माझ्या वाचकांपैकी विमानात खूपदा बसणारे किती असतील माहीत नाही. पण पूर्वीपेक्षा विमान प्रवास आता सहज केला जातो. मला आज तथाकथित साहित्यिक मूल्य नसलेलं काहीतरी लिहिण्याची खूप इच्छा होतेय. म्हणून माझा आवडता विषय विमानाचे अपघात (शुभ बोल ना-या..) घोळवत होतो डोक्यात. त्यात मला काही अपघात असे आठवले की जे खूप विचित्र किंवा वेगळे आहेत.
साउंड्ज इंट्रेस्टिंग..??
सायप्रस देशात हेलीओस एअरवेज नावाची विमान कंपनी होती. १४ ऑगस्ट २००५ ला या कंपनीचं "ऑलीम्पिया" नावाचं "बोईंग ७३७-३००" विमान ११५ पॅसेंजर्स आणि सहा क्रू मेंबर्सना घेऊन सायप्रसमधल्या लार्नाका एअरपोर्टवरून आधी ग्रीसमधल्या अथेन्स आणि मग झेक रिपब्लिकमधल्या प्रागला जाणार होतं. त्यानं टेक ऑफ घेतलाही.
आपल्याला माहीत आहे की विमान खूप उंचावर जात असल्यामुळे विमानाच्या केबिनच्या आत जर हवेचं कृत्रिम प्रेशर मेंटेन केलं नाही तर तिथल्या विरळ हवेत आपण ताबडतोब फुटून आणि घुसमटून मरू.
जसजसं विमान वर जात जातं तसा तसा बाहेरच्या हवेचा दाब कमी होतो आणि विमानाची सिस्टीम आपोआप केबिन प्रेशर वाढवत जाते. यासाठी केबिन प्रेशर रेग्युलेशन हे "ऑटो" मोडवर ठेवावं लागतं.
विमानाच्या सर्व्हिसिंगच्यावेळी "मॅन्युअल" मोडवर ठेवलं गेलेलं हे स्टेटस टेकऑफच्या आधी "ऑटो" करायला दोन्ही पायलट विसरले. किंवा त्यांना ते "मॅन्युअल" असल्याचं माहीतच नव्हतं किंवा आणि काहीतरी. पण केबिन प्रेशर सिस्टीम "मॅन्युअल" ठेवून त्यांनी टेक ऑफ घेतला.
थोड्याच उंचीवर कॉकपिटमध्ये प्रेशर वॉर्निंगचे अलार्म वाजायला लागले. ते दुस-या कशाचेतरी अलार्म आहेत असं समजून पायलट्सनी ते डिसेबल केले.
मग चौदा हजार फुटांवर एकदम सर्व पॅसेंजर्सच्या समोर ऑक्सिजन मास्क उघडले गेले. तेव्हा लक्षात आलं की केबिन प्रेशराइझ झालीच नव्हती. चौदा हजार फूट म्हणजे इतकीही विरळ हवा नाही की एकदम प्रेशरचा फरक जाणवेल. तेव्हाही पायलटना वाटलं की फार मोठा प्रोब्लेम नाही फक्त सिस्टीमला कूलिंग मिळत नाहीये.
एरव्ही समजा पन्नास हजार फुटांवर जीवघेण्या लो प्रेशर एरियात विमान पोचलेलं असताना अचानक केबिन प्रेशर फेल झालं असतं तरी एकदम घुसमटल्यामुळे ते लक्षात येऊन पायलटनं विमानाला खाली मुसंडी मारायला लावली असती. पण हेलीओस ऑलीम्पियाच्या बाबतीत नकळत हळू हळू कमी होत जाणारा ऑक्सिजनचा अभाव हाच सैतान ठरला. त्यामुळे झालं काय की पायलट्सना धोका कळेकळेपर्यंत ते त्यांचा मेंदू निकामी झाला होता. ते हळूहळू भ्रमिष्ट झाले होते आणि मास्क लावणे किंवा विमान खाली उतरवणे यांवर कंट्रोल ठेवण्याइतकेही भानावर राहिले नव्हते. म्हणजे परिस्थिती काय आहे याचं त्यांना शेवटपर्यंत आकलनच झालं नाही.
मग हळूहळू हायपोक्सियामुळे (ऑक्सिजनची कमी) पायलट असंबद्ध वागायला आणि बोलायला लागले. त्यांनी रेडिओवर एअरपोर्टशी केलेल्या संभाषणात ते बोईंगमध्ये मुळातच नसलेल्या पार्टसची नाव घेऊन "तो पार्ट कुठे आहे" वगैरे डिरेल झाल्यासारखे प्रश्न विचारायला लागले. आणि मग संपर्क तुटला.
ठराविक वेळेत हेलीओस ऑलीम्पिया बोईंगकडून काहीच रिस्पॉन्स न आल्यामुळे त्याच्या बाजूने उडून जवळून काही निरीक्षण करण्यासाठी दोन एफ-१६ लढाऊ विमानं पाठवली गेली. त्या फायटर जेट्सनी हेलीओस बोईंगच्या अगदी जवळून समांतर उड्डाण करत खिडक्यांतून आत पहायचा प्रयत्न केला.
त्यांना असं दिसलं की को-पायलट कॉकपिटमध्ये कंट्रोलवर मान टाकून निश्चेष्ट पडला होता. मेन पायलट दिसतच नव्हता. म्हणजे तो खाली झुकून पडला असणार. दोन्ही पायलट बेशुद्ध किंवा मृत आणि ऑक्सिजनरहित विमान ऑटो पायलटवर उडत चाललेय अशी भीषण परिस्थिती झाली होती.
मग एक फ्लाईट अटेन्डन्ट मुलगा कॉकपिटमध्ये येऊन बसला. तो विमान चालवायचा प्रयत्न करत होता. अर्थात त्याला ते जमत नव्हतं.
त्या फ्लाईट अटेन्डन्ट पोरानं रेडिओवरून एअरपोर्टला कॉन्टॅक्ट करायचा पुष्कळ प्रयत्न केला. तो रेडिओवर "मे-डे..मे-डे" (संकट सिग्नल) असं सारखं म्हणत होता. पण त्याने चुकीची फ्रिक्वेन्सी ट्यून केली होती. त्यामुळे त्याचं ओरडणं कोणत्याच एअरपोर्टवर कुणीच ऐकत नव्हतं.
हा मुलगा जरी फ्लाईट अटेन्डन्ट असला तरी त्याने लहान टू सीटर ट्रेनी विमान उडवण्याचं थोडंसं शिक्षण घेतलं होतं (माझ्यासारखं). त्याला बोईंग तात्पुरते ऑपरेट करण्यासाठी रेडिओवरून डीटेलमध्ये गाइडन्स मिळाला असता तर विमान कदाचित वाचलं असतं. मी हे नक्की सांगू शकतो.
टेकऑफपासून दोन तास विमान सरळ रेषेत उडत राहिलं आणि इंधन संपून ग्रीसमधल्या पर्वतात कोसळलं. तोपर्यंत सर्व पॅसेंजर जिवंत किंवा बेशुद्ध होते. क्रॅश झाल्यावर सर्वच्या सर्व १२१ जण मारले गेले.
हे क्रॅश साईट वरचे फोटो:
फोटो: जालावरून साभार.
नंतर २००६ मध्ये हेलीओस एअरवेज बंद पडली.
.....
पायलटशिवाय विमान तासनतास उडत राहणं आणि मग इंधन संपून कोसळणं. मधला काळ किती हॉरिबल गेला असेल..!!
त्याच दुर्दैवी ऑलीम्पियाचा फोटो. क्रॅशपूर्वी एक वर्षाआधीचा. आभार: विकी-मिडीया फोटोज.
.......
असे विचित्र अपघात खूप आहेत..विश्वास बसणार नाही पण फ्लाईटमध्ये आपल्या लहान मुलाला गम्मत म्हणून विमानाचा कंट्रोल हाताळायला दिला आणि कंट्रोल सुटून क्रॅश झाला अशीही घटना घडली आहे. वो कहानी फिर कभी...
प्रतिक्रिया
11 Nov 2010 - 5:32 pm | मनि२७
बाप रे...
11 Nov 2010 - 6:00 pm | मी ऋचा
अशा कथा येउ द्यात (होउ द्या नव्हे) अजुन!
11 Nov 2010 - 6:13 pm | llपुण्याचे पेशवेll
आयला. पण या कमी प्रेशर कंडीशनमुळे कोणी फुटले नाहीत का? काय हाल झाले असतील बिचार्यांचे. मला तर विमानात गेल्यावर या प्रेशर कमी होण्यामुळे कान दुखणं वगैरे त्रास फार होतो. मग मी कानात इयर प्लग घालून बसतो.
11 Nov 2010 - 6:19 pm | गवि
फुटण्याइतका कमी दाब नसतो या लेव्हलवर. ऑक्सिजन नसल्यामुळे मरतात. पण इथे पॅसेंजर्सचे ऑक्सिजन मास्क डिप्लॉय झाले होते.
त्यामुळे जिवंतपणे सगळे मरणाला सामोरे गेले. दोन तास विमान उडत राहिलं. पायलट असता तर वाचले असते.
12 Nov 2010 - 5:57 am | Pain
कान कमी प्रेशरमुळे दुखत नाहीत. आपल्या कानात एक द्रव पदार्थ असतो. त्याच्या स्थितीवरून छोटा मेंदू तोल सांभाळण्याचे काम करतो. विमानाचा वेग उड्डाण करताना आणि उतरताना (आपल्याला फारसा जाणवत नसला तरी) तीव्र गतीने वाढत/ कमी होत जातो. आपण त्याला सरावेपर्यंत थोडा त्रास होतो. तसेच च्युईंगम खायचा ही सल्ला देतात. तुम्हाला दुर्दैवाने तो त्रास जास्त प्रमाणात जाणवत असेल.
(ही खूप पूर्वी मिळालेली माहिती आहे, तज्ञांकडून खात्री करून घ्या)
12 Nov 2010 - 3:54 pm | गवि
ही माहिती नवीन आहे. धन्यवाद.
मला लहानपणी फ्लाईट मधे कान खूप दुखल्याचं आठवतंय.
नंतर फ्लाईंग शिकताना किंवा नंतर काही त्रास झाला नाही त्यामुळे कारण शोधलं नाही.
11 Nov 2010 - 6:39 pm | प्रदीप
नॅट जियोवर पूर्वी सुरू असलेली 'एयरक्राफ्ट डिसॅस्टर्स' ही माझी अत्यंत आवडीची मालिका होती. त्यात नुसते विमान अपघात कसे झाले (असावेत) इतकेच नव्हे तर त्यानंतरची सगळी चौकशी अत्यंत सविस्तर दाखवलेली असे.
त्या मालिकेत ह्या अपघाताविषयी पाहिलेले आहे. तरी तुमचा लेख आवडला (तुमच्या ह्याच संदर्भातील इतर लेखांप्रमाणेच माहितीपूर्ण आहे). ह्याच विषयावरील अजून लेख येऊ द्यात.
काही अपघात सुचवतो:
१. एरोफ्लोटचे मॉस्को-हॉंग्काँग विमान पायलटने, विमान सायबेरियावर असतांना आपल्या मुलाच्या हातात दिले. त्याच्याकडून जे काही चुकून घडले त्यामुळे विमान कोसळले.
२. सिल्क एयरचे एक विमान इंडोनेशियात सरळ नदीत कोसळले. त्या अपघाताच्या कारणाविषयी काही बोलले जाते पण नक्की काही माहिती नाही.
३. अलीकडेच झालेला एयर फ्रान्सच्या विमानाचा अटलांटीकमधे पडून झालेला अपघात. ह्याविषयी अजूनतरी काही माहिती माझ्या वाचनात आलेली नाही.
४. ब्रिटीश एयरवेजचे एक लांब पल्ल्याचे विमान एक-दोन वर्षांपूर्वी हीथ्रोला उतरले खरे, पण त्यात नशीबाचा व अर्थात क्रूच्या कौशल्याचा भाग होता, बर्फ इंजिनात साठल्यामुळे काहीतरी बिघाड त्या विमानात झालेला होता.
५. दिल्लीवरील दोन विमानांची भीषण टक्कर (मला वाटते, मृतांच्या संख्येच्या हिशेबात हा जगातील सर्वात मोठा अपघात असावा?)
६. हडसन नदीत विमान कसे कौशल्याने उतरवले गेले, त्याची कथा. (ह्याच संदर्भात असे वाचनात आले होते की इजिप्त एयरलाईनचे एक विमान नेमक्या अशाच परिस्थितीत ग्रीसमेधे कोसळले. त्यावेळी कप्तानाने मॅन्युअलप्माणे मॅन्युवरींग न करता देवाचा (ह्याप्रसंगी अल्लाचा) धावा करण्यात वेळ व्यतित केला.
12 Nov 2010 - 1:22 pm | सविता
सहमत
अजून एक...
मी डिस्कव्हरी वरती पाहिले होते.
पायलट च्या समोर च्या काचेचे स्क्रू नीट न बसल्याने विमान उडाल्यावर थोड्याच वेळात ती काच निघून गेली आणि पायलट बाहेरच्या कमी हवेच्या दाबामुळे बाहेर ओढला गेला. फ्लाईट अटेन्डट ने त्याचे पाय घट्ट धरून ठेवल्याने तो विमानाच्या बाहेर फेकला गेला नाही. सर्वांना वाटले की बाहेर ऑक्सिजन नसल्याने तो जिवंत राहणार नाही, तेव्हा त्याचा पकडून ठेवलेले शरीर सोडून द्यावे का? पण फ्लाईट अटेन्डट ने काही तसे केले नाही. को-पायलट ने विमान तातडीने जवळच्या विमानतळावर उतरवले.
आश्चर्यकारक रित्या या खूप भयानक अपघात होऊ शकेल अशा परिस्थिती मध्ये कोणीच दगावले नाही. अगदी तो विमानाबाहेर ओढला गेलेला पायलट पण नाही. तो फक्त बेशुध्द आणि बराच जखमी झाला होता. फ्लाईट अटेन्डट च्या निग्रहामुळेच खरे तर सगळे बचावले. अन्यथा त्याने जर पायलट चे शरीर तो मॄत झाला आहे असे समजून सोडून दिले असते तर तो तर मेलाच असता पण ते शरीर मागे जाऊन इंजिन मध्ये अडकून पुढे बरेच काही भयानक होऊ शकले असते....
12 Nov 2010 - 3:57 pm | गवि
हे सगळे अपघात खूप इंटरेस्टिंग आहेत.
अर्थात ब-याच ठिकाणी याची माहिती आहेच.
माझी स्वतःची टिप्पणी ज्याठिकाणी लिहिता येईल अशा स्टोरीज घेऊन लिहिण्याचा प्रयत्न करीन..
12 Nov 2010 - 5:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
वाट पहात आहे.
11 Nov 2010 - 6:58 pm | गणेशा
विमान प्रवास केला आहे .. परंतु तांत्रीक गोष्टींची माहीती नाही ..
तुम्ही लिहित रहा .. वाचत आहे
11 Nov 2010 - 7:31 pm | धमाल मुलगा
कसलं भयानक!
छोट्या छोट्या गोष्टींमधलं दुर्लक्ष किंवा अनवधान किती महागात पडू शकतं ह्याचं हे एक रोखठोक उदाहरणच.
11 Nov 2010 - 7:45 pm | रामदास
सहमत आहे.
11 Nov 2010 - 8:23 pm | धमाल मुलगा
मुनीवर्य, सोडा हो ह्या अजाण लेकराला आता. ;)
11 Nov 2010 - 7:51 pm | बिपिन कार्यकर्ते
बसवला टेंपोत!!! च्यायला... कसली दुर्दैवी घटना आहे... बाप रे!!!! आधीच आजकाल फिअर ऑफ फ्लाइंग येते आहे... त्यात परत हे... :(
12 Nov 2010 - 12:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पुढच्या विमानप्रवासात जास्तच भीती वाटणार हे निश्चित!
12 Nov 2010 - 12:35 am | शिल्पा ब
आपण नेहमी विमानाने प्रवास करतो हे दाखवायचा प्रयत्न दुसरे काही नाही..
12 Nov 2010 - 12:11 pm | विश्वनाथ मेहेंदळे
काय हे अदितीतै, कोल्ह्याने आपली पायरी ओळखून प्रतिसाद द्यावेत हे तुम्हाला अजून माहिती नाही? विमानात बसू शकतात ते केवळ हिरवे लोकं, तुम्ही काहून आपले घोडे (किंवा कोल्हे) दामटता आहात ??
12 Nov 2010 - 3:58 pm | गवि
"बसवला टेंपोत!!! "
....
हे खूप आवडलं..आता वापरतो..
11 Nov 2010 - 7:58 pm | चिगो
मी तर आता केबीन प्रेशर कमी होऊन ऑक्सिजन मास्क खाली आलेच (अशी वेळ आणि अपघात कुणाच्याही नशिबी नसावेत, ही ईशचरणी प्रार्थना) तर आधी क्रु मेंबर्सना पायलटला केबिन प्रेशर रेग्युलेशन चेक करायचा निरोप पाठवायला सांगेन..
12 Nov 2010 - 4:02 pm | गवि
खूपच टेन्शन घेतलत..
सॉरी..
बाय द वे..त्या पायलट्स कडेही मास्क असतातच..
पण इथे आल्टिट्यूड फार नव्हती आणि त्यांना काही लक्षात यायच्या आत ते डिसओरिएन्ट झाले.
वॉर्निंगकडे दुर्लक्ष केलं इथे चूक सुरू झाली आणि मग होतच गेली.
विमान अपघात हे नेहमी "सीरीज ऑफ एरर्स" असतात. सिंगल, एक चूक कधीच नसते.
11 Nov 2010 - 9:38 pm | रेवती
फारच दुर्दैवी!
तसा कुठलाही बिघाड नसताना असं होणं म्हणजे अतिच झालं!
एकदा टर्ब्युलंट फ्लाईटमध्ये माझ्या मुलानं (३ वर्षाचा असताना) आता आपण परत कधीच भेटणार नाही का असं विचारलं होतं. त्यानंतर मला विमानप्रवास कधीच आवडला नाही आणि आवडणार नाही.
ज्या लोकांना कामानिमित्त सतत विमानप्रवास असतो ते अगदी फर्स्टक्लासमधून जात असले तरी मला त्यांची दया येते.
सगळ्यात अगतिक अवस्था असते. प्रवासात फ्लाईटस् ना होणारे उशीर हे दोन तासापासून बेचाळीस तास असे कितीही होते. आता वेळेवर सगळे प्रवास झाले तर कोणती पुण्याई कामी आली ? असा विचार मनात येतो.
12 Nov 2010 - 4:06 pm | गवि
मी स्वतः पी पी एल होल्डर आहे आणि अनेक सोलो फ्लाईट केल्या आहेत. (शिकताना)
तेही सी-१५२ सारख्या बोईंगपेक्षा शतपट कमी सुरक्षित विमानात.
तरीही आज मी पॅसेंजर म्हणून बसलो की लागते छाती धाड्धाड उडायला.
"विमान अपघात" हा अभ्यासविषय बनवल्याचा परिणाम.
आता नाहीच लिहित या विषयावर..
11 Nov 2010 - 11:52 pm | शिल्पा ब
छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा परफेक्ट का कराव्यात याचे एक दुर्दैवी उदा.
12 Nov 2010 - 12:42 am | Nile
कॉमेट कंपनीच्या इतिहासाची आठवण झाली. थोडीशी मोठी श्टोरी असल्याने लिहण्याचा कंटाळा आला आहे, नंतर कधीतरी.
12 Nov 2010 - 1:00 am | सुनील
भयंकर. तरीही, इतर कुठल्याही वाहनांपेक्षा विमान प्रवास हा कमी धोकादायक समजला जातो.
12 Nov 2010 - 4:10 pm | गवि
ते खरं आहे..पण रस्त्यावरच्या अपघातांमधे वाचण्याची शक्यता आणि विमान अपघातामधे वाचण्याची शक्यता या विचित्र गोष्टी आहेत.
यावर मी इथे लिहिलंय..
12 Nov 2010 - 1:18 am | प्राजु
बापरे!
12 Nov 2010 - 5:52 am | सहज
अजुन येउ द्या पण पुढच्या वर्षी... :-)
12 Nov 2010 - 6:05 am | Pain
नुकतीच झालेली अजून एक घटना: अमेरिकेत वैमानिक झोपी गेल्याने विमान ठरलेल्या ठिकाणी न उतरता तसेच पुढे गेले. नंतर वैमानिक संगणकावर खेळ खेळत होते अशी काहीतरी सारवासारव करण्यात आली.
निरपराध लोक मेल्याचे कळल्याने हळहळ वाटली. नेहमीप्रमाणे यावरही काहीच करू शकत नाही ही जाणीवही.
बाकी नाव वाचून सोहो (solar & heliospheric observatory) किंवा सूर्यमालेविषयी काहीतरी आहे असे वाटले.
12 Nov 2010 - 4:13 pm | गवि
अमेरिकेत वैमानिक झोपी गेल्याने विमान ठरलेल्या ठिकाणी न उतरता तसेच पुढे गेले. नंतर वैमानिक संगणकावर खेळ खेळत होते अशी काहीतरी सारवासारव करण्यात आली.
वैमानिक झोपल्याची केस पहिल्यांदाच ऐकली. वाचायला पाहिजे माहिती डीटेलमधे..
पायलट्स गेम खेळत होते ही सुद्धा भयानक घटनाच आहे.
ऑटो पायलट वर विमान चालू आहे म्हणजे गेम खेळायचा नसतो..
भोंचक्का झालो हे वाचून..
12 Nov 2010 - 4:30 pm | योगी९००
पायलट्स गेम खेळत होते ही सुद्धा भयानक घटनाच आहे.
विमानतल्या संगणकात गेम ठेवायचेच कशाला..??? आहो आमच्या office च्या संगणकात सुद्धा आम्हाला गेम टाकायला ban केले आहे..घरी पण आजकाल घरच्यांना घाबरून गेम खेळत नाही..
बाकी घटनेचे वर्णन छान केले आहे...अजून येऊ द्या..
12 Nov 2010 - 9:39 am | डीलर
National Geographic वर या वर एक तासाची फिल्म दाखव्ण्यात आली होती. Air crash investigation म्हणून.
12 Nov 2010 - 2:52 pm | ब्रिटिश टिंग्या
+१
12 Nov 2010 - 2:27 pm | स्पंदना
मला सगळ्यात भयानक वाटतो तो ऑस्ट्रेलियन फ्लाईट ' नाव आठवत नाही ' जी इंडोनेशियाच्या जवळ समुद्रात पडली. अन काही दिवसान फक्त एक खुर्चीचा हात अन त्या बरोबर एक मानवी हात वर आला, बाकी काही म्हण्जे काही नाही. कित्ती दिवस नातेवाइक तिथे बसुन होते. ना विमान ना एकही म्रुत देह , वाइट सगळ्यात वाइट!
खर सांगु ? डिप्रेस होत अस काही वाचुन. त्यात भर आमची अजाण निष्पाप पोर ! विमानात बसल की घसा फोडुन विचारतात ,' आई, इज धिस प्लेन गोइंग टु क्रॅश?' किप क्वायट किप क्वायट म्हणुन म्हणुन जीव जातो.
12 Nov 2010 - 6:50 pm | गांधीवादी
लेखन आवडले,
एक माझे मत, (लेखनाविषयी नाही)
असे लेखन वाचताना त्या मागे कितीतरी भयानक प्रसंग असतो हे कळते.
खरेतर मला असे लेखन आवडत नाही. (म्हणजे असे प्रसंग आवडत नाही असे म्हणायचे आहे मला). असे प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिल्यावर वाईट वाटते.
देव त्यांच्या मृतात्म्यांस शांती देओ.
खरेतर असे लेखन कमीत कमी वेळा वाचायला मिळाले पाहिजे.
अवांतर : मला TITANIC सिनेमा सुद्धा आवडला नव्हता.