भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही यादी दिली असती तर?

Bhushan11's picture
Bhushan11 in जनातलं, मनातलं
28 Nov 2010 - 4:55 am

भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ही यादी दिली असती तर?
==================================

केतन आणि विनीत शेजारी शेजारी राहत होते. दोघेही लहान असल्यापासून एकत्रच वाढले. दोघेही एकत्रच अभ्यास करायचे, खेळायचे. त्यांच्या आयाही एकमेकांच्या मैत्रिणी होत्या. त्यामुळे त्या दोघीही एकमेकींकडे वरचे वर जायच्या. केतन आणि विनीत हळूहळू मोठे व्हायला लागले. अभ्यासात
केतन जात्त्याच हुशार होता. पण हे विनीतच्या आईस कळलं तरी मनाला पटत नव्हतं. दहावीच्या परीक्षेच्या वेळी केतन जरा आजारी पडला. विनीतची आई केतनच्या आईकडे जावून सहानुभूती दाखवायची. विचारपूस करायची. पण घरी आल्यावर का कुणास ठावूक तिला किंचित बर वाटायचं. छातीत खोलवर कुठेतरी जाळल्यासारखं पण वर थोडं शांत वाटायचं. नेमकं सांगायचं तर "आसुरी आनंद" हा शब्दप्रयोग इथे वापरता येईल.

असं म्हणतात कि काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर हे सहा शत्रू आहेत. षड्रिपू.

स्वार्थ, लबाडी, चोरी, फसवणूक, दुष्टपणा, आणि असत्य हे सहा उपशत्रू म्हणता येतील का?

स्वार्थ हा शत्रू लोभ या शत्रूशी जोडता येईल. किंबहुना स्वार्थी आणि लोभी या शब्दांचे अर्थ एक होऊ शकतात. आपण लोभी या शब्दाचा उपयोग करतो तेव्हा बरेच वेळा "पैशाचा लोभी" या संदर्भात करतो. पण स्वार्थी माणूस केवळ पैशाबाबत स्वार्थी असतो असं नाही. तर तो घर, पोझिशन, गाडी या बाबतीत स्वार्थी असू शकतो. स्वार्थी माणूस लोभी माणसापेक्षा हुशार असतो. त्याला दूरदृष्टी असते. त्याला पेशन्स असतो. तो विचारी असतो. त्याला वेळ आणि संधी याचं भान असतं. याच्या उलट लोभी माणूस आपण सहज ओळखू शकतो. स्वार्थी माणूस ओळखायला वेळ लागतो.

लबाड हा शत्रू लोभ या शत्रूचा मोठं भावंड म्हटलं तर कसं? लोभी बनण्यासाठी लबाड बनलं तर जास्त चांगलं. लबाड माणूस लोभी होऊ शकतो. पण लोभी माणूस लबाड असेलच असं नाही. लबाड माणूस प्लानिंग करण्यात हुशार तर लोभी माणूस प्लानिंग करण्यात 'ढ'. लबाड मुळातच असावं लागतं पण लोभी माणूस डोळ्यासमोर लोभ दिसला तरच जागा होतो.

चोरी या शत्रूला तर कुणीही ओळखू शकतो. चोरी हा सरळसोट शत्रू आहे. चोरी केली हे सरळ असतं. पण चोरी करण्याचे हेतू विविध असू शकतात. कुणी पोटासाठी, कुणी पैशासाठी चोरी करतं. चोरी हा स्वार्थ आणि लबाड या शत्रूंचा धाकटा भाऊ.

फसवणूक करण्यार्या माणसाला प्लानिंग करावा लागतं. त्यात तो तज्ञ असावा लागतो. विशिष्ट हेतू डोळ्यासमोर ठेउन हा शत्रू काम करतो. हा कधी कधी कलाकारही असावा लागतो. फसवताना चेहऱ्यावरील भाव बदलण्याचं कौशल्य त्याच्याकडे असावं लागतं. हा शत्रू लोभ या शत्रूचा थोरला भाऊ.

दुष्ट माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्याची छळवणूक करतो. अधिकाराने आणि सत्तेने दुसर्याच बळकावण्यात मागे पुढे पाहत नाही. दुसर्याच्या भावनेची त्याला कदर नसते.

असत्य किंवा खोटा बोलणं हा सर्वात कॉमन शत्रू.
लोभासाठी खोटं
'कामा'साठी खोटं
स्वार्थासाठी खोटं
फसवणूकीसाठी खोटं
चोरीसाठी खोटं

तसं पाहिलं तर माणसाला अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठी या शत्रुंचा उपयोग झाला. त्यापुढे जाऊन म्हणता येईल कि मानवाचा विकास या शत्रुन्मुळेच झाला. लोभ या एका शत्रूचे आपण आभार मानले पाहिजेत. यातूनच पुढे मद आला. संपत्तीचा गारवा आल्यावरच आपले हितशत्रू आपल्याला पाण्यात पाहतात. तेही बाह्या सावरून कामाला लागतात आणि स्पर्धेत उतरतात. मग मत्सर हा शत्रू ताठपणे उभा राहतो. आणि आपोआपच इकॉनॉमी वाढते.

जगातल्या सर्व लेखकांनी या शत्रूंचा पुरेपूर फायदा उठवला. कथा, कादंबर्या, नाटकं, सिनेमे तुफान प्रसिद्ध झाली. शेक्स्पेअर अजरामर झाला. महाभारत अजूनही लोक वाचतात. श्री विजय तेंडूलकरानी तर स्त्री अत्याचारावर लिखाण केलं आणि या विषयावर सम्राट झाले .

Godfather चित्रपट एक महत्वाचा टप्पा ठरला.

शांतपणे विचार केला तर हे सर्व शत्रू आपल्या आणखीनच जवळ येत आहेत. खरं तर हे आपल्यामध्ये भिनून गेले आहेत. एकनाथ महाराजांनी "विंचू चावला" असं सांगितलं, पण हा विंचू आपल्या अंगात घर करून बसला आहे. पण हा विंचू नक्की केव्हा चावतो ते कळत नाही. एक वर्षाचं मुल "हे माझं आहे" असं म्हणत खेळणं ओढून घेतो तेव्हा आपण म्हणतो, 'पोरगा हुशार आहे'. थोडं मोठा झाल्यावर "हा पक्का आहे' असं म्हणतो.

भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम या ६ शत्रूंची नावासकट जाणीव करून दिली असं म्हणतात. अर्जुनाने जर श्रीकृष्णाला विचारला असतं कि
"अरे, माझ्यासमोर ऑलरेडी १०० शत्रू उभे आहेत आणि तू वर ६ शत्रूंची यादी देतो आहेस, म्हणजे माझं काम आणखीनच अवघड करतो आहेस. ६ शत्रूंपेक्षा ६ मित्रांची यादी तू का नाही देत?

जर श्रीकृष्णाने ६ मित्रांची यादी दिली असती तर हे जग आज कसं असतं?

भूषण

टीप - हा लेखामध्ये बर्याच तृटी असू शकतात. मी या विषयावर अभ्यास केलेला नाही. विचार आले तसे लिहून काढले आहेत.

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

28 Nov 2010 - 5:29 am | शिल्पा ब

कोणते मित्र? नाही म्हणजे श्रीकृष्णाने शत्रुंनाच मित्र बनविले होते म्हणून विचारले हो!! बाकी कृष्णासारखा कोणीच नाही..आपल्याला जाम आवडतो कन्हैय्या..

सूर्यपुत्र's picture

28 Nov 2010 - 9:57 am | सूर्यपुत्र

आपले ६ मित्र कोणते आहेत, ते सांगतात...
मला "विवेक" आठवतोय, बाकी नाही आठवत.

आत्मशून्य's picture

28 Nov 2010 - 12:22 pm | आत्मशून्य

असो जीथे शत्रून्चि नावे माहीत असून त्याना पराभूत करता आले नाहि तिथे मित्र कोण हे समजून सोबत टिकवता आली असती याची काय खात्री..

सर्वसाक्षी's picture

28 Nov 2010 - 1:17 pm | सर्वसाक्षी

<"अरे, माझ्यासमोर ऑलरेडी १०० शत्रू उभे आहेत आणि तू वर ६ शत्रूंची यादी देतो आहेस, म्हणजे माझं काम आणखीनच अवघड करतो आहेस. ६ शत्रूंपेक्षा ६ मित्रांची यादी तू का नाही देत?>

पांडव ज्या आश्रमात/ गुरुकुलात शिकले त्याला पाश्चिमात्य देशांतून देणगी येत होती काय? यावर विद्वानांनी थोडे संशोधन करावे