलेली फुले
ओंजळीत गोळा करता करता हलकेच म्हणाला हा
"आजोबा !!"
या अंगणात या
नि खुशाल फुले गोळा करा
आजोबांचे डोळे आले आनंदाने भरून
म्हणाले ,बाळा एवढी माणुसकी ?
फुलांना हात लावल्यास काटे टोचतील
अशा पाट्या पाहिल्यात मी पुणेरी
आता तुझ्या फुलांचा वास जाईल रानभर
नि पाखरे येऊन बसतील फांदीवर
आजोबा तेवढेच हवेय मला
त्या झाडाला खेटून बसलेय माझे कवितेचे झाड
तुम्हाला जर दिसले तर खुशाल गप्पा मारा
संवाद साधता आला तर खुशाल रेंगाळून जा .....
तो वाट बघतोय कोणीतरी
दाद देईल कवितेला नि घेईल खोल श्वास
छाती घेईल गच्च भरून .....
फुलांचा वास पसरतोय सगळीकडे सर्वत्र
कधी जाईल त्याच्या शब्दाचा सुवास
तो वाट बघतोय
तो मग्न आत्ममग्न ....कासावीस ...!!!!
प्रतिक्रिया
14 Dec 2010 - 7:46 pm | गणेशा
कविता आवडली ..
माझ्यावरतीच आहे असे वाटले ..
कारण : --
अवांतर : माझ्या नविन घराचे नाव " पारिजात " ठेवले आहे, आणि त्याच्या पुढे पारिजात या महिण्यात लावत आहे ..
धन्यवाद ..
तुम्ही पण या खुशाल फुले गोळा करायला मग ..
सोबत आणलेल्या आपल्या शब्दांचे दान
तेथे बाजुलाच असलेल्या कवितेच्या झाडाला द्या ..
कदाचीत उद्या त्या झाडाला जी शब्दफुले असतील
त्यात तुमच्या आठवणींचाच सुगंध दरवळत असेन ..................
14 Dec 2010 - 8:00 pm | संजयशिवाजीरावगडगे
अप्रतिम कविता !! व्वा आवडली ..
15 Dec 2010 - 2:09 pm | प्रकाश१११
आभार.!!