टॉनिक..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
25 Oct 2010 - 9:17 am

'आयुष्य' या शब्दाचा अर्थ जर वर वर विचार केला तर जन्मापासून मृत्यूपर्यंत जो काही काळ असतो त्याला आयुष्य म्हणतात असाच असेल. पण हा जो काही काळ असतो तो आपण कसा घालवतो याला कदचीत 'जीवन जगणे' असे म्हणत असावेत. मी कधीही या दोन्ही गोष्टींचे अर्थ लावण्याचा अथवा समजून घेण्याचा प्रयत्न नाही केला.. किंवा इथून पुढे करेन असेही नाही . मात्र गेल्या काही दिवसांत जे काही बदल मला जवळून पहायला मिळाले त्यातून कदाचीत थोडंफार यालाच 'जीवन' म्हणत असावेत असं वाटू लागलं.

आयुष्यात थोडासा जरी 'बदल' झाला तरी तो बाकी इतर किती 'बदल' घडवू शकतो याचं उदाहरणच पाहण्यात आलंय. आपापल्या नोकर्‍या, उद्योग, रूटीन सोडून नवर्‍याच्या पाठोपाठ भारतातून इकडे परदेशी आलेल्या स्त्रीया, ज्या नोकरी करू शकत नाहीत परदेशी, त्या किती एकलकोंड्या होऊ शकतात हे पाहिलंय मी.. त्यातूनच काही स्त्रीया काही उद्योग लावून घेतात मागे जसे इडली-डोश्याचे पीठ विकणे, वेगवेगळे आर्ट क्लासेस घेणे.

पण सर्व सामान्य स्त्रीया ज्यांना विशेष पर्याय नसतात त्यांचं आयुष्य एखादी किटि पार्टी, मुलांचे स्विमिंग, ज्युकिडो, सॉक्कर क्लासेस, एखादी प्ले डेट या चाकोरीच्या बाहेर जात नाही, हे आता जाणवलं. सणवार अगदी भारतीय आणि परदेशातले सुद्धा येत असतात, जात असतात... भारतामध्ये दिवसभर मागे असणारे उद्योग, डोक्याला असणारी नानाप्रकारची व्यवधानं यामध्ये अगदी जखडून गेलेला दिवस इथे परदेशात नोकरी नसेल तर त्या बाईसाठी केवळ घरकाम करण्यापुरताच असतो . मुले, त्यांचे क्लासेस, स्वयंपाक पाणी आणि इतर साफसफाई इतकंच तिचं अस्तित्व उरतं. हे सर्व करायला संपूर्ण दिवस पुरतो पण मग कधी कंटाळा आला म्हणून एखादं काम बाजूला ठेवलं तर दुसरे दिवशी कामात वाढ होण्या पलिकडे दुसरं काहीच पदरात नाही पडत.. मग हळूहळू मरगळ चढू लागते.. मनावर आणि एकूणच जीवनावर. या सगळ्यात कधी आजूबाजूच्या मैत्रीणीशी गप्पा झाल्या तर त्यातूनही इतर काहीच निष्पन्न होत नसतं. कारण ती ही तशीच मरगळ घेऊन जगत असते. मग घरच्यांविषयी कूरबुरी, सासू-सासरे यांच्या तक्रारी, गप्पांमध्ये जी गैरहजर असेल त्या स्त्री विषयी अथ पासून इति पर्यंत काग्याळ्या.. किंवा अगदीच काही नसेल तर नवर्‍याबद्दल किंवा मुलांबद्दल तक्रार. यांतून दुसरं-तिसरं काहीच होत नाही, तक्रार मात्र असते आणि ती ही अखंड!! कशी जाणार ही मरगळ??

दिवाळीच्या दरम्यान एखाद्या कार्यक्रमाची चर्चा सुरू होते. आणि त्यात दिवाळी निमित्त एखादा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि त्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. या कार्यक्रमात एखादा ग्रुप डान्स करण्याची टूम निघते. सुरूवात होते ती ...'नाही गं जमत.. घरचं सगळं बघायचं... मुलांचे क्लासेस.. दोन्ही वेळचा स्वयंपाक, लॉन्ड्री... मुलांच्या शाळा.. हे सगळं करे पर्यंत नाकी नऊ येतात..नाही बाई जमणार..!!! ' त्यानंतर मग हळू हळू... 'कसं दिसेल बाई आता डान्स करणं.. !! केवळ शाळेत केला होता डान्स.. आता इतक्या वर्षानी करायचा म्हणजे.. कसं वाटेल..आता पूर्वीसारखा 'शेप' ही नाही राहिला.. !' अशा शंकातून हळू हळू ..' हरकत नाही.. आत्ता नाही करायचा तर मग कधी.. आणि काय माहिती पुढच्या वर्षी या आपल्या ग्रुप पैकी कोण कुठे असेल.. करून तरी बघू. थोडे दिवस प्रॅक्टिस करू.. अगदीच नाही जमलं तर नाही करायचं.. त्यात काय!'.. असं करत करत शेवटी तयारी सुरू होते. कोणी तरी पुढाकार घेतं. गाणी ऐकून, बघून त्यातलं एक फायनल होतं आणि मग किती जणी आहेत त्यावर डान्सच्या स्टेप्स बसवणं सुरू होतं..

सकाळी मुले, नवरा आपपल्या उद्योगांना बाहेर पडले की, एकीच्या घरी जमून संपूर्ण गाण्यावर हळूहळू कोरिओग्राफी होऊ लागते... स्टेप्स बसू लागतात. पहिले ३-४ दिवस हात्-पाय खूप दुखतात..... पण आता नाविन्याची ओढ लागलेली असते. बोलताना गप्पांमधले संदर्भ, विषय कधी बदलले गेले समजतही नाही. एकप्रकारची वेगळीच लकाकी चेहर्‍यावर येऊ लागते, घरातली कामे सुद्धा एकदम पटापट होऊ लागतात. अगदी मुलांचे क्लासेस, त्यांचे शाळेतले प्रोग्रॅम्स, घरी येणारे पाहुणे... त्यांची सरबराई.. हे सगळे करताना एक प्रकारचा आत्मविश्वास जाणवू लागतो.. एकमेकीबद्दल होणार्‍या कागाळ्यांचं रूपांतर आता डान्स साठी लागणार्‍या सामानाची चर्चा करण्यात होऊ लागतं. कितीही घरी काम असलं तरी प्रॅक्टिस ची वेळ पाळली जाऊ लागते.

आपण काहीतरी नविन करतो आहोत, काहीतरी वेगळं.. जे कधी काळी शाळेत केलं होतं.. जे कधी काळी शिक्षकांनी ,मित्रमैत्रीणींनी, आई-बाबांनी नावाजलं होतं.. नेहमीच्या रूटीनपेक्षा वेगळं... चार लोकं आपल्याकडे बघतील.. आपल्यासाठी टाळ्या वाजवतील, आपलं कौतुक करतील... आणि मग आपल्या मुलांनाही आपला अभिमान वाटेल.. आपणही काहीतरी करू शकतो हे समजेल सगळ्यांना.. हा विचार नवचैतन्य देऊन जातो. आणि एकेदिवशी अचानक आरश्यासमोर उभे असताना जाणवतं.. आपण बदललो आहोत.. डोळ्यात वेगळीच चमक आलीये.. चेहर्‍यावर वेगळाच निखार आलाय, आत्मविश्वास वाढलाय... काहीतरी वेगळंच वाटतंय!
पूर्वी स्वतःला बेढब वाटणारं स्वतःच शरीर अचानक बांधेसूद वाटू लागतं.. जीवन बदलंलय का?.. हा प्रश्न पडू लागतो.. कारण घरात एकलकोंडेपणामुळे होणारी चिडचिड कमी झालेली असते.

यालाच 'बदल' असं म्हणतात. मरगळलेल्या दिवसांना थोडीशी नवलाई मिळालेली असते.. मग तो डान्स असो.. किंवा आणखी कोणतीही ग्रुप अ‍ॅक्टीविटी असो.. पण त्या एका कार्यक्रमाने १-२ महिने का होईना आयुष्य टवटवीत केलेलं असतं. अधूनमधून 'आता हा कार्यक्रम होऊन जाईल.. मग पुढे काय?? पुढे तेच रटाळ रूटीन??' असे विचार मनात डोकावून जातात. आणि मग लक्षात येऊ लागतं आयुष्य असंच ठेवायचं असेल तर हे असं काहीतरी टॉनिक अधूनमधून घेणं आवश्यक आहे.

आयुष्यात थोडासा बदल सुद्धा कितीप्रकारचे बदल घडवून आणतो हेच पहायला मिळालं या सगळ्यामधून. आणि नकळत देवाकडे मागून गेले .."या सगळ्या जणी आत्ता जशा आहेत तशाच राहुदेत.. अगदी हसतखेळत...!"

(खूप काही वेगळं नाहीये हे... पण मी जे पाहिलं माझ्या आजूबाजूला , ते बघून जे वाटलं ते तुम्हासोबत शेअर करावं वाटलं... म्हणून हा लेखनाचा खटाटोप.)

- प्राजु

साहित्यिकप्रकटन

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

25 Oct 2010 - 9:57 am | आनन्दा

आमच्या सौ. ना आणायचा प्लॅन आहे... पण तो याच कारणामुळे हेलकावे खातोय!

कुसुमिता१२३'s picture

25 Oct 2010 - 10:09 am | कुसुमिता१२३

असं टॉनिक आवश्यक असतं हे खरं! पण जर नोकरी करणं शक्य नसेल तर परदेशात राहून व्हॉलेंटीअर काम करता येइल..त्या निमित्ताने नविन ओळखी होतील..परदेशातल्या समाज-जीवनामधे मिसळ्ण्याची संधी मिळेल.
व्हॉलेंटीअर काम आपल्या इतर सर्व बाबी अ‍ॅडजेस्ट करुन आपल्या सोयीस्कर वेळेनुसारही करत येते! एका नव्या वेगळ्या आयुष्याची ओळख करुन घेता येइल!

प्राजु अगदी सह्ही लिहिल आहेस . नोकरी सोडुन फक्त नवर्‍याचा सपोर्ट म्हणुन रहाण फार अवघड जात. अन बर्‍याच नवर्‍यांना याची जाणिव ही असते. माझ्यामुळे तुला काहिही करता येत नाही हे माझ्या ओलखिच्या बर्‍याच जणिंचे नवरे त्यांना बोलुन दाखवतात. नवीन ओळख करुन देताना तर अगदी आवर्जुन ती आधी कुठे अन कशी काम करत होती ते सांगितल जात.

छान लिहिलयं.. क्षणभर का होईना, पण अंतर्मुख झालो... लिहित राहा...

परिकथेतील राजकुमार's picture

25 Oct 2010 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त !!

चित्रा's picture

25 Oct 2010 - 6:18 pm | चित्रा

बॉलीवूड डान्सिंगचे क्लासेस आमच्या इथे प्रचंड जोमात चालत आहेत.

सुरुवातीला मला असे वाटायचे की हे काय चालले आहे? पण आता त्यात बिनधास्तपणे भाग घेणार्‍या स्त्रियांचे कौतुक वाटते. निदान आपल्याला अह्वे ते करण्याचे धाडस आले आहे असे नक्की जाणवते. आणि त्याचा फायदा शरीराला, आणि मनःस्वास्थ्य सुधारल्यामुळे घराला होतो हेही जाणवले.

लेख छान प्राजु. धन्यवाद!

धन्यवाद कसले गं चित्राताई! पण ठरल्याप्रमाणे मी लेख लिहिला आहे.. आता तुम्हा बाकीच्या मंडळींची टर्न आहे... ;)

बॉलिवूड डान्सच्या लेसन्सबद्दल सहमत!
काही दिवसांपूर्वी मैत्रिणीने विचारले होते कि माझा मुलगा तिच्या मुलीबरोबर नाचायला पार्टनर म्हणून येइल का.
'आय हेट लव्हस्टोरी' अश्या की काहीतरी नावाचा सिनेमा होता. दिवाळीच्या मेळ्यात नाचायचे होते.
तेंव्हापासून माझ्या मुलाने त्या मुलीशी बोलणेच बंद केले आहे. इथले आसपासचे बॉलिवूड नाचाचे क्लास भरून वाहत असतात. मलाही त्या आयांचं कौतुक वाटतं कि मनात आलं तर नाचून घेतात. मला बरेच दिवस मनाची तयारी करावी लागेल.;)
वाय एम सी ए च्या झुंबा डान्सच्या क्लासमध्ये बर्‍याचदा पंजाबी गाण्यांचे संगीत वापरतात.

चित्रा's picture

26 Oct 2010 - 7:46 am | चित्रा

मला बरेच दिवस मनाची तयारी करावी लागेल.
बास का?! डान्स पे चान्स ;)

लेखन मनापासून केलय म्हणूनच छान वाटतय.
परदेशी गेल्यावर एकटेपणा हा भरपूर प्रमाणात सगळ्यांनाच सहन करावा लागतो, निदान काही काळापुरता तरी.
मी इथं आल्यावर भरपूर कामात असतानाही कधीकधी एकटेपणा अगदी घेरून येत असे त्याची आठवण झाली.
फॉल सुरु झाल्यावर तर नक्कीच!
असो. प्रत्येकाला त्यावर उपाय मिळू दे ही इच्छा!

यशोधरा's picture

25 Oct 2010 - 6:56 pm | यशोधरा

छान लिहिलं आहेस प्राजू!

फारच छान लिहीलाय लेख. उत्तम नीरीक्षण. नीरीक्षणाला असलेली माणुसकीची किनार.

भास्कर केन्डे's picture

25 Oct 2010 - 7:32 pm | भास्कर केन्डे

काय म्हणताय, प्राजू तै!

CTMM मध्ये आतापर्यंत तुमच्या गाण्यांची धूम असते असं सगळ्यांकडून ऐकायला मिळायचं आता नृत्याविष्कार सुद्धा पहायला मिळणार तर! आम्ही "सह कुटुंब" हजेरी लावावी म्हणतोय. आमच्या मराठी मंडळात पण असाच काही प्रयोग करायचा विचार असल्याचे कुटुंबाकडून ऐकून आहे. तुम्ही काय "अखिल भारतीय महिला मंडळ" एकाच वेळी एकाच प्रकारे विचार करता काय? ;)

जियो

स्वाती२'s picture

25 Oct 2010 - 7:33 pm | स्वाती२

आवडले!

प्रियाली's picture

25 Oct 2010 - 7:35 pm | प्रियाली

मनापासून लिहिलं आहे हे कळतं आहे. :) मोठ्या पगाराची आणि पदाची नोकरी सोडून घरी बसणे आणि त्याचे सर्व साईड इफेक्ट्स मी अनुभवले आहेत. जेव्हा इथे नोकरी लागली तेव्हा माझ्या मनातला पहिला विचार असा होता की 'यापुढे एम्प्लॉयरने घालवून दिल्याशिवाय नोकरी सोडणार नाही.' ;)

अगदी मनातलं सांगायचं तर नोकरी करताना जो भाव मला हापिसात मिळे तो देणारे नोकरी सोडल्यावर कोणी राहिले नव्हते. ;)

कधीतरी घरी असणार्‍या स्त्रियांचं वैषम्य वाटतं. शनिवार-रविवार हे सुट्टीचे दिवस नसून काबाडकष्ट करण्याचे दिवस असतात माझ्यासाठी. मुलीला एक्स्ट्रा अ‍ॅक्टिविटीजना पाठवता येत नाही. पाठवले तर सतत वेळेचा विचार करावा लागतो. वैयक्तिक कामे, डॉक्टरच्या अपॉइंट्मेंट्स वगैरे सांभाळताना नाकी नऊ येतात. :( पण नोकरीचं पारडं फार जड आहे हे मान्य करते.

असो. नाचासाठी शुभेच्छा! तुम्ही बायकांनी असा ग्रुप करून व्यायामासाठी सुद्धा नाचलात तर भेटी होतील, वेळ जाईल, शरीर सुडौल होईल आणि वेळप्रसंगी कार्यक्रमांमध्येही भाग घेता येईल. कायम ग्रुप बनवा.

प्राजु's picture

25 Oct 2010 - 9:21 pm | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार. :)

छान लिहिलंयस प्राजु :)

रेवतीतै अगदी खरं बोललीस ! फॉल सुरू झाल्यावर खरंच तसं वाटतं !

मी माझ्यापुरते बरेच उद्योग शोधते. इथल्या डच मित्रमैत्रिणींचं एक वर्तुळ तयार झालं आहे. रोजच्या मंडळींपेक्षा वेगळ्या लोकांना भेटणं हे एक उत्तम टॉनिक असतं असा माझा अनुभव आहे.