सायकल चोर

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
22 Sep 2010 - 2:18 pm

माझ्या लहानपणी, साधारण सात-आठ वर्षांचा असताना एक इटालियन चित्रपट पाहिला होता 'द बायसिकल थिव्हज' ! तेंव्हा तो फारसा समजलाही नव्हता पण घरी आल्यावर आईने त्याची गोष्ट सांगितली होती.
नुकतीच त्या सिनेमाची आठवण झाली व प्रकर्षाने तो पुन्हा पहावा असे मनाने घेतले. मग मुलाच्या मदतीने तो नेटवर शोधला, त्याची सबटायटल्स शोधली आणि बघितला. एक अविस्मरणीय अनुभव घेतल्याचे समाधान मिळाले. या चित्रपटाला ऑस्कर व इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत व जगभरातल्या समीक्षकांनी तो अद्वितीय असल्याचे मान्य केले आहे. हा चित्रपट वास्तववादी चित्रपटांच्या प्रारंभापैकी एक मानला जातो.

दुसर्‍या महायुध्दानंतरच्या मंदीच्या काळात इटालीमधली ही गोष्ट आहे. नोकर्‍यांचे दुर्भिक्ष व गरीबी अशा काळात रोममधे रिची हा आपला कथानायक नोकरीसाठी एका केंद्राबाहेर बसलेला असतो. त्याचे नांव पुकारताच त्याचा मित्र त्याला बोलावून आणतो. नोकरी पोस्टर्स चिकटवण्याची असते पण त्यासाठी स्वतःची सायकल असणे जरुरी असते. तो नोकरीची चिठ्ठी घेऊन वाटेत सार्वजनिक विहीरीवर पाणी भरणार्‍या आपल्या बायकोला भेटतो आणि ते दोघे आता काय करावे याचा विचार करत घरी येतात. याची सायकल दुरुस्तीला पडलेली असते पण सोडवायला पैसे नसतात. बायको घरच्या जुन्या व नव्या चादरी गहाण ठेवून पैसे उभे करते आणि ते सायकल मिळवतात. वाटेत बायको एका ठिकाणी वर जाते, भविष्य सांगणार्‍या एका बाईचे पैसे द्यायला. तिने तुझ्या नवर्‍याला नोकरी मिळेल असे भाकित केलेले असते. रिची तिच्या या अंधश्रध्देची चेष्टा करतो. बिचारा मुलगा सकाळी लवकर उठून बापाची सायकल पुसून चकचकीत करतो. मुलाला पेट्रोलपंपावर कामाला सोडून हा नोकरीला जातो. एक सहकारी त्याला पोस्टर्स कशी चिकटवायची ते शिकवतो. पोस्टर लावताना हा शिडीवर चढलेला असताना एक टोळी येते व त्यातील एकजण त्याची सायकल पळवतो तर हा पाठलाग करत असताना दुसरा त्याला गुमराह करतो. बिचारा, पोलिसही मदत करत नाहीत म्हणुन मुलाला घेऊन घरी येतो. पुन्हा घराबाहेर पडून एका मित्राची मदत मागतो. सकाळी उठून मुलगा, मित्र व त्याचे सहकारी असे चोरबाजारात शोधायला निघतात. तिथे सगळ्या सायकलींचे सुटे पार्टस करुन ठेवलेले असतात. अशा तर्‍हेने शोध हा निष्फळ ठरतो.
सगळीकडे शोधून दमल्यावर तो मुलाला घेऊन एका बर्‍याशा रेस्तांरांमधे जातो आणि क्षणभर ते दु:खी जीव आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण सायकल नाही तर नोकरी नाही आणि नोकरी नाही तर उपासमार, हे दाहक सत्य तो विसरु शकत नाही. निराश होऊन तो त्या भविष्यवेत्तीकडे पण जातो पण तिथेही पदरी निराशाच पडते. तिथून बाहेर पडल्यावर योगायोगाने तो सायकलचोर दिसतो. त्याचा पाठलाग करुन त्याला पकडल्यावर त्याचे शेजारी त्या चोराची बाजू घेतात. मुलगा पोलिसाला बोलावून आणतो. पण शेवटी पुरावा काहीच न मिळल्यामुळे अपमानित होऊन त्याला त्या वस्तीतून बाहेर पडावे लागते. अगदी शेवटी निराश व उद्विग्न होऊन ते एका फुटबॉल स्टेडियमच्या बाजूला बसलेले असतात. बाहेर सायकलींचा ढीग असतो. एका घराबाहेर लावलेल्या सायकलकडे रिचीचे लक्ष जाते. चोराला शोधून न्याय मिळवण्यासाठी तळमळणारा शेवटी स्वत्;च सायकल चोरतो आणि दुर्दैवाने पकडला जातो. मुलासमोर पकडले जाणे, मारहाण, अपमान या सगळ्या वेदना तो भोगतो. मुलाकडे पाहून सायकल मालकाला त्याची दया येते आणि तो त्याला पोलिसांकडे सोपवत नाही. हताश झालेले ते बापलेक डोळ्यांत अश्रु, चेहेर्‍यावर अगतिकतेची भावना, असे, घरची वाट जड पावलांनी चालू लागतात.
या चित्रपटाचे वैशिष्ठ्य म्हणजे अप्रतिम अभिनय! रिची, त्याची बायको मारिया व मुलगा ब्रुनो यांचा अभिनय स्तिमित करुन सोडतो. विशेषतः त्या छोट्या मुलाने प्रत्येक प्रसंगी दाखवलेले चेहेर्‍यावरील भाव हे इतके बोलके आहेत की सबटायटल्स नसती तरी काही फरक पडला नसता. व्हिट्टोरियो दि सिका याचे दिग्दर्शन तर सार्‍या जगाच्या कौतुकाचा विषय बनले आहे.

आपल्या मिपाकरांपैकी जर कोणी हा बघितला असेल तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल.

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

Pain's picture

22 Sep 2010 - 2:24 pm | Pain

:(

छान सांगितले आहे.
पिक्चर बघितलेला नाही पण तुमच्याकडुन कळाला.
प्रत्येक्ष अभिनय पहाण्यात मजा यीइल .. त्यामुळे नक्की बघेन

धन्यवाद

छान सांगितले आहे.
पिक्चर बघितलेला नाही पण तुमच्याकडुन कळाला.
प्रत्येक्ष अभिनय पहाण्यात मजा यीइल .. त्यामुळे नक्की बघेन

धन्यवाद

मस्त कलंदर's picture

22 Sep 2010 - 4:07 pm | मस्त कलंदर

छान ओळख करून दिलीत एका नव्या चित्रपटाची..

विशेषतः त्या छोट्या मुलाने प्रत्येक प्रसंगी दाखवलेले चेहेर्‍यावरील भाव हे इतके बोलके आहेत की सबटायटल्स नसती तरी काही फरक पडला नसता.

दुर्दैवाने भारतीय चित्रपटात ही सटल्टी नाही हे मला असे चित्रपट पाहताना जाणवते. प्रत्येक गोष्ट मसाला पद्धतीने दाखवली तरच भारतीयांना समजते असा आपल्या दिग्दर्शकांचा समज दिसतो. अर्थात यालाही काही अपवाद आहेत, हे आपले नशीब..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2010 - 10:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि सटल्टीच्या बाबतीत तर दहादा सहमत.

पहायचा राहून गेला आहे अशा उत्तम सिनेमाच्या पुनर्स्मरणाबद्दल धन्यवाद, तिरशिंगराव! आता नक्की शोधून आणणार आणि पहाणार, ओळख छानच.

अदिती आणि मस्त कलंदरः तुम्हा दोघींच्या subtletyच्या मुद्द्याबद्दल सहमत.

अशा वेळी आपल्याकडे 'कोशिश' सारखे चित्रपट आधिक का येत नाहीत याची खंत वाटते. संजीवकुमार आणि जया भादूरी या कलाकारांनी या चित्रपटातील कित्येक प्रसंग केवळ कायिक अभिनयावर आणि नजरेतून ज्या समर्थपणे व्यक्त केले आहेत त्याला तोड नाही! उदाहरण म्हणून ३२:२० ते ४२:२० या कालावधीतील प्रसंग पहावेत (संपूर्ण चित्रपटच पुन्हा-पुन्हा पहावा इतका अप्रतिम आहे -त्यात खर्‍या दिलीपकुमार ने स्वतःवरच केलेल्या विनोदासकट!)

शिशिर's picture

22 Sep 2010 - 4:47 pm | शिशिर

फार एकले आहे ह्या सिनेमा बद्दल. आजून बघायला नाही मिळाला. कथा वाचल्यावर उत्सुकता आजून वाढली. दोन लहान मुलांचा (भाउ-बहिण) अप्रतिम अभिनय असलेला असाच एक सिनेमा म्हणजे ईराण चा Children of Heaven. त्यावरच बेतलेला अलिकडे आलेला सिनेमा म्हणजे बमबम बोले.

मस्त कलंदर's picture

22 Sep 2010 - 8:17 pm | मस्त कलंदर

जर तो पाहिला नसेल तर तो कसा होता हे इथे वाचा आणि पुन्हा एकदा चिल्ड्रेन ऑफ हेवन पाहायला घ्या.. मी वरती सटल्टीबद्दल जेव्हा लिहिले, तेव्हा डोक्यात बम बम आणि चिल्ड्रेन...च होता!!!

रुपी's picture

22 Sep 2010 - 11:06 pm | रुपी

जेव्हा 'सकाळ' सध्याच्या न्यूनतम पातळीच्या एक-दोन पायरी वर होता, तेव्हा त्यामध्ये एक सदर होते. त्यात अशा चांगल्या देशी-विदेशी चित्रपटांबद्दल छापून यायचे. त्यात या Children of Heaven बद्दल वाचले होते.
हा Bicycle Thieves सबटायटल्स सहीत कुठे मिळेल? काही माहिती मिळाली तर बरे होईल.

शिल्पा ब's picture

22 Sep 2010 - 10:15 pm | शिल्पा ब

चित्रपट म्हणून चांगला आहे...आवडला..
बाकी socialist अजेंडा वाटतो.