प्रतिबिम्ब

मूकवाचक's picture
मूकवाचक in जे न देखे रवी...
22 Nov 2010 - 11:39 pm

माझ्या छोट्याश्या कौलारू घराच्या एका कोपर्यात
धुनीवर टांगलेला आरसा तेजाळला आहे
नितळ आणि रिक्त आरशात
तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटते आहे.

माझ्या पादुका दरवाजाजवळच्या कोनाड्यात
धीरोदात्तपणे प्रतिक्षा करत आहेत.
हे घर जिथे मी सारे जीवन व्यतीत केले.
जिथे काही क्षणांपुर्वीच प्रखर सूर्यप्रकाशात
सचेतन मी भलत्याच खोड्या काढत खळखळून हसायचो.

आज इथे संतजन लोटले आहेत.
एकतारी छेडत निर्गुणी भजने गात आहेत.
त्यांचा आनंद ... त्यांचे हास्य पहाटेच्या शीतल वार्याच्या झुळूकेवर स्वर होऊन
माझ्या रिकाम्या खोल्यांमधून गुंजते आहे.

जिथे काल मी अत्यवस्थ, मरणासन्न पहुडलो होतो
कुणीतरी धूपदाणीतला धूप प्रज्वलित केला.
तसे काहीच बदललेले नाही
फक्त यापुढे हे 'माझे घर' नाही.

धूप मंदगतीने जळतो आहे.
आणि उजाडणाऱ्या प्रत्येक दिवसाबरोबर
आज न उद्या माझ्या आठवणी पुरत्या विस्मृतीत जातील.
धुनीवर टांगलेला आरसा पुन्हा तेजाने न्हाऊन निघेल
पुन्हा एकदा नितळ आणि रिक्त आरशात
तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटेल .....
तळ्यातल्या तरंगांचे प्रतिबिंब उमटेल .....

(स्वामी आनंद मिलारेपा यांच्या काव्याचा भावानुवाद)

शांतरसमुक्तक

प्रतिक्रिया

राघव's picture

23 Nov 2010 - 10:33 am | राघव

छान आहे.
अहो पण सोबत, मूळ काव्यसुद्धा द्या की. :)

स्वानन्द's picture

23 Nov 2010 - 10:42 am | स्वानन्द

सहमत.

बाकी मुक्तक सुरेखच.

मूकवाचक's picture

23 Nov 2010 - 4:09 pm | मूकवाचक

जालावर वाचले:
http://www.oneskymusic.com/poetry.htm

गणेशा's picture

23 Nov 2010 - 4:48 pm | गणेशा

आवडला अनुवाद