चौदावं सरुन पंधरावं लागलय तिला..
दाट केसांच्या घट्ट दोन वेण्या घालुन शाळेला निघालीये ती..
तळपत्या सूर्याची किरणं पडताहेत तिच्या कोवळ्या चेहर्यावर
त्यांना चुकवण्यासाठी मान खाली घालून चाललीये ती..
रस्त्यातून जाणार्या एक-दोन आज्ज्यांच्या डोलताहेत माना..
"कशी सालस पोर हो..कधी डोकं वर करुन नाही बघायची!"
पण खरं तर मनातुन तिलाही वाटतय
कुणीतरी यावं मागून सायकलवरुन
अन 'विचारावं' तिला
मग निर्दयपणे हसून 'नाही' म्हणावं तिनं त्याला..
पण नाही वाजत सायकलची घंटी मागून!
जाऊ द्या..तिला काय त्याची पर्वा..
तिला माहितीये, एक दिवस येणार आहे तिच्या स्वप्नांचा राजकुमार,
अन घेऊन जाणार आहे तिला दू.....र देशी विमानातुन
कळेल तेव्हा तुम्हाला!
एकोणीसावं सरुन विसावं लागलय तिला
किरमिजी रंगाचा चुडीदार खुलतोय तिच्या गव्हाळ कांतीवर
कॉलेजला निघालीये ती
सूर्य्,ऊन अन हिची मान खाली..
एक दोन आज्ज्यांच्या डोलणार्या माना..
पण मनातुन तिलाही वाटतय
वाजवावी शीळ कुणीतरी मागून
मग टाकावा आपण त्याच्यावर एक जळजळीत नेत्रकटाक्ष
नाही घालत आहे कुणी शीळ
जाऊ द्या..तिला काय त्याची पर्वा
ती तर जाणार आहे दूर देशी राजकुमारा बरोबर
कळेलच तेव्हा तुम्हाला..
बावीसावं लागलय तिला
जोश्यांच्या मधुकरचं स्थळ घरबसल्या चालून आलय
आई बाप खुष आहेत
मुलगा कारकून्..सरकारी नोकरी आहे
त्यांना ही अशीच मान खाली घालून चालणारी सालस सून हवी आहे..
ही नि:स्तब्ध.. नेमस्त आई बाप समजावताहेत
हिच्या पाठच्या दोघी अजुन उजवायच्या आहेत..
पण हिची स्वप्नं? तो दूर देश..राजकुमार्..विमान....अरे थांबा!
'स्त्री' आहे ती आता..
आता तिच्या स्वप्नांवर तिचा काय हक्क?
प्रतिक्रिया
23 Sep 2010 - 10:21 pm | पैसा
:(
24 Sep 2010 - 12:12 am | कुसुमिता१२३
धन्यवाद!
24 Sep 2010 - 2:13 am | चित्रा
कविता आवडली.
24 Sep 2010 - 2:15 am | बेसनलाडू
(वाचक)बेसनलाडू
24 Sep 2010 - 2:18 am | चित्रा
परत वाचताना फक्त वाटले की शेवटच्या तीन ओळी फारच स्पष्ट आहेत. अर्थ वाचकांनी काढलाच असता.
24 Sep 2010 - 7:53 am | कुसुमिता१२३
चित्रा,बेसन लाडू, प्रतिसादाबद्दल आभार!
24 Sep 2010 - 10:41 am | अनिल २७
अशीच एक "ती" मला माहितेये, म्हणून कविता मनाला भिडली..
24 Sep 2010 - 11:27 am | काव्यवेडी
फार छान !! खुप आवडली.
24 Sep 2010 - 11:35 am | मस्त कलंदर
छान कविता.. चित्रातैंशी सहमत.
24 Sep 2010 - 2:15 pm | कुसुमिता१२३
अनिल,काव्यवेडी, मस्त कलन्दर प्रतिसादाबद्द्ल खुप खुप आभारी..
24 Sep 2010 - 3:49 pm | परिकथेतील राजकुमार
चौदा पंधराव्या वर्षी पोरीची जाण बघुन समाधान वाटले.