तव नयनांचे दल हलले ग

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
9 Oct 2010 - 3:27 pm

आजपासून मला आवडलेल्या काही कवितांची ओळख करून देत आहे. तेव्हा या कविता किमान पन्नास वर्षांपूर्वीच्या असणार हे तर आलेच. पण चांगली कविता नेहमीच ताजी तवानी असते ( हे माझे मत !) सुरवात श्री. बा.भ.बोरकरांच्या एका भावकवितेपासून करू.
तव नयनाचें दल हललें ग
कवीवर्य बा.भ. बोरकर हे बालकवींप्रमाणेच निसर्गात रंगणारे. त्यामुळे त्यांची एक कविता द्यावयाची म्हटले तर त्यांच्या अनेक निनांतसुंदर निसर्गकविता समोर येतील. पण आज मी आज एक भावकविता देत आहे. हीच का ? तर तुमच्या आवडत्या कवीच्या अनेक कविता तुम्हाला प्रिय असल्या तरी दोन चार तुमच्या स्वत:च्या असतात. त्या नेहमी वाचण्याकरिता नसताच मुळी. एखाद्या खास "मूड"मध्येच त्यांची आठवण येते. आणि "आज अचानक गाठ पडे" प्रमाणे परवा एका टीव्हीवरील कार्यक्रमात ही सुरेल आवाजात ऐकावयास मिळाली.

तव नयनाचें दल हललें ग !
पानावरच्या दवबिंदूपरि
त्रिभुवन हें डळमळलें ग !

तारे गळले, वारे ढळले
दिग्गज पंचाननसे वळले
गिरि ढासळले, सुर कोसळले
ऋषि, मुनि, योगी चळले ग !

ऋतुचक्राचे आंस उडाले
आकाशांतुनि शब्द निघाले,
"आवर आवर अपुले भाले
मीन जळीं तळमळले ग !"

हृदयीं माझ्या चकमक झडली
नजर तुझी धरणीला जडली
दो हृदयांची किमया घडली
पुनरपि जग सावरले ग !

संपूर्ण कविता अगदी लहानश्या कालावधीवर बेतलेली आहे. तीने याच्याकडे पाहिले, नेत्रकटाक्ष टाकला असे नेहमीच्या काव्यात सांगितले जाते, व त्याच्या हे लक्षात येते न येते तोच तीची नजर खाली, जमिनीकडे वळली. या अल्प काळात जे उत्पात घडून आले त्याचे कवी वर्णन करत आहे.
पहिल्या दोन ऒळीतले सौंदर्य ध्यानात घेण्यासाठी जरा सकाळी लवकर उठून बागेत चक्कर मारली पाहिजे. हिवाळ्यातली...एखादी पावसाळ्यातील पहाटही चालेल, पानावर साचलेले दवबिंदू बघा, गवताचे पातेही दिमाखाने हे वैभव मिरवत असते. कोवळे ऊनही काही मिनिटापुरते त्या थेंबाला हिरकणीचे सौंदर्य बहाल करते. वार्‍याच्या एखाद्या झुळुकीने पान हलते, थेंब इकडे तिकडे हलतो, खाली पडणार, पडणार असे वाटेतो परत जागेवर येतो . प्रियकराच्या दृष्टीने मात्र त्रिभुवनच डळमळलेले असते.

दिग्गज पंचाननसे वळले.... येथली गंमत कळावयास थॊडी पुराणांची ओळख पाहिजे. पंचानन हे शंकराचे नाव. हे योगीराज एकदा बसले असतांना एक लावण्यलतिका त्यांना नमस्कार करण्याकरिता प्रदक्षिणा घालते. ती बाजूला वळल्यावर यांना त्या दिशेला एक मुख फुटले. ही चार नवीन तोंडे मिळाली म्हणून शंकर पंचानन. पुराणातला दुसरा पंचानन म्हणजे मारुती. तोही शंकराचा अंशावतार म्हणूनच पंचानन. विंदांच्या "साठीची गजलेत"ला मारुती यामुळेच मागे वळून पहात नाही ना ? आता दिग्गजच असे वळले तर गिरि ढासळणारच !

नेत्रकटाक्षाला भाल्यांची उपमा ही काही नवी नव्हे. हृदय विद्ध करावयाला हे नेहमीचेच आयुध आहे. पण या भाल्याच्या पात्यावरील चकचकणार्‍या , लखलखीत तेजाला "तळमळणार्‍या मीनांशी" जोडून देणे खास गोयकराची किमया. येथे मीनाक्षीतले मीन नाहीत. तीच्या नेत्रातील चमक व तळमळत असल्यामुळे सुर्कन फेर्‍या मारणार्‍या माश्यांच्या खवल्यावरील चमकेतील साम्य कवीला जाणवत आहे. आणि हो, दोघांची तळमळही , मीनाची व कवीची !

चकमक झडली, ठिणगी पडली व हृदयाला आग लागली ... नाही नाही, प्रेयसी अशी उर्दू गझलेतील साकी सारखी निष्ठूर नाही. तीने नजर खाली वळवली व किमया झाली तरी पुनरपि जग सावरलेच. ( तीला आपल्या सामर्थ्याची पुरेपुर जाणीव असल्याने तर तीने वेळेवर नजर फिरवली नसावी ना ?)

शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

विद्याधर३१'s picture

9 Oct 2010 - 4:55 pm | विद्याधर३१

सुरेख ओऴख..
कविता माहीत होतीच.
रसग्रहणही छान.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Oct 2010 - 11:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता माहीत होतीच.
रसग्रहणही छान..

असेच म्हणतो....!

-दिलीप बिरुटे

शुचि's picture

9 Oct 2010 - 5:01 pm | शुचि

>> पण या भाल्याच्या पात्यावरील चकचकणार्‍या , लखलखीत तेजाला "तळमळणार्‍या मीनांशी" जोडून देणे खास गोयकराची किमया. >>
वा वा सुरेख!!!

श्रावण मोडक's picture

9 Oct 2010 - 5:24 pm | श्रावण मोडक

या छोटेखानी लेखातील काही वाक्येही सौंदर्यस्थळे आहेत.
याचसाठी म्हणत होतो हा रसास्वाद चालू ठेवा, बंद करू नका.

अविनाशकुलकर्णी's picture

9 Oct 2010 - 5:56 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त

प्रीत-मोहर's picture

9 Oct 2010 - 6:49 pm | प्रीत-मोहर

बाकीबाबांच्या सगळ्याच कविता सही आहेत.........

तुम्ही रसग्रहण पण तितकंच सुंदर लिहिलंय. व्वा!

प्रदीप's picture

9 Oct 2010 - 7:31 pm | प्रदीप

नेहमीप्रमाणेच. असेच पुढे चालू ठेवा, श्रावणशी सहमत.

पण ह्या कवितेतील शेवटची ओळ खटकली. 'पुनरपि जग सावरले?' छे छे, ते आता तर कायमचे बदलून गेले आहे!

सन्जोप राव's picture

10 Oct 2010 - 6:28 pm | सन्जोप राव

पण ह्या कवितेतील शेवटची ओळ खटकली. 'पुनरपि जग सावरले?' छे छे, ते आता तर कायमचे बदलून गेले आहे!
या वाक्यातील स्मरणरंजनाशी या कवितेतल्या भावाचा संबंध नाही, असे वाटते. प्रियेच्या नजराजनरेतून ढवळलेले जग पुन्हा सावरले, एवढेच बाकीबाबांना म्हणायचे असावे. बाकी चू.भू.दे.घे.
सुरेख उपक्रम. आवडला.

चिंतामणी's picture

10 Oct 2010 - 12:19 am | चिंतामणी

छान कवितेचे सुंदर रसग्रहण.

जाता जाता- ह्या काव्यास सलिल कुलकर्णी यांनी छान चाल देली आहे आणि उत्तम गाईले आहे. कोणाकडे "डाउनलोड" (Link) साठी जोडणी असेल तर येथे द्यावी.

चिंतामणी's picture

10 Oct 2010 - 12:26 am | चिंतामणी

छान कवितेचे सुंदर रसग्रहण.

जाता जाता- ह्या काव्यास सलिल कुलकर्णी यांनी छान चाल देली आहे आणि उत्तम गाईले आहे. कोणाकडे "डाउनलोड" साठी जोडणी (Link) असेल तर येथे द्यावी.

राजेश घासकडवी's picture

10 Oct 2010 - 10:41 am | राजेश घासकडवी

पानावरच्या दवबिंदूपरि

ऋतुचक्राचे आंस उडाले

हे खूपच छान...
अजून रसग्रहणं येऊ द्यात.

शहराजाद's picture

10 Oct 2010 - 12:13 pm | शहराजाद

पानावरच्या दवबिंदूपरि
त्रिभुवन हें डळमळलें ग !

अप्रतिम रचना.
सुरेख रसग्रहण.

स्पंदना's picture

10 Oct 2010 - 12:25 pm | स्पंदना

शरद दादा आमच्या इथे 'शरदिनी ' ताई नावच्या एक कवियत्री आहेत.
तुम्ही त्यांचे जुळेभाऊ का?

हलके घ्या.

अतिशय सुन्दर रसग्रहण अन रसग्रहण करताना उपजलेले एक अप्रतिम गद्य काव्य!!

निखिल देशपांडे's picture

10 Oct 2010 - 12:40 pm | निखिल देशपांडे

एका मस्त कवितेची ओळख..
या कवितेला सलिल कुलकर्णीने लावलेली चाल खाली ऐकता येइल.
Get this widget | Track details | eSnips Social DNA

स्वाती२'s picture

10 Oct 2010 - 5:10 pm | स्वाती२

सुरेख!

धनंजय's picture

10 Oct 2010 - 6:32 pm | धनंजय

पुनर्वाचनात आनंद मिळाला. या वेळेला बोरकरांची कविता अधिक काळजीपूर्वक वाचली.

दुसर्‍या कडव्यात "सुर" म्हणजे "देवलोक" हे समजल्यामुळे अर्थ नीट कळला. (आधी "सुर" म्हणजे संगीतातले असे वाटल्यामुळे अर्थाचा गोंधळ उडाला होता.)

"ऋतुचक्राचे आंस उडाले..." कडवे अजून नीटसे समजलेले नाही. बाकी सर्व कडवी म्हणजे ओळीचा ओळीला दुवा अर्थी-अर्थी जोडलेली मेखला आहे.

पहिल्या कडव्यात "दल" म्हणजे "पाकळी" हे रूपक आहे, त्यावरून कल्पनेची भरारी ओळी-ओळीच्या पंखा-पंखाच्या उघडझापेने सुरू होते, त्या प्रत्येक कल्पनेबरोबर रसिकही भरारी मारू शकतो.
डोळे -> पाकळी
पाकळीवरती दवबिंदू -> कवीचे त्रिभुवन विश्व
त्रिभुवन विश्व डळमळले त्याचे पायरीपायरीने वर्णन केले आहे. "पंचानन"ची कथा शरद यांनी उकलून सांगितलेलीच आहे. ऋतुचक्र मोडले, निर्वाणीची आकाशवाणी झाली इतपत कल्पनाभरारीचे दुवे मला जुळताना दिसतात.
मात्र "मीन तळमळले" (गोवेकराला शोभणारे) धप्पकन खाली पडते. विश्वातल्या मोठमोठाल्या घटनांची चढती यादी दिल्यानंतर मीन म्हणज आकाराची आणि वैश्विकतेची पायरी खाली उतरलेली आहे. मीन इतके सूक्ष्मही नाहीत, की विरोधाभासाने अधिक वैश्विक व्हावेत.

शेवट्चे कडवे फारच छान आहे. शेवटच्या कडव्यात विश्व पुन्हा सावरणे आवश्यक होते, हे तर रसिकाला अपेक्षितच असणार. आदल्या कडव्यांच्या उत्तुंग अतिशयोक्तीचा डोलारा कोसळू न देता ही कलाटणी देणे म्हणजे कल्पकता आणि कौशल्याची पराकोटी होय.

सुनील's picture

10 Oct 2010 - 8:14 pm | सुनील

चांगल्या कवितेचे चांगले रसग्रहण.

कवितेचा छंद तर खास बोरकरी!

कवी असल्याचा जाज्वल्य अभिमान असलेला हा प्रतिभासंपन्न कवी राजकारणापायी शेवटी दुर्लक्षित राहिला याची खंत जरूर वाटते.

उत्खनक's picture

10 Mar 2013 - 10:38 am | उत्खनक

"तव नयनाचें दल हललें ग!"
ही ओळच अप्रतीम आहे! आवडले.

पिशी अबोली's picture

10 Mar 2013 - 3:59 pm | पिशी अबोली

खूप सुंदर..चिरतरुण कविता असतात काही..त्यातलीच ही एक..आणि रसग्रहण सुद्धा तेवढेच तरल आहे.. :)

खूप छान रसग्रहण केले आहे शरद यांनी . धनंजय यांनीही चांगली भर घातली आहे.
कविता माहीत होती पण पूर्ण वाचली नव्हती कधी.