अशीच मे महिन्यातील एक दुपार...
अशीच मे महिन्यातील एक दुपार...बाहेर रणरणत उन...
मी माझ्या भाच्याकडे गेलो. मे महिन्याची सुट्टी सुरू झाली होती. म्हणल बघाव काय चालू आहे ते ! तर स्वारी आरामात कंप्यूटर गेम खेळत बसली होती. बाजूला लेज चिप्स आणि कोक होतच.
मी विचारला "काय सुट्टिचे काय प्लान आहेत?" तो स्क्रीन वरुन लक्ष जराही विचलित न करता तो म्हणाला " काही नाही, आजच ही वॉर अँड वॉरक्रॅफ्ट आणली आहे. आज खेळून संपवीन मग उद्या दुसरा पार्ट आणायचा.. एक किंग्डम डेस्ट्राय केलाय मी, आता उद्या दुसर उडवायचाय. शिवाय काही चिट कोड्स ही डाउनलोड करायचे आहेत." एवढा बोलून तो पुन्हा त्या e-खाटिकखान्याकडे वळला. मी गप्प बसलो. आमचा संवाद संपला.
माझी बाकीची काम करून घरी परत आलो. घरी येऊन जेवलो. म्हणल आता जरा पडि घ्यावी. फ्यान जोरात सोडला. त्याच्या घर्घर आवाजबरोबर मला झोपेची गुंगी चढायला लागली. एव्हढ्यात "धप्पा" असा असा कोणीतरी खाली ओरडल आणि मुलांचा गोंधळ ऐकू आला. मी झटकन उठलो आणि बघितले तर काही मुलं लपंडाव खेळत होती. मन झटकन भूतकाळात गेल...
अशीच मे महिन्यातील एक दुपार...बाहेर रणरणत उन...
मोठी माणस त्यांची त्यांची काम आवरून, जेवून खाउन आता वामकुक्षीच्या तयारीला लागलेली असत. मग हळुहळू बाळगोपाळ मंडळीच्या हालचाली सुरू होत. एकेक भिडू वाड्याच्या मधल्या अंगणात जमा होऊ लागे. मग कुठला तरी एखादा खेळ ठरायचा आणि धमाल सुरू व्हायची.
काय नसायच त्या खेळात. स्पर्धा, हेवेदावे, पूर्व-वैमनस्य, भांडण, असुया,.... पण फक्त खेळापुरतच. बाकी एरवी फक्त मैत्री.
एकट्याने बसून कंप्यूटर गेम खेळण्यापेक्षा लाख पटीने मोलाच शिक्षण ह्या खेळामधून मिळायच आणि ते सुद्धा फुकट !!!
आता कुठे कुणी हे खेळ खेळत असतील का?
आपल्या आठवणी ताज्या करण्यासाठी ह्या काही जन्त्रि पहा:
अंगणात खेळले जाणारे खेळ
विष-अमृत
रुमाल पाणी
लंगडि
लपंडाव - हा खेळ जरा संध्याकाळी सुरू करायचा आणि "अंड" झाल की फार मजा यायची.
आंधळी कोशिंबीर - कोणी कुठे भलातीकडेच चालला आहे अस वाटल की मागून ओरडायच "स्टॉप स्टॉप"
डुककर मुसंडी - हा खरतर पावसात खेळायचा खेळ. दोन्ही हात मानेच्या मागे ठेऊन कोपर पुढे करून फक्त डोक्याने दुसर्याला बाद करायच. बरेचदा डोक आपटून राज्य करणाराच बाद व्हायचा.
पायमारी - जमिनीवर पाय पसरून बसायच. हाताच्या आधारांवर रांगत रांगत चक्क पायानी बाद करायच.
डबाडा ऐस पैस - "डबाडा ऐस पैस" अस ओरडायला मजा यायची.
गोट्या- यातल्या "हडकी" ने टोले द्यायला माझे हात आत्ताही शिवशिवत आहेत.
लगोरी
टिपरी पाणी- मुलींचा खेल
चोर पोलिस
पतंग उडविणे - ट्यूब लाइट च्या काचा कुटून घरच्या घरी मांजा बनवाने
खांब खांब खांबोळी - "शिरापुरी.... पुढच्या घरी...."
टिपी टिपी टिप टॉप - वॉट कलर यु वोंट? आणि मग वाळत घातलेल्या कपड्यापासून ते शर्टच्या बटणापर्यंतचे सगळे रंग शोधून होत.
काही बैठे खेळ
सापशीडी - अगदी शेवटी एक मोठ्ठा साप आहे त्याने गिळल की खल्लास
व्यापार - एकदा हॉटेल झाला की निवांत घ्यायच !!
ल्युडो -
बुद्धिबळ
पत्ते - असंख्य खेळ आणि जादू
कॅरम
उनो
नाव गाव फळ फूल - असा खेळ या पृथ्वीवर होता हे लोकांना सांगूनसुद्धा खर वाटणार नाही. !!
घरगुती सरबते
रसना - मे महिन्याच स्पेशल डील
पन्ह
वाळा
मस्तानी
पुस्तक
चांदोबा - विक्रम वेताळ, आणि साउथ इंडियन स्टाइल चित्र
इंद्रजाल कॉमिक्स - वेताळ उर्फ "चालता बोलता समंध" , बहाद्दुर, मॅनड्रक्स आणि लोथार, फ्लॅश गॉर्डन. (ही आता कुठे मिळतात का?)
कुमार -
चंपक - खरच भम्पक असायच.
सुट्टीची स्पेशल पॅकेजेस
पुण्यात लहान मुलांसाठी बहुदा एव्हढीच ठिकाण होती.
संभाजी बाग - किल्ला , मत्स्यालय, भेळ, पाणीपुरी, बंदुकीने फुगे फोडणे
पेशवे पार्क - फुलराणी (तिकीट काढून बर का!! )
आईसक्रिम पॉट आणून आईसक्रिम बनवणे
पर्वती - पाहण्यासारख काय आहे मला अजुन कळलेले नाहीये.
राजा केळकर संग्रहालय
छंद
काडेपेट्यांचे छाप जमवणे - माझी आजी याला "भिकार्यांचे डोहाळे" म्हणायची.
स्टॅम्प जमवणे
रंगीत पिसे जमवणे - यात पिसांना "पिल्ल"(?) व्हायची म्हणे !!!!
दगड, गोटे, शंख, शिंपले जमवणे - पुन्हा तेच. "भिकार्यांचे डोहाळे" !!!
पिंपळाच्या पानाला वहित ठेऊन जाळी पाडणे.
शाळेतील बैठे खेळ
राजा राणी चोर शिपाई - ऑफ नाहीतर बुळ्या मास्तराच्या तासाला खेळायला बेस्त
पुस्तकातल क्रिकेट - याला "बालभारती" च पुस्तक म्हणजे दुधात साखर !!!
पेनापेनी - कॅरम सारखा पेनांनि खेळायचा खेळ. यात एकदाच "हिरो" च्या पेनाने मारता यायच. "ताड्या शॉट"
बॉलबेरिंग चा खेळ
स्टीलची पट्टी बाकाच्या फटीत घालून आवाज काढणे.- धनुष्याची प्रत्यंचा खेचून अर्जुनाने काय आवाज काढला असेल हे ऐकायच असेल तर हा आवाज ऐकाच.
- बोलघेवडा
प्रतिक्रिया
25 Nov 2010 - 11:43 am | डॉ.श्रीराम दिवटे
छान! परंतु सध्या उन्हाळा कुठाय?
25 Nov 2010 - 11:47 am | घाशीराम कोतवाल १.२
बोलघेवड्या खरच मजा होती राव तेव्हाच्या खेळात खुप धमाल यायची आता ती मजा राहिली नाही राव तु एकदम १० -१५ वर्ष मागे नेलस राव
25 Nov 2010 - 11:54 am | यकु
पावसाळ्यात आमच्याकडे एक खेळ असतो - खुपसा-खुपशी!
एक गज घ्यायचा, ओल्या जमिनीत रिंगण ओढायचे आणि त्यात प्रत्येकाने गज खुपसायचा.
ज्याचा गज जमिनीत न खुपसता पडला की त्याची कंबख्ती!
कारण नंतर बाकीचे गज जमीनीत मारत बरेच दूर घेऊन जातात - आणि तेवढ्या लांबून लंगडी घालत रिंगणापर्यंत यायचे. पुन्हा गज खुपसता आला तर ठीक - नाहीतर पुन्हा पायाची हाडं खिळखीळी.
चला - खेळायची का खुपसा खुपशी?
25 Nov 2010 - 12:16 pm | धुमकेतू
हल्लि कोणी आट्यापट्या , हन्टर-बन्टर , भोवरा हे खेळ खेळतात का ?
25 Nov 2010 - 12:24 pm | स्पा
प्लास्टिक च्या "सन" (कंपनीचं नाव) बॉल ने " शेकाशेकी" खेळायला जाम धमाल यायची...
पण फारच " पाशवी" खेळ होता तो......
25 Nov 2010 - 1:52 pm | स्वतन्त्र
आम्ही यालाच अप्पारप्पी म्हणायचो. आणि त्या चेंडूला Kitkat .काय मस्त होते ते दिवस !
25 Nov 2010 - 2:24 pm | गणेशा
सर्व जुणे दिवस आठवले .. धन्यवाद .. ९९ % येथे लिहिलेले सगळे खेळ खेळायचो मी ..
फक्त डबाडा ऐस पैस ला - डब्बा एक्सप्रेस म्हणायचो ..
25 Nov 2010 - 2:44 pm | महानगरी
अजून एक खेळ असे - दगड का माती नावाचा
तसेच खेळायच्या आधी चकावे लागे - त्या साठी राम राइ साई सुट्ट्यो असा गजर - अर्थ माहिती आहे का कुणाला याचा?
व्यापारात भायखळा, वाळकेश्वर वगैरे मिळाले की अत्यानंद
लेख वाचताना जुन्या आठवणी आणि शब्द जागे झाले..
25 Nov 2010 - 5:23 pm | अपूर्व कात्रे
चंपक - खरच भम्पक असायच.
लेखकाचा त्रिवार निषेध.....
चंपक आणि ठकठकवर माझे बालपण पोसले गेलेय
25 Nov 2010 - 5:46 pm | अन्या दातार
कात्रेजी,
१००००००००००००% सहमत
चंपक आणि ठकठक म्हणजे अफलातून धमाल; त्यातही जास्तकरुन ठकठक
(ठकठकमधला बन्या अजुनही आठवतोय.)
2 Oct 2013 - 9:06 pm | अमित खोजे
चंपक ठकठक आणि चांदोबा
25 Nov 2010 - 9:31 pm | रेवती
अगदी अशीच असायची उन्हाळ्याची सुट्टी. नातेवाईकांकडे मुक्काम किंवा त्यांचे आपल्याकडे.....मग तर अजून धमाल.
आईने एकदा गुळाची ढेप आणली आणि फोडून भरायला जमले नाही. उन्हाळ्यात उष्ण म्हणून पन्ह्याशिवाय गूळ खायला परवानगी नव्हती. आम्ही पाहुणेकंपनीला हाताशी धरून अर्धी ढेप बोटाने उकरून संपवली होती. तेंव्हा रसनाचे आकर्षण जास्त असायचे आणि मुले पन्ह्याला नाकं मुरडायचो.
लायब्ररीतून प्रत्येकी तीन तीन पुस्तकं मिळायची ती येताना वाटेतच चालत असताना वाचायची. धाकट्या भावाची मोठ्ठ्या अक्षराची पटकन रस्त्यात वाचून टाकत असू. नंतर काकांनी आजी आजोबांच्या नावाने वाचनालयाला मोठी देणगी दिल्यावर फक्त आम्हाला पाच पुस्तके प्रत्येकी अशी आणायला मिळायची.
2 Oct 2013 - 9:14 pm | अमित खोजे
पुस्तकांबद्दल चे खरे आहे. वाचनालयातून पुस्तके आणली कि घरी येईपर्यंत दम निघत नसे. येतानाच चालत चालत कमीत कमी ३ गोष्टी तरी संपलेल्या असायच्या. मग बाबांनी मला १० ० गोष्टींचे पुस्तक विकत घेऊन दिले आणि मग कुठे ते चांगले १ ० दिवस पुरले . मग १ ० दिवसांनी ये रे माझ्या मागल्या. परत भुणभुण सुरु - " आई आता काय करू? "
सुट्टीत कधी कधी चांगलेच बोर व्हायचे. (बोअर हा शब्द इंग्लिश आहे मी मराठी हे अजून कळलेले नाही. तेव्हा मात्र आम्ही तो सर्रास वापरत असू ). सगळे खेळ खेळून संपले कि मग दुपारी भांडणे सुरु व्हायची. ती पण timepass म्हणून. मग दुपारी वामकुक्षी घेणार्यांचा ओरडा बसला कि बाहेर पळून जायचे. थोड्या वेळाने परत येउन पुन्हा गोंधळ! मग त्यामध्ये चोरून रसना पी कुठे पन्हच सांडून ठेव. दुपारी ४ ला आई उठली कि मग तिला आमच्या सगळ्या कार्यक्रमाचा पत्ता लागायचा पण तेव्हा आमचा पत्ता नसायचा. आम्ही तर केव्हाच धूम ठोकलेली असायची.
26 Nov 2010 - 5:28 am | शिल्पा ब
छान लेख...आताच्या मुलांना हा छान अनुभव कधी मिळणार?
26 Nov 2010 - 2:11 pm | इंटरनेटस्नेही
मस्त!
26 Nov 2010 - 2:30 pm | जागु
"भिकार्यांचे डोहाळे"
हसु आवरले नाही.
छान लेख.
28 Nov 2010 - 4:38 pm | मिहिर
मस्त!
28 Nov 2010 - 8:17 pm | स्वाती दिनेश
शाळेत असतानाच्या मे महिन्याच्या, दिवाळीच्या सुट्ट्या आठवल्या..
स्वाती
1 Dec 2010 - 9:25 am | मदनबाण
छान लेख... :)
मला पतंग उडवायला फार आवडायचे... अनेक वर्षात फिरकी हातात धरलीच नाहीये... :(
2 Oct 2013 - 8:28 pm | चित्रगुप्त
आवडला लेख.
तुमच्या त्या भंपक 'चंपक' मधे बरीच वर्षे 'डिंकू' नावाची मालिका मी लिहीत/चित्रित करत होतो ते आठवले.
2 Oct 2013 - 9:33 pm | अमित खोजे
डिंकू ची चित्रे तुम्ही काढत होतात? छानच !!!
2 Oct 2013 - 9:59 pm | अर्धवटराव
तुम्ही ते डिंकुकार होय... याच डिंकुचा भाऊ वाटावा असा "चाणाक्ष्य हेर" मालिका पण तुम्हीच लिहायचे का? ति मधेच का संपवली? राजाची चोरीला गेलेली तलवार भोंदु मांत्रीक शोधुन देतो (पहारेकरी गाढवाचा मुर्खपणा कामि येतो). त्या पुढे का नाहि सरकली ति मालिका? मला अजुनही उत्सुकता आहे कि डिंकु त्या मांत्रीकाचा पडदाफाश कसा करतो ते :)
3 Oct 2013 - 1:51 pm | कपिलमुनी
अजून लक्षात आहे..
2 Oct 2013 - 10:18 pm | यसवायजी
@ राजा राणी चोर शिपाई - ऑफ नाहीतर बुळ्या मास्तराच्या तासाला खेळायला बेस्त
----
आम्ही कॉलेजात होतो तेंव्हा पण एका बुळ्या मास्तराच्या तासाला हा खेळ खेळायचो. फक्त बदल इतकाच होता की त्या चिठ्यांत राजा राणी ऐवजी क्लासमधल्या पोरींची नावं असायची. आणी त्यांचे मार्क (रेटींग) पण ० तो १०० असे दिले होते. ;)
पुढे मास्तर शिकवतायत आणी मागे आमचं चाल्लय.. माझ्याकडे ३ शीला आणी १ अमृता आहे.., मला सुजाता पास कर ना...
----
आठवणी..
2 Oct 2013 - 10:37 pm | आसिफ
खुपच छान..हे वाचुन मी देखिल माझ्या बालपणी काय काय 'उद्योग'करायचो ते आठवले.
मला देखिल काड्यापेट्यांची चित्रे ,पोष्टाची तिकिटे,जुनी नाणी जमवन्याचा छंद होता.मी जिथे जाईन तिथे या वस्तु शोधत फिरायचो, या 'भिकार' नादामुळे कित्येकदा घरच्यांचा मार देखिल खाल्ला आहे.
वर लिहलेले सर्व खेळ खेळलेले आहेत. त्यात आणखी भर म्हणजे
सिगरेटचे पाकिट:सिगरेट ची मोकळी पाकिटे विशिष्ट रितीने दुमडुन त्याचा चोकोन तयार करायचा. प्रत्येक चोकोनाची किम्मत ते सिगरेटचे पाकिट किती आकर्षक या वर असायची.उदा. गोल्ड फ्लेक्स- १० पॉईट्स, गुडन गरम-१०० पॉईट्स.
काचेच्या गोट्या, सिमेंट्ची गोटी: : आम्ही याला ऐरे म्हणायचो. यातही वेगवेगळे 'डाव' असायचे.
आम्ही जिंकलेले ऐरे मोठ्या बरणीत, किंवा बाट्लीत ठेवायचो.दिवसभर उगचच त्या बाटलीचा आवाज करायचो.
भोवरा, आणखी एक खेळ होता, त्याला आबादाबी अस्स काहीतरी म्हणायचो. त्या खेळात फक्त मारामारी असायची.
यातल्या त्या काळी जमवलेल्या सर्व वस्तु मी अगदी परवा परवा पर्यंत जपुन ठेवल्या होत्या.
3 Oct 2013 - 12:04 am | अर्धवटराव
गुडन गरम... धुम्रपानाचा श्रीगणेशा सहसा याच सिग्रेटीने व्हायचा. भारी जोश दाखवुन मोठ्ठा कश मारला आणि त्यानंतर दिवसभर खोकलत बसलो होतो :D