जय नावाचा इतिहास जो
सारे जेत्यांचेच लिखाण आहे
पराजितांना अधर्मी ठरवून
उंच विजेत्यांचे निशाण आहे
राजपुत्रच श्रेष्ठ धनुर्धारी
वचन गुरुंचे महान आहे
एका अंगठ्याच्या कर्जापायी
गुरुधर्म तो गहाण आहे
सूताघरी सूर्यपुत्र दानी
वंचनाच नियतीचे दान आहे
धर्माची चौकशी करतो ईश्वर
उरी भावाचाच बाण आहे
जरी सुयोधन अंधपुत्र तू
राजपदीही अपमान आहे
सत्तालोभ धर्माधर्म कधी
कमरेखालीच प्रहार आहे
कर्मयोगाची करुनि भलामण
हरला गुरुचाच प्राण आहे
सूडाग्नीत जीवन गुरुपुत्राचे
चिरंजीव विराण आहे
पराजितांना अधर्मी ठरवून
उंच विजेत्यांचे निशाण आहे.....
प्रतिक्रिया
12 Nov 2010 - 3:19 pm | रन्गराव
शब्द नाहीत प्रतिक्रिया द्यायला!
12 Nov 2010 - 3:19 pm | गणेशा
एक जबरदस्त काव्य ...
खुप आवडले ..
12 Nov 2010 - 3:22 pm | इनोबा म्हणे
झकास जमले आहे.
-इनोबा म्हणे
12 Nov 2010 - 3:55 pm | स्पंदना
बर झाल टाकलात. अशी शांत बसुन वाचायची होती. काय भिडते!!
12 Nov 2010 - 5:04 pm | धमाल मुलगा
कऽडक!
12 Nov 2010 - 7:27 pm | मेघवेडा
मस्त!
12 Nov 2010 - 7:29 pm | llपुण्याचे पेशवेll
बिलकुल आवडली नाही.
12 Nov 2010 - 7:37 pm | प्रियाली
काही मते पटणारी नाहीत पण आवडली.
12 Nov 2010 - 7:44 pm | असुर
मस्त!
--असुर
12 Nov 2010 - 8:54 pm | प्रीत-मोहर
जबरदस्त!!!
12 Nov 2010 - 11:04 pm | शिल्पा ब
मला कविता वगैरे काही समजत नाही...पण हि कविता आवडली, समजली.
छान आहे. मी साधारणपणे असे धागे उघडतच नाही..पण अवलियाने काहीतरी विडंबन केलंय म्हणून मूळ काय ते वाचले आणि आवडले.
2 Oct 2013 - 7:13 am | राजेश घासकडवी
ही कविता वाचायचीच राहून गेली होती. अतिशय आवडली.
इतिहास जेतेच लिहितात हे आत्तापर्यंतचं विदारक सत्य माहित असूनही आपण डोळ्यांवर कातडं ओढतो. आणि मग त्या जेत्यांनीच लिहिलेल्याची हाजीहाजी करून त्याल सत्याचं स्वरूप देतो. युद्धांच्या उद्रेकात काही दगड शिल्लक रहातात, काही ठिकऱ्या होऊन नष्ट होतात. मग उरलेल्या दगडांना आपण आपल्या कल्पनाविलासाने कोरून त्यांतून देखणे हिरो आणि सुंदर हिरॉइनी तयार करतो, - त्यांच्या कथा एकमेकांना सांगतो. देवांच्या मूर्ती घडवतो आणि त्यांची पूजा करतो. हे सत्य किती बेगडी आहे याची कल्पना असूनही ती नाकारतो आणि मूर्ती स्वीकारतो.
मला राहून राहून प्रश्न पडतो. पांडवांचा तारणहार म्हणून कृष्ण देव झाला. पांडव हरले असते तर न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या कौरवांना मदत करणारा शकुनिदेव झाला असता का?
2 Oct 2013 - 4:55 pm | वेल्लाभट
व्हेरी नाईस
9 Oct 2013 - 1:22 pm | एच्टूओ
मस्तच...!!