"और आज का हमारा घर बैठे लखपती बनानेवाला सवाल हैं - बासमती और परिमल यह किस खाद्यप्रकार की किस्में हैं?
आपका उत्तर आप एसेमेस द्वारा इस नंबर पर भेज सकते हैं.....या फिर इस नंबर पर कॉल कर सकते हैं....
महानायकाने हा प्रश्न विचारल्यावर माझ्या मनात विचारचक्र सुरु झाले. अमिताभसारख्या अभिनयसम्राटाला टेलिशॉपिंगमधल्या पोपटपंची करणार्या दुय्यम अभिनेत्यांसारखी (आलोकनाथ, भाग्यश्री, श्वेता तिवारी, सुधीर पांडे, सुधीर दळवी इत्यादी मंडळी असल्या जाहिराती करतांना दिसतात) ही पोपटपंची करतांना बघून एसेमेसमधून आणि फोन कॉल्समधून मिळणार्या कोट्यवधींच्या कमाईचा अंदाज बांधता येतो.
अशा पद्धतीचा एक एसेमेस किंवा कॉल ३ रुपयाला पडतो. माझ्या अंदाजाने 'कौन बनेगा...' मध्ये भाग घेण्यासाठी किंवा 'घर बैठे' लखपती होण्यासाठी किमान पन्नास लाख लोक रोज लाख रुपयासाठी असले एसेमेस किंवा कॉल्स करत असतील. म्हणजे एसेमेस आणि कॉल्समधून मिळणारा पैसा जातो दीड कोटी रुपयांच्या घरात. आठवड्याचे चार दिवस हा कार्यक्रम चालतो. म्हणजे एका आठवड्याचा एसेमेस आणि कॉल्सचा रेवेन्यू जवळपास सहा कोटी रुपये!!!!
मी दोन-तीनदा 'कौन बनेगा...' मध्ये भाग घेण्यासाठीचे एसेमेस पाठवले आणि पुढचे तीन दिवस वाट बघत बसलो. माझा मोबाईल नीट चालतो आहे की नाही, व्यवस्थित चार्ज केलेला आहे की नाही हे सतत तपासायचे म्हणजे डोक्याला ताप होऊन बसला. नाहीतर ऐनवेळेस त्यांचा फोन यायचा आणि माझा फोन गतप्राण झालेला असायचा या भीतीपोटी मी कुठलीच रिस्क घेत नव्हतो. मध्येच कुठल्या अनोळखी नंबरवरून फोन आल्यास मी माझ्या जागेवरून उठून एका कॉन्फरंस रूममध्ये जायला लागलो. शांतपणे आणि काळजीपूर्वक सगळे डिटेल्स कळायला हवेत. स्टुडिओ कुठे आहे, कधी पोहोचावे लागेल, सोबत कोणाला घेऊन येता येईल, किती दिवस रहावे लागेल, सुटी टाकावी लागेल की शनिवार-रविवार या दोन दिवसात शूटिंग संपेल, अमिताभसोबत फोटो काढता येईल का...एक ना हजार प्रश्न...शांतता हवीच. शिवाय त्याचवेळेस टॅक्सची गणिते डोक्यात घोळत असत. अगदी सहा लाख पंचवीस हजार जरी जिंकले तरी टॅक्स कापून हातात किती पडतील, जास्त जिंकले तर अधिक मज्जा वगैरे प्रश्न डोक्यात वळवळत असत....उत्सुकतेने कॉल घेतल्यावर मात्र हमखास भ्रमनिरास (काय मस्त पंचलाईन जमलीये; 'हमखास भ्रमनिरास'! एअर इंडिंयाने वापरायला हरकत नाही.) होत असे.
"हॅलो सर, मैं लक्ष्मी बँक से कोमल बात कर रही हूं..."
"जी नहीं, मैं आपसे कोमल बातें नही कर सकता..."
"नही सर, आप कोमल नही, मैं कोमल हूं"
"अच्छा, आप कोमल हो? पर मैं कैसे मान लूं की आप कोमल हो, मैंने तो आप को अभी तक देखा ही नही. देखूंगा तो पता चलेगा ना की आप कोमल हो, या कमल हो, या मलमल हो...देखना तो पडेगा ना?"
फोन बंद, आमचा रीतसर भ्रमनिरास! पुन्हा कामात डोकं. पुन्हा फोन, या वेळेस पेंशन प्लॅन घेण्याचा आग्रह. आमच्या निवृत्तीनंतरच्या भाजी-भाकरीची यांनाच जास्त चिंता. असो. कोमलच्या कोमल आवाजामुळे हवेहवेसे वाटणारे विषयांतर झाले खरे...लखपती होण्यासाठी पण मी जंग जंग पछाडले...रोज एसेमेस पाठवायचो. बरं यांचे प्रश्न इतके सोपे असायचे की उत्तर पाठवायचा मोह व्हायचाच. "वानरों की सेना ने क्या जलाया?" या प्रश्नाचे ऑप्शन्स होते लंका, पुंछ, घर, दिल...किंवा असेच काहीतरी. मी खूपच हुशार...मी लगेच लंका हे उत्तर पाठवून दिले. नंतर एकदा प्रश्न आला "कृष्ण भगवान इनमें से कौनसा वाद्य बजाते थे?" ऑप्शन्स होते गिटार, तबला, बांसुरी, मंजिरा. लगेच पाठवले....मग माझ्या टाळक्यात प्रकाश पडला. हे उद्या "फुटबॉल का उपयोग नीचे दिये गये किस खेल में होता हैं?" असा देखील प्रश्न विचारतील. कारण सोपे आहे; जास्तीत जास्त लोकांनी या खेळात सहभागी व्हावे आणि मोबाईल कंपन्यांचा धंदा जास्तीत जास्त चालावा आणि त्यायोगे 'कौन बनेगा...' ला अधिकाधिक रेवेन्यू मिळावा...
सहभागप्रेरक एसेमेस आणि कॉल्स हे असे फसवे असतात. सोपे प्रश्न, कोटी आणि लाख रुपयांचे आमिष, भावनिक पातळीवर लोकांना मते नोंदविण्यास केलेले आव्हान, शंभरदा दाखवलेले आणि ऐकवलेले गायकाचे गाव, मुलाखती घेऊन दाखवलेली त्याची शाळा, त्याच्या भागातल्या लोकांना केलेले सूक्ष्म आव्हान... हा सगळा लोकांनी मोबाईल हातात घेऊन धपाधप एसेमेसेस पाठवावेत किंवा कॉल्स करून आपली मते नोंदवावीत म्हणून हुशारीने केलेला व्यावसायिक खटाटोप असतो. बरं एक कॉल किंवा एक एसेमेस चांगला तीन-तीन रुपयांचा. म्हणजे आपण कुणासाठी मत नोंदवावे तर झपकन आपल्याला तीन रुपयांचा फटका बसणार; ज्याला मत दिले आहे त्याच्या खिजगणतीतही नसणार की आपल्याला अमुक एका व्यक्तीने मत पाठवले आहे. शिवाय संगीत, अभिनय या कलागुंणांवर आधारित स्पर्धांच्या कार्यक्रमांना केवळ स्पर्धकाच्या गावचा म्हणून दूध डेअरीचा चेअरमन आणि ताजे बोल्हाईचे मटण विकणारा, दोघेही मते पाठवतात. त्यांची आयुष्यातली सांगितिक मजल मर्तिकाच्या वेळेस वाजवणारे डफडे या वाद्याच्या पुढे गेलेली नसते. त्याच क्षणी कार्यक्रमातले दिग्गज परीक्षक कफल्लक होतात आणि असल्या बाजारीकरणापुढे नाइलाजास्तव मान तुकवतात. अर्थात त्यांना देखील घसघशीत मानधन मिळते हा मुद्दा अलाहिदा. आणि म्हणूनच या सगळ्या प्रकारांना त्यांची संमती असते. शिवाय मिळणारी प्रसिद्धी, त्यातून मिळणारे नवीन काम, चर्चेत (लाईमलाईट) मध्ये राहण्याची संधी इत्यादी फायदे असतातच. त्यात त्यांची काही चूक आहे असे मात्र अजिबात नाही. नुसती साधना करून आणि रियाझ करून पोट भरत नाही हे खरे. अंगी असलेले गुण बाहेर दिसले तर पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा आणि सन्मान मिळेल आणि असले कार्यक्रम त्यासाठी खूप उपयोगी ठरतात.
'सारेगमप' सारख्या किंवा 'बिग बॉस' सारख्या कार्यक्रमांसाठी प्रेक्षकांची मते मागणार्या एसेमेसेसची आणि कॉल्सची उलाढाल देखील जवळपास इतकीच होत असावी. शेवटी करमणूक हा एक व्यवसाय आहे. कला हा व्यवसाय होऊ नये असे कित्येक दिग्गजांचे मत असले तरी आजकालच्या जागतिकीकरणाच्या दिवसात टिकून राहण्यासाठी कलेचा व्यवसाय करून आनंदात आणि ऐषोआरामत जगण्याची मनिषा बाळगणे गैर म्हणता येणार नाही.
एसेमेस पाठवणे किंवा कॉल्स करणे मात्र आपल्या हातात आहे. हा शेवटी ज्याच्या त्याच्या मर्जीचा आणि आवडीचा प्रश्न आहे...
प्रतिक्रिया
17 Nov 2010 - 3:01 pm | विलासराव
एसेमेस पाठवणे किंवा कॉल्स करणे मात्र आपल्या हातात आहे
नक्कीच. मी ह्या फंदात कधी पडलो नाही.
17 Nov 2010 - 3:49 pm | ५० फक्त
मी पण या फंदात कधीच पडत नाही, शिवाय दसरा दिवाळीला पण - सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे असले एसएसएम पण करत नाही. या एसएसएम ला पण नेहमीपेक्षा जास्त दर लावतात.
पण एक गंमतीची गोष्ट आहे की -- या एसएसएम व कॉल वर मोबाईल कंपन्या चालतच नाहीत, त्यांचे सर्वात जास्त उत्पन असते रिंग टोन व डायलर टोन सारख्या तथाकथित व्हॅल्यु अॅडेड सेवा.
हर्षद
18 Nov 2010 - 8:49 am | समीरसूर
दसरा, दिवाळी, होळी, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, व्हॅलेन्टाईन डे, फ्रेंड्स डे, रोज डे अशा हजार दिवशी एसेमेस शुभेच्छांचा वर्षाव होतो. मी तर ऐकले आहे की मोबाईल कंपन्या अशा दिवसांसाठी खास संदेश लिहून देऊ शकणार्या लोकांना नोकरीवर ठेवतात. एखाद्या सणासाठी शुभेच्छा देणार्या काही छान ओळी, काही विनोद असला मजकूर लिहून देणारी मंडळी या कंपन्यांमध्ये पगारी काम करतात. धंदा वाढवण्याची ही नामी शक्कल आहे.
रिंगटोन्स वगैरेंचा धंदा तर मूळ गाण्यांच्या ध्वनीहक्कांपेक्षा जास्त असतो असे देखील वाचनात आले होते. तरुणाईची नस ज्याला गवसली त्याने धंद्यात यश मिळवलेच म्हणून समजा.
आता आयपॅड, सॅमसंग गॅलॅक्सी टॅब, ऑलिव्हटॅब, डेल स्ट्रीक इत्यादी टॅब्लेट्सच्या धंद्याचा मुहुर्त लागलेला आहे. कालच वृत्तपत्रात या सगळ्यांविषयी माहिती आली होती. किती छान आयडिया आहे, मोठी स्क्रीन, भरपूर सोयी, फोनची पण सुविधा, पन्नास सिनेमे साठवता येतील इतकी स्मरणशक्ती...तरुणांना (अर्थात मला पण...असे अजून तरी वाटतेय) भुरळ न पडली तर नवलच.
सध्या तरुण भारत ही भारताची ओळख आहे आणि प्रत्येक दशकात किंवा १.५ दशकात असे खास ट्रेंड्स व्यवसायाला पोषक ठरत असतात असे माझ्या निदर्शनास आलेले आहे. उदाहरणार्थ क्रिकेट, बॉलीवूड, हरितक्रांती, मध्यमवर्ग, आयटी, इंटरनेट, ऑटोमोबाईल, फेसबूक, मोबाईल....असे हे बदलत जाणारे ट्रेंड्स आहेत. ज्याने ट्रेंड्सची पावले आधीच ओळखली तो यशस्वी झालाच म्हणून समजा...
17 Nov 2010 - 4:10 pm | स्वतन्त्र
कधी प्रयत्न नाही केला ...पण आंतरजालावरच्या फुकट SMS सेवेचा आपण फायदा घेतला तर ?
17 Nov 2010 - 7:49 pm | शुचि
लेख आवडला. सुरुवातीची विनोदाची किनार तर भारीच. मग हळूहळू गंभीरतेकडे झुकत गेला.
17 Nov 2010 - 8:21 pm | चिगो
योग्य विषय आहे..
>>हे उद्या "फुटबॉल का उपयोग नीचे दिये गये किस खेल में होता हैं?" असा देखील प्रश्न विचारतील.
ह्या कार्यक्रमात असाच एक लखपती प्रश्न खरोखर विचारला होता... "क्रिकेट के एक ट्रायसिरीज में कितने देश खेलते है" असा.. ;-)
18 Nov 2010 - 9:06 am | समीरसूर
मी पाहिला होता तो भाग. :-)
या आठवड्यात तर दोन दिवशी एकच प्रश्न लखपतीसाठी विचारला होता.
पण यावेळी केबीसी मध्ये खूप स्क्रिप्टींग झालेले आहे असे मला वाटते. एक कोटी जिंकून पुन्हा तीन लाख वीस हजारावर येणारा तो स्पर्धक खरच मंद होता की केबीसीवाल्यांनी त्याच्यासोबत मांडवली केली हाच प्रश्न मला पडला आहे. कुठलाही सुज्ञ माणूस एक कोटी जिंकल्यावर का म्हणून अजिबात माहित नसलेल्या प्रश्नाचे उत्तर सांगायचा प्रयत्न करेल? हे पटणे अवघड गेले. आणि एक कोटी जिंकल्यावर आणि नंतर हरल्यावरदेखील त्या येड्याच्या चेहर्यावरची एक साधी रेष देखील हलली नव्हती. हे देखील जरा अविश्वसनीय वाटले. काहीतरी गोची नक्कीच होती...
अजून एक, केबीसी मध्ये प्रामुख्याने उत्तर प्रदेशच्या लोकांचा भरणा जास्त वाटतो आणि त्याखालोखाल गुजरातच्या लोकांचा. हा योगायोग असेल? मराठी आतापर्यंत एकच आला होता; लोणारचा दीपक कांबळे! तो साधारण खेळला.
अजून एक मुद्दा, आधी कुठल्यातरी कारणाने आधीच्या केबीसी सीझन्सशी संबंध असणारे स्पर्धक यावेळेस खूप जास्त संख्येने आढळले. २-३ जणं तर चक्क दोनदा केबीसी मध्ये हजेरी लावून गेले. आम्ही १० वर्षे एसेमेस पाठवून शेवटी कोमलचे कठिण हृदय चाचपायचे आणि काही-काही लोकांचं नशीब इतकं जोरदार की त्यांची केबीसी मध्ये दोनदा जायचे? लक्षावधी लोकांमधून दोनदा निवड होणं आणि ते ही इतक्या जास्त प्रमाणात हे थोडं अतार्किक नाही वाटत?
कुणाचा तरी बाप, भाऊ, आई हे सगळे केबीसी मध्ये येऊन गेले होते. एक कुणीतरी परिहार म्हणून युपीची मुलगी दुसर्यांदा केबीसी मध्ये आली होती. असे बरेच लोक यावेळेस दिसले. हा योगायोग असेल?
आमची एक सहकारी एका एपिसोडच्या शूटिंगला गेली होती. गुंजन शुक्ला म्हणून युपीची एक महिला होती तिच्या एपिसोडला प्रेक्षकांत बसण्याचा पास तिला मिळाला होता. ती सांगत होती की एक इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी लॉजिस्टिक सांभाळत असते. म्हणजे शूटिंग करणे, लोकं बोलावणे, त्यासाठी पासेस वाटणे, इतर सामग्रीची व्यवस्था बघणे इत्यादी....म्हणजे तुमचा काही खास वशिला, ओळख असल्याशिवाय तुम्हाला आत बसण्याची संधी मिळणं तसं अवघडच. म्हणजे इतरही काही गोष्टी मॅनेज होऊ शकत असतील अशी शंका घ्यायला रास्त वाव आहे...असो. शेवटी काय द्राक्षांना कोल्हा आंबट!
--समीर