(मिपाच्याच एका सभासदाच्या मागणीवरून नचिकेत्याचे आख्यान इथे छापत आहे. मला माहिती असलेली गोष्ट मी माझ्या शब्दात सांगायचा प्रयत्न केला अहे. लिखाणासाठी मुद्दामच मराठी प्रमाण भाषा वापरली आहे.)
नचिकेत्याचे आख्यान
नचिकेत्याची गोष्ट कठ नामक उपनिषदात आढळते. नचिकेत्याचे वडील उद्दालक ऋषींनी एकदा विश्वजीत यज्ञाची तयारी केली होती. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे यज्ञ करणार्या ब्राम्हणांना गायी दान कराव्या लागत. उद्दालक ऋषींनी सगळ्या म्हातार्या झालेल्या आणि दूध आटलेल्या गायी देण्याचा सपाटा लावला. बापाची ही लबाडी नचिकेत्याच्या लक्षात आली. मुळातच धार्मिक वृत्तीचा, सत्त्वगुणी नचिकेता 'अशाने आपल्या वडिलांना पुण्य कसे लाभणार' या विचाराने अस्वस्थ झाला. जर आपल्या वडिलांना पुण्य मिळवायचे असेल तर त्यांनी एखादी खरोखरची मौल्यवान वस्तू दान केली पाहिजे असे त्यास वाटू लागले. विचार करू जाता आपण स्वतःच आपल्या वडिलांची एकप्रकारे संपत्तीच आहोत असे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे आपलेच दान जर त्यानी केले तर त्यांना पुण्य मिळू शकेल असे त्यास वाटले. अशा रितीने बापाकरता आत्मत्याग करायला नचिकेता तयार झाला.
वडिलांकडे जाऊन नचिकेत्याने त्यांना प्रश्न केला, "बाबा, तुम्ही मला कोणाला दान केले आहे?" मुलाचा हा प्रश्न पोरकट वाटून बापाने त्याकडे प्रथम दुर्लक्ष केले. पण बाप उत्तर देत नाहीसा पाहून नचिकेता पुनःपुन्हा तोच प्रश्न विचारू लागला. शेवटी संतापून जाऊन बाप कडाडला, "जा, मी तुला म्रुत्युला दान दिले आहे." हे ऐकून नचिकेता चमकला. पण बापाचा शब्द खरा करण्यासठी तो खरोखरच आत्मबळावर यमलोकी जाऊन उपस्थित झाला.
तेव्हा दुर्दैवाने यमराज तिथे नव्हते. यमलोकीच्या द्वारपालांच्या विनवण्यांनंतरही नचिकेता यमराजांची वाट बघत दाराशीच तीन दिवस आणि तीन रात्री बसून राहिला. परत आल्यावर नचिकेत्याची सगळी इत्थंभूत हकिगत ऐकून यमराज कळवळले व आतिथ्यात झालेल्या कमतरतेची भरपाई म्हणून प्रत्येक दिवसासाठी एक असे एकूण तीन वर त्यांनी नचिकेत्यास देऊ केले.
तेव्हा नचिकेत्याने 'माझ्या वडिलांचा माझ्यावरचा रोष मावळो आणि त्यांना यज्ञाचे पुण्य प्राप्त होवो' असा पहिला वर मागितला. दुसर्या वराने त्याने अग्निविद्या मागितली. तिसर्या वराच्या वेळेला मात्र त्याने एका गूढ प्रश्नाला हात घातला. तो म्हणाला, "जेव्हा माणूस मरतो तेव्हा काहीजण म्हणतात की तो पूर्णपणे नष्ट होतो तर काही म्हणतात की मृत्युच्या वेळेला फक्त शरीरपात होतो व शरीरातील 'खरा माणूस' तत्वतः जिवंतच राहतो (अस्ति इति एके नास्ति इति च एके). तुम्ही मृत्युदेवता आहात. तुम्ही मला सत्य काय ते सांगा. हेच मी तिसरा वर म्हणुन मागत आहे."
एका बालकाने विचारलेला हा प्रश्न ऐकून यमराजांना आश्चर्य वाटले. त्यांनी नचिकेत्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. ते म्हणाले, "मुला, हा प्रश्न तू विचारू नकोस. ह्या प्रश्नाचा उलगड भल्याभल्यांना होत नाही. सुरलोकातील श्रेष्ठ देवतादेखील ह्या प्रश्नाचे उत्तर जाणत नाहीत. तू दुसरे काहीतरी माग." नचिकेता तत्काळ उत्तरला, "तसेच जर असेल तर माझी तुमच्याशीच गाठ पडली हे माझे भाग्यच. देवतांकडूनही जे ज्ञान मिळणार नाही ते मिळवण्याची संधी मी अशी वाया घालवू का?" यमराज यावर निरूत्तर झाले.
मग त्यांनी नचिकेत्याला अनेक आमिषे दाखवायला सुरुवात केली. ते म्हणले, " तू या प्रश्नाऐवजी पृथ्वीवरचे अनेक उत्तमोत्तम उपभोग मागून घे. दिर्घायुष्य माग. निष्कंटक सार्वभौम साम्राज्य माग. पुत्रपौत्र माग. या बघ, या दिव्य रथात बसलेल्या आणि पुरुषांना रमवण्यात कुशल अशा अप्सरा माग. यातले काहीच नको असेल तर ज्याने काहीही विकत घेत येते अशी धनसंपत्ती माग. मी सिद्धसंकल्प आहे. मी तुला कुबेरापेक्षाही अधिक श्रीमंत करू शकतो. सुरलोकातील देवगणांनाही दुर्लभ असे उपभोग तुला देऊ शकतो. तू काय हवे ते माग पण तुझा हा प्रश्न परत घे." नचिकेता म्हाणाला, "यमराज, तुम्ही हे इतके ज्ञानी असून हे काय बोलता? तुम्ही दाखवलेल्या या सगळ्याच वस्तू क्षणभंगुर नाहीत काय? या सगळ्या वस्तू आज कितीही चांगल्या दिसत असल्या तरी त्यांची अंतिम गती ही मृत्यु - तुम्ही स्वतःच - नाही काय? असे असून का माझी अशी परीक्षा घेता?"
पुनःपुन्हा दाखविलेल्या आकर्षणांनतरही नचिकेत जराही चळत नाही हे बघून यमराज संतुष्ट झाले. नचिकेत्याच्या वैराग्याची प्रशंसा करून त्यांनी त्याला आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान सांगितले.
ते ज्ञान घेऊन नचिकेता मृत्युलोकी परत आला आणि आपण केलेली भयानक चूक लक्षात येऊन कष्टी झलेल्या आपल्या वडिलांना भेटला. त्यंना त्याने सगळी हकिगत ऐकवली आणि त्यांना शांत केले. अशा प्रकारे नचिकेता नंतरच्या काळात सगळ्या कुमारवयीन साधकांसठी एक आदर्श बनून राहिला.
याच उपनिषदात यमराज सर्वांनाच आवाहन करतात,
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया
दुर्गं पथस्तत् कवयो वदन्ति
अर्थात, उठा, जागे व्हा. आत्मप्राप्तीचा मार्ग मोठा दुर्घट आहे. धारदार वस्तर्याच्या पात्यावरून चालण्याइतके ते कठीण आहे. तरीही मागे हटू नका. योग्य व्यक्तिकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय थांबू नका.
ठणठणपाळ
प्रतिक्रिया
15 Apr 2008 - 3:44 pm | आनंदयात्री
धन्यवाद ठणठणपाळ. छान गोष्ट.
15 Apr 2008 - 7:39 pm | व्यंकट
म्हणतो.
व्यंकट
15 Apr 2008 - 3:49 pm | मनस्वी
धन्यवाद ठणठणपाळ.
15 Apr 2008 - 3:51 pm | ठणठणपाळ
नचिकेत्याबद्दल आधीच्या लेखात धनंजय यांनी माहिती दिल्याचं आणि सागर यांना ध्वनि स्वरुपात हवी ती माहिती मिळाल्याचं हा लेख प्रकाशित केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. क्षमस्व!
15 Apr 2008 - 3:53 pm | आनंदयात्री
ठणठणपाळ च्या एवजी ठणठणपाळ्या म्हटल्यासारखे वाटते !
15 Apr 2008 - 4:47 pm | धनंजय
मी अगदीच त्रोटक माहिती दिली होती. तुम्ही कथा सुंदर खुलवली. लेख आवडला.
17 Apr 2008 - 3:04 pm | सागर
धनंजयरावांशी सहमत....
तुमच्या शब्दांत सुरेख आणि योग्य त्या संक्षिप्त स्वरुपात मला नचिकेताचे आख्यान दिले त्याबद्दल धन्यवाद
अवांतरः
(मिपाच्याच एका सभासदाच्या मागणीवरून नचिकेत्याचे आख्यान इथे छापत आहे.
मीच तो सभासद :)
नचिकेताच्या आख्यानाने माझ्या (अ)ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद
-सागर
18 Apr 2008 - 1:38 pm | ठणठणपाळ
धन्यवाद सागर!
15 Apr 2008 - 4:09 pm | धमाल मुलगा
आभारी आहे.
ठणठणपाळ, विस्मरणात गेलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण ताजी करुन दिल्याबद्दल आभार.
अर्थात, मला ठाऊक असलेली नचिकेताची गोष्ट इतकी संतुलीत नव्हती. बहुधा ती गोष्टीरुपाने पिढ्यांपिढ्या चालत आल्याने असेल, पण काही गोष्टी मुळ कथेत नसलेल्या आज जाणवलं.
धन्यवाद.
15 Apr 2008 - 9:50 pm | स्वाती दिनेश
ठणठणपाळ, विस्मरणात गेलेल्या गोष्टीची पुन्हा आठवण ताजी करुन दिल्याबद्दल आभार.
असेच म्हणते,
स्वाती
15 Apr 2008 - 7:48 pm | विजुभाऊ
आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान
म्हणजे आत्मा हा अमर आहे. त्याला तुम्ही निर्माण करु शकत नाही , नश्ट करु शकत नाही. आत्मा एका शरीरातुन दुसररे शरीर धारण करु शकतो.
अर्वाचीन भौतिक शासत्रात हाच सिद्धान्त
ऊर्जेचा अविनाशत्वाचा नियम म्हणून सांगितला जातो.( लॉ ऑफ कॉन्झर्वेषन ऑफ एनर्जी)
ऊर्जा निर्माण करता येत नाही , ती नष्ट करत येत नाही. ऊर्जा एका स्वरूपातुन दुसर्या स्वरुपात जाते.
........नचिकेताचा आश्रम सोबती :विजुभाउ
15 Apr 2008 - 10:33 pm | मुक्तसुनीत
आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्व अशी तुलना वाचताना माझ्या मनात नेहमी एंट्रॉपी चा विचार येतो. काळ अनंत आहे, ऊर्जा संपत नाही , हे विश्व विस्तारत आहे हे सर्व (तत्वतः ) मान्यच. पण हेच शास्त्र हेही सांगते की, एकूण ऊर्जेमधे जरी बदल घडत नसला तरी एंट्रॉपी - म्हणजेच उपलब्ध ऊर्जेची कार्य करण्याची अक्षमता - ही एक सतत वाढत रहाणारी गोष्ट आहे. तसे असल्यास अविनाशी आत्म्यालाही , युगानुयुगांनंतर "म्हातारे" होण्याच्या प्रक्रियेमधून जावे लागते , असे मानायचे काय ?
16 Apr 2008 - 1:58 am | चतुरंग
ही एक समांतर कल्पना असली तरी तंतोतंत सारखी आहे असे वाटत नाही.
वर उल्लेखलेली एंट्रॉपी म्हणजेच उपलब्ध ऊर्जेची कार्य करण्याची अक्षमता
ही ज्या व्यवस्थेतून हे मोजमाप होते आहे त्या सिस्टिमशी (व्यवस्थेशी) निगडित असते. आता संपूर्ण वैश्विक पातळीवर ती व्यवस्था कोणती? तिथे एंट्रॉपी वाढते आहे म्हणजे ती कोणत्या दुसर्या व्यवस्थेसापेक्ष? असे प्रश्न उपस्थित होतात असे वाटते. आपण जर असे मानले की एक विशिष्ठ कार्य करण्यासंदर्भातली ऊर्जा कमी झाली तर त्याचवेळी दुसर्या कोणत्यातरी कार्यासंदर्भात ती वाढलेली असणार हे निश्चित (जसे भरती-ओहोटीचे चक्र जगाच्या दोन टोकांना एकाच वेळी सुरु असते तसे काहीसे). त्यामुळे वाढत जाणारी एंट्रॉपी ही भासमान आहे, सापेक्ष आहे.
त्याच नियमाप्रमाणे आपण जर असे बघितले की जगाची लोकसंख्या वाढतच आहे. तर मग 'नवीन आत्मे' कोठून आले? आत्मा निर्माण करता येत नाही ह्या गृहितकानुसार ते त्या ह्या असलेल्या व्यवस्थेतूनच कोठूनतरी यायला हवेत मग आधी ते कोठे होते?
माझ्या विचार करण्याच्या सध्याच्या कुवतीनुसार हे सर्व आत्मे एकाच चैतन्यतत्त्वाचा हिस्सा आहेत. (किंबहुना 'हिस्सा' हा शब्दही तितकासा योग्य नाही, त्याऐवजी एकच चैतन्य आहेत हे जास्त योग्य), त्यामधे एक, दोन, तीन असे संख्यात्मक वेगळे असे काही नाहीच. वेगळी आहेत ती शरीरे ती आपण मोजू शकतो त्यामुळे लोकसंख्या कमी किंवा जास्त असली तरी आत्म्याला (चैतन्याला) काही फरक पडत नाही - हीच कदाचित जिवा-शिवाची एकरुपता असावी! त्यामुळे शरीराच्या संख्येनुसार एंट्रॉपी कमीजास्त होत असेल पण एकून ऊर्जास्रोताचा विचार केला तर काही फरक नाही.
अजून थोडे खोलात जाऊन पाहूयात. आपल्या सर्वाना एक अनुभव नक्कीच आलेला असेल. कित्येक वेळा आपण एखाद्या ठिकाणी पहात असतो नजरेसमोरुन काही गोष्टी जातात, आपल्याला दिसल्याचे कळत नाही, काही वेळाने भानावर येतो त्यावेळी अमूकअमूक घडले ह्याची जाणीव दुसर्या कोणी दिली तर आपण म्हणतो "कधी झाले? मला तर समजलेच नाही." हे कशामुळे होते? तर माझ्या मते इंद्रियातल्या त्यावेळच्या चैतन्याच्या अभावामुळे! हे कोणत्याही ज्ञानेंद्रियाच्या बाबतीत अनुभवायला येते.
अजून थोडे पुढे जाऊयात.
मूलतः सर्व पदार्थातले अणू एकसारखेच आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या रेण्वीय रचनांमधून वेगवेगळी मूलद्रव्ये तयार होतात. अशा विशिष्ठ संरचनांमधून माणूस बनवता येईल का? कदाचित हो. त्यात चैतन्य्/आत्मा आणता येईल का? सांगता येत नाही.
एखादा माणूस मृत होतो म्हणजे त्यातले चैतन्य नष्ट होते. त्याचे डोळे बघू शकत नाहीत. पण त्याने नेत्रदान केलेले असले आणि ते नेत्र दुसर्या माणसाला बसवले तर तो माणूस मात्र 'त्या मृत' डोळ्यांनी बघू शकतो! ह्याचं कारण डोळे मृत असणे किंवा नसणे हे चैतन्याच्या असण्या-नसण्यावर अवलंबून आहे! म्हणजेच ते सापेक्ष आहे!
एकाची एंट्रॉपी दुसर्याची एंथाल्पी झाली!
आत्मा हा अत्यंत सूक्ष्म असल्याशिवाय तो ही अणूंची मूलभूत संरचना 'चालवू' शकणार नाही. त्याचवेळी तो संपूर्ण विश्व व्यापणारा असणार त्याखेरीज तो ही व्यवस्था धारण करु शकणार नाही. ''अणु रणिया थोकडा|तुका आकाशाएवढा||" म्हणजे तरी काय?
तेव्हा आत्मा हाच काळ आहे, ते एक डायमेंशन (मिती) आहे. त्यातल्या कुठल्या बिंदूवर आपण आहोत त्याप्रमाणे आपल्याला (म्हणजे आपल्या शरीराला) गोष्टी भासतात. त्या मितीमधून आपले शरीर वेगळे झाले की ते मृत होते. पुन्हा मितीत आले की जिवंत होते. असे वाटते. ह्या विचारानुसार आत्म्याला "म्हातारपण" नसावे!
चतुरंग
16 Apr 2008 - 2:26 am | मुक्तसुनीत
विजूभाऊ आणि चतुरंगरावांचे मनःपूर्वक आभार. चतुरंगरावांनी या विषयाचा चांगला सांगोपांग विचार केला आहे असे जाणवले. माझ्या साध्याशा शंकेला त्यांनी फार समर्पक उत्तर लिहीले आहे.
16 Apr 2008 - 3:45 am | एक
"..त्याच नियमाप्रमाणे आपण जर असे बघितले की जगाची लोकसंख्या वाढतच आहे. तर मग 'नवीन आत्मे' कोठून आले? आत्मा निर्माण करता येत नाही ह्या गृहितकानुसार ते त्या ह्या असलेल्या व्यवस्थेतूनच कोठूनतरी यायला हवेत मग आधी ते कोठे होते?...."
जगाची लोकसंख्या वाढत आहे. म्हणजेच मानवजातीची संख्या वाढत आहे..पण याच बरोबर काही प्राणी एक्स्टिंक्ट होत आहेत.
हे आत्मे तिथून तर येत नसतील. विनोदाने म्हणत नाही आहे. पण आपल्या पुराण ग्रंथात कुठ्ली पाप केली असता कुठली योनी मिळते याचं वर्णन आहे. म्हणजे टोटल आत्म्यांची संख्या ही फक्त मानवजातीच्या संख्येएवढी नसावी..
16 Apr 2008 - 8:30 am | चतुरंग
माझ्या विवेचनात मी 'आत्म्यांची संख्या' असा शब्दप्रयोग मुद्दम केला कारण पुढच्या स्पष्टीकरणात माझ्या मते असे काही नाहीये हे मला सांगायचे होते - असते ती शरीरांची संख्या. इथूनतिथून सर्वात एकच चैतन्य व्यापलेले असते.
बाकी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्राण्यांच्या एक्स्टिंगशन मुळे त्यांच्या शरीरांची संख्या कमी होईल पण आत्म्याला काही फरक पडत नाही असे वाटते.
चतुरंग
18 Apr 2008 - 6:39 am | विजुभाऊ
आत्म्याची संख्या...आपल्या पुराण ग्रंथात कुठ्ली पाप केली असता कुठली योनी मिळते याचं वर्णन आहे
बरोब्बर. आपल्या पैकी काही जण गेल्या जन्मी अमिबा नायतर देवी चे जन्तु , मलेरिया चे व्हायरस असु शकतो. रौरव , पयान्तक आणि कुंभीपाक ( ही नरकांची नावे आहेत) या स्कूल चे हेडमास्तर म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही या जन्मी जे पाप कराल ते पुढच्या जन्मात फेडावे लागते.
::: पुढचा जन्म चिकन चा असेल की पापलेट सुरमयी असेल या चिन्तेत विजुभाऊ
16 Apr 2008 - 12:34 pm | धमाल मुलगा
चतुरंगराव,
वास्तववादी वैचारिक अभ्यासपुर्ण आणि शास्त्र+तर्कशात्राच्या अनुशंगाने आलेली प्रतिक्रिया ! एव्हढेच म्हणू शकेन मी.
खूप छान सांगितलंत.
आवडलं.
आठवण झाली ती काही वर्षांपुर्वी एका मित्रासोबत त्याच्या सेमिनारची तयारी करतानाची. फोर्थ डायमेंन्शन असा त्याचा विषय होता. पुस्तकांचे ढिगारे, जालावरचे संदर्भ, सगळं उपसुन शेवटी आमचंही अगदी असंच मत झालं होतं.
आमच्या ह्या रिसर्चचा निष्कर्षही एकदम 'हटके' काढला होता..
Time, being the forth dimension of this so-called three dimensional world makes the things relate to a certain block of identity for the happenings. As one can rotate the three dimensional object & can view the desired pattern of that specific dimension,If....if one succeeds into turning to the forth dimension that is time, this three dimensional world may see an absolutely different aspect of the each & every incident happened or happening or going to happen !
We may kiss good bye to fortune tellers
(हे जवळपास ६-८ वर्षांपुर्वीचे असल्यामुळे वाक्यरचना जशीच्या तशी अस्ल्याची गॅरेंटी नाही.)
-ध मा ल. (इन फोर्थ डायमेंनशन)
16 Apr 2008 - 1:10 am | व्यंकट
खरं आहे, पण समजा १०० वॉटचा एक दिवा एका पूर्ण बंद खोलीत तासभर लावला, म्हणजे, वीज-उर्जेच रुपांतर प्रकाश उर्जेत झालं, तर मग नंतर त्या प्रकाश उर्जेला पुन्हा वीजेत बदलून वीज तुडवड्याचा प्रश्न सोडवता का येत नसावा?
व्यंकट
16 Apr 2008 - 8:45 am | चतुरंग
मुख्यत्वे ऊष्णता व प्रकाश ह्या मार्गे व्यय होईल. त्यातल्या फक्त प्रकाशाचा वापर करुन विद्युत शक्ती निर्माण करायची ठरवली तरी फोटोव्होल्टाइक सेलने ते शक्य होईलही. त्यातही परिवर्तनातला व्यय आणि निर्माण झालेल्या ऊर्जेची शक्ती ही अत्यंत मर्यादित असेल. शिवाय एकूण नफा- नुकसानीचा विचार करता हा पर्याय अजिबात व्यवहार्य ठरत नाही.
(अवांतर - मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जेचा वापर हा स्वस्तातला पर्याय करण्यासाठी जगभर प्रयत्न सुरु आहेत -दुर्दैवाने भारतात ह्याबद्दल जेवढे व्हायला हवेत तेवढे प्रयत्न होत नाहीत.
आपण व्यक्तिगत स्वरुपात सौर पॅनल बसवून छोट्याप्रमाणावर का होईना विजेचा प्रश्न आपल्यापुरता सोडवू शकतो. तेवढे केले तरी सुरुवात तर होईल.)
चतुरंग
16 Apr 2008 - 9:49 am | व्यंकट
धन्यवाद चतुरंगसाहेब,
उर्जा संपत नाही तिचे रुपांतर होते, असे असता, उष्णता आणि प्रकाश ह्यामार्गे रुपांतरीत झालेली उर्जा पुढे कशात रुपांतरीत होते? कारण ती नष्ट तर होत नाही, मग जर नष्ट होत नसेल तर ती एकतर कुठेतरी साचून राहीली असेल अथवा रुपांतरीत झाली असेल. मग ही जी कुणीतरी साठवली आहे ती कुंणी भिंतींनी ? फर्नीचर्नी ? ती ज्यानी साठवली ते तिला रिलीज करतात का? पुढे तिचे काय होते? थोडक्यात ह्या व्यय होणार्या उर्जेचा पूर्ण माग शास्त्रज्ञांनी काढला आहे का?
समजा, एखाद्याने जेवण करून उर्जा मिळवली, ती त्याने घाम गाळून खर्च केली, समजा नुस्ता रिकामा चरखा चालवला... आता ही उर्जा कुठे गेली ?
एकूणच कुठल्याही एकदा वापरून झालेली उर्जा जाते तरी कुठे?
व्यंकट
16 Apr 2008 - 7:58 pm | चतुरंग
विकिमधला हा दुवा वाचलात तर बरीच माहिती मिळेल.
चतुरंग
17 Apr 2008 - 11:00 am | व्यंकट
!
व्यंकट
15 Apr 2008 - 10:24 pm | मुक्तसुनीत
ठणठणपाळ यांना धन्यवाद !
16 Apr 2008 - 8:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ठणठणपाळराव,
नचिकेताचे आख्यान चांगले झाले आहे. त्याचबरोबर 'आत्म्याच्या अमरत्वाचे तत्वज्ञान काय आहे ? हेही कधीतरी सांगावे असे वाटते.
तसेच आत्म्याचे अमरत्व = ऊर्जेचे अविनाशत्वच 'चतुरंगाचे' विवेचनही झकास झाले आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
16 Apr 2008 - 11:16 am | विसोबा खेचर
अवांतर -
लिखाणासाठी मुद्दामच मराठी प्रमाण भाषा वापरली आहे.)
हे आपण आपल्यापुरतं म्हणत असाल तर आमचं काहीच म्हणणं नाही. आपण काहीही म्हणावयास मुखत्यार आहात, नव्हे तो आपला अधिकारच आहे!
परंतु आमच्यापुरतं बोलायचं झालं तर आम्ही 'प्रमाणभाषा' ही संकल्पनाच मानत नाही! भाषा ही प्रत्येकाकरता आहे, सर्वांकरता आहे. आमच्या मते अमूक भाषा म्हणजे 'प्रमाणभाषा' आणि तमूक भाषा म्हणजे 'अप्रमाणभाषा' अशी भाषेची कुठलीही बालिश वर्गवारी नसते!
असो..
अर्थात, उठा, जागे व्हा. आत्मप्राप्तीचा मार्ग मोठा दुर्घट आहे. धारदार वस्तर्याच्या पात्यावरून चालण्याइतके ते कठीण आहे. तरीही मागे हटू नका. योग्य व्यक्तिकडून आत्मज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय थांबू नका.
हा हा हा!
अहो कसला डोंबलाचा दुर्घट मार्ग आलाय? उगाच काय धारदार वस्तर्याचं पातं नी बितं?! आणि जळ्ळं आत्मज्ञान करून घ्यायला योग्य व्यक्ति तरी कशाला पाहिजे?!
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया
दुर्गं पथस्तत् कवयो वदन्ति
धत् तुमची रांडेच्यांनो ;)
च्यामारी, आपल्या जुन्या ग्रंथात 'आत्मज्ञान' हा शब्द उगाचच्या उगाच मारे जड वगैरे करून ठेवला आहे! उगाच च्यायला संस्कृतमधले जड जड शब्द वापरून एखद्याला आत्मज्ञान या शब्दाबद्दल आत्मियता वाटण्याऐवजी त्या शब्दाची भिती कशी बसेल हेच पाहिले आहे! 'आत्मज्ञान!', 'आत्मपाप्ती' ही म्हणजे काहीतरी भयंकर दुर्लभ गोष्ट आहे असाच एकूण सूर दिसतो!
ताजी फडफडीत तळलेली सुरमई पानात पडली की माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! एखाद्या लावण्यवतीसोबत रसिकतेने गप्पा मारत सिंगलमाल्टचे दोन पेग पिता पिता माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात बसून गाणी म्हणणे, सुखदु:खाच्या चार गप्पा मारणे, अडीअडचणीत सापडलेल्या एखाद्याला सर्वतोपरी मदत करणे यातून माणसाला आपोआप आत्मप्राप्ती होते असा माझा अनुभव आहे! दोन सुरेल तंबोर्यात जमलेला एखादा भन्नाट पुरिया किंवा तोडी ऐकतांना आत्मप्राप्तीचा अनुभव येतो असा माझा अनुभव आहे! एखाद्या अनाथाश्रमातल्या लहान मुलांना एखाद्या रविवारी अगदी मनमुराद गोडाधोडाचं जेवता येईल इतपत देणगी त्या आश्रमाला देऊन त्या लहानग्या अनाथांना ते गोडाधोडाचं जेवताना त्यांच्या चेहेर्यावरचा आनंद पाहण्यासारखा दुसरा आत्मानंद नाही असा माझा वैयक्तिक अनुभव आहे!
च्यामारी नचिकेताला आत्मप्राप्तीच्या इतक्या साध्या अन् सोप्या व्याख्याही समजू नयेत याचे नवल वाटते! आणि आत्मप्राप्ती, आत्मज्ञान म्हणजे काहीतरी भयंकर गूढ गोष्ट आहे आणि ती मिळवण्याकरता एखाद्या ज्ञानी माणसाचं साहाय्य घ्यावं हेच आयुष्यभर सांगत बसणार्या आपल्या ऋषिमुनींचीही मला कीव येते!
असो...
आपला,
(आत्मानंदी!)
तात्याभैय्या देवासकर,
देवसकरांची कोठी, इंदौर.
--
"अरे श्याम, बेटा ठेव ते गीतेचं पुस्तक बाजूला. फार थोर पुस्तक आहे ते. पण आपण नाही ना तेवढे थोर!"
"बेटा श्याम, न पेलणार्या गोळ्या घेऊ नयेत! मग त्या भांगेच्या असोत, वा आध्यात्माच्या असोत!"
"न पेलणार्या पट्टीत गाऊ नये. सगळं गाणं बेसूर होऊन जातं! आपली पट्टी काळी दोन. पांढरी तीन, पांढरी चार पट्टी आपल्याला जमायची कशी?!"
(इति काकाजी, नाटक तुझे आहे तुजपाशी)
16 Apr 2008 - 11:50 am | आर्य
आत्मप्राप्ती, आत्मज्ञान म्हणजे काहीतरी भयंकर गूढ गोष्ट आहे आणि ती मिळवण्याकरता एखाद्या ज्ञानी माणसाचं साहाय्य घ्यावं हेच आयुष्यभर सांगत बसणार्या आपल्या ऋषिमुनींचीही मला कीव येते!
सुरलोकातील श्रेष्ठ देवतादेखील ह्या प्रश्नाचे उत्तर जाणत नाहीत? च्यामरी मग कशाला पाहिजे असंल ज्ञान ?
यमानेच जर अमरत्वाचे तत्वज्ञान सांगितले आहे तर तेच वाचुन काढायचं .............झालं
आणि ओरिजनल पाहिजेच असेल तर "यमराज"च देतील ना ? नचिकेताला दिलं तस............मेल्यावर बधू......
बाकी चैतन्य काय आहे ह्या सगळ्यात? ते कुठून आलं तेवढ सांगा त्याचा पुढचा प्रवास / रुपांतरण मी सांगतो......
(योग्य व्यक्ति ?) आर्य
16 Apr 2008 - 12:11 pm | धमाल मुलगा
गोष्ट म्हणून आवडली खरं,मोठं भारावून जायला झालं...ते आत्मा,परमात्मा,मुक्ति, श्वर-नश्वराचं गौडबंगाल...पण तात्याभैय्या देवासकरांच्या प्रतिक्रियेने जमिनीवर आलो.
अगदी खरं आहे हे देखील. आध्यात्माचं वारंही न लागलेल्या आम्हा क्षुद्रातिक्षुद्राना कसलं आलंय आत्मज्ञान?
इथं तिच्याआयला कोणाला काळजी दोन वेळच्या घासाची, कोणाला काळजी पोरांच्या शिक्षणाची, तर कोणाला स्वतःच्या प्रगतीची.
हा नचिकेत बहुधा कधीही 'एंप्लॉयमेंट एक्सचेंज'च्या रांगेत उभा राहिला नसावा, त्याला कधी अप्रेझल्सकरता साठमारी करावी लागली नसावी. म्हणून अशा लहान वयात हे फावल्या वेळचे विचार....मरणानंतर काय नि कसे!
अरे, मान्य आहे हे जिवन क्षणभंगुर आहे, त्यामध्ये असलेली ऐहिक सुखं क्षणापुरती आहेत, असतील बापडी...पण ती आनंद देत नाहीत? आम्ही सर्वसामान्य माणसं...आता माणूस म्हणून जन्माला आल्यावर माणसाची जी काही उद्दिष्टं/कार्यं असतील ती नको का करायला?
कस्सलं काय?
एखादा मित्र बर्याच दिवसांनी त्याच्या घरी चाललाय, मोठ्या आनंदाने तुमच्यापाशी येतो,म्हणतो, "ओय यार! परसो मै घर जा रहा हूं | पूरा एक हफ्ता अपनी फॅमिलीके साथ बिताऊंगा |"
त्याच्या नजरेत तरळणारा आनंद,चेहर्यावरचं हसु बघा...साथीच्या रोगासारखं तुमच्याही चेहर्यावर तेच झळकेल. त्याला कडकडून मिठी मारा, म्हणा, "जा साले, हफ्ताभर ऐश कर के आ. मॉं जीके हाथों बना जी भर के खाके आ | मेराभी प्रणाम देना उनको" आता पुन्हा त्याच्या डोळ्यात बघा...हे जग-बिग सगळं तिच्याआयला त्या आनंदावरुन ओवाळून टाकावसं नाही वाटलं तर सांगा!
पावसात भिजलेलं एखादं मांजराचं पिल्लू उचलून घरी आणा, त्याला छान पुसा, गरमागरम दूध प्यायला द्या...दूध पिउन झाल्यावर तुमच्याच सोफ्यावर तंगड्या पसरुन ताणून दिलेल्या त्या पिल्लाकडं बघा...कसं वाटतंय? समाधान? तृप्त भावना? अहो माझ्यासाठी हेच आहे आत्मज्ञान !
ह्यावर मला 'आनंद' चित्रपटातलं एक वाक्य आठवतं...
"बाबूमोशाय...जिंदगी बडी होनी चाहिये.....लम्बी नही| मै हसते-खेलते छे: महिने जिया, आप बिना हसे सौ साल जिये..बोलो कौन ज्यादा जिया? "
[वाक्य तंतोतंत आठवत नाहीय्ये, पण आशय हाच आहे]
अहो इथं एक आयुष्य जगता जगता लोकांच्या नाकी नऊ येताहेत आणि मरणानंतर पुढे काय अन् मागे काय ह्याची उठाठेव हवीय कशाला? (निदान मला तरी)
आपला,
-(हृषीदांचा आनंद) ध मा ल
16 Apr 2008 - 12:27 pm | मनस्वी
+१
16 Apr 2008 - 12:57 pm | विसोबा खेचर
पावसात भिजलेलं एखादं मांजराचं पिल्लू उचलून घरी आणा, त्याला छान पुसा, गरमागरम दूध प्यायला द्या...दूध पिउन झाल्यावर तुमच्याच सोफ्यावर तंगड्या पसरुन ताणून दिलेल्या त्या पिल्लाकडं बघा...कसं वाटतंय? समाधान? तृप्त भावना? अहो माझ्यासाठी हेच आहे आत्मज्ञान !
क्या बात है धमाल्या! सुंदर रे!
आपला,
(आत्मज्ञानी धमाल्याचा आत्मानंदी गुरू!) तात्या.
:)
18 Apr 2008 - 6:18 am | विजुभाऊ
अहो इथं एक आयुष्य जगता जगता लोकांच्या नाकी नऊ येताहेत आणि मरणानंतर पुढे काय अन् मागे काय ह्याची उठाठेव हवीय कशाला?
अरे बापरे ! हे काय ? धमु बाळा तू चार्वाकाचे सारे तत्वज्ञान एका वाक्यात उतरलवस की रे.झकास. आजपासुन तूच आमचा नचिकेता
18 Apr 2008 - 12:38 am | धनश्रीदिनेश
तुम्हाला बर्याच जणानी नचिकेताबद्द्ल माहीती दिली आहे, पण माझ्या वाचण्यात आलेली गोष्ट थोडी वेगळी आहे.त्याचे बाबा वाजश्रवस तेजस्वी ब्राम्हण होते,सन्स्क्रूतीच्या कार्यात आपले आयुष्य दिले, त्यामुळेच नचिकेत सुद्धा तेजस्वी होता. त्याने यमाकडे ३ वर मागितले १ वडिलाचा राग शान्त व्हावा. २ अग्निविद्या, ३ महत्वाच म्हणजे आत्मज्ञान ज्याची १ली पायरी - माणुस पशु नाही इश्वराविषयी क्रुतज्ञा बुद्धि जीवनात आणणे, २री पायरी मी माणूस आहे,म्हणुन माणुसकी प्रमाणे जगा, ३री पायरी अहं ब्रम्हास्मि | मी ईश्वर आहे, ईश्वर माझ्यातच आहे नचिकेताच्या वडिलांनी सर्वस्व दक्षिणा नावाचा यज्ञ केला होता कारण नचिकेत वडिलांप्रमाणॅच तेजस्वी होता त्याला स्वत:च्या बळावर सर्व मिळवावयाच होत.[ श्राद्ध भाग २ हे पुस्तक परम पुज्य पांडुरंग शास्त्री आटवले ह्यांच्या सद्वीचार दर्शन ह्यातुन घेतले आहे ] त्यात ही कथा सविस्तरपणे आहे