आंधळी कोशिंबीर

प्रमोद सावंत१'s picture
प्रमोद सावंत१ in जनातलं, मनातलं
28 Oct 2010 - 12:58 pm

सुमारे १००० वर्षांपूर्वी अरबी राष्ट्रांमध्येच जगाची वैचारिक प्रगती झाली. बगदाद व कैरॊ ही जागतिक संस्कृतीची केंद्रस्थाने बनली . नंतरच्या १००० हजार वर्षांत त्या प्रदेशांची अधोगती झाली. भ्रष्टाचार, बेजबाबदारपणा, संपत्तीचे ऒंगळ प्रदर्शन, आपापसातील भांडण, लढाया यामुळे अरब राष्ट्रे पारतंत्र्यात गेली. स्वतंत्र झाल्यावरही काही वर्षे तेथील नेते आंधळी कोशिंबीर खेळत होते. आता त्यांनी डोळ्यांवरची पट्टी काढली आहे. आपल्या समाजाचे भवितव्य शिक्षणावर अवलंबून आहे, हे त्यांना उमगले आहे. त्यामुळे या देशात स्वत: राष्ट्राध्यक्ष व त्यांची पत्नी शिक्षण क्षेत्रात जातीने लक्ष देतात, भरपूर पैसा ऒततात. विद्यार्थ्यांचा मानसिक विकास करण्यासाठी त्यांची जगातील विचारवंतांची गाठभेट घालून देण्याचे प्रयत्न करतात. शिक्षणक्षेत्रात प्राधान्य देण्याची मानसिकता समाजाला आली, तर शिक्षणासाठी लागणारा निधी आपोआपच मिळतो.
संदर्भ- एका दिशेचा शोध, लेखक- संदिप वासलेकर, प्रकाशक- राजहंस प्रकाशन
आंतरराष्ट्रीय किर्तीचे विश्लेषक व तज्ज्ञ संदीप वासलेकर हे जगातील विविध देशांना भेटी देतात. त्यांचा अभ्यास करतात. त्या निरीक्षणातून त्यांनी त्यांच्या पुस्तकात मांडलेले विचार मार्मिक आहेत. तेलांच्या खाणींमुळे समृद्ध झालेली अरब राष्ट्रे एकेकाळी जागतिक विचारांची केंद्रे होती हे सद्य परिस्थिती पाहून खरे वाटणार नाही. कैरो, बगदाद आदी शहरे शिक्षणाचे माहेर घर होते. कालपरत्वे आज मात्र खूपच बदल झाला आहे. दुबई, जॉर्डन सारखी शहरे जागतिक व्यापाराची केंद्रे होऊ पाहत आहेत. या देशातील नेत्यांना आलेले भान आपल्या देशातील लोकांना कधी येईल. आपल्या देशामध्ये शाळेसाठी असलेल्या भूखंडावर मॉल्स उभारली जातात. पुढारी मंडळी शिक्षणमहर्षी न म्हणविता शिक्षणसम्राट म्हणून ओळखली जाऊ लागली. अमेरिकेसारखीच आपल्या अर्थसंकल्पामध्ये फार मोठी तरतूद ही संरक्षण खात्यावर केली जाते. त्या तुलनेत शिक्षणावर केलेली तरतूद अगदीच तुटपूंजी आहे. शिक्षणावर आपण योग्य ते लक्ष दिल्यास आपण निश्चितच जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ घडवू शकतो. गरज आहे ती नेत्यांच्या मानसिकतेची.

धोरणलेख