नातं

आदिजोशी's picture
आदिजोशी in जनातलं, मनातलं
17 Sep 2010 - 5:50 pm

काही दिवसापूर्वी विलेपार्ले को.ब्रा. कट्ट्याच्या वार्षीक संमेलनात नातं ह्या विषयावर एक छोटासा प्रोग्रॅम केला. 'नातं' ह्या विषयाचा विविध अंगांनी विचार करून एक छोटासा कार्यक्रम सादर करायचा होता. माझ्याच काही नव्या जुन्या कविता मिळून साधारण १५ मिनिटांचं काव्य वाचन केलं. त्यातल्या काही कविता वगळून बाकिचं लिखाण इथे देतो आहे.

-----

नातं हा फार अजब प्रकार आहे. अजब अशासाठी की मानलं तर नातं नाही तर निव्वळ ओळख. रक्ताची माणसं सोडली तर बाकीची सगळी नाती जोडलेली असतात. नातं कुणाशीही असू शकतं. पावसाशी, मातीशी, अगदी जुन्या डायरीशीही. आज आम्ही अशीच काही वेगळी नाती बघणार आहोत एका वेगळ्या पद्धतीने.

तर सुरुवात करूया पहिल्या नात्यापासून. ह्या नात्यातल्या दोन्ही गोष्टींबद्दल आपल्या मनात फारसं प्रेम नाही, किंबहूना थोडा दुस्वासच आहे. हे नातं ज्यांच्यामधे आहे ते, आपल्या नेहमी दिसतात. पण आपण त्याबाबत कधीच विचार करत नाही. पण आता करणार आहोत आणि बघणार आहोत की त्यांच्या मनात काय आहे. कवितेचं नाव आहे "डुक्कर आणि चिखल"

अरे चिखला चिखला, काळी माती तुझी माय,
तुझ्या पोटातली माया, जशी दुधावर साय.

गिळगिळीत तुझी काया, वाटे मला हवी हवी,
तुझ्या सवे झोपण्याची, मजा चाखून पहावी.

तुझ्या विण जगण्याची, कल्पनाच होत नाही,
बरबटल्या शिवाय, मला झोप येत नाही.

-----

एकच व्यक्ती दोन वेगळ्या नात्यांत कशी वेगळी वागते. म्हणजे ही तीच व्यक्ती का असा प्रश्न पडण्याइतपत वेगळी. आई. आपल्या लेकरांवर जीवापाड प्रेम करणारी स्त्री, त्यांना तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपणारी स्त्री. हिच स्त्री जेंव्हा आईच्या भुमीकेतून बायकोच्या भुमीकेत शिरते तेंव्हा हा प्रेमळ स्वभाव अचानक कुठे गायब होतो. एका नात्यामुळे इतका फरक पडावा? असाच एक नवरा घराच्या एका कोपर्‍यात बसला असताना त्याला समोर दिसलं झुरळ. त्रयस्थ व्यक्तिला त्यांच्यातला नवर कोण आणि झुरळ कोण हे ओळखता आलं नसतं. तर, समोरच्या झुरळाला बघून नवर्‍याच्या मनात आपसूकच एक अनामिक नातं निर्माण झालं.

फेंदारून मिशा दोन, चालतोस तू थाटात,
मनी येता जेवतोस, कधी माझ्याच ताटात.

घरातली महामाया, मण मणाचे पाऊल,
थराथरा कापतसे, तुझी लागता चाहूल.

बायको घाबरे तुला, मला वाटे तुझा हेवा,
पुढल्या जन्मी तरी देवा, माझा झुरळं करावा.

-----

वर्षानूवर्ष जपलेलं एखादं नातं तिसर्‍या व्यक्तीमुळे दुरावताना फार त्रास येतो. आणि हे सगळं आपल्यासमोर घडत असेल तर मनाची अवस्था फारच विचित्र होते. धड रागावूही शकत नाही आणि शांतही राहू शकत नाही. मग वाटा वेगळ्या होतात. कायमच्या.

मला वाटलं नव्हतं तो पण असाच निघेल,
नवं नातं जुळल्यावर मला वेगळा करेल.

इतकी वर्ष मी त्याला साथ दिली, कधी तक्रार केली नाही,
आम्ही सतत सोबत होतो, कधी अंतर दिलं नाही.

तो पण खूष होताच की माझ्या सोबत,
एकत्रच जगत होतो आम्ही रमत गमत.

पण तिला बघताच तो मला विसरायला लागला,
आणि तिच्या सांगण्यावरून मला टाळायला लागला.

लग्न ठरलं त्याचं तिच्याशी,
प्रतारणा केली त्याने माझ्याशी.

मग मी सुद्धा ठरवलं, आपणही त्याच्या सोबत रहायचं नाही,
आपली वाट वेगळी करायची, आता थांबायचं नाही.

लग्नात होतेच मी त्यांच्या, माझ्या समोरच त्याने तिचा बायको म्हणून स्विकार केला...
त्याने तिच्या डोक्याला डोकं लावताच मी ही दुसरा घरोबा केला...
त्याने तिच्या डोक्याला डोकं लावताच मी ही दुसरा घरोबा केला...

मी? मी त्याच्या केसातली ऊ...

-----

नात्यातली अजून एक लागणारी गोष्ट की आपण समोरच्याला गॄहीत धरू लागतो. आपली सोय बघताना आपण समोरच्या व्यक्तीचा विचारच करत नाही. ती व्यक्तीही नात्याचा मान राखून आपल्याला हवं तसं वागत राहते. आणि मग एके क्षणी हे सगळं असह्य होतं.

नान्याच्या बैलाला ढोल

कसलं वाह्यात कार्ट जन्मलंय जोशांच्या घरात,
बाहेरच नाही पडत कधी, पडीक असतो सारखा घरात.

च्यायला सकाळ झाली की उठतो,
आणि माझा त्रास सुरू होतो.

रात्री पण स्वस्थ झोपू देत नाही,
काही ना काही सुरूच असतं, जरा शांत बसू देत नाही.

दिवसापण ह्याचे हेच उद्योग,
सगळे मित्र वर्च्युअल, भेटत नाही कुणी कधी, मैत्रीचा काय उपयोग?

२-२ वाजेपर्यंत चॅटींग करतो,
आणि नंतर माझ्यावर टॉरंट सोडून स्वतः आरामात झोपतो.

ह्याला चश्मा लागला की ह्याचे आई बाबा मला शिव्या घालतील,
मला डायटवर पाठवून, ग्लेअरफ्री एल. सि. डि. आणतील.

अरे घराबाहेर पड जरा,
खरी फुलं बघ जरा.

स्क्रिनसेव्हरची हिरवळ म्हणजे निसर्ग नाही रे राजा,
फिफा एस्क्ट्रीम खेळून कुणी फिट रहात नाही रे राजा.

ह्याच्यामुळे मलाही नको नको ते बघावं लागतं,
भरपूर जागा असतानाही सरखं अपडेट व्हावं लागतं.

एके दिवशी क्रॅश होणार आहे मी,
सगळा डेटा घालवून पुन्हा फ्रेश होणार आहे मी.

पण म्हणा त्याने ह्याला काय फरक पडणार,
सगळा बॅक-अप घेतलाय मेल्याने, पुन्हा माझ्यात कोंबणार.

च्यायला खरंच ह्या नान्याच्या बैलाला ढोल

-----

पुढचं नात्या इतकी घट्ट विण दुसर्‍या कुठल्याही नात्यात दिसत नाही. हे नातं अतिशय प्राचिन आहे. अगदी देवांपासून दानवांपर्यंत सगळ्यांचं ह्या बाबतीत एक मत आहे. हे नातं आहे सुरा म्हणजे दारू आणि सुराग्रही ह्यांचं. सरळ सरळ बेवडे न म्हणता सुराग्रही म्हटलं कारण चंद्रशेखर गोखलेंच्या भाषेत सांगायचं झालं तर:

बेवडा ह्या शब्दालाच देशी दारूचा वास आहे,
बेवडा ह्या शब्दालाच देशी दारूचा वास आहे,
नुसता उच्चारला तरी चढल्याचा भास आहे.

सुराग्रही ह्या शब्दातच कलात्मकता आहे. दारू पिणं हे काही पाप नव्हे. पण ती पचवता न येणार्‍या काही अजाण बालकांमुळे बिचारी दारू विनाकारण बदनाम झाली. प्रत्यक्ष बच्चन बाबांनी पण सांगितलंय 'नशा शराब में होता तो नाचती बोतल'. तुम्हाला पचत नाही हा दारूचा दोष आहे का? दारू पिण्याचे काही फायदे थोडक्यात सांगतो. पहिला फायदा म्हणजे बेवडे नेहमी ऑप्टिमिस्ट असतात.

ग्लास हाफ एंप्टी की हाफ फुल हा प्रश्न दारुड्यांना कधीच पडत नाही.
कारण आपला ग्लास नेहमीच हाफ एंप्टी असतो आणि समोरच्याचा ग्लास नेहमीच हाफ फुल

ग्लास हाफ एंप्टी की हाफ फुल हा प्रश्न दारुड्यांना कधीच पडत नाही,
कारण येणारा प्रत्येक पेग हाफच असतो, त्यात सोडा घालून तो वाढवायचा असतो.

ग्लास हाफ एंप्टी की हाफ फुल हा प्रश्न दारुड्यांना कधीच पडत नाही.
कारण ग्लासातली संपली तरी बाटलीतली शिल्लक असतेच की.

ग्लास हाफ एंप्टी की हाफ फुल हा प्रश्न दारुड्यांना कधीच पडत नाही.
कारण आपला ग्लास लपवायचा असतो आणि लोकांची नजर चुकवून त्यांचा संपवायचा असतो.

-----

सुराग्रहींच्या आयुष्यातली सगळ्यात आनंदाची वेळ म्हणजे शुक्रवार रात्र आहे, बायको माहेरी गेली आहे, घरावर त्यांचा एकछत्री अंमल सुरू झालेला आहे आणि सगळी रिकामी टाळकी स्टॉक घेऊन हजर झाली आहेत. जरा दोन-चार पेग रिचवले की ह्यांच्या जिव्हेवर सरस्वती नाचू लागते आणि कविता होतात.

क्वार्टर जशी मी ३ पेग मधे संपवतो तशाच ह्या कविताही मी ३ ओळींत संपवतोय

जास्तं पिणार्‍यांना लोकं नावं ठेवतात
मनातल्या मनात मात्रं
त्यांच्या स्टॅमिनावर जळतात

प्यायची इछा होत नाही
असा एकही दिवस जात नाही
रात्र तर नाहीच नाही

 

आता ह्या २ दारोळ्या खास तुमच्यासाठी

अरे संसार संसार
जशी विस्की सोड्यावर
दोन पातेली विकली
आणि आणली क्वार्टर

अरे संसार संसार
जशी चकण्याची पाखर
आधी चिवडा संपूदे
मग शेव भेळेवर

--------------------------------------------------------

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

आहा रे अ‍ॅड्याभाव मस्त.
आज त्या धुराळ्यात इकडे कुणाच लक्षच गेलेल दिसत नाय.

पैसा's picture

17 Sep 2010 - 7:41 pm | पैसा

पण थोडं थोडं दिलं असतं तर जास्त लोकांपर्यंत पोचलं असतं.

सहज's picture

17 Sep 2010 - 7:41 pm | सहज

हा हा! बरेच दिवसांनी एन्ट्री मारली हो.

छान आहेत कविता आणि दारोळ्या!

स्पंदना's picture

19 Sep 2010 - 9:39 pm | स्पंदना

असेच म्हणते.

नितिन थत्ते's picture

19 Sep 2010 - 10:14 pm | नितिन थत्ते

वेलकम ब्याक. :)

पुनरागमनात शतकच की. :P

इंटरनेटस्नेही's picture

20 Sep 2010 - 1:30 am | इंटरनेटस्नेही

क्युट!

मेघवेडा's picture

21 Sep 2010 - 2:35 pm | मेघवेडा

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Sep 2010 - 2:33 pm | घाशीराम कोतवाल १.२

अ‍ॅडी जोशी बॅक ईन अ‍ॅक्शन
लय भारी राव ....
खास करुन दारोळ्या ;)

मी? मी त्याच्या केसातली ऊ...

हे एकदम भारी!!!!!!!!!!!!!!!!!!!

टुकुल's picture

21 Sep 2010 - 4:11 pm | टुकुल

लै भारी रे अ‍ॅड्या... कश्या सुचतात रे तुला अश्या कविता?

--टुकुल

धमाल मुलगा's picture

21 Sep 2010 - 6:59 pm | धमाल मुलगा

अ‍ॅड्या....भावा,
तुझ्या दु:खात मी सहभागी आहे :D

आदिजोशी's picture

23 Sep 2010 - 2:59 pm | आदिजोशी

मला कसलं दु:ख झालंय?

धमाल मुलगा's picture

23 Sep 2010 - 3:10 pm | धमाल मुलगा

च्छ्या:!
म्हणजे तु अ‍ॅड्या नाहीसच. कोणीतरी तोतया आहेस.

हाहाहा! उसकी शादी होगयेली हय! ;)

धमाल मुलगा's picture

23 Sep 2010 - 6:35 pm | धमाल मुलगा

म्हणुनच.

रेवती's picture

21 Sep 2010 - 7:21 pm | रेवती

कोण?
अ‍ॅडीजोशी कि काय? आँ?
नाव कधी बदललं?
बाकी कविता छान!
को. ब्रा. कट्ट्याला (पुण्यात नव्हे) मीही दोन तीन वर्षे गेले....नंतर नाही गेले.;)
सगळ्या काकूटाइप बाया जवळ येउन विचारायच्या,"माहेरची देशस्थाची कि काय तू?";)

धमाल मुलगा's picture

21 Sep 2010 - 7:28 pm | धमाल मुलगा

ओ पर-देशस्थ काकू, का देशस्थ-कोकणस्थ भट्टीतले निखारे उपसताय? ;)

रेवती's picture

21 Sep 2010 - 7:48 pm | रेवती

अरे नाही! निखारे उपसत नाहिये.
खरच विचारायच्या, आणि 'हो ' म्हणून सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यातले भाव बघण्यासारखे असायचे.
त्यावेळी स्वभावात थोडा टारगटपणा असल्याने एंजॉय करायचे नंतर कंटाळा आला.

धमाल मुलगा's picture

21 Sep 2010 - 7:54 pm | धमाल मुलगा

धन्य!

मी गंमत करत होतो. :)