स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ?
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
समुद्री गाज, पोफळी बाग
कलती उन्हं सोनेरी झाक
सोनेरी वाळूत हिरवा पडाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
कौलारू घर, दारी झुलाव
पाण्यात दूर डोलतेय नाव
ताजी म्हावरं पैशाला पाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
लाकडी घर, टेकडीवर गाव
उतरतं छत .. काचेचा ताव
गुलाबी थंडी धवल वर्षाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
न्हाली दव, ऊबदार सकाळ
नेसूनि रंग ये….संध्याकाळ
चंदेरी उधळण चांदण्या वाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
जगती कोण, चुकला धाव?
मनी आपलं.. एक जपावं गाव
स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ?
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
प्रतिक्रिया
17 Apr 2008 - 6:36 am | शितल
एकदम समुद्र किनारी वसलेल्या गावातील घरात नेऊन सोडलेत, छान,
स॑दिप खरे न॑तर तुमचे ना॑व स॑दिप चित्रे.
17 Apr 2008 - 7:04 am | चित्रा
छान कविता, आवडली.
अलिबाग-मुरूड किनार्याची आठवण झाली. अशाच येऊ देत कविता अजून.
18 Apr 2008 - 2:57 pm | विसोबा खेचर
कविता छान आहे, औरभी आने दो..
तात्या.
9 May 2008 - 7:24 pm | संदीप चित्रे
अजून पाठवीनच.
9 May 2008 - 7:31 pm | इनोबा म्हणे
आवडली.
चित्रेसाहेब खूपच छान कविता. अजून येऊद्यात.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
9 May 2008 - 7:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वप्नातलं गाव, त्याचं काय नाव ?
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
संदीप,
मस्त रे !!! संपुर्ण कविता आवडली.
9 May 2008 - 8:01 pm | मन
तीन टिंब एवढ्याच साठी की इतक्या सुंदर कवितेला नुसतं शब्दात प्रतिसाद देणं अवघड आहे.
त्या टुमदार गावाची इथं बसल्या बसल्या सफर घडवलीस ,मित्रा.
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
9 May 2008 - 8:03 pm | मन
मला ही कविता इतकी आवडलिये, की सगळ्या दोस्तांना मेल करावी म्हणतोय(तुमच्या नावा सकट),
पण अर्थातच, तुमची परवानगी असेल तरच.
आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)
10 May 2008 - 1:27 am | संदीप चित्रे
मनोबा ...
तुमच्या मित्रांना कविता बिन्धास्त (माझ्या नावासकट) पाठवा :)
त्यांना माझा ब्लॉगही पहायला सांगा.
www.atakmatak.blogspot.com
9 May 2008 - 8:35 pm | झकासराव
चित्रे ,
तुमच्या स्वप्नामधल्या गावाला चित्रांच परिमाण द्या की अजुन छान वाटेल :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
10 May 2008 - 1:49 am | वरदा
मला एकदम समुद्रकिनार्यावर गेल्यासारखं वाटलं....
10 May 2008 - 1:57 am | मदनबाण
फारच सुंदर......
समुद्री गाज, पोफळी बाग
कलती उन्हं सोनेरी झाक
सोनेरी वाळूत हिरवा पडाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
> हे फार आवडल......
(शिंपले वेचणारा)
मदनबाण.....
10 May 2008 - 8:04 am | ईश्वरी
फारच छान . आवडली कविता.
समुद्री गाज, पोफळी बाग
कलती उन्हं सोनेरी झाक
सोनेरी वाळूत हिरवा पडाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
कौलारू घर, दारी झुलाव
पाण्यात दूर डोलतेय नाव
ताजी म्हावरं पैशाला पाव
स्वप्नात असे ज्याचं त्याला ठाव !
ही २ कडवी तर मस्तच. कोकणात समुद्र किनारी असलेलं गाव डोळ्यासमोर उभं रहातं.
-- ईश्वरी
10 May 2008 - 6:31 pm | गणपा
मस्त रे संदिप...
आवडली कविता.. कविता वाचुन गाव परत एकदा डोळ्यपुढं उभ राहिल.
- (मनान गावात पोहोचलेला..) गणपा.