दु:खद निधन

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
13 Apr 2008 - 10:53 am

प्रसिद्ध स॑गीतकार श्री. दशरथ पुजारी या॑चे काल डो॑बिवली येथे कर्करोगाने देहावसान झाले.
पुजारीसाहेबा॑चे नाव घेतले की आठवितात त्या॑नी निर्मिलेली साधी-सोपी, पण अवीट गोडीची भावगीत॑ आणि सात्विक वृत्तीची भक्तिगीत॑. त्या॑च्या गाण्याशिवाय आकाशवाणीचा तर दिवस जात नसेल. पुजारीसाहेबा॑नी स॑गीत दिलेली सुमन कल्याणपुरा॑च्या सुमधूर आवाजातील किती तरी गीत॑ रसिका॑ना आठवत असतील. 'रिम झीम करती श्रावण धारा' 'गरजत आले वारे' 'मृदुल स्वरा॑नी छेडित तारा' ' अजुन त्या झुडुपा॑च्या मागे' यासारखी एक से एक सरस भावगीते आजही मनास व्याकूळ करतात. सकाळी आकाशवाणीवर 'केशवा माधवा' 'देव माझा विठू सावळा' 'हरि भजनाविण काळ' इ. गाणी आपले मन शुचिर्भूत करतात.
दशरथ पुजारी हे स्वतः उत्कृष्ट हार्मोनियम वादकही होते. त्या॑नी प॑.लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले या॑च्याकडून जयपूर घराण्याची तालीम घेतली होती. मु॑बई आकाशवाणीचे ते कित्येक वर्षे आधारस्त॑भ होते. आजचे आघाडीचे स॑गीत-स॑योजक अनिल मोहिले हे उमेदवारीच्या काळात पुजारीसाहेबा॑चे सहाय्यक होते.
पुजारीसाहेबा॑च्या आत्म्यास ईश्वर शा॑ती देवो..
(त्या॑चा दु:खी शिष्य) प्रसाद दाढे

संगीतबातमी

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

13 Apr 2008 - 11:16 am | विसोबा खेचर

वाचून खूप वाईट वाटलं दाढेसाहेब! अजून काय लिहू?

ही अशी गुणी माणसं पुन्हा होणार नाहीत!

साला, गाण्याच्या गणगोतातलं कुणी गेल्याचं कळलं की खूप त्रास होतो. रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असतात ही नाती!

तात्या.

नीलकांत's picture

13 Apr 2008 - 11:20 am | नीलकांत

ह्यांची गाणी आधी पासून ऐकून आहे.

परमात्मा त्यांना शांती देवो.

प्रमोद देव's picture

13 Apr 2008 - 11:25 am | प्रमोद देव

दशरथ पुजारी नावाचा संगीताचा पुजारी आपल्यातून निघून गेल्यामुळे गाण्यातला गोडवाच हरपलाय असे मला वाटते.
'अशीच अमुची आई असती ' हे त्यांचे गाणे, माझे अत्यंत आवडते गाणे होते. त्याशिवाय 'अजून त्या झुडपांच्या मागे,हरी भजनाविण काळ घालवू नको रे ' अशी कितीतरी सुमधुर गाणी त्यांच्या गळ्यातून ऐकलेली आहेत. माझ्या आवडत्या संगीतकार आणि गायकांपैकी अजून एक बूजुर्ग व्यक्ती आपल्यातून निघून गेलेय. आता उरल्या फक्त आठवणी. :(
पुजारी साहेबांना माझी विनम्र आदरांजली.
त्यासंबंधीची बातमी येथे पाहा.

अवांतरः गेल्याच महिन्यात माझे असेच एक परिचित आणि आवडते गायक आणि संगीतकार श्री. भूमानंद बोगम ह्यांचेही निधन झाले होते. त्यांनाही माझी आदरांजली.
बहुधा स्वर्गात एखादे संगीत संमेलन असावे आणि त्यासाठी ह्या लोकांना पाचारण केले असावे अशी एक कल्पना मनाला चाटून गेली.
ह्या सर्वांच्या जाण्याने माझे ते बालपणातील एकेक संगीत सुर हरवायला लागलेत. :(

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

आनंद घारे's picture

13 Apr 2008 - 11:55 am | आनंद घारे

आज सकाळच्याच वर्तमानपत्रात त्यांना चतुरंग संगीत सन्मान जाहीर करण्यात आल्याचे वृत्त होते आणि त्याच्या बाजूलाच ते अत्यवस्थ असल्याची बातमी होती. मृत्यू येण्यापूर्वी त्यांना या पुरस्काराबद्दल कळले तरी होते की नाही ते ठाऊक नाही. हा सन्मान थोडे दिवस आधी मिळाला असता तर....? त्यांची गाणी इतकी सुमधुर आहेत की त्यांना अशा औपचारिक शिक्क्याची गरज नव्हतीच, पण अशा देण्याने त्या सन्मानालाही सन्मान मिळतो!

विवेक काजरेकर's picture

13 Apr 2008 - 12:43 pm | विवेक काजरेकर

या थोर संगीतकाराला माझीही श्रद्धांजली.
त्यांनी संगीतबद्ध केलेली माझी काही आवडीची गाणी ......
क्षणभर उघड नयन देवा
वारयावरती घेत लकेरी
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आलो
या लाडक्या मुलांनो
मृदुल करांनी छेडित तारा
रे क्षणाच्या संगतीने
मस्त ही हवा नभी, वाटते नवे नवे
नंदाघरी नंदनवन फुलले
भाग्य उजळले तुझे चरण पाहिले
निरोप तुज देता, उर्मिला मी
रिमझिम झरती श्रावणधारा
ते नयन बोलले काहीतरी
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
आकाश पांघरुनी जग शांत झोपलेले
अजून त्या झुडुपांच्या मागे

सुमन कल्याणपूरसारख्या अतिशय गुणी गायिकेचा वापर दशरथ पुजारींयेवढा सातत्याने इतर कोणत्याही संगीतकाराने बहुधा केला नसावा.
या कल्पक संगीतकाराला पुन्हा एकदा सलाम. दशरथ पुजारीसाहेबांच्या गाण्यांची संपूर्ण सूची कोणाकडे उपलब्ध असल्यास सगळ्यांशी शेअर करावी

विदेश's picture

13 Apr 2008 - 1:05 pm | विदेश

सुमन कल्याणपूर आणि भावगीतातील गोडवा यांनी -दूरदर्शन नसताना- आकाशवाणीद्वारे आमचे कान खरेच श्रवणीय झाले होते.
प्रमोदकाकांप्रमाणेच अनेकांच्या बालपणातील संगीताचे सूर हरवत आहेत.

गाण्याच्या गणगोतातलं कुणी गेल्याचं कळलं की खूप त्रास होतो. रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट असतात ही नाती!
सहमत.
दशरथ पुजारीसाहेबांच्या गाण्यांची संपूर्ण सूची कोणाकडे उपलब्ध असल्यास सगळ्यांशी शेअर करावी
इथे बर्‍याच गीतांची यादी आहे.

दशरथ पुजारी यांना श्रद्धांजली.

विवेक काजरेकर's picture

13 Apr 2008 - 3:47 pm | विवेक काजरेकर

दुव्याबद्दल धन्यवाद अविनाश. या संकेतस्थळाला मी नेहेमीच भेट देतो. पण जशी काही संगीतकारांची संपूर्ण Discography उपलब्ध असल्याचं स्मरतंय तशी पुजारीसाहेबांची संपूर्ण कारकीर्दीतली गाणी इसवीसनानुसार मिळाली तर उत्तम. पुजारीसाहेबांवर एखादं चरित्रात्मक पुस्तक असल्याचं आठवतंय का कोणाला ?

विवेक काजरेकर यांसी........
दशरथ पुजारी यांचे ' अजुन त्या झुडुपांच्या मागे ' या नांवाचे आत्मचरीत्र आहे.
[पुजारींचा भक्त...] केशवराव.

विवेक काजरेकर's picture

14 Apr 2008 - 11:23 am | विवेक काजरेकर

येत्या भारत भेटीत आठवणीने हे पुस्तक घेण्याचा प्रयत्न करेन

केशवराव's picture

13 Apr 2008 - 4:52 pm | केशवराव

दशरथ पुजारी गेले. आणखी एक तारा निखळला. नॉस्टॅलजिक व्हायचे नाही असे म्हटले तरी कसे शक्य आहे? आमच्या भाव विश्वातला एक एक दुवा असा तुटायला लागला तर कसे व्हायचे? जुन्या तबकड्याच ऐकत बसायचे का?
पुजारी साहेबांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची नांवे कुठे एकत्र मिळतील का?
ईश्वर त्यांना सद्गती देवो.
पुजार्यांचा भक्त...... केशवराव.

डॉ.प्रसाद दाढे's picture

13 Apr 2008 - 5:31 pm | डॉ.प्रसाद दाढे

पुजारी साहेबा॑च्या काही आठवणी.. त्या॑ना पाहताच 'साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी' हीच म्हण कुणाच्याही मनात आली असती. एव्हढे अन्याय होऊनसुद्धा त्या॑च्या वाणीत कटूता कधीच नव्हती. उलट जुन्या काळातल्या ग॑मती-किस्से ते र॑गवून सा॑गत असत. त्या॑नीच मला सा॑गितलेली एक गोष्ट- एकदा ते रेडिओस्टुडिओमध्ये गेले असता त्या॑ना तेथे रफीसाहेब हातात वही घेऊन एका मराठी गाण्याचा सराव करता॑ना दिसले. पुजारीसाहेबा॑नी त्या॑ना आश्चर्या॑ने विचारले की 'तुम्ही आणि मराठी गाणे.. हे कसे?' त्यावर रफीसाहेब त्या॑ना मिष्किलपणे पण दबक्या आवाजात म्हणाले, 'अब क्या करे॑, उस श्रीका॑त ठाकरेने मुझे धमकी दी है॑ कि रफी तुम इतने सा॑ल बम्बईमे॑ होकरभी एकभी मराठी गाना नहि॑ गाया? ये नहि चलेगा..आज तो तुझे मराठी गाना गानाही पडेगा..' 'एकदम सही बात है॑' असे पुजारीसाहेबा॑नी म्हणून ठाकरे॑चे ह्या कल्पनेबद्दल अभिन॑दन केले आणि मग 'प्रभू तू दयाळूचे' रेकॉर्डी॑ग सुरू झाले..
पुजारीसाहेब अनेक वर्षे॑ गिरगावात राहात होते. पुढे डो॑बिवलीत आल्यावर आमचे व त्या॑चे कौटू॑बिक स॑ब॑ध जुळले. पण पूर्वीपासूनच त्या॑च्या गाण्या॑चा व आमचा एक वेगळाच भावनिक ब॑ध होता.साधारणपणे अडुसष्ट-एकोणसत्तरच्या सालच्या आसपास दशरथ पुजारी या॑चे 'मृदुल स्वरा॑नी छेडित तारा' हे गाणे आकाशवाणीवर खूप गाजले होते. माझ्या आई-वडिला॑ना ते गाणे एव्हढे आवडले होते की त्या॑नी आपल्या प्रथम कन्येचे नाव 'मृदुला' असे ठेवले. आणि योगायोग असा की पुजारीसाहेबा॑नी आपला गाण्या॑चा अखेरचा अल्बम (शब्द जरी होते माझे) तिच्याच आवाजात काढला..

प्रमोद देव's picture

13 Apr 2008 - 5:52 pm | प्रमोद देव

प्रसादशेठ तुम्ही पुजारी साहेबांच्या आठवणी लिहाच.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

डॉ.प्रसाद दाढे's picture

13 Apr 2008 - 9:16 pm | डॉ.प्रसाद दाढे

गेले काही वर्षे मी पुण्यात असल्यामुळे मला गुरू॑चे (स्व.पुजारीसाहेब) दर्शन खूप दिवसा॑त घडले नाही. पण आता मात्र जिवास चुटपुट लागून राहिली आहे.
मी त्या॑च्याकडे हार्मोनियम शिकण्यास जात असे. (१९९६ ते ९८) त्या॑ची हार्मोनियमवर इतकी हुकूमत होती की ऐकणारा केवळ स्तिमित होत असे. ते पेटी गायकी ढ॑गाने फार नजाकतीने वाजवित असत. भावगीत गायक व स॑गीतकार असले तरी त्या॑चा हि॑दूस्थानी शास्त्रीय स॑गीताचा सखोल अभ्यास होता. मला ताल धरायला सा॑गून ते पेटीवर एखादा राग वाजवित तेव्हा कधी कधी असे वाटे की आता सम चुकणार, पण वीज कोसळावी तसे ते समेला पोहोचत आणि ऐकणार्‍या॑च्या तो॑डून वाहवा येत असे. तालाशी खेळणे त्या॑ना खूप आवडायचे; ती त्या॑च्या गुरू॑ची त्या॑ना देणगी होती. एका खाजगी मैफिलीत तर त्या॑नी प॑.चिमोटे॑वर देखील मात केली होती. तथापि प॑. चिमोटे॑बद्दल त्या॑ना खूप आदरही होता. चिमोटेच काय, बाबूजी, खळेसाहेब, वस॑त प्रभू, विश्वनाथ मोरे॑सारख्या आपल्या समवयस्क स॑गीतकारा॑बद्दलही ते निता॑त आदराने बोलत असत. (हेही त्या॑च्याकडून शिकण्यासारखे होते)
त्या॑चा आणखी एक अज्ञात पैलु म्हणजे कुस्ती व व्यायामाची आवड. लहानपणी आखाड्यात डावपेच शिकल्याचे ते सा॑गत व मिष्कीलपणे मलाही व्यायाम करण्याचा सल्ला देत. त्या॑चा ज्योतिषशास्त्रावरही बराच विश्वास होता व अभ्यासही होता.
माझ्या कॉलेज शिक्षणामुळे न॑तर मला त्या॑च्याकडून खूप शिकता आले नाही याचे वैषम्य आयुष्यभर राहिल पण त्या॑च्यासारख्या दिग्गज स॑गीतकाराचा काही काळ सहवास आणि गुरूकृपा लाभली याचे समाधानही वाटेल..

भडकमकर मास्तर's picture

14 Apr 2008 - 3:09 pm | भडकमकर मास्तर

फार छान आठवणी लिहिल्या आहेस प्रसाद....
दशरथ पुजारींना माझीही आदरांजली...

विवेक काजरेकर's picture

13 Apr 2008 - 6:16 pm | विवेक काजरेकर

दाढेसाहेब,

क्षमा करा, एक चुकीची दुरुस्ती सुचवावीशी वाटते आहे. तुम्ही वर "मृदुल स्वरांनी छेडित तारा" असा दोनदा उल्लेख केला आहे. पण ते गाणं "मृदुल करांनी छेडित तारा" असं आहे.

डॉ.प्रसाद दाढे's picture

13 Apr 2008 - 8:39 pm | डॉ.प्रसाद दाढे

मृदुल करांनी छेडित तारा"
हेच बरोबर आहे.. चुकून 'स्वरा॑नी' असे लिहिले गेले

चतुरंग's picture

13 Apr 2008 - 9:10 pm | चतुरंग

पडद्याआड गेली की काळजात कळ येते!
एक निश्चित की संगीत अमर आहे आणि चांगल्या गोष्टींचा ओघ ह्या ना त्या मार्गाने पुढे चालू रहातोच रहातो. तसा तो राहो ही सदिच्छा.
दशरथ पुजारींना भावपूर्ण श्रध्दांजली.

चतुरंग

ऋषिकेश's picture

13 Apr 2008 - 9:27 pm | ऋषिकेश

आता मिपावर वाचलं.. वाईट वाटलं.. :(

दशरथ पुजारींना विनम्र श्रध्दांजली.

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

मुक्तसुनीत's picture

13 Apr 2008 - 9:35 pm | मुक्तसुनीत

त्यांच्या गाण्यांशी असंख्य आठवणी निगडीत आहेत. कुणीतरी घरातले गेल्यासारखे वाटते आहे. आजीच्या पांघरूणात, मामाच्या कडेवर असताना, शेजार्‍यांकडे खेळताना , कळत-नकळत त्यांनी केलेली गाणी कानावर पडत राहिली ; अंतर्मनात कायमची वसतीस्थानी आली.

आज ते गेले तरी त्यांच्या गाण्यांच्या स्मृती आहेत. त्यांनी गाण्यांवाटे दिलेल्या आनंदाचे, लहानपणाच्या आठवणींना आपल्या स्वरांनी सुगंधित केल्याचे ऋण कायमचे राहील.

व्यंकट's picture

14 Apr 2008 - 11:59 am | व्यंकट

पुजारीसाहेबा॑च्या आत्म्यास ईश्वर शा॑ती देवो..

व्यंकट