पाहुणेर

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
12 Oct 2010 - 7:24 am

पाहुणेर
प्रत्यक्षातले विश्व, कवीच्या कल्पनेतले विश्व तसेच आणखी एक विश्व कवितेत आढळते,भावविश्व. शाळेत आपण शिकलेल्या कविता प्रत्यक्षातल्या विश्वाचे काव्यात्वक वर्णन केलेल्याच असत. जरा नंतरच्या काळात कल्पनेतले विश्वही परिचयाचे होऊं लागते. उदाहराणर्थ "शाळेस रोज जातांना, मज विघ्ने येती नाना" या कवितेपासून "फूलराणी"चे कल्पनेतील विश्वही आपल्या परिचयाचे झालेले असते.भावविश्वाची ओळख जरा मोठेपणी, जाणून उमजून कविता वाचावयाला सुरवात केल्यावरच होऊं लागते.त्यातही ज्यांना "भावगीते" म्हणतात तीच जास्त परिचयाची असतात. गदिमा., शांता शेळके, पाडगांवकर यांची भावगीते सुंदर भावकविताही असूं शकतात; पण तरीही भावगीत व भावकविता यात सूक्ष्म फरक राहतोच. आज श्री. पुरुषोत्तम पाटील यांची एक निनांतसुंदर भावकविता पाहू.

पाहुणेर
येणार्‍यासाठीं
लगबग पहांट....चुळुक झुळुक सडा
हलकेसे स्वस्तिक, फुलकीशी रांगोळी
अन् थोडा दळदार सूर्य....

थांबलेल्यासाठीं
एकुलता पाट, सुगरण ताट
अन् नखलेल्या कोंवळ्या पानांचा
थोडा बेतशीर केशरविडा....

जाणार्‍यासाठीं
अर्ध्या-उघड्या दाराआडचा
ओझरता इरकली पदर
अन् कांकणांची थोडी अस्वस्थ किणकिण....
पुरुषोत्तम पाटील (तळ्यांतल्या साउल्या,१९७८)
हे निसर्गचित्र आहे कीं भावचित्र याचा संभ्रम पाडावा असे हे मोहक आणि रेखीव पण धूसर चित्र. पन्नासेक वर्षांपूर्वीचे खेडेगावातले एक लहानसे घर, समोर एक छॊटेसे अंगण आणि पहांटे हळुवारपणे सडा घालणारी... अरे. पण हिचे वर्णन तर कोठेच नाही ! लगबग आहे ती येऊं घातलेल्या पाहुण्याच्या स्वागताची, पाहुणेराची ! त्याच्याकरता सडा चुळुकझुळुक, हलकी फुलकी स्वस्तिक-रांगोळी, सूर्य मात्र दळदार ! गंमत पहा. काढणारी नाजूक, शेलाटी म्हणून स्वस्तिक-रांगोळी हलकीफुलकी ! पण येणारा, तो राजबिंडा, दणकट आहे, त्याचे प्रतीक जो सूर्य, तो मात्र दळदार, भरीव ; फोपशा नाही. किती सहजतेने ही रूपके वळणे बदलतात !
पाहुणा आला, त्याच्या भोजनासाठी घरातला एकुलता एक पाट व समोरील ताटात सुगरणीने केलेला स्वयंपाक. कोवळी पाने नखलून केलेल्या पानांचा केशरविडा , पण तोही बेतशीर .इथेही ती सुगरण नाही, ताट सुगरण बनले आहे.

पाहुणा निघाला, पण त्याला निरोप द्यावयाला अंगणाच्या फाटकापर्यंत जाता येत नाही. अर्ध्या उघड्या दारातूनच बघावयाचे, तेही ओझरतेच. हृदयातील अस्वस्थता दाखवणार.... किणकिणारी कांकणे!
तो "पाहण्याकरिता" आला होता? असावा नाही ? वाटते खरे तसेच. पण कवी तर त्याच्या विषयी वा तिच्या विषयी काहीच सांगत नाही. सगळे तुमच्यावरच सोडलेले. म्हणून तर चित्र धूसर पण मोहक आणि रेखीवही. कोणत्याही सहृदय रसिकाला तिच्या भावविश्वात सहज नेणारे.
ही किमया कशाने साधली? मला वाटते या शब्दचित्रात रंग भरले आहेत विशेषणांनी. आणि ही विशेषणे कोणाही व्यक्तीला लावलेली नाहीत. अचेतनात जीवन भरण्याचे काम ती करतात. पहांटेपासून लगबग तिची पण पहांटच लगबग होते. सड्याचा आवाज, चुळुकझुळुक, नादमयी होतो. रांगोळी हलकी फुलकी होते आणि सूर्य दळदार. सुगरण ती पण ते आपल्याला कळते सुगरण ताटामुळे. कोवळी पाने? असतील,असतील. डोळ्यासमोर येते ती तिचीच कोवळीक. तिची आतुरता दिसते अर्ध्या दारामागच्या "इरकली" पदराने. आज तिने खास इरकली साडीची घडी मोडली,येणार्‍याकरता. व किंचित थरथरणारे हात,ते जाणवतात किणकिणत्या कांकणांनी! जणुं सगळ्या निर्जीव वस्तु आज तिच्याकरता सजीव झाल्या आहेत.
काव्यात तुलना अप्रस्तुत असतात कारण बर्‍याच वेळी त्या फसव्याच ठरतात. पण तरीही तुम्हाला भा.रा.तांब्यांची " नववधू" आठवली असेलच.दोहोंची तुलना केलीत तर दोन भावविश्वांच्या मांडणीतला फरक प्रकर्षाने जाणवेल.
शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

सन्जोप राव's picture

12 Oct 2010 - 8:03 am | सन्जोप राव

पाहुणेर हा गावाकडचा शब्द फारा दिसांनी भेटीला. आल्याआल्या उराउरी भेटला.बसला. तांब्यातलं पाणी घटाघटा प्याला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. चा-पानी झालं. मग गड्यानं शिरा आन देठ काढून, बेताचा चुना लावून पान म्होरं धरलं. "तंबाकु..... चालत्या का तुमानी?" त्यानं सुपारी कातरता कातरता विचारलं. बरं वाटलं.
पाहुणेर म्हणजे पाहुणचार. कविता चांगली असली तरी रसग्रहणाच्या अर्थाबद्दल मतभेद आहेत. दळदार सूर्य हे 'त्याचे' प्रतीक वाटत नाही. सूर्य, त्याचा प्रकाश, त्याचे किरण अशी ही मालिका वाटते. तो 'पाहण्यासाठी' आला होता असेही वाटत नाही. पाहण्यासाठी आलेल्याला जेवायला घालण्याची पद्धत नाही. तेही एकट्याने तर नाहीच नाही. केशरविडा (यातली केशराची कल्पना आपण 'पोएटिक लायसन्स' म्हणून सोडून देऊ) तर फक्त घरधन्याची सरबराईच सूचित करतो. एखाद्या दिवसासाठी येणारा चाकरमानी, त्याच्या नुसत्या अस्तित्वाने दाराआड बहरणारी त्याची कारभारीण आणि भाकरीच्या ओढीने त्याचे येतो न येतो तोच निघून जाणे आणि दारामागची अस्वस्थ किणकिण - हे सूत्र अधिक पटणारे वाटते.
हे कदाचित सैन्यातून काही दिवसांच्या रजेवर येणार्‍या जवानाच्या पत्नीचेही चित्र असेल. पण आहे मात्र झकास.

स्पंदना's picture

12 Oct 2010 - 9:26 am | स्पंदना

मलाही सन्जोपरावांचच मत पटल कारण एव्हढ्या सकाळ पासुन वाट पाहुन त्याच स्वागत करुन परत थोरा मोठ्याम्च्या दडपणाखाली घेतलेला निरोप अस दृश्य निदान मी तरी पाहिल.

सुन्दर कविता अन थोडॅ मतभेद असले तरी लिखाण अतिशय उत्तम.

पुष्कळ शब्द आहेत पण लेखकाला काय म्हणायचे आहे ते कळले नाही.

विजुभाऊ's picture

12 Oct 2010 - 10:54 am | विजुभाऊ

नुसरत फते अली खान यानी गायलेले " मेरा पिया घर आया" ची चित्र फीत आठवली. त्यात अशीच काहिशी सिच्युएशन आहे

आमचेकडे सर्व प्रकारच्या विरजणांचे आनन्ददायक श्रीखंड करून मिळेल

हाहाहा... श्रीखंड चांगले पण गाडी कोणी पियुषावर नेउ नये!

मस्त कलंदर's picture

12 Oct 2010 - 12:11 pm | मस्त कलंदर

ही कविता शाळेत आम्हांला होती. तेव्हाही तिचा अर्थ एखाद्या दिवसासाठी अलेल्या घरधन्याचे न बोलता स्वागत होते पण छोट्या छोट्या गोष्टींतून तिचे प्रेम कसे व्यक्त होत जाते असाच कवितेच्या शेवटी लिहिला होता. पुन्हा एकदा या कवितेचे स्मरण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

सुंदर कविता सांगितल्याबद्दल आभार :)

जीवघेणी कविता, रसग्रहण आणि तसेच प्रतिसाद.

विलासराव's picture

12 Oct 2010 - 8:44 pm | विलासराव

छान लिहिलत.

धनंजय's picture

13 Oct 2010 - 2:43 am | धनंजय

"काकणांची किणकिण"बद्दल रसग्रहण आवडले.

शरद's picture

13 Oct 2010 - 7:23 am | शरद

धनी आला होता ?
वाचकाला आपल्याला भावलेला कवितेचा अर्थ हा, त्याच्यापुरता का असेना, नेहमीच बरोबर असतो. किंबहुना चांगली कविता/चांगले साहित्य प्रत्येक रसिकाच्या मनात निरनिराळे तरंग उठविणारच. त्यामुळे श्री संजोप राव यांना सुचलेल्या भावाबद्दल आक्षेप नाही. हे काही गणित नाही, इथे २+२ = ४ हेच उत्तर बरोबर असा आग्रह नाही. दळदार सूर्य हा उमलणार्‍या आशेला विकसित करणारा किरण म्हणावयासही हरकत नाही.
पण मला "येणारा" हा घरधनी मानण्यास दोन अडचणी दिसतात. धन्याला निरोप देण्यास ती एकवेळ फाटकापर्यंत येऊं शकणार नाही पण अर्धवट उघड्या दारामागेच तिला थांबावे लागेल हे तेवढे पटत नाही, अगदी घरी ज्येष्ठ आहेत हे धरूनही. घरधनी लगेच जाणार असेल तर ती दु:खी होईल, पण मग अस्वस्थ हा भाव अचूक वाटणार नाही. मुख्य म्हणजे "पाहुणेर" हे कवितेचे नावच. "हा" पाहुणा आहे , "घरधनी" नाही हे पहिल्यांदीच साफ केले आहे. घरधन्याचा कसला पाहुणचार करता हो ? नाही, मला ही विराणी वाटत नाही. पहिली प्रीत उमलावयाच्या आधीची आतुरता, आशा, अपेक्षा, आशंका या सगळ्यांचा कल्लोळ यातूनची अस्वस्थता , ही जास्त जाणवते.
शरद