लिंगबदल
भीष्मांनी आपला सावत्रभाऊ विचित्रवीर्य याचा विवाह करण्याचे ठरवले. त्याचवेळी काशीराजाने आपल्या तीन मुली अंबा,अंबिका व अंबालिका यांचे स्वयंवर योजिले होते. भीष्म त्या ठिकाणी गेले व त्या तीन मुलींना उचलून आपल्या रथात ठेवले व जमलेल्या सर्व राजांना युद्धाचे आव्हान दिले. सर्वांचा पराभव करून त्यांनी त्या मुलींना घरी आणून आपल्या आईच्या ताब्यात दिले व सांगितले की विचित्रवीर्याच्या लग्नाकरिता यांना आणले आहे. त्या वेळी अंबा त्यांना म्हणाली की " माझे शाल्व राजावर प्रेम आहे व आम्ही लग्न करावयाचे ठरविले होते".
भीष्मांनी तिला शाल्वाकडे पाठविले पण शाल्वाने तिचा स्विकार करावयाचे नाकारले. अनाथ अंबा भीष्मांचे गुरू परशुराम यांना शरण गेली. परशुरामांना वाटले की आपला शिष्य भीष्म आपले ऐकेल. त्यानेही अंबेचा स्विकार करण्याचे नाकारले व मग परशुराम - भीष्म यांचे चौवीस दिवस भीषण युद्ध झाले. त्यातही भीष्म हरला नाही तेव्हा परशुरामांचाही नाइलाज झाला. अंबेला आता करण्यासारखे काहीच उरले नाही. तेव्हा तिने अतिशय कडक तपस्चर्या केली. शंकराने तिला दर्शन देऊन वर दिला की " तुझ्या हातून भीष्माचा वध होईल." अंबेने विचारले " माझ्यासारख्या स्त्रीच्या हातून हे कसे शक्य आहे ?" शंकर म्हणाले " माझे शब्द खोटे होत नाहीत. पुढील जन्मी तू मुलगी म्हणूनच जन्मशील पण तुला पुढे पुरुषत्व प्राप्त होईल व तुझ्या हातून भीष्माचा वध होईल. " आपले ह्या जन्मीचे कार्य संपले असे समजून अंबेने चिता रचली. "भीष्मवधार्थ" असे म्हणून त्या चितेत उडी मारली व जीव दिला. हा झाला पूर्वार्ध.
त्याच सुमारास अपत्यप्राप्तीकरिता द्रुपद शिवाची आराधना करत होता. महादेव प्रसन्न झाल्यावर द्रुपदाने मुलगा-मुलगी मागितलेच पण आणखी सांगितले की "मला भीष्माची खोड मोडावयाची आहे; त्या करिता पुत्र पाहिजे." महादेव म्हणाले "या वराने तुला स्त्रीपुरुषात्मक एकच अपत्य होईल. प्रथम कन्या व पुढे पुरुष असे अपत्य तुला होईल." मग द्रुपदाने ते आपल्या बायकोला सांगितले. यथावकाश द्रुपदपत्नीला कन्यारत्न प्राप्त झाले पण तिने राजाला ' मला पुत्रच झाला" असे कळविले.तिला पुत्रासारखेच वाढविले. सत्य फक्त त्या दोघा आईवडिलांनाच माहीत होते.तिचे नावही "शिखंडी" असे पुल्लिंगी ठेवले. ती मोठी झाल्यावर द्रुपदाची काळजी वाढू लागली पण शंकराच्या वचनावर विश्वास ठेऊन त्याने शिखंडीचे लग्नही हिरण्यवर्मा नावाच्या राजाच्या मुलीशी केले. पण तिला लगेचच कळले की आपला नवरा आपल्या सारखाच स्त्री आहे. तिने त्या प्रमाणे आपल्या वडिलांना कळविले व द्रुपदाने फसविले म्हणून हिरण्यवर्मा सैन्य घेऊन द्रुपदावर स्वारी करण्यास आला.
आपल्यामुळे हे संकट ओढावले म्हणून शिखंडी वैतागली व नगर सोडून एका अरण्यात गेली. तिथे तिला एक मोठा वाडा दिसला.त्या जाऊन ती रडत बसली. तो वाडा स्थूणाकर्ण नावाच्या एका यक्षाचा होता. कुबेराचा तो मोठा अनुचर होता. त्याने विचारले " तू का रडतेस ? तुझी काय इच्छा असेल ती मी पूर्ण करेन". शिखंडीने काय अडचण आहे ती सांगितली. यक्ष म्हणाला "ठीक आहे. काही काळापुरते मी माझे पुरुषत्व तुला देतो व तुझे स्त्रीत्व घेतो.पण तुझे काम झाले की तू परत येऊन माझे पुरुषत्व परत कर. शिखंडीने ते कबूल केले व शिखंडी पुरुष झाला व स्थूणाकर्ण स्त्री.
शिखंडी नगरात येतो व द्रुपदाला काय झाले ते सांगतो. शंकराचे वचन खरे झाले म्हणून द्र्पद हर्षभरीत होतो व व्याह्याला निरोप पाठवितो की " शिखंडी पुरुषच आहे, आपण काय ती खात्री करून घ्यावी." हिरण्य़वर्मा पेचात पडला. मग त्याने" अत्यंत मनोहर, रूपमती,वरारोहा व उन्मत्तयौवना निवडक स्त्रीया शिखंडीकडे पाठविल्या. त्यांनी शिखंडीकडे येऊन त्याचा अनुभव घेतला व त्या समाधान पावल्या. परत येऊन त्यांनी राजाला सांगितले की शिखंडी मोठा जोरकस पुरुष आहे..राजाने द्रुपदाची भेट घेऊन त्याची माफी मागितली, कन्येला दम दिला, शिखंडीला भेटी दिल्या व काही दिवस द्रुपदाकडे राहून तो माघारी गेला.
राजधानीत हा उत्सव चालू असतांना अरण्यात एक दुसरेच नाटक चालू होते. कुबेर आपल्या तो बरोबर काही सेवक घेऊन आकाशातून हिंडत असताना कर्मधर्मसंयोगाने स्थुणाकर्णाच्या वाड्यापाशी येतो. तो खाली उतरून वाड्यात येतो पण त्याला भेटावयास स्थूणाकर्ण बाहेर येत नाही म्हणून तो भडकतो. त्याचे सेवक सांगतात की "स्थूणाकर्णाने आपले पौरुष्य शिखंडीला दिले असून तो स्त्री झाला आहे म्हणून लाजेने तो बाहेर येत नाही. तडकून तो सेवकांना त्याला बाहेर घेऊन येण्यास सांगतो व स्थूणकर्णास म्हणतो की " तू हे यक्ष जातीला लाजीरवाणे कृत्य केले आहेस, आता रहा कायमचा स्त्री म्हणून." इतर सेवक बरीच रदबदली करतात व म्हणतात की एवढी कठोर शिक्षा नको. कुबेर ते कबूल करतो व म्हणतो की "ठीक आहे. जो पर्यंत शिखंडी जिवंत आहे तो पर्यंत तो पुरुष व हा स्त्री राहील व शिखंडी मेल्यावर हा परत पुरुष होईल." कुबेर निघून जातो.
वचन दिल्याप्रमाणे शिखंडी पुरुषत्व परत करण्यास स्थूणकर्णाकडे येतो. स्थूणकर्ण त्याला म्हणतो " तू परत आलास हे चांगलेच केलेस. पण दैवगती निराळी आहे. आता मरेपर्यंत तू पुरुषच रहा."आनंदाने शिखंडी राजधानीला परततो. पुढे द्रोणाचार्यांकडे शिक्षण घेऊन एक महान योद्धा होतो व भारतीय युद्धात भीष्मांचे पतन होण्यास कारणीभूत होतो.
(महाभारत, उद्योगपर्व, अंबोपाख्यानपर्व, अ. १७३ -१९२.)
शरद
प्रतिक्रिया
27 Nov 2010 - 8:28 am | नगरीनिरंजन
भीष्म क्षत्रिय असूनही परशुरामाचा शिष्य कसा?
वरारोहा म्हणजे काय?
शिखंडी पुरुष झाला हे भीष्माला माहिती नव्हतं का? की माहिती असूनही मरायचं म्हणून त्याने शस्त्रं टाकली? की खरोखरच शिखंडीने पराक्रम करून भीष्माला मारलं?
27 Nov 2010 - 12:07 pm | ए.चंद्रशेखर
महाभारताच्या गोष्टीत असे का? हा प्रश्न कधीही विचारायचा नसतो. कारण त्याला उत्तर नसते.
27 Nov 2010 - 12:23 pm | क्लिंटन
केवळ महाभारतातील गोष्टींमध्ये असे का हे विचारायचे नाही का इतर अनेक प्रकारांविषयी हा प्रश्न विचारायचा नाही? असो.
27 Nov 2010 - 12:31 pm | ए.चंद्रशेखर
चर्चेचा विषय महाभारताबद्दल आहे म्हणून मी महाभारतातील गोष्टींबद्दल असे लिहिले आहे. तसे बघायला गेले तर भारतीय रीति-रिवाज, कर्मकांडे, अंधश्रद्धा वगैरे सारख्या बर्याच गोष्टींबद्दल असे म्हणता यावे.
27 Nov 2010 - 12:44 pm | परिकथेतील राजकुमार
+१ सहमत आहे.
आंतरजालावर देखील बर्याच धार्मिक धाग्यांवर येउन श्रद्धा,धर्म,देव, कर्मकांडे ह्यांच्याविरुद्ध ओकार्या काढणार्यांना देखील 'का ?' असे विचारायचे नसते म्हणे.
27 Nov 2010 - 12:50 pm | अपूर्व कात्रे
परशुराम आणि भीष्म गुरु-शिष्य आहेत ही माहिती मलाही नवीन आहे. शिखंडी पुरुष झाला हे भीष्मांना माहित होते. अंबेने भीष्मांच्या समोरच त्यांना मारण्याची प्रतिज्ञा केली होती. मात्र शिखंडी मुलगी म्हणून जन्माला आल्याने व स्त्रीवर (शिखंडी जरी नंतर पुरुष झाला असला तरीही) शस्त्र रोखणे हा क्षात्रधर्म नसल्याने भीष्मांनी शिखंडी समोर आल्यावर शस्त्रे चालविली नाहीत. तरीही शिखंडीने भीष्मांना मारले नाही. त्यांना अर्जुनाने मारले. त्यामागचा इतिहास पुढीलप्रमाणे: - भीष्म व कर्णाचे वाकडे असल्याने भीष्मांच्या सेनापत्याखाली युद्धभूमीवर न उतरण्याची प्रतिज्ञा कर्णाने केली होती. युद्ध सुरु होऊन बराच काळ लोटूनही पांडवांपैकी कोणीही धारातीर्थी न पडल्याने दुर्योधनाने भीष्मांची निर्भत्सना केली व कौरवांचे सेनापतीपद कर्णाकडे देण्यास सुचवले. यावर संतप्त होऊन भीष्मांनी प्रतिज्ञा केली की उद्या एकतर पांडव तरी संपतील किंवा मी (भीष्म) तरी. हे कळल्यावर पांडवांच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. त्यावर उपाय म्हणून कृष्णाने द्रौपदीला संपूर्ण सौभाग्यवतीचे अलंकार लेवून, डोक्यावर पूर्ण पदर घेऊन भीष्मांना भेटण्यास सांगितले. द्रौपदीने भीष्मांना भेटल्यावर वंदन केले तेव्हा भीष्मांनी तिला "सौभाग्यवती भव" असा आशीर्वाद दिला. त्यानंतर द्रौपदीने आपली खरी ओळख दिली. आपला आशीर्वाद खरा करण्यासाठी व पांडव वाचण्यासाठी भीष्मांनी तिला उपाय सांगितला. यानुसार शिखंडी समोर आल्यावर तो स्त्री म्हणून जन्माला आल्याकारणाने भीष्म शस्त्र चालविणार नाहीत. त्यामुळे शिखंडीच्या आडून अर्जुनाने भीष्मांवर शस्त्र चालवून त्यांना मारावे. दुसऱ्या दिवशी युद्धात याच उपायाने अर्जुनाने भीष्मांना शरबद्ध केले.
27 Nov 2010 - 1:04 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत आहे.
परशुराम हे भिष्माचे गुरु कधीच न्हवते. मात्र भिष्माशी झालेल्या २३ दिवसांच्या अखंड युद्धानंतर त्यांनी शस्त्रास्त्रांचा त्याग करुन तपश्चर्येला जाताना आपल्याकडील सर्व संपत्ती दान केली. हे दान पुर्ण झाले आणि तिथे द्रोणांचे आगमन झाले. रीक्तहस्ताने उभ्या असलेल्या परशुरामांनी शेवटी आपल्याकडी सर्व शस्त्र-अस्त्र विद्या मंत्रार्चनेसकट द्रोणांना दिली. त्यामुळे त्यांना एका अर्थाने द्रोणांचे गुरु म्हणता येईल.
27 Nov 2010 - 1:04 pm | मृत्युन्जय
भीष्म क्षत्रिय असूनही परशुरामाचा शिष्य कसा?
भीष्म शंतनु आणि गंगा यांचा मुलगा. गंगेच्या विनंतावरुन परशुरामांनी भीष्माला शिकवणे मान्य केले.
शिखंडी पुरुष झाला हे भीष्माला माहिती नव्हतं का?
माहिती होते
की माहिती असूनही मरायचं म्हणून त्याने शस्त्रं टाकली?
युद्धाचा वीट आला म्हणुन शस्त्र टाकली. एकाबाजुला कृष्ण आणि दुसर्याबाजुला आपण असेपर्यंत युद्धाचा निकाल लागणार नाही हे त्यांना माहिती होते म्हणुन त्यांनी शस्त्रे टाकली. शिखंडी हे एक कारण देखील होते कारण त्याच्या जन्माचे रहस्य ते जाणुन होते. त्यांना कुठुन कळाले हे महाभारतात लिहिलेले नाही (किमान मला माहित नाही)
की खरोखरच शिखंडीने पराक्रम करून भीष्माला मारलं?
पराक्रम कोणीच केला नाही. भीष्म शिखंडीच्या आडुन मारलेल्या अर्जुनाच्या बाणाने शरपंजरी पडले.
27 Nov 2010 - 3:13 pm | शरद
(१) भीष्माला परशुरामांनी कसे शिकवले ?
परशुरामाने एकवीसवेळा पृथ्वी नि:क्षत्रीय केली होती तरी नंतर पीतरांच्या सांगण्यावरून त्याने तो राग सोडून दिला होता. नंतर फक्त दोन वेळा राग उफाळून आला म्हणून त्याने क्षत्रीयांशी भांडण काढले. पहिल्यांदी शंकराचे धनुष्य मोडले म्हणून रामाबरोबर व नंतर आपले म्हणणे आपला शिष्य ऐकत नाही म्हणून भीष्माबरोबर. दोनही वेळा त्याचा पराभव झाला. कालाय तस्मै नम: ! भीष्माचे वडील क्षत्रीय असले तरी तो गंगापुत्र म्हणजे देवपुत्र होताच. गंगेने भीष्माच्या जन्मानंतर त्याला स्वर्गी नेले व तेथे सर्वगुणसंपन्न करावयाचे म्हणून परशुराम, वशिष्ट,बृहस्पती व शुक्राचार्य यांच्याकडून धनुर्विद्या, वेद, अर्थशास्त्र व राजधर्म यांचे शिक्षण दिले. व तो तरुण झाल्यावरच त्याला परत शंतनूकडे पोचविले. ( महाभारत, आदिपर्व, संभवपर्व,अ.१००)
(२) वरारोहा म्हणजे शब्दश: आरोहण करण्यास श्रेष्ट. आज ग्राम्य वाटेल असा हा शब्द पूर्वी सर्रासपणे , नि:संकोचपणे संस्कृत भाषेत वापरलेला आढळतो. हनुमानासारखा ब्रह्मचारीही याचा उपयोग करतो.
(३)शिखंडी पूर्वी स्त्री होता हे भीष्मांना माहीत होते का ? हो. अंबा आपल्यावर फार खवळून गेली आहे हे माहित झाल्यामुळे त्यांनी तिच्या पाळतीवर हेर ठेवले होते व तिच्या दोनही जन्मातील माहिती त्यांनी अद्ययावत ठेवली होती. युद्धाच्या आधी भीष्म दुर्योधनाला सांगतात की शिखंडीवर बाण सोडणार नाही कारण तो प्रथम स्त्री होता. व नंतर वरील गोष्ट ते सांगतात.(महाभारत, उद्योगपर्व,अ.१७३) भीष्म इच्छामरणी असल्याने अर्जून किंवा शिखंडी कोणीच त्यांना मारणे शक्य नव्हते. झाले असे की युद्धाच्या दहाव्या दिवशी शिखंडीच्या मागून अर्जुन लढला व भीष्म शिखंडीवर बाण सोडत नाहीत याचा त्याने फायदा घेतला. भीष्मांना अष्टवसूंनी सांगितले म्हणून त्यांनी युद्ध थांबविले. भीष्म रथाच्या खाली पडले याचा अर्थ तांत्रिक दृष्ट्या ते मेले असा घेऊन युद्ध थांबंविण्यात आले. शिखंदी मोठा योद्धा होता, महारथी होता पण अर्थात भीष्म-अर्जून यांच्या पंक्तीतला नव्हता.
शरद
27 Nov 2010 - 10:01 am | अविनाशकुलकर्णी
मनोरंजक
27 Nov 2010 - 10:24 am | स्वानन्द
मस्स्त! महाभारतासारख्या सुरस आणि रोचक आणि मनोरंजक कथा आजवर तरी वाचनात आल्या नाहीत.
27 Nov 2010 - 12:23 pm | परिकथेतील राजकुमार
कथा माहिती होती, पण तुमच्या शैलीत वाचताना अजुन मला आली :)
लिंगबदलाचे असेच अजुन एक उदाहरण म्हणजे अर्जुन. मिळालेल्या शापाचा खुबीने वापर करुन त्याने अज्ञातवासातले एक
वर्ष लिंगबदलाच्या सह्हायाने पुर्ण केले.
27 Nov 2010 - 12:51 pm | स्पा
मिळालेल्या शापाचा खुबीने वापर करुन त्याने अज्ञातवासातले एक
वर्ष लिंगबदलाच्या सह्हायाने पुर्ण केले
बदललेलं लिंग कुठे ठेवलेला होतं मग त्याने?
उगी आपलं कुतूहल म्हणून.....
(ह घे )
27 Nov 2010 - 12:52 pm | अवलिया
शमीच्या झाडावर बहुधा !
27 Nov 2010 - 12:54 pm | स्पा
खल्लास.......................
सांद्लोय खुर्चीवरून.....
:)
27 Nov 2010 - 12:46 pm | अवलिया
शरदराव ! जियो ! मस्त लेखमाला चालु आहे !!
फक्त माहिती देतांना ज्यांना काही माहिती नाही किंवा ज्यांचे हेतु आधीच ठरलेले आहेत त्यांचा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या ! :)
27 Nov 2010 - 1:23 pm | शिल्पा ब
एक माहिती म्हणून छान लेख...आता अशा गोष्टींबाबत बोलू नये पण खरोखरच असे काही लिंगबदल कसे झाले असतील? शिखंडी वा अर्जुन कोणी असो...
म्हणजे आमच्या पूर्वजांनी विमानाचा शोध लावला यासारखेच आहे म्हणून विचारले...
अवांतर: महाभारत हि माझी अत्यंत आवडती कथा आहे...आणि कर्ण पण आवडतो
27 Nov 2010 - 5:01 pm | यकु
मुळात ही सगळी कल्पित पात्रे होती.
नाटकात नाही का गरज भागवण्यासाठी सर्वात जास्त सूट होणार्या नटाला दोन भूमिका कराव्या लागतात तसं!
28 Nov 2010 - 12:44 am | शिल्पा ब
<<<मुळात ही सगळी कल्पित पात्रे होती.
काढला का वाद ?
27 Nov 2010 - 5:40 pm | इंटरनेटस्नेही
मला वाटतं लिंग बदलाच्या बाबतीत अधिक माहिती मायकल जॅक्सन देऊ शकतील.. पुढच्या सर्वपित्रीला भेटतो त्याला.
असो.. सविस्तर प्रतिसाद नंतर.. सध्या अंमळ 'कामा'त आहे.
-
इंटेश देशमुख.
28 Nov 2010 - 3:47 pm | स्पंदना
रोचक!! महाभारताच्या एका कथेमाग अश्या अनेक कथा असतात.