ओ कलकत्ता

पैसा's picture
पैसा in जनातलं, मनातलं
18 Sep 2010 - 11:38 pm

गेल्या वर्षी युनियनच्या कॉंफरन्सच्या निमित्ताने कलकत्त्याला गेले होते. बरोबर 2 मैत्रिणी होत्या. वास्को- हावडा एक्सप्रेसने आम्ही कलकत्त्याला पोचलो. महिला वर्गासाठी रहाण्याची उत्तम सोय गुजरात समाजाच्या लॉजमध्ये केली होती. तर कॉन्फरन्स “महाजाति सदन” मध्ये बडा बाजार रस्त्यावर होती. बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे. सकाळी ते पाहिलं.
कॉंफरन्स सुरू झाली. नाश्ता जेवण सगळं वेगळ्याच बंगाली चवीचं पण स्वादिष्ट होतं. दिवसभर भाषणं वगैरे झाली. रात्रीच्या जेवणाची व्यवस्थाही तिथेच, म्हणजे महाजाति सदन मध्ये होती. रसभरे रसगुल्ले खाउन रसना तृप्त झाली. जेवण जरा जास्तच झालं. आम्हाला गुजरात लॉजकडे पोचवण्यासाठी बसेस ठेवल्या होत्या. बस यायला थोडा वेळ होता. म्हटलं थोडे पाय मोकळे करूया. मी आणि माझी मैत्रीण रस्त्याच्या बाजूच्या फूटपाथवर चालायला लागलो.
मेट्रो स्टेशन ओलांडून थोडं पुढे गेलो. काही अंतरावर फूटपाथवर बस स्टॉपचा एक आडोसा होता. वरचा लाईट बंद होता. त्या अर्धवट उजेडात नीट पाहिलं तर एक म्हातारा, एक म्हातारी आणि एक मध्यमवयीन पण उतारवयाचा माणूस, तिघंजण जीर्ण मळकट कपडे पांघरून फूटपाथवर कोंडाळं करून बसले होते. नीट पाहिलं तर त्यांच्या मधोमध एक पत्रावळ होती. वर थोडासा भात, आणि त्या भातावर दिसेल न दिसेलसा डाळीचा पिवळा ठिपका. ते तिघेही बाकी सगळ्या जगाला विसरून ते जेवत होते.
हे दृश्य पाहून थोड्या वेळापूर्वी पोटात गेलेलं सुग्रास अन्न टोचायला लागलं. मी माझ्या मैत्रिणीकडे फक्त पाहिलं. आणि आम्ही दोघी एकही शब्द न बोलता तिथून मागे फिरलो. महाजाति सदनमध्ये ५०० लोक जेवून उरलेल्या अन्नाचे ढीग काउंटर्सवर अजूनही तसेच होते. बाजूलाच स्थानिक कार्यकर्त्यांसाठी कागदाच्या खोक्यांमध्ये जेवणाची पार्सलं नीट तयार करून रचून ठेवली होती. आम्ही दोघीनी त्यातली दोन खोकी उचलली आणि परत त्या म्हातार्‍यांच्या दिशेने निघालो.
परत त्यांच्यापर्यंत पोचताच ती खोकी त्यांच्याजवळ ठेवली. एकाने उघडून पाहिलं आत काय आहे ते. आणि त्यानी खायला सुरुवात केली. ना कोणी एकही शब्द उच्चारला, ना आभारप्रदर्शनाची भाषणं झाली. आम्हालाही त्यांच्या डोळ्यांकडे पाहायचंसुद्धा धाडस राहिलं नव्हतं.

*****************
रात्र काहीशी अस्वस्थ गेली. सकाळी ब्रेकफास्टनंतर परत तिकडे जाऊन बघितलं, पण ते तिथे नव्हते. दिवसाची बस स्टॉपची नेहमीची वर्दळ होती. परत कॉंफरन्स सुरु झाली. रुटीन भाषणं, माहितीची देवाण घेवाण सगळं त्या दिवसापुरतं संपलं. त्या दिवशीही इतरांशी बोलता बोलता बसमधून राहण्याच्या जागेकडे निघालो. बसने आम्हाला मुख्य रस्त्यावर उतरवलं. तिथून गुजरात लॉजकडे थोडं चालत जावं लागत होतं. आम्ही सगळ्या बायका घोळक्याने बडबड करत चालत होतो. अचानक रस्त्याने वळण घेतलं आणि बाजूच्या फूटपाथवर एका लाकडी पेटीवर झोपलेला ८/९ वर्षांचा लहान मुलगा दिसला. अंगावर पांघरूण नाही. हातापायांची जुडी केलेली. हवा तशी बर्‍यापैकी थंड होती. सगळ्या बायका बोलता बोलता गप्प झाल्या. बहुतेक प्रत्येकीला आपल्या आपल्या घरी झोपलेल्या लेकरांची आठवण आली असावी.
ते लेकरू, तशा सुनसान रस्त्यावर, एकटं झोपलेलं.... आपल्या आईची वाट पहात उपाशी झोपलं होतं? का दिवसभर काम करून दमून झोपलं होतं? वाट चुकलेलं म्हणावं तर चांगलं झोपलेलं होतं आणि जवळच मुख्य रस्त्यावर पोलीस चौकी होती. कोणीतरी दुकानदाराने नक्कीच पोलिसाना कळवलं असतं. काही कळेना. आम्ही तशाच लॉजवर गेलो. राहून राहून त्या झोपलेल्या मुलाची आठवण येत होती. दुसर्‍या दिवशी कॉंफरन्स संपली. आम्ही सगळ्यांचा निरोप घेऊन निघालो. राहिलेल्या एका दिवसात कालीघाटावर जाऊन आलो. जमेल तशी सायन्स सिटी पाहिली. कोणी साड्या खरेदी केल्या. मग हावडा वास्को एक्सप्रेसने परत घरी.

*****************
पण अजूनही, कलकत्ता म्हटलं की, तिथल्या प्रसिद्ध साड्या, बंगाली मिठाया, कालीघाट, किंवा सायन्स सिटीच्या आधी आठवतात ते, एका पत्रावळीत जेवणारे ते तीन म्हातारे. आजही कधीतरी झोपलेल्या मुलांच्या अंगावरची पांघरुणं नीट करताना डोळ्यासमोर येतं, ते फूटपाथच्या कडेला लाकडी पेटीवर अंगाची जुडी करून झोपलेलं लेकरू.

या अस्वस्थतेच्या शापातून सुटका नाही.

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

18 Sep 2010 - 11:51 pm | शिल्पा ब

गरीबीसारखा शाप नाही...
एकदा मी अंधेरीत बस थांब्यावर उभी असताना एक माणूस एका कचऱ्याच्या पेटीबाहेर (जी ओसंडून वाहत होती) एका हाटेलने फेकून दिलेला मोठ्ठा भात एका भांड्यात गोळा करताना पहिला...
तो माणूस व्यवस्थित कपडे घातलेला होता अन भांडेही हाटेलात असते तसे मोठे होते...माझा अंदाज असा कि एखाद्या सध्या हाटेलातील कर्मचारी असावा जो हा भात गरीब लोकांना विकत असणार...

वाईट वाटते...शक्य तिथे थोडीफार मदत करते ... आपली पण काही श्रीमंती वाहून चालली नाही. :-(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Sep 2010 - 12:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>गरीबीसारखा शाप नाही...
हम्म, सहमत आहे...!

-दिलीप बिरुटे

मी-सौरभ's picture

18 Sep 2010 - 11:53 pm | मी-सौरभ

अजून अणुभव येउ द्यात..
लेखन्शैली चान आहे तुमची :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2010 - 12:13 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-(

तशी गरिबी सगळीकडेच असते पण मैत्रिणीकडून कोलकात्यामधल्या गरिबीचं वर्णन बरच ऐकलं आहे.
इथे बॉस्टनध्येही कचर्‍याच्या ढिगातून बेगल्स किंवा डोनटस् चे तुकडे शोधून खाणारे लोक पहायला मिळाले.
माझ्या काही मैत्रिणी प्रत्येक सिझन संपला कि स्वत:चे आणि मुलांचे सगळे कपडे टाकून देतात आणि नव्या सिझनसाठी नवे आणतात. ते कमी वापरलेले कपडे, महागाचे कोटस् असे टाकून देताना पहिलं कि कसंसच होतं. काही कपडे मुलं पुढच्या वर्षीही वापरू शकतील असे असतात. आपली उंची आता बदलत नाही मग उगिच कपडे का टाकायचे?
एका मैत्रिणीनं थंडीचे ३० कोटस् तर तिच्या नवर्‍यानं ६० विकत घेतलेत. २०० पंजाबी सुटस्, २०० साड्या वगैरे आकडे ऐकून चाट पडायला होतं. अजून बरेच किस्से आहेत पण वाया जाणार्‍या पैश्याचे तसेच अतोनात गरिबीचे!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Sep 2010 - 12:28 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

टाकून दिलेल्या कपड्यांचं अमेरिकेत काय करतात? इंग्लंडात कपडे टाकायला वेगळे (कचर्‍याच्या डब्यांसारखे पण स्वच्छ) डबे असतात आणि हे कपडे गरजूंपर्यंत पोहोचत असावेत. किमान असा विचार केल्यानंतरतरी बॅगेत न मावणारे कपडे समाधानाने त्या डब्यांमधे टाकून मी बाडबिस्तरा गुंडाळला.

असतात ना! तश्या डब्यांमध्ये मीही मुलाचे लहान होणारे पण चांगले कपडे, बूट टाकत असते पण त्या पेटार्‍यापर्यंत जायचे कष्ट कोण घेणार? त्यापेक्षा मॉलपर्यंत खरेदीला जाणे सोपे!;) आजकाल मीच त्यांच्याकडून असे कपडे गोळा करते आणि दर शनिवारी इथे एका ठिकाणी एकीकडे संस्कार वर्ग चालू असताना मुलांचे आईवडील दुसरीकडे बसून कपड्यांची वर्गवारी करतात तिथे देते. बर्‍याचदा घरबसल्या वर्गवारी करूनच देते. मग ते कपडे गरजू भारतीय कुटूंबांना देण्यात येतात. असे गरजू भारतीय इथे असू शकतात हे समजले तेंव्हाही आश्चर्य वाटले होते.

निस्का's picture

19 Sep 2010 - 12:45 am | निस्का

बरेच जण जुने कपडे, खेळ्णी, फर्निचर इ. गुडविलच्या केंद्रात दान करतात. जे अर्थातच नंतर गरिबांना फुकट किंवा 'threft stores' मध्ये अगदी कमी भावाला विकले जाते. आनंदाची गोष्ट म्हणजे, माझ्या माहितितली बहुतेक भारतीय कुटुंबे हे करत असतात.

रेवती's picture

19 Sep 2010 - 12:53 am | रेवती

हो, बरोबर आहे. अश्या केंद्रातही सामान दिले तर चालते.
शिवाय लायब्ररीमध्येही पुस्तक उशिराने परत केल्याचे पैसे देण्याऐवजी खराब न होणारे अन्नपदार्थ देता येतात.
तसे बरेच मार्ग आहेत पण वाया घालवणे हे स्वभावातच असते काहीजणांच्या!:(

मिसळभोक्ता's picture

28 Sep 2010 - 11:54 am | मिसळभोक्ता

गुडविल ला द्या. टॅक्स डिडक्टिबल आहे.

शिल्पा ब's picture

19 Sep 2010 - 12:56 am | शिल्पा ब

इतके कपडे कधी वापरतात हे लोकं? आणि एवढे कोट? काय गरज? ३-४ असले तरी चालतात...माझे तर पाच वर्षापूर्वीचे आहेत तेच मी वापरते..स्वच्छ ठेवले कि झालं.
नवीन कपडे घ्यावेत पण जुने वापरण्याजोगे असताना का फेकून द्यायचे अन नवीन घ्यायचे? माजोर्ड्यासारखा कशाला वागायचं..
२०० पंजाबी सुट? तेसुद्धा एका सिझनला? नवश्रीमंत वगैरे म्हणतात तसला प्रकार असावा...

पंजाबी कपडे नाही टाकायचे!
ते दर दोनेक वर्षांनी भारतातल्या मोलकरणीला (एकदा वापरलेले) द्यायचे. पण हिरव्या देशातले कपडे असतात ना! ते टाकून द्यायचे. सगळे कपडे वापरले गेले पाहिजेत असाही हट्ट नसतोच मुळी! सगळं सोप्प आहे! :(

शिल्पा ब's picture

19 Sep 2010 - 12:51 am | शिल्पा ब

मी असे कपडे आणि वस्तू craigslist मध्ये जाहिरात देऊन बाहेर ठेवते....ज्यांना गरज आहे ते लोक येऊन घेऊन जातात.

सुहास..'s picture

28 Sep 2010 - 10:24 am | सुहास..

मी असे कपडे आणि वस्तू craigslist मध्ये जाहिरात देऊन बाहेर ठेवते....ज्यांना गरज आहे ते लोक येऊन घेऊन जातात.

असे करणे मनापासुन आवडले !!

अनिल २७'s picture

28 Sep 2010 - 5:58 pm | अनिल २७

माझे पण टोपी ऑफ !

ह्या पाठ सोडत नाहीत हे खरे.

मध्यंतरी मुंबईत अशी एक समाजसेवी संस्था असल्याचे ऐकले होते जी हॉटेल्समधून रोजच्यारोज उरणारे अन्न पॅक करुन अतिशय गरीब लोकांना वाटायला घेऊन जाते. (मील्स ऑन वील्स की कायसे नाव होते मला नक्की आठवत नाहीये..)

चतुरंग

अवांतर -
कलकत्ता खूप बकाल आहे, वेश्यावस्ती खूप आहे असं ऐकलं आहे.
कालीघाटाचीही एक (अंध)श्रद्धा ऐकली आहे. माझा नवरा जहाजावर होता त्याचा सहकारी त्याच्या मुलाला घेऊन काली मंदीरात गेला होता. आणि या सहकार्‍याच्या मते मुलाच्या जवळ्जवळ बर्‍या झालेल्या कर्करोगाने दर्शनानंतर उचल खाल्ली. त्याचं म्हणणं होतं की ते देऊळ (काली मातेचं) सगळ्यांनाच लाभतं असं नाही.
मुंबईला महालक्ष्मी आहे म्हणून मुंबई ही देशाची अर्थिक राजधानी पदाला चढली आहे. असं मी उडतसं ऐकलं आहे. यावर विज्ञाननिष्ठ लोकांची मतभिन्नता असू शकते. पण स्थानमहात्म्य नावाची काही एक गोष्ट असते. तसं मला वाटतं कलकत्त्याचा ऑरा खूप हार्श आहे तो या कालीमातेच्या स्थानामुळे.

लेखाबद्दल - लेख खूप मनापासून आहे. आवडला. शेवटचं वाक्य काळजाला भीडलं. लहान मुलाचा प्रसंग वाचून वाईट वाटलं.

अनुभव सुन्न करणारा आहे खरा, पण गरिबी फक्तं कोलकात्यातच नसून सगळीकडेच आहे. तुम्हाला तुम्ही राहता तिथे असे लोक दिसत नाहीत?

असो, मी पूण्यात असताना रात्री १२-१ वाजता स्वारगेटला बर्‍याचदा चहा पिण्यासाठी जात असे, तेव्हा तिथे बस स्थानकाच्या परिसरात जवळ जवळ शेकडो लोक आपापले फाटके अंथरूण पांघरूण पसरवून झोपताना पाहिले आहेत. शिवाय लक्ष्मी रस्त्यावर रहात असल्याने, रात्री जेवल्यानंतर दगडूशेटच्या दर्शनाला जात असे. तेव्हाही दुकाने बंद झाल्यावर दुकानासमोरील शेडखाली आडोसा धरून हेच लोक झोपताना पाहिले आहेत. दुकानदारही ह्या लोकांनी तिथेच घरोबा करू नये किंवा तिथे घाण करू नये म्हणून दुकान बंद केल्यावर बादलीभर पाणी दुकानासमोर ओतून जायचे. थंडी-पवसात हे लोक काय करत असतील, कुठे जात असतील याची कल्पनाही करवत नाही. अश्यांना सभोवती बघून वाईट वाटायचं. गलबलूनही यायचं. शक्य तेव्हा जमेल तशी मदतही करायचो. पण गरिबी एवढी पसरलेली आहे की आपण एकटं कुणाकुणाला पुरणार? तसंही म्हणतात ना "नित मडं त्याला कोण रडं?" या लोकांना दररोज पाहून नंतर मग भावनाही बोथट होतात.

आम्ही रहायचो तिथंच खाली एक वेडसर बाई झोपायची दररोज रात्री. तिला आपण काय करतो, कपडे घालतो की नाही याचंही भान रहायचं नाही. बर्‍याचवेळा लक्ष्मी रस्त्यावर तिला भेळ-उत्तप्याच्या गाड्यावर भिक मागतानाही पाहिलं. मग आम्ही मित्र मेस मधे न जाता रूमवर डबा मागवायचो रात्री. डबा मागवल्याने प्रत्येकी एकेक पोळी जास्त यायची. मग त्याच पोळ्या आणि भाजी कागदात गुंडाळून तिला नेऊन द्यायचो. न कमावत्या दिवसात तेवढं नक्कीच करू शकत होतो आम्ही. थंडीच्या दिवसात तिला २-३ वेळ चादरीपण दिल्यात. पण २-४ दिवसात ती त्या चादरी कुठंतरी हरवून यायची. पुढे काही दिवसांनी तिच येईना झाली. काही दिवस रुखरूख वाटली. पण मग वेळ गेला तशी तिची आठवणही! आज तुम्ही गरीबी बद्दल लिहिलं आणि तिची आठवण झाली.

प्रीत-मोहर's picture

19 Sep 2010 - 9:08 am | प्रीत-मोहर

अस्वस्थतेच्या शापातुन सुटका नाही......खरय ग.अग्दी..........सही लिहिलय्स....

अरुण मनोहर's picture

19 Sep 2010 - 10:09 am | अरुण मनोहर

उदास वाटलं

नितिन थत्ते's picture

19 Sep 2010 - 12:00 pm | नितिन थत्ते

चांगले संवेदनशील लेखन.

भारतात बहुतेक ठिकाणी अशी दृष्ये दिसतात. नुकताच शानबा५१२ यांनी लिहिलेला लेख असेच वर्णन करणारा होता.

सहज's picture

19 Sep 2010 - 12:07 pm | सहज

>कम्युनिटी सर्विस हा एक उपाय आहे.

ह्या विषयावर एक चर्चा

गरीबी सगळीकडेच असते पण का कोण जाणे काही प्रसंग आयुष्यभर पाठलाग करत राहातात. बाकी लेख आवडला.

दत्ता काळे's picture

19 Sep 2010 - 5:59 pm | दत्ता काळे

मला भारतात रस्त्याच्याकडेला भीक मागणार्‍या एकाकी म्हातार्‍या बायकांची विलक्षण कीव येते. एकतर समाजात दुय्यम स्थान, त्यातून कुटुंबासाठी राबायचं, अपमान (प्रसंगी मारसुध्दा ) सहन करायचा आणि जगण्याच्या शेवटच्या टप्प्यात भीक मागावी लागते ह्यासारखं वाईट जीणं नशीबाला आलेल्या म्हातार्‍या बाईच्या मनाची काय अवस्था असेल ?
विचार करणं देखील अवघड आहे.

उपेन्द्र's picture

19 Sep 2010 - 10:45 pm | उपेन्द्र

दुर्दैवाने काही लोक किती कठीण परिस्थितीत जीवन व्यतीत करीत असतात.. आणि आपण एखाद्या क्षुल्लक समस्येचा किती बाऊ करतो...

आवडाबाई's picture

20 Sep 2010 - 12:14 pm | आवडाबाई

अस्वस्थतेच्या शापातून सुटका नाही.
खरं आहे !!

आणि त्यांना बघून तुम्ही नजरेआडही करू शकला असतात, पण ते न करता, अनोळखी ठिकाणी असून जे केलंत त्याचं कौतूक !

माझं ही असं बर्‍याच वेळा होतं, कधी कधी काही केलं जातं, पण अनेकवेळा तर काहीही करता येत नाही - कधी आपण बसमध्ये असतो, कधी घाईत !! पण ती गोष्ट डोक्यातून मात्र जात नाही अनेक दिवस !

अनामिक म्हणतात तसे लोक शिवाजीनगरच्या ही बाहेर बघीतलेत, पण त्याना पाहिल्यावर मनस्थिती द्विधा होते - धड त्यांचा राग पण येत नाही, आणि धड कीव पण . हे लोक असे रस्त्यावर राहून आपलं शहर खराब करतायत, त्यांना encouragement मिळेल असं काही आपल्याकडून होऊ नये असं वाटत असतं. पण त्यांच्यातल्याच लहान मुलांचे, वयात येत असलेल्या मुलींचे फाटके कपडे पाहिले की मदत करावीच लागते !

छान आठवण ! अजून लिहा.

यशोधरा's picture

20 Sep 2010 - 12:28 pm | यशोधरा

संवेदनाशील लेखन. तू त्या कुटुंबियांना मदत केलीस हे वाचून बरे वाटले.

लिखान चित्र उभे करत आहे .

-

सगळीकडची अशी जनता पाहिली की विचार चक्रे सुरु होतात. वाटेत भिकारी आला की त्या विचारांची १ रुपया किंमत करुन आपण पुढे ही गेलेलो असतो .

असो बरेच लिहण्यासारखे आहे पुढे पण नंतर लिहितो ..

-

मेघवेडा's picture

20 Sep 2010 - 5:35 pm | मेघवेडा

विठ्ठला तू वेडा कुंभार!

नगरीनिरंजन's picture

20 Sep 2010 - 6:21 pm | नगरीनिरंजन

संवेदनशील माणसाना हा अस्वस्थतेचा शाप असतो हे अगदी खरं आहे. पण खूप विचार केल्यावर कळतं की आहे हे असं आहे. लाईफ इज नॉट फेअर. ज्याच्या वाटेला जे आलंय त्याने ते मुकाट जगायचं आणि मरायचं. या भव्य पटावर आपण सोंगट्या आहोत सोंगट्या. कितीही उड्या मारल्या तरी आपली धाव ठरलेली. ती धावायची आणि खेळ संपला की पटावरुन बाजूला व्हायचं. बस्स.

रणजित चितळे's picture

28 Sep 2010 - 10:14 am | रणजित चितळे

मी तुमचा लेख वाचला. मला अजुनच तो आवडला व भावला कारण मी बंगळुरला यायच्या आधी कोलकोत्या च्या बालिगंज ला रहायचो. अशी गरीबी पाहीली की पुर्व संचित व प्रारब्धावरचा विश्वास वाढतो. छान लिहीता. तुमचे बाकीचे लेख हळु हळु वाचीन व त्यावर काय वाटले ते लिहीन.

बर आहे

प्रकाश घाटपांडे's picture

28 Sep 2010 - 5:07 pm | प्रकाश घाटपांडे

वाचून विकासरावांचे उदरभरन नोहे...
आठवलं.

विनायक प्रभू's picture

28 Sep 2010 - 5:54 pm | विनायक प्रभू

लेख

अनिल २७'s picture

28 Sep 2010 - 6:03 pm | अनिल २७

अस्वस्थ करणारा लेख, उदास वाटलं, काळजाला भिडलां, संवेदनशील लेखन, सुन्न झालो, चटका लावणारा अनुभव ई ई.. अश्या काही प्रतिक्रिया येणार हे अपेक्षितच होतं.... चालू द्या...