मला गाण्यातील स्वर आणि तालाच्या आधी, त्यातले शब्द भावतात. शब्दांच्या केलेल्या हरकती , खेळ यां कड़े माझे जास्त लक्ष जाते.
अनूप जलोटा यांचे भजन '' हे मैंया मोहि मैं नहीं माखन खायो'' याचे उत्तम उदहारण. सुरुवातीचे हे मैंया मोहि मैं नहीं माखन खायो आणि आता आई ऐकतच नाही अजुन तिला संशय आहे असे लक्षात आल्यावर झालेला बदल हे मैंया मोहि मैंनेही माखन खायो, हा बदल जेंव्हा समजतो तेंव्हा हे शब्दच सुर आणि तालाच्या सुन्दर कव्हर मधला मुद्देमाल आहे हे लक्षात येते.
आज लिहितोय ते मराठी मधील '' मी मज हरपून बसले ग '' या बद्द्ल. गाण्यात ही, पहिली दोन कड़वी शृंगार रसावर आधारित आहेत, गाणे बहुधा राधेला मनात कल्पुन असावे, अतिशय सुंदर गाणे आहे. पहिली दोन कडवी राधा तिच्या आणि कृष्णाच्या शृंगाराबद्दल सांगते आहे तिच्या सखीला, हो सखीलाच कारण तिच्या साठीच तर येतो तो सुरेख ग आणि आशा भोसलेंचा आवाज. या गाण्यांत तर स्वत: श्रीरंग ही या आवाजाला राधेचाच समजला असता आणि नंतर ' लगान' मधल्या ' राधा कॅसे न जले ' मुळे त्याची खात्रिच पटली असेल.
' साखर झोपे मध्येच अलगद प्राजक्तासम टिपले ग ' , मी ५वी - ६वीत असल्यापासून प्राजक्ताची फुले माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत, म्हणून ' प्राजक्तासम टिपले ग ' याचा याची देहि याची डोळा याची हाती अनुभव आहे,
आणि त्यात भर घातली ती चंद्रशेखर गोखालेंच्या कवितेनं
प्राजक्त झाडावरुन ओघलतो
त्याच्या आवाज होत नाही
याचा अर्थ असा नाही की
त्याला इजा होत नाही ,
असो विषयांतर फार झाले, प्राजक्त आणि गोखले हे सगळे स्वतन्त्र विषय आहेत.
दुस-या कडव्यात राधेला दिव्याची वात आणि गज-यातून मोकळ्या होउन पसरलेल्या मोगा-याच्या कोमेजल्या कळ्या या सारख्याच वाटताहेत. एकीकडे पहाटेच्या मंद वा-याने होणारी वातीची थरथर तर दुसरीकडे तीच थरथर राधेत जागवतो आहे श्रीरंग. राधेच्या या हालचालीनी श्रीरंगाला पण जाग आली आणि त्याने जो स्पर्श केला राधेला, त्या सुख स्वप्नात तिला वाटले की आपण कालिंदी काठी असलेल्या झोक्यावर आहोत काय पण श्रीरंगाचा स्पर्श आहे हे समजल्यावर तिला प्रथम लज्जेची जाणीव झाली पण नंतर त्या लज्जेतुन बाहेर येतांच ती उमलली आणि मग ती त्या झोक्यांवर झुलू लागली.
गाण्या मधल्या तिस-या कडव्या तील' त्या नभ श्यामल मिठीत नकळत बिजलिसम लखलखले ग ' या ओळी भर उन्हाळ्यात पण धुवांधार पावसाची चित्रे उभा करतात. पण या गप्पा चालु असताना बहुधा सासुच्या किंवा कुणाच्या तरी येण्याची चाहुल लागते आणि राधा लगेच आपल्या सखीला या शृंगार जालातुन बाहेर काढताना म्हणते ''दिसला मज तो देवकी नंदन ', संपलंच की सारे शृंगारचा पासून सपशेल फरकत आणि चक्क आता श्रीरंगा वरून राधा एकदम देवकी नंदन पर्यंत येउन पोहोचते.
ज्या श्रीरंगाने राधेला प्राजक्तासम टिपलं , ज्याच्या श्वासांनि ती थरथरली, ज्याच्या स्पर्शानी ती लाजली, उमलली आणि झुलली, त्याच्या मिठीत बिजलीसम लखलखली पण, आता सांगताना मात्र कशी सांगते आहे त्या लखलख प्रकाशांत दिसला तो कोण, तो नभ शयामल श्रीरंग नाही, राधा म्हणते '' दिसला मज तो देवकी नंदन , अन मी डोळे मिटले ग ''
या राधे कृष्णाच्या सुन्दर गीतांने मी या लेखन प्रकारची सुरुवात केली आहे आणि माझ्या क्षमते नुसार पुढे ही विविध गीतां बद्दल ' लिहेन.
हर्षद
पुर्व प्रकाशित - http://harshad-gaaanikha.blogspot.com
प्रतिक्रिया
26 Oct 2010 - 11:11 pm | बेसनलाडू
सुरेश भट, बाळासाहेब मंगेशकर आणि आशा भोसले या त्रयीने उधळलेल्या अनेक रत्नांपैकी एक असे हे गाणे आहे. या गाण्यावरील तुमचे लेखन आवडले. सुरेश भटांच्या शब्दयोजनेबाबत आणि प्रतिभेबाबत, दिसला मज तो देवकीनंदन मधल्या 'तो' वर आशाताईंनी घेतलेल्या तानेबद्दल (तसेच गाणे संपतानाच्या तानेबद्दल) तर न बोललेलेच बरे!
(आस्वादक)बेसनलाडू
हे गाणे आशाताईंनंतर आरती अंकलीकर-टिकेकर, अनुराधा मराठे इ. अनेकांनी गायले. मला व्यक्तिशः आशाताईंनी गायलेल्या गाण्याप्रमाणेच अनुराधा मराठेंनी गायलेलेही फार आवडते.
(वैविध्यप्रेमी)बेसनलाडू
हे गाणे मास्टर दिनानाथांच्या 'सुहास्य तुझे मनासी मोही, जशी न मोही सुधा सुरां' या मूळ गाण्यावर बेतलेले असल्याचे आशाताईंनी सांगितल्याचे स्मरते. हे मूळ गाणे आंतरजालावर कुठे उपलब्ध आहे का?
(शोधक)बेसनलाडू
26 Oct 2010 - 11:22 pm | ५० फक्त
श्री. बेसनलाडु
प्रतिसादा बद्दल धन्यवाद.
माझ्या कडे - सुहास्य तुझे मनासी मोही, जशी न मोही सुधा सुरां - श्री. सुरेश वाडकरांनी गायलेलं आहे एम पी ३ मध्ये,
तुम्हाला कसे पाठ्वाबे ते सांगा.
हर्षद.
26 Oct 2010 - 11:33 pm | बेसनलाडू
(उत्सुक)बेसनलाडू
26 Oct 2010 - 11:42 pm | प्राजु
सुरेख!!
हे गाणे www.dhingana.com वर ऐकता येईल. नक्षत्रांचे देणे १/२ मध्ये.
हर्षद, आपण एका सुंदर लेखमालेची सुरूवात केली आहे असे मी गृहीत धरते आहे.
खूप लिहा.. शुभेच्छा!
26 Oct 2010 - 11:53 pm | चिगो
आशाताईंनी गायलेल्या,सुरेश भटांच्या शब्दांनी सजलेल्या गाण्यांबद्दल काय बोलावे ? स्वर्ग आहे तो !! "तरुण आहे रात्र अजूनी" मधली "पश्चिमेचा गार वारा"तल्या "गार" वर घेतलेली तान प्रत्येक वेळी माझ्या अंगावर काटा फूलवते.. आशाताईंची काही मराठी गाणी तर अशी आहेत की ती ऐकून झाल्यावर मी कमीत कमी त्यादेवशी तरी दुसरी गाणी ऐकण्याच्या स्थितीत नसतो..
....लेख सुरेख. एका चांगल्या मैफलीची ही सुरुवात आहे असे मानतो. शुभेच्छा आणि धन्यवाद..
27 Oct 2010 - 12:58 am | शुचि
मस्तच गाणं आहे. "हरपून" हा शब्द इतका चपखल वापरला आहे. -
मी मज हरपून बसले गं, सखी मी मज हरपून बसले गं
आज पहाटे श्रीरंगाने, मजला पूरते लूटले गं
साखर झोपेमधेच अलगद प्राजक्तासम टिपले गं
त्या श्वासांनी दीपकळीगत, पळभर मी थरथरले गं
त्या स्पर्शाच्या हिंदोळयावर, लाजत उमलत झुलले गं
त्या नभशामल मिठीत नकळत, बिजलीसम लखलखले गं
दिसला मग तो देवकीनंदन, अन मी डोळे मिटले गं
ओळख आवडली.
27 Oct 2010 - 1:27 am | उपास
अप्रतिम गाणं भटांचं.. शृंगाररस आणि भक्तीरस ह्या दोन भिन्न प्रवृत्तींच्या रसांचा सुरेख संगम.. आशाने सोनं केलय अगदी.. भटांनी केलेली 'गं' ची पेरणी आणि आशाची ती नाजूक/ सावध फेक.. ह्याला म्हणतात गाणं..
शेवट तर झक्कास.. त्याच्या तेजाला सर्वसमर्पण !!
अजून येउं दे !!
27 Oct 2010 - 3:57 am | मिसळभोक्ता
ह्याच्यात भक्तीरस कुठे दिसला बॉ ?
27 Oct 2010 - 8:44 am | नितिन थत्ते
अगदी असाच प्रश्न पडला.
कै च्या कै.
बाकी गाणे आणि त्याचे रसग्रहण दोन्ही उत्तम आहे. अजून येऊ द्या
27 Oct 2010 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार
ते बहुदा भट साहेब व आशाताईंचे भक्त असावेत. मला त्यांच्या प्रतिसादात देखील भक्तीरस दिसतोय.
27 Oct 2010 - 7:56 pm | उपास
'श्रीरंग' आणि 'देवकीनंदना'च्या तेजाने दिपून गेलेली राधा भक्तीरसात नाही?? मला तरी दिसतोय ब्वॉ.. असो!
परा, खी खी खी. . दृष्टी (आणि तिचा कोन) बघणार्याच्या डोळ्यात असते हेच खरं ;)
28 Oct 2010 - 11:30 pm | नितिन थत्ते
देवकीनंदनाच्या तेजाविषयी संपूर्ण गाण्यात काहीही लिहिलेले नाही.
बिजलीसम लखलखणे हे नायिकेचेच आहे.
गाण्यात श्रीकृष्णाचे उल्लेख खालीलप्रमाणे आहेत.
पहाटे श्रीरंगाने पुरते लुटले
त्याने साखरझोपेत टिपले
त्याच्या श्वासांनी शहारा आला (थरथरले)
त्याच्या स्पर्शाच्या हिंदोळ्यावर लाजणे, उमलणे
त्याने मिठीत घेतले
देवकीनंदन दिसला
हे उल्लेख पाहिले की नायिकेने मिटलेले डोळे कृष्णाच्या तेजाने दिपून मिटलेले नसून वर लिहिलेल्या कृतींमुळे आलेल्या तृप्तीने मिटलेले आहेत.
भक्तीरसाचा मागमूसही नाही.
इतक्या सुंदर गाण्यावर उगाच भलते आरोप कशाला करावे?
29 Oct 2010 - 12:12 am | उपास
अहो, आरोप कुणि केलेत म्हणे.. काय वाट्टेल ते ?
आणि शॄंगार रस नाहीये असं म्हटलय का.. तो तर गाभाच आहे !
इतर कोणी मिठीत घेणे आणि देवकीनंदनाने, श्रिरंगाने मिठित घेणे ह्यात फरक आहे.. मीरा आणि राधा (आणी गोपीही) ह्यांच प्रेमही आहे कृष्णावर आणि भक्तीही.. तुम्हाला तिची तृप्तीच दिसली फक्त, पण मला पुढे 'त्या'च्या तेजाला तिचं सर्वसमर्पणही दिसलं त्यात..
असो, अधिक काय लिहीणे, तुम्हाला वाटतं तुम्हीच बरोबर तर ते ही खरंच की :)
(काही असेलंच तर) पुढचं सगळं व्यनित..
29 Oct 2010 - 12:47 am | नितिन थत्ते
गाण्यातल्या कुठल्या शब्दांतून तुम्हाला कृष्णाचे तेज दिसले आणि त्या तेजाला केलेलं सर्वसमर्पण दिसलं ते सांगा ना.
गाण्यात नसलेल्या शब्दांतून काय दिसलं यात विंटरेस्ट नाही.
राधा ही कृष्णाची भक्त नव्हती. सखी होती. मीरा कृष्णाची भक्त होती.
27 Oct 2010 - 2:30 am | तर्री
खूप भावले .
मधेझालेले विषयांतर " आनेवाले चिजों कि झाकी " आहे. वाह !
जमल्यास ( पक्षी :वेळ झाल्यास ) चांदणे शिंपीत वर लिहावे ही वि.
27 Oct 2010 - 12:29 pm | अविनाशकुलकर्णी
मस्त..गाने
28 Oct 2010 - 4:43 pm | ५० फक्त
आपणां सर्वांना प्रतिसादाला बद्द्ल धन्यवाद, आपल्या शुभेच्छा आणि प्रोत्साहनामुळे लवकरच मराठी व हिंदी मधील अशा
ब-याच गाण्यांबद्दल लिहेन.
या नंतर गाणं असेल - हे सुरांनो चंद्र व्हा........
हर्षद
28 Oct 2010 - 4:45 pm | यशोधरा
आवडलं.
28 Oct 2010 - 4:50 pm | मितान
छान :)
28 Oct 2010 - 7:42 pm | बिपिन कार्यकर्ते
छान.