बरेच काही उगवून आलेले - द. भा. धामणस्कर

मनिष's picture
मनिष in जनातलं, मनातलं
11 Apr 2008 - 4:08 pm

एका मैत्रीणीच्या सांगण्यावरून नुकतेच हे पुस्तक घेतले, आणि ह्या कवितांच्या प्रेमातच पडलो. अतिशय सहज-सोपी भाषा, पण प्रगल्भ विचार आणि कल्पना. झाड, पक्षी, आकाश, निसर्ग ह्याच्यांभोवती गुंफलेल्या बहुतेक कविता - आणि त्यातून झिरपणारा अविरत माणुसकीचा, संवेदनशील, प्रेमळ व समंजस तत्वज्ञानाचा झरा! केवळ अफलातून!! अतिशय प्रभावी व खोलवर स्पर्शून जाणार्‍या ह्या कविता आहेत. त्यात काही मुलीविषयी, नातवाविषयी, आईविषयी आणि पोरक्या, गरीब मुलांविषयी देखील कविता आहेत; पण त्यांच्या कवितांमधून लक्षात राहतो तो सर्वव्यापी, सर्वसामावेशक निसर्ग आणि त्याची असंख्य रुपे आणि रुपके.

संदिप खरेची कवितांची पुस्तके हजारोंनी खपत असतांना ह्या पुस्तकाचे नावही पुस्तकांच्या दुकानदारांना महित नव्हते हे बघून अतिशय दु:ख झाले, एक पुस्तकासाठी १० दुकाने पालथी घातली तेंव्हा ‘साधना’ मध्ये एकदाचे ‘युरेका’ झाले. अर्थात दुःख झाले, पण आश्चर्य नाही वाटले - संदिप खरे, सलिल कुलकर्णी presentation (सादरीकरण? बापरे! :)) मुळे लक्षात राहतात शिवाय त्यांच्या कविताही सहज-सोप्या आणि लोकप्रिय. असो! मुद्दा संदिप खरेच्या कवितांचा नाही (त्यावर लिहिणारे बरेच आहेत) - द. भा. धामणस्कर ह्यांच्या कवितांचा आहे. ह्या कविता एका वेगळ्याच अभिरुचीच्या आणि जाणिवेच्या आहेत - धामणस्कर ह्यांच्यावर जे. कृष्णमुर्ती ह्यांच्या विचारांचा प्रभाव आहे; त्यांच्या कवितांमध्ये आस्था व समंजसपणा प्रसन्नतेने दरवळतांना जाणवतात. त्यांच्या कवितांमधे दुःख असले तरी वैफल्य, उद्वेग नाही; एक सहज, समजुतदार स्वीकार जाणवतो. त्यांच्या कविता ह्या expression (अविष्कार, उस्फुर्त प्रतिक्रिया ह्या अर्थानी) पेक्षा reflection (चिंतन) च्या पातळीवर आहेत असे वाटते. आपल्या अनुभवांकडे, भावनांकडे सह्रद्‍यतेने पण दूरस्थपणे पाहण्याची दुर्मिळ प्रगल्भता आणि सजगता धामणस्करांकडे आहे. त्यातूनच हे ‘बरेच काही उगवून आलेले’ बहरून आले आहे.

त्या पुस्तकातील माझ्या काही आवडत्या कविता -

साधना

तृषार्ततेच्या काठावरील पाखराला
आपल्या असण्यामुळे पाणी पिण्यास संकोच वाटला तर,
आपला म्हटले त्यानेच परका मानल्यावर
आपण करतो तेच करायचे; त्याच्या वाटेतून
त्याच्या सोयीसाठी दूर व्हायचे....तरीही पक्षी
कुठल्या पाइपलाईनमधून थेंब थेंब ठिबकून जमलेल्या
निवळशंख पाण्याला शिवत नसेल तर
पाण्यात आपण आहोत असे जाणून
आणखी दूर जायचे. पक्ष्याला
पाण्यात फक्त आकाश दिसेपर्यंत
कसलाच भरवसा वाटणार नाही...

कुणाला संकोच वाटत असेल तेव्हा
कणवपूर्ण हृदयाने स्वतःला दूर करणे ही
साधनेची सुरुवात; सांगतेचा क्षण आला की
तुम्हीच आकाश झालेले असता. मग
जलाशयाच्या अगदी काठावर उभे राहीलात तरी
पाण्यात फक्त आकाशच असेल. एखाद्या
हुशार पक्ष्यालाही तुम्हांला
आकाशापासून
वेगळे करता येणार नाही...

परिपक्व झाडे

रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही ...

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत...

समुद्राविषयी
१.
सर्व नद्या, इच्छा असो-नसो,
समुद्राला मिळतात. त्यांच्या
निमुट आसवांनी सारा समुद्रच
खारट करून टाकलेला.

२.
समुद्र आपल्यासारखाच : दुःखी.
त्याच्या विव्हळण्याचा
समुद्रगर्जना म्हणून प्रथम
कुणी अधिक्षेप केला?
आवेगाने किनार्‍यापर्यंत
वाहत आलेल्या त्याच्या अश्रूंना
भरती कुणी म्हटले आणि
डोळ्यात जमणारे पाणी मागे
खेचणार्‍या निग्रहाला ओहोटी?

अजून काही ओळी नक्षत्रे कवितेतील...

नक्षत्रे

........
४.
रात्रभर,
सगळे तारे माझेच असल्यासारखा मी
त्यांच्याकडे पाहत राहिलोय;
उजाडताना, मीही आकाशासारखाच
पुन्हा कफल्ल्क होणार आहे...

आणि ही शेवटची एक अफलातून कविता; ‘सार’ म्हणावे ह्या योग्यतेची. सगळ्या आयुष्याच्या प्रवासाकडे, त्यातल्या अनुभवांकडे, त्यातून उमगलेल्या आणि झिरपलेल्या ज्ञानाकडे बघण्याचा एक विलक्षण दृष्टीकोन!

बरेच काही उगवून आलेले

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले....

अजूनही कित्येक मोती विखुरले आहेत या पुस्तकात. पुस्तकातील सगळ्याच कविता इथे देण्याचा उद्देश नाही; मला अतिशय आवडलेल्या ह्या कवितांच्या पुस्तकाची ओळख करून द्यावी असे वाटले, एवढेच. आवर्जून विकत घेऊन वाचावे असे हे - बरेच काही उगवून आलेले!

हाच लेख मी माझ्या ब्लॉगवरही प्रकशित केला आहे!

कवितासमीक्षा

प्रतिक्रिया

ठणठणपाळ's picture

11 Apr 2008 - 9:34 pm | ठणठणपाळ

कविता चांगल्या आहेत पण प्रकाशित करण्यापूर्वी तुम्ही जनरल डायरची परवानगी घेतली आहे का?

मनिष's picture

12 Apr 2008 - 12:25 am | मनिष

लेख माझाच आहे, रसास्वाद करतांना काही कवितांचा उल्लेख केला तर ते वावगे ठरू नये असे वाटते; पण धोरणाशी विसंगत वाटल्यास हे डिलीट केले तरी चालेल.

विसोबा खेचर's picture

12 Apr 2008 - 8:48 am | विसोबा खेचर

छानच आहेत कविता...!

'बरेच काही उगवून आलेले' हा कवितासंग्रह वाचला पाहिजे एकदा..

धन्यवाद मनिषराव. आपण फार चांगला परिचय करून दिला आहे..

अवांतर -

रसास्वाद करतांना काही कवितांचा उल्लेख केला तर ते वावगे ठरू नये असे वाटते;

अगदी सहमत आहे.

मिपाच्या सभासदाने स्वत:ची माहितीपर/रसास्वादात्मक किंवा भाषातरात्मक/अनुवादात्मक अशी कुठलीही टिप्पणी न केलेले, मिपाचे सभासद नसलेल्यांचे लेखन किंवा मिपाबाह्य साहित्य/लेखन उगाच जसेच्या तसे केवळ माहिती/आस्वाद म्हणून केवळ 'पुढे ढकलण्याच्या' स्वरुपात किंवा 'पुढे ढकलण्याच्या' उद्देशाने जसेच्या तसे मिपावर प्रकाशित करण्याला मिपाची मनाई आहे परंतु वानगीदाखल काही उदाहरणे देऊन त्यावर काही रसास्वादात्मक किंवा परिचयपर काही लिहिल्यास त्यात नक्कीच काही वावगे नाही!

आणि जनरल डायर यांच्याकडे हे तारतम्य निश्चित आहे, त्यामुळे अजूनही असेच उत्तमोत्तम रसास्वादात्मक लिखाण मिपावर निर्धास्तपणे येऊ द्या, ही विनंती! जनरल डायर त्याचे नक्कीच स्वागत करतील अशी खात्री असू द्या! ;)

तात्या.

मुक्तसुनीत's picture

12 Apr 2008 - 5:36 pm | मुक्तसुनीत

अनेक वर्षांनी धामणस्करांच्या कविता पुन्हा एकदा वाचल्या. मनिषरावांचा शतशः आभारी आहे.

धामणस्करांच्या साध्या आयुष्याबद्दल जे थोडे ऐकले त्यानुसार , आयुष्यभर डोंबिवलीसारख्या मुंबईतल्या एका उपनगरातले, वयाची तीस-पस्तीस वर्षे रोज लोकल्-ट्रेनचे धक्के खात जाणारे एक साधेसे नोकरदार आयुष्य त्यांचे होते. अशा आयुष्यात एखाद्या माणसाच्या कोवळ्या भावना, काव्यात्म वृती या सर्व गोष्टींची राखरांगोळी झाली असती. धामणास्करांच्या इतक्या सुंदर , नितळ कविता हा या दृष्टीने, मला एक छोटासा चमत्कारच वाटतो !

त्यांच्या या कविता थेट त्यांच्यासारख्या आहेत : छोट्याशा आणि विलक्षण नितळ ! "मौजे"च्या दिवाळी अंकातल्या मांदियाळीमधे त्यांची कविता अगदी नेहमी असायची. आयुष्याबद्द्ल अनाग्रही, शांत आणि विचारांचे स्फटीक गोळा करणारी.

मनिषरावांमुळे या काळाची पुन्हा एकदा सफर घडली. त्यांचे.मनःपूर्वक आभार.

मनिष's picture

14 Apr 2008 - 11:19 am | मनिष

खूप वेगळ्या आणि सुरेख कविता आहेत. मी तर भारावूनच गेलो...