लिंगबदल (आणखी एक गोष्ट)
अर्जुनाने द्रुपदाचा पण जिंकला व द्रौपदी त्याची पत्नी झाली. पण भावाभावात तंटे उद्भवू नयेत म्हणून तिने इतर चौघा भावांचा स्विकार केला व ते नाते अतिशय समर्थपणाने सांभाळले. तिच्या बाजूने तिने स्वच्छ व्यवहार केला केवळ अर्जुन हा पती रहावा म्हणून ! तिला प्रत्येकाकडून एकएक मुलगाही झाला. तिने पत्नीधर्म सांभाळला पण पांडवांनी त्याप्रमाणे काही त्याग केला का ? तसे दिसत नाही. धर्म, भीम, नकुल व सहदेव यांनी आणखी एकएक राजकन्या पत्नी म्हणून घरात आणली व त्यांना मुलेही झाली.(हिडिंबा धरली तर) भीमाच्या बायका दोन. पण कहर केला तो अर्जुनाने. त्याने सुभद्रेला पळवून तिच्याशी लग्न केले व उलुपी व चित्रांगदा ह्या आणखी दोन बायका केल्या. आजच्या आपल्या कल्पने प्रमाणे हा द्रौपदीवर उघड उघड अन्याय झालेला दिसतो. पण त्या काळी तसे धरले जात नसावे. सुभद्रा पहिल्यांदी घरी आली तेव्हा द्रौपदीला भेटावयास कसे जावयाचे हा मोठा प्रश्न होता. सुभद्रा नवयौवनसंपन्न राजकन्या होती व अर्जुनाने तिच्या रूपाकडे पाहून तिला वरले हे द्रौपदीला खटकणारे होते. मोठ्या काव्यात्मक भाषेत तिने अर्जुनाला आपली खंत दाखवली आहे. " अर्जुना, इकडे कशास येतोस ! ती यदुकन्या सुभद्रा असेल तिकडे जा. माझ्यापेक्षा सुभद्रेवर तुझा अधिक लोभ जडला हे स्वाभाविकच झाले. ओझे एकदा घट्ट बांधिले असले तथापि त्यास पुन्हा दुसरी दोरी बांधिली, तर पहिली दोरी सैल पडावयाचीच ! तेव्हा नव्या प्रेमाने जुने प्रेम शिथिल होणे साहजिकच आहे." सुभद्रेने राजवस्त्रे न नेसता साधा गोपवधूवेष धारण केला व द्रौपदीकडे जाऊन 'मी तुमची दासी आहे" असे विनयाने सांगितले. द्रौपदीने आढी सोडून तिचा स्विकार केला. नंतर अर्जुनाने उलुपी व चित्रांगदा यांच्याशीही विवाह केले. पण यावरून अर्जुन हा स्त्रीलंपट होता असे म्हणता येणार नाही. याला दोन गोष्टी साक्षी आहेत. तो विराटाच्या मुलीला नृत्य-गायन शिकवावयला एक वर्ष होता. विराटावरचे संकट निवारून जेव्हा पांडव प्रकट झाले तेव्हा विराटाने आपली मुलगी त्याला पत्नी म्हणून देऊ केली. त्या वेळी तो म्हणतो,"ही माझी शिष्या म्हणून, मला ती मुलीप्रमाणे आहे. मी तिचा स्विकार सून म्हणून, अभिमन्यूची पत्नी म्हणून करीन ." दुसरी कथा हा आजचा विषय आहे.
पांडव वनवासात असतांना त्यांनी भविष्यात आपणास कौरवांशी युद्ध करावे लागणार आहे व त्या वेळी भीष्म-द्रोण यांसारख्या अस्त्रवेत्त्यांशी लढावयाचे आहे हे ध्यानात घेऊन असे ठरले की अर्जुनाने हिमालयात जाऊन स्वर्गीय देवांकडून त्यांची अस्त्रे मिळवावीत. मोठ्या कष्टाने सर्वांचा निरोप घेऊन अर्जुन एकटा हिमालयावर गेला. तिथे त्याने प्रथम शंकरांकडून पाशुपतास्त्र मिळवले व नंतर इंद्राच्या सांगण्यावरून तो इतर देवांकडील अस्त्रे मिळवण्याकरिता स्वर्गात गेला. तेथे इंद्रगृही राहून त्याने सर्व देवांकडून त्यांची अस्त्रे शिकून घेतली. नंतर इंद्र त्याला म्हणाला की चित्रसेन गंधर्वापासून तू गायन,वादन नृत्यही शिकून घे. पुढे एके दिवशी अर्जुनाची दृष्टी उर्वशीवर जडली आहे असे कळून आल्यावरून इंद्राने चित्रसेन गंधर्वाबरोबर उर्वशीला निरोप पाठवला व तीला अर्जुनाकडे जाण्यास सांगितले. ती नटूनथटून रात्री अर्जुनच्या मंदिरात आली. रात्री स्त्री आपल्या मंदिरात आल्यामुळे साशंक झालेल्या अर्जुनाने तिला प्रणाम करून वडील मनुष्याप्रमाणे तिचा सत्कार केला. तो म्हणाला "हे देवि, काय आज्ञा आहे सांग, हा दास तुझ्या सेवेविषयी तत्पर आहे." त्यावर उर्वशी म्हणाली " इंद्रदरबारी एकदा सर्व श्रेष्ट अप्सरांचे नृत्य चालू असतांना तू केवळ एकट्या माझ्याकडेच टक लावून पहात होतास.तेव्हा इंद्राच्या निरोपावरून तो व चित्रसेन या उभयतांच्या अनुमोदनाने मी येथे प्राप्त झाले आहे. मीही तुझ्या गुणाच्या योगाने अंत:करण आकृष्ट झाल्यामुळे मदनाच्या अधीन होऊन, तुझी सेवा करावयास आले आहे." तिचे हे बोलणे ऐकून अर्जुन लज्जेने व्याप्त झाला व कानांवर हात ठेऊन बोलू लागला, " हे सुमुखी, तूं मला खास गुरूस्त्रीसारखी वा इंद्रपत्नी सची
प्रमाणे आहेस. मी तुझ्याकडे का पहात होतो ते ऐक. ही आमच्या पौरववंशाची जननी आहे हे ऐकल्यावर आनंदित होऊन तुझ्याकडे पहात होतो.हे कल्याणि, आमच्या वंशाची अभिवृद्धिही तुझ्यामुळे झाली असल्याने तूं मला गुरूपेक्षाही गुरू आहेस.मजविषयी तूं भलत्याच प्रकारची कल्पना करू नकोस." यावर उर्वशी म्हणाली, " हे वीरा, आम्हा अप्सरांस कोणाचाही प्रतिबंध नाही.पुरूच्या वंशातले जे पुत्र किंवा नातू स्वर्गात येतात ते आम्हाला रमवतात. त्यात त्यांना दोष लागत नाही,मदनाने माझ्या शरीराचा भडका उडवून दिला असल्याने विव्हल होऊन गेले आहे." यावर अर्जुन म्हणाला "मी खरेच सांगतो ते तूंही ऐक, सर्व देवता, दिशाही ऐकू देत. भूलोकी कुंती किंवा माद्री, ह्या स्वर्गात सची तशी तूं मला आहेस, तू माझ्या वंशाची जननी असल्याने जास्तच मान्य आहेस. मी तुझ्या पायांवर मस्तक ठेवतो, जा तूं येथून.
तूं मला जननीप्रमाणे असल्याने तूं माझे पुत्राप्रमाणे रक्षण केले पाहिजेस." उर्वशीने क्रोधाने अर्जुनाला शाप दिला, "तुझ्या पित्याने अनुज्ञा दिली असून मी कामाच्या अधिन होऊन आपण होऊन तुझ्याकडे आले असतांना तूं ज्या अर्थी मला मान देत नाहीस त्या अर्थी तू
पुरुष नाहीस अशी प्रसिद्धी होऊन षंढाप्रमाणे बायकात नृत्य करीत फिरशील." ती रागारागाने नोघून गेली.
सकाळी त्याने चित्रसेनाला व चित्रसेनाने इंद्राला रात्रीची हकिकत कळविली. इंद्राने अर्जुनाला बोलावून घेऊन त्याचे सांत्वन केले. इंद्र म्हणाला " तूं आपल्या धैर्याच्या योगाने ऋषींच्यावरही मात केली आहेस. हा शाप अभिष्ट गोष्ट घडवून आणणारा आहे. अज्ञातवासांत असतांना
एक वर्ष तुला नर्तकाचा वेष व पुरुषत्वाचा अभाव प्राप्त होईल व वर्षाने तू परत पुरुष होशील." इति. (महाभारत, वनपर्व,अ.१४४-१४६.)
(१) शिखंडी स्त्रीचा पुरुष झाला तर अर्जुन एका वर्षापुरता पुरुषाचा क्लैंब झाला.
(२) कौरव-पांडव हे पुरूच्या वंशातले म्हणून पौरव. उर्वशी पुरूची पत्नी होती.
शरद
प्रतिक्रिया
30 Nov 2010 - 4:21 pm | मृत्युन्जय
ही आमच्या पौरववंशाची जननी आहे हे ऐकल्यावर आनंदित होऊन तुझ्याकडे पहात होतो.हे कल्याणि, आमच्या वंशाची अभिवृद्धिही तुझ्यामुळे झाली असल्याने तूं मला गुरूपेक्षाही गुरू आहेस.मजविषयी तूं भलत्याच प्रकारची कल्पना करू नकोस."
एक सामान्य शंका. जर अर्जुनाने उर्वशीचा अव्हेर आदरभावनेतुन केला तर त्याने द्रौपदीचा स्वीकार का केला? महाभारतात स्पष्ट लिहिले आहे की तिने प्रथम युधिष्ठिराशी लग्न केले. म्हणजे ती त्याच्या मोठ्या भावाची बायको आधी होती आणि त्याची बायको नंतर झाली . त्या हिशेबाने ती मातेप्रमाणे नव्हती काय?
30 Nov 2010 - 4:33 pm | नरेशकुमार
ते उत्तरेकडुन आले होते, माहित नाहि का ?
30 Nov 2010 - 4:45 pm | परिकथेतील राजकुमार
धन्यवाद श्री. शरदजी :)
एक शंका मला देखील आहे.
माझ्या अल्पज्ञानाप्रमाणे इंद्राने उर्वशीला विनंती करुन अर्जुनाला पुन्हा उ:शाप देण्यास भाग पाडले. तेंव्हा तिने उ:शाप म्हणुन अर्जुनाला 'हे षंढत्व फक्त एक वर्ष असेल व त्या वर्षाची निवड अर्जुन स्वतः करु शकेल' असे सांगितले.
30 Nov 2010 - 6:06 pm | शरद
उर्वशीचा उ:शाप व युधिष्टिराशी पहिले लग्न.
"हे तुम्हाला कोठे मिळाले ? " हा प्रश्न विचारणे मला जमत नाही, तो माझा पिंड नव्हे.माझ्याकडे वरदा प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले महाभारताचे खंड आहेत. विदर्भ-मराठवाडाचे तेच खंड आहेत. त्यात असे काहीच नाही. पण महाभारताची ही प्रत "निलकंठ प्रत" वा मुंबई प्रत म्हणून ओळखली जाते. याशिवाय "कलकत्ता प्रत" व इतर अनेक प्रती आहेत. त्यांमध्ये कथांचे/माहितीचे फेरफार आहेत. एका प्रतीतले आख्यान दुसर्यात असेलच असेही नाही व असले तर थोड्याफार फरकाने असण्याची शक्यताही आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देणे अवघड आहे. व कित्येक वेळी हरदासांच्या कथा, मुलांची पुस्तके, कादंबर्या, नाटके यांत लेखक मनास येईल असे फेरफार करतो व वाचकाला तेच बरोबर असावे असे वाटते.
मृत्युंजय कादंबरीत असे बरेच बदल केलेले आपणास आढळतील. असो. महाभारताच्या या प्रति प्रमाणे, पाचही पांडवांशी द्रौपदीचा विवाह,विवाह पाचही जणांशी होणार असे ठरल्यानंतर, क्रमाने एकेक दिवशी झाला. त्यामुळे वरील प्रश्न उद्भवत नाही. इंद्र हा Big Boss असल्याने त्याला उर्वशीला विनंती करावयाचे कारणच नव्हते. त्याने आपल्या अधिकारातच शापात बदल करून टाकला.
शरद
30 Nov 2010 - 4:57 pm | नगरीनिरंजन
आणखी एक शंका:
द्रौपदी व पांडवांचे लग्न झाल्यावर सुरुवातीला द्रौपदी प्रत्येकाकडे एक वर्ष राहणार आणि एका भावाबरोबर राहात असताना दुसर्या भावाने तिच्याशी संग करू नये आणि असा नियमभंग केल्यास एक वर्ष शिक्षा म्हणून प्रवासास जावे असे ठरले होते. द्रौपदी युधिष्ठीराकडे राहात असताना अर्जुन नियमभंग करून तिथे गेला (कोणीतरी हल्ला केला की गायी चोरल्या म्हणून आपले गांडीव आणायला म्हणून तो द्रौपदीच्या अंतःपुरात गेला असेही ऐकले आहे) म्हणून त्याला प्रवासास जावे लागले आणि त्या प्रवासातच उलुपी, चित्रांगदा आणि सुभद्रा अशा तीन बायका त्याला मिळाल्या. अशीच कथा आहे का?
तसे असेल तर त्याने चुकून नियमभंग केला की उर्वशी समोर दाखवलेला निग्रह त्याला द्रौपदीच्या बाबतीत दाखवता आला नाही?
30 Nov 2010 - 9:28 pm | योगी९००
कोणीतरी हल्ला केला की गायी चोरल्या म्हणून आपले गांडीव आणायला म्हणून तो द्रौपदीच्या अंतःपुरात गेला असेही ऐकले आहे
अर्जूनाने आपले गांडीव द्रौपदीच्या अंतःपुरातच का ठेवले असावे? शस्त्रागार किंवा स्वतःचा महाल नव्हता की काय?
1 Dec 2010 - 9:00 am | अप्पा जोगळेकर
मुद्दामच ठेवलं असेल तिथे.
30 Nov 2010 - 5:01 pm | विनायक प्रभू
आता मानुस म्हंटला मंजे व्हायची की एकांदी मिष्टीक.
एवड मनावर काहुन घ्येता राव.
30 Nov 2010 - 7:46 pm | शरद
नियम असा ठरला कीं इतौत्तर आम्हापैकी कोणीही बंधुद्रौपदीला घेऊन एकांतांत बसला असतां जो दुसरा बंधुत्याशी नजरानजर करील त्याने ब्रह्मचर्य व्रत धारण करून बारा वर्षें वनवास करावा. " समागम हा हरिदासी पर्याय असावा. अर्जुन ब्राह्मणाच्या गायी सोडवण्याकरिता आपली शस्त्रे घेण्याकरिता शस्त्रागारात जात असतांना त्याने युधिष्ठिर्-द्रौपदी यांना एकांतवासात बघितले. गायी परत केल्यावर तो वनवासाला निघाला. तेव्हा युधिष्ठिराने " मोठा भाऊ वडिलांच्या सारखा असतो, तू वनवासात जाऊ नकोस " असे सांगितले . पण त्याने ते ऐकले नाही. तो ठरल्याप्रमाणे वनवासाला गेला. गचाळ पर्याय कलीयुगातील असावेत. (महाभारत्,अर्जुनवनवासपर्व, अ.२१३.)
शरद
30 Nov 2010 - 7:49 pm | नगरीनिरंजन
शंकेचे निराकरण केल्याबद्दल धन्यवाद शरदजी!
1 Dec 2010 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार
सहमत आहे. आणि ते कुठल्या प्रकारच्या मेंदूतुन निघत असावेत ह्याची एक झलक इथे दिसतेच आहे :)
श्री. शरदजी तुमचा अभ्यास खरच हेवा वाटावा असा आहे. शक्य झाल्यास घटोत्कचाचा मुलगा 'बार्बरिक' ज्याला कृष्णाने त्याकाळातला सर्वोत्तम क्षत्रिय म्हणुन गौरवले होते त्याच्याविषयी वाचावयास आवडेल. गंमत म्हणजे एकलव्याकडे अंगठा मागुन बदनाम झालेल्या द्रोणाचार्यांविषयी सर्वांना माहिती आहे, मात्र एका दिवसात महाभारत युद्ध संपवण्याची क्षमता असलेल्या ह्या बार्बरिकाकडे कृष्णाने गुरुदक्षिणा म्हणुन त्याचे डोकेच मागीतले होते आणि जे त्याने दिले हे फार थोड्या लोकांना माहिती असावे.
1 Dec 2010 - 12:10 pm | आळश्यांचा राजा
इंटरेस्टिंग! यावर एक कथा येऊ द्या!
(मायथॉलॉजीचा वेडा)
1 Dec 2010 - 12:24 pm | परिकथेतील राजकुमार
माझ्यापेक्षा शरदजी अधिक माहितीपुर्ण कथा लिहितील हे नक्की. म्हणुनच त्यांना विनंती केली आहे. त्यांना काही कारणाने शक्य नसेल तर मी नक्की लिहिन.
1 Dec 2010 - 1:57 pm | शरद
सप्रेम नमस्कार.
ही गोष्ट महाभारतात नाही. कथाकल्पतरु सारख्या पुस्तकात ह्या गोष्टी असतात. त्यामुळे मला असे वाटते की या मालिकेत ही गोष्ट येण्याऐवजी आपणच ती लिहलीत तरे बरे होईल. मी ही आणखी दोन गोष्टी लिहून थांबावयाचे म्हणत आहे. आपला,
शरद
1 Dec 2010 - 12:23 pm | प्रचेतस
|बार्बरिकाकडे कृष्णाने गुरुदक्षिणा म्हणुन त्याचे डोकेच मागीतले होते आणि जे त्याने दिले हे फार थोड्या लोकांना माहिती असावे
वि.म. बुक कं च्या महाभारत प्रतींत तर हा उल्लेख कुठे असल्याचे आमच्या माहितीत नाही. ही एक हरदासी कथाच असावी. पर्व व अध्याय कुठला हे स्पष्ट सांगितलेत तर अधिक धांडोळा घेता येइल पराशेठ.
1 Dec 2010 - 12:27 pm | परिकथेतील राजकुमार
नाही हो. मी देखील हि कथा महाभारतात वाचलेली नाही.
महाभारताच्या अनुशंगाने येणार्या ज्या काही इतर कथा वाचल्या त्यात हिचा उल्लेख आहे, तसेच विकि वर देखील ह्यातील काही भाग उपलब्ध आहे.
1 Dec 2010 - 8:17 am | स्पंदना
ज्यान पण जिंकुन द्रौपदी प्राप्त करुन दिली, ज्याच्या वरच्या प्रेमा पायी तिने पांचाली होण स्विकारल त्याचा फारच थोडा सहवास लाभला त्या बिचारीला!! वर आणी सवती वर सवती!
ब्रुहन्नडेची (? नाव बरोबर आहे ना?) कथा आवडली.
1 Dec 2010 - 9:10 am | मदनबाण
दोन्ही भाग वाचले,नविन माहिती समजली...