मला एक वाईट खोड आहे.
बसमध्ये बसलेली अनेक माणसं विंडो सीट मिळाली, की कानाला ईयरफोन लावतात, आणि मस्तपैकी डुलकी काढतात.
मी मात्र, खिडकी मिळाली की रस्त्यावरचा कोपरान कोपरा उगीचच न्याहाळत बसतो... आणि, कधीच नवीन काहीच पाहायला मिळत नाही.
मुंबईच्या नेहेमीच्या रस्त्यावर रोज नवीन काय दिसणार म्हणा...
तेच, फेरीवाल्यांनी पॅक केलेले फूटपाथ, एखाद्या मोकळ्या जागेत सुस्त पडलेलं एखादं गलेलठ्ठ कुत्रं, भरभरून वाहाणारी कचरा कुंडी, उघडीवाघडी पोरं, बाजूनं चालणार्या प्रत्येकाचं पुढे पडणारं प्रत्येक पाऊल न्याहाळणारा मोची, कळकट, लक्तरलेल्या कपड्यातला, अस्ताव्यस्त वाढलेल्या केसांचा, भयाण, शून्य नजरेनं आसपासच्या गर्दीसमोर आशाळभूतपणे हात पसरणारा एखादा भिकारी...
कुठेतरी, रस्त्याकडेच्या फूटपाथवर दोन झाडांना बांधून केलेला जुनाट साडीचा पाळणा, आणि त्याच्या पातळ, पारदर्शकपणातून दिसणारं, आपल्याशीच खेळणारं, हातपाय चोखत जगाच्या अस्तित्वाचीही जाण नसणारं एखादं तान्हं... त्याच्या बाजूला राखणदारासारखं पहारा देणारं भटकं कुत्र...
एखाद्या आडोशाला अंगाभोवती फाटकीतुटकी कापडं गुंडाळून सिगारेटच्या चांदीवरची पावडर हुंगणारं गर्दुल्यांचं टोळकं, नाहीतर, भर उन्हात, तर्र होऊन वाकडातिकडा पडलेला कुणीतरी दारुडा... त्याच्या शेजारी, संधीची वाट पाहात त्याच्या 'खिशा'वर नजर खिळवून बसलेला कुणीतरी गर्दुल्या, एखाद्या कोपर्यात, पान खाऊन रंगवलेल्या ओठांची, खाकी पावडरचा मेकप केलेली, काजळानं डोळे माखलेली आणि 'नकली सोन्या'नं अंगभर मढलेली, भडक साडीतली, तरुणपण हरवलेली, भिरभिरत्या नजरेनं 'गिर्हाईक' शोधणारी कुणीतरी...
आणखीही कितीतरी... तेच तेच!!
... तरीही मी बसमधून प्रवास करताना हे सगळं न कंटाळता पाहात बसतो.
... कहीतरी, काहीतरी वेगळं, नवं दिसेल या आशेनं!
अजून तरी यापेक्षा वेगळं काही दिसलं नाही.
पण परवा मला यातलंच एक वेगळेपण चमकल्यासारखं दिसून गेलं...
... ही माणसं अशी कुत्र्यामांजरासारखी, दुसर्या जगातलं असल्यासारखी, का राहातात?
आपल्या, लिहित्यावाचत्यांच्या, नोकरीधंदेवालांच्या, घरदारवाल्यांच्या दुनियेशी त्यांचा काहीच संबंध का नसतो?
सध्या देशभर जनगणना- शिरगणती- सुरू आहे...
ही माणसं कोणाच्या खिजगणतीत तरी असतील?...
किती असतील अशी माणसं?...
कुणालाच माहीत नसेल. अगदी, रस्त्यावरच्यांसाठी 'समाजकार्य' करणार्या एखाद्या 'एनजीओ'कडेही, याचं रेकॊर्ड नसेल...
पण, ती माणसं तसं हौसेनं नक्कीच राहात नसावीत.
अस्वच्छपणा, गलिच्छपणा, कुणाला स्वभावत: आवडत नाही. अगदी, कचराकुंडीजवळ जगणार्या त्या अस्तित्वहीनांनापण...
मी हे खात्रीनं सांगतोय...
... आता मी मुद्द्यावर येतो.
... त्या दिवशी बसमधून येताना, माझी ही खात्री झाली.
... अत्यंत फटके, कुठूनही उघडे पडलेले, रंगावर काळीकुट्ट पुटं चढून मूळचा रंग हरवलेले कपडे घातलेला, भुकेनं किंवा नशेनं, उभं राहण्याचं त्राण हरवलेला, हातापायांच्या केवळ काड्या झालेला... असाच भयाण, शून्य डोळ्यांचा एक मानवी जीव- त्याला माणूस म्हणणं मला शक्य होत नाहीये.- सिग्नलजवळ रस्त्याकडेला अशक्तपणे उभा होता...
बस थांबली, तसा त्यानं केविलवाणा चेहेरा करून हात पसरत दोनचार खिडक्यांशी भीक मागायचा प्रयत्न केला. पण नंतर तो बहुधा थकला असावा. निमूटपणे रस्त्याकडेला गेला...
माझं सवयीनुसार लक्ष होतंच.
त्यानं खांद्यावरचं एक मळकट फडकं हातात घेतलं... त्याचा बोळा केला, आणि तो खाली बसला.
त्या बोळ्यानं त्यानं जमिनीचा लहानसा तुकडा साफ केला...
धुळीचा एक कणही त्यानं तिथे राहू दिला नाही. मग थोडा मागं झुकला... मान वाकडी करून त्यानं ती स्वच्छ झालेली जागा न्याहाळली, आणि समाधानानं मान हलवत तो त्या स्वच्छ जमिनीवर टेकला...
... हेही दृष्य मी पहिल्यांदाच पाहिलं असेल असं नाही...
पण त्या वेळी मात्र, मी चमकलो.
कशाला हवी त्याला स्वच्छता?... तो स्वत: तर इतका गलिच्छ, मळलेला, मूळचा चेहेरादेखील धुळीनं हरवलेला होता.
तरीही बसायच्या जागेवर त्यानं लख्ख सफाई केली होती...
म्हणजे, त्याला स्वच्छता आवडत होती.
अस्वच्छतेचा त्यालाही तिटकारा होता...
पण, परिस्थितीनं त्याला तसं राहाणं भाग पाडलं असावं, हे स्वच्छ होतं...
मला त्याच्या त्या कृतीचं तेव्हा हसू आलं होतं... इतका मळकटलेला तो, बसण्यासाठी जागा साफ करतोय, ह्या विरोधाभासाचं हसू...
मी विचार करू लागलो... ह्या विरोधाभासाचाच.
उत्तर मिळालं... पण ते कश्या शब्दांत सांगायचं ते कळत नाहीये.
---------------------------
http://zulelal.blogspot.com
प्रतिक्रिया
6 Dec 2010 - 12:55 am | शुचि
त्यालादेखील बालपण होतं का? आई होती का जिने त्याला शिकवले होते की "बाळा नेहमी स्वच्छ रहा." का अशी वेळ यावी त्या जीवावर?
वाचून खूप वाईट वाटले.
6 Dec 2010 - 1:05 am | शिल्पा ब
परिस्थिती माणसाला लाचार बनवते...जमेल त्या पद्धतीने परिस्थितीवर मत करून राहतात बरेच लोक, त्यांच्यापरीने.
मी मुंबईत असताना झोपडपट्टीतल्या काही मुली वर्गात होत्या तेव्हा त्यांच्याशी मैत्री झाली....त्यांच्या घरी गेले असता आजूबाजूला घाण असली (बहुतेक वेळा त्यांनीच केलेली) तरी घर स्वच्छ असायचे...अर्थात ते काही अगदी भिकारी वगैरे नव्हते पण तरी...चालायचेच.
अवांतर : बाकी नेहमीचेच तेच ते असले तरी लोकांची त्याच्याशी डील करण्याची पद्धत वेगळी असते...मला लोकांच्या reactions पाहायला आवडतात...कोणी बारीक गोष्टींवर चिडलेले, कोण अगदी आनंदात चाललेले, गिऱ्हाईक - दुकानदार हुज्जत, एखादं भांडण अन ते एन्जॉय करणारी गर्दी...तुम्ही नुसतेच लोक बघण्यापेक्षा काय घडतंय ते पहा...मजा वाटते.
6 Dec 2010 - 9:35 am | मदनबाण
सुंदर लेखन... अगदी माझ्याच मनातल्या भावना मांडल्या आहेत असं कुठेतरी वाटुन गेलं...
आज सकाळी च असाच एक माणुस नजरेस पडला होता...सिमेंटच्या एका छोट्या चौकोनात बसुनच भेदरलेल्या नजरेने लोकांकडे पहात होता, जणू काही आजुबाजुला असणारे लोक त्याच्यासाठी एक प्रश्न असावे !!!
मलाही मग एक प्रश्न पडला... माणुस हल्ली माणुस कमी आणि रोबोच जास्त होत चालला आहे...भावना शून्य होत असलेला.?
6 Dec 2010 - 4:02 pm | स्पंदना
मुंबई !! माणसाला जसा शहाणा करते तस्साच खुळाही करते ही नगरी!! वाईट्ट!