संतांच्या कविता

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
10 Sep 2010 - 10:15 am

संतांनी फ़क्त अभंग व ओव्याच लिहल्या असे नाही. त्यांनी काही सुरेख कविताही लिहल्या आहेत. आज आपण लावत असलेले कोणतेही चांगल्या कवितेचे निकष लावले तरीही उत्तीर्ण होतील अशी काव्ये संत साहित्यांत मिळतात.तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा एक खेळकर कविता म्हणून आपण आस्वाद घेऊ.

त्याचे असे झाले,कोंकणांत मीठ विकावयाला नेले ,व्यापारांत लाखाचे बारा हजार केले, म्हणून लोक टिंगल करावयाला लागले. म्हणून तुकारामांनी ठरवले की या वेळी नक्की खपेल असाच माल विकावयाचा. निवडक,’ युनिक",लोकप्रिय वगैरे. त्यांना एकदम आठवण झाली कृष्णाची,गोकुळांत सर्वांच्या,विशेषत: बायकांच्या,जरा जास्तच मर्जीत होता. व आताही पंढरपूरांत बरे चालले होते. मग देहूतही खपेलच. मोठ्या आशेने,संतांकडे थोडीफ़ार उसनवार करून,देव घेतला,हातगाडीवर टाकला व निघाले गल्ली-बोळातून ओरडत :

देव घ्या कोणी देव घ्या कोणी आइता आला घर पुसोनी!
देव न लगे देव न लगे सांठवणाचे रुधले जागे!
देव मंदला देव मंदला भाव बुडाला काय करूं!
देव घ्या फ़ुका देव घ्या फ़ुका न लगे रुका मोल काही!
दुबळा तुका भावेविण उधार देव घेतला ऋण!

पण नशीबच फ़ुटके त्याला काय करणार ! लोक म्हणाले,"देव नको, साठवायला जागाच नाही".खपतच नाही म्हटल्यावर, वैतागून, परत कोठे न्यावयाचा म्हणून, सांगावयाला लागले "पैसे देवू नका, फ़ुकट घ्या". तरी लोकांचा धोशा एकच."जागा नाही,फ़ुकट देखील नको". बाहेर कितीही आव आणला तरी कोणालाही हृदयांत देव नकोच असतो, लोभ-द्वेषादि षड्रिपूनी भरलेल्या हृदयांत देवाला जागा कुठे मिळणार?
इथे कवितेची मांडणी कशी नाट्यमय आहे बघा. सगळी कविता संवादरुप आहे. पहिल्या ओळीत तुकाराम रस्त्यावरून ओरडत चालले आहेत. " देव घ्या, देव घ्या" म्हणतांना " Home delivery" आमिष ते दाखवतात. पण लोक काही भोळे नाहीत. ते म्हणतात, " नको रे बाबा, देव घेतला तर तो ठेवावयास जागा तर पाहिजे ? आधीच जागा कमी, तेथे तुझा देव कोठे ठेवणार ? " तिसर्‍या ओळीत कपाळाला हात लावून तुकाराम म्हणत आहेत, " मंदी आली, देवाचा भाव एकदम कोसळलाच की ! याच्या शेअरला आता कागदाचाही भाव नाही. काय करावे ? आता परत नेऊन तरी काय करणार ? " हताश होवून ते ओरडावयाला लागतात, " चला, उचला, उचला, फुकट घ्या. एक पैसाही देवू नका, उचला !" तरीही गिर्‍हाईक ढिम्मच. फुकटदेखील कोणाला देव नकोच आहे. शेवटच्या ओळीत तुकाराम स्वगत म्हणत आहेत, " संतमंडळाकडे शब्द टाकून देव उधार आणला खरा, पण आता हे कर्ज फेडावयाचे तरी कसे ? "
समाजाच्या दांभिकपणावर नेमके बोट ठेवावयास महाराजांना हलकी फ़ुलकी "कविता" पुरते.
शरद

साहित्यिकआस्वाद

प्रतिक्रिया

अवलिया's picture

10 Sep 2010 - 11:28 am | अवलिया

क्या बात है !

मस्तच कविता आणि माहिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Sep 2010 - 12:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्तच कविता आणि माहिती

-दिलीप बिरुटे
[तुकोबांचा फॅन]

निखिल देशपांडे's picture

10 Sep 2010 - 12:04 pm | निखिल देशपांडे

अरे वा..
अशा अजुन कविता असतील तर नक्कीच येउद्या

शुचि's picture

10 Sep 2010 - 12:25 pm | शुचि

नेटकं रसग्रहणं. मस्त!

विलासराव's picture

10 Sep 2010 - 12:45 pm | विलासराव

फुल्टु पटेश.

पाषाणभेद's picture

10 Sep 2010 - 7:00 pm | पाषाणभेद

शरदराव एकदम छान लेख. पुर्ण वाटत नाही पण.

यशोधरा's picture

10 Sep 2010 - 7:52 pm | यशोधरा

मस्त! :)