संडे स्पेशल (गरमागरम सुप्स)

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
20 Apr 2008 - 6:24 pm

सूप ही एक अत्यंत पोषक व चवदार डिश आहे. शिवाय करायला अगदी सोपी आणि पचायला हलकी. डाएट फूड म्हणून विषेश लोकप्रिय.
१.गाजर आणि कोथिंबीरीचे सूप
साहित्यः
४ टे.स्पून बटर
३पातीचे कांदे स्लाईस करून
४५० ग्रॅम गाजर
१ टे.स्पून धने पावडर
५ कप पाणी किंवा चिकन स्टॉक
१/२ कप गोड घट्ट दही
चवीनुसार मीठ, मिरपूड
२-३ टे.स्पून सजावटी साठी कोथिंबीर

एका मोठ्या पातेल्यात बटर गरम करा. त्यात पातीचे कांदे,गाजर घालून चांगले परतवा.झाकण ठेऊन १० मि. शिजवा, भाज्या मऊ झाल्या पाहिजेत्.धनेपूड घालून १मि.परतवा. स्टॉक घालून मीठ व मिरपूड घाला. उकळी आल्यावर मंद आचेवर२० मि. शिजवावे.
थोडे थंड झाल्यावर मिक्सरमधून प्युरी बनवून घ्या. ही प्युरी पुन्हा पातेल्यात घालून वरून दही घाला व हलकेच गरम करा.पुन्हा उकळी येऊ देऊ नका. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

२.क्रीम ऑफ स्पिनच सूप
साहित्यः
२ टे.स्पून बटर
१ छोटा कांदा बारीक कापून
६७५ ग्रॅम ताजा पालक कापून
५ कप व्हेजिटेबल स्टॉक
१ टे.स्पून कॉर्नफ्लोअर पाव कप पाण्यात मिसळून
चिमूटभर जायफळ पूड
१/४ कप क्रीम
चवीनुसार मीठ, मिरपूड

पातेल्यात बटर गरम करा. त्यात कांदा घालून मऊ होऊ द्या. पालक घालून झाकण ठेवा व १० मि.शिजवा.
थोडा स्टॉक घालून हे मिश्रण मिक्सरमधून काढा व प्युरी बनवा. ही प्यूरी कॉर्नफ्लोअरचे पाणी, मीठ, जायफळची पुड वमिरपूड घालून १५ मि.मंद आचेवर ठेवा. वरून क्रिम घालून लगेच उतरवा. गरमागरम सर्व्ह करा.

३.क्रीम ऑफ मशरूम सूप
साहित्यः
१०० ग्रॅम बटण मशरूम
३० ग्रॅम ऑयस्टर मशरूम
१/२ लिटर व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी
१ कांदा बारीक चिरुन
१ च. बारीक कापलेला लसूण
६० मि.लि.फ्रेश क्रीम
५० ग्रॅम लोणी
१ च.ऑलिव्ह ऑईल
१/२ च. बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ, मिरीपूड

पातेल्यात कांदा व लसूण, ऑलिव्ह ऑईल व लोण्यामधे परतवा. मशरुम घालून ५ मि.परतवा.मशरूम नरम व्हायला पाहिजेत.
या मिश्रणाची मिक्सरमधे पेस्ट बनवा. एका भांड्यात या पेस्टला उकळी आणा.आच मंद करून क्रीम,मीठ,मिरीपुड घाला.
कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

४.मिंनस्ट्रोन सूप
साहित्यः
३ मोठे टोमॅटो
२ मोठे कांदे
२ मोठी गाजरे
१ वाटी बारीक चिरलेला कोबी
१ वाटी मटाराचे दाणे
१ वाटी मॅकरोनी तुकडे
२५ ग्रॅम चिज
१ टे.स्पून कॉर्नफ्लोअर
२ लसूण पाकळ्या
१ टे.स्पून लोणी
१ टे.स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
१ च.साजुक तूप
६कप पाणी
चवीनुसार मीठ, मिरीपूड

सर्व भाज्या अत्यंत बारीक चिरा. कारण हे सूप गाळायचे नसते. टोमॅटो उकळ्त्या पाण्यात ठेऊन,नंतर गार पाण्यात ठेवा व त्याची साल काढून बारीक चिरा.
तुपावर कांदा,लसूण, गाजर परतवून घ्या.नंतर त्यात टोमॅटो,कोबी, मटारचे दाणे घाला. पाणी घालून भाज्या शिजवून घ्यावा.
दुसर्‍या पातेल्यात ३ते ४ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे.त्यात १ च. तेल घालावे.मीठ घालावे व पाण्याला उकळी आली की त्यात मॅकरोनी चे तुकडे घालावेत. मॅकरोनी शिजली कि ती सुपामधे घाला.
मीठ व मिरपूड घाला. लोण्यात कॉर्नफ्लोअर मिसळून घावे व त्यात घालावे. आयत्यावेळी चीज व कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

५.मलगटानी सूप
साहित्यः
३ टे.स्पून शिजवलेला भात
अर्धा नारळ
१स्पून.बडीशेप, २ दालचिनी तुकडे, २टी.स्पून. धने,२ टी.स्पून जिरे, १/४ टी.स्पून मेथी दाणे
२ टे.स्पून रिफाइंड तेल
१/४ किलो गाजर बारीक चिरून
१ कांदा बारीक चिरून
१ सलगम सोलून, बारीक चिरून
४ लसूण पाकळ्या बारीक चिरुन
१/२ इंच आले सोलून बारीक चिरुन
३/४ वाटी(पाऊण) मसूर डाळ
१/२ किलो टोमॅटो ,उकडून, सोलून बारीक चिरुन
चिमूट्भर हळद
२ टे.स्पून लिंबाचा रस
चवीनुसार मीठ
६ कप व्हेजिटेबल स्टॉक

तांदळाचा भात शिजवून घ्यावा किंवा शिळा चालेल.
नारळ वाटून त्याचे दुध काढून ठेवावे.
बडीशेप्,धने, जिरे, मेथी , दालचिनी तव्यावर थोडे भाजून बारीक पूड करावी.
पातेल्यात तेल गरम करावे.त्यात आले,लसूण, कांदा, सलगम व गाजर घालून ३ मि. परतावे. त्यात मसाला पावडर, मीठ, व्हेजिटेबल स्टॉक, टोमॅटो व मसुराची डाळ धुवून घालून भाज्या मऊ शिजेपर्यंत शिजवावे. भाज्या व डाळ शिजल्यावर खाली उतरावे.
गार झाल्यावर मिक्सरमधून बारीक करावे.
वाढायच्यावेळी परत उकळून त्यात नारळाचे दुध, लिंबाचा रस व शिजवलेला भात घालून गरमागरम सर्व्ह करावे.

मांडणीआस्वाद

प्रतिक्रिया

चित्रा's picture

20 Apr 2008 - 7:30 pm | चित्रा

पाककृती छान दिसतायत! करून पाहीन.

स्वाती दिनेश's picture

20 Apr 2008 - 10:14 pm | स्वाती दिनेश

पाककृती छान दिसतायत! करून पाहीन.
चित्रासारखेच म्हणते,
स्वाती

विसोबा खेचर's picture

21 Apr 2008 - 7:14 am | विसोबा खेचर

वा स्वातीताई,

सुपं लई भारी दिसताहेत! एकदा करून पहिली पाहिजेत...

मला मात्र मटणाचं आणि खेकड्याचं सूप सर्वात जास्त आवडतं! ;)

तात्या.

स्वाती राजेश's picture

21 Apr 2008 - 2:15 pm | स्वाती राजेश

हे मटण सूप
साहित्यः
पाव किलो मटण
अर्धा इंच आले
२ लसूण पाकळ्या वाटून
पाव किलो टोमॅटो (ऐच्छिक)
१/२ च. मिरपूड
चवीनुसार मीठ
१ टे.स्पून लोणी
१ कांदा बारीक चिरून
१ च. कॉर्नफ्लोअर

मटण स्वच्छ धुवून बारीक तुकडे करावेत. त्यात टोमॅटो, मिरपूड, आलं,लसूण् घालून ८ कप पाणी घालून प्रेशरकुकरमधे शिजवून घ्यावे.शिजल्यावर गाळून घ्यावे. ह्यालाच मटण स्टॉक म्हणतात.
एका पातेल्यात लोणी वितळून कांदा परतून घ्यावा. त्यावर कॉर्नफ्लोअर घालून परतावे व गाळून घेतलेले पाणी व मीठ घालून सर्व्ह करावे. हवी असल्यास कोथिंबीर घालावी.

नंदन's picture

21 Apr 2008 - 3:25 pm | नंदन

आहेत पाककृती. इकडे मिळणार्‍या सुपांत आवडणारी म्हणजे फ्रेन्च ओनियन आणि चिकन नूडल्स.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

वरदा's picture

21 Apr 2008 - 9:06 pm | वरदा

मी ही सगळी खाते बाहेर सुप्स्..आता एक एक करुन घरी करुन पाहीन...