मे महिन्यातली अशीच एक रखरखीत कोरडीठाक दुपार. सकाळपासुन रणरणत्या उन्हात दवाखाने, पोलिस ठाणी, क्राईम ब्रँच वगैरे ठिकाणी बातम्यांच्या शोधात फिरुन फिरुन जीव कातावला होता. अनायासे सगळीकडे लंच टाईम सुरु होत होताच म्हणुन म्हणलं जरा आता पोलिस आयुक्त कार्यालयातल्या प्रेसरुम मधे जाऊन पंख्याचा वारा तरी घ्यावा. प्रेसरुम मधे शिरलो तर दोबोले `मेजर' डबा संपवुन हात धुवायलाच निघालेले. त्यांचा सहाय्यक शिपाई राजा आधीच डबा संपवुन फ़ोनवर `राऊंड' घेत बसलेला. मला घाम पुसत प्रेसरुममधे शिरताना पाहुन दोबोले मेजरनी पाण्याची बाटली उचलली अन बाहेर पडले. न सांगताही मला लक्षात आले की मेजर आता कुलरचे थंड पाणी घेऊन येणार. उन्हाच्या तलखीने घसा कोरडा पडला होता, ओठ पार सुकले होते. अश्यावेळी पंख्याचा वारा अन थंड पाणी... क्या बात है!
मनोमन सुखावुन एका खुर्चीत टेकलो तर पेजर किंचाळला. "नक्कीच चीफ़ रिपोर्टर असणार हा. साला स्वत: एसी ऒफ़िसात बसणार अन आम्हाला मात्र कधी धड बुड टेकु देणार नाही," मनोमनी चीफ़ रिपोर्टरला शिव्या हासडत मी पेजर काढुन निरोप पाहिला तर "प्लीज कॊल - रामभाऊ". म्हणजे निरोप चीफ़ रिपोर्टरचा नव्हताच तर. तो होता रामभाऊचा. रामभाऊ म्हणजे एक अवलियाच. वैकुंठ स्मशानभुमीतल्या विद्युतदाहिनीचा टेक्नीशियन म्हणुन पंचवीस-तीस वर्षे काम करणारा रामभाऊ शोकाकुल नातेवाईकांना बरीच मदत करायचा. त्या भयाण, भकास, रडक्या वातावरणातही त्याच्या ओठांवर सतत स्मित असायचं. कामाच्या स्वरुपानं त्याला लोक टाळायचे ती उणीव तो भेटेल त्याला जीव लावुन भरुन काढायचा. आम्हा पत्रकारांचा तर तो तारणहारच. वैकुंठमधे घडलेल्या सगळ्या घटना त्याच्यामार्फ़त आम्हाला नेहमी कळायच्या. तिथं घटना घडणार तरी काय़? पण कधीतरी अचानक कुणीतरी गचकायचं अन रामभाऊला एकदम आम्हा क्राईम रिपोर्टर्समधे डिमांड यायची.
समोरचा फ़ोन ओढला अन वैकुंठमधे रामभाऊशी संपर्क साधला. "दादा इथं मुडदा जिवंत झालाय. एकजण एकटाच अँब्युलन्समधे घालुन त्याच्या म्हातारीला घेऊन आला. विधी करायचे नव्हतेच. डेथपास वगैरे सगळे होते अन नंबर पण नव्हते. तसाच मुडदा विद्युतदाहिनीजवळ नेला अन फर्नेसचे दार उघडले तर एकदम मुडद्याचे पाय हलायला लागले. माझ्या लगेच लक्षात आलं अन मुडदा ताटीवरुन सोडवायला लागलो तर म्हातारी तोवर कण्हायला लागली," रामभाऊ सांगत होता.
मुडदा जिवंत झाला? पान एकची मोठ्ठी बातमी! माझ्या बातमीदाराच्या डोक्यात विचारचक्र गरागरा फ़िरायला लागले. बाई कुठे आहे विचारले तर रामभाऊने सांगीतले की त्याने तिला आणले होते त्याच अॅम्ब्युलन्समधुन टाकोटाक तिला ससुनला हलवले होते. प्रेसरुमबाहेर आत येणा-या इतर पत्रकारांची चाहुल लागली तसे मी रामभाऊला इतर कुणाला काही न बोलण्याची ताकीद देऊन फ़ोन ठेवला अन तिथुन सटकलो.
काही मिनिटातच मी ससुनमधे कॆज्युलटीमधे पोहोचलो तर समोर अॅडमिशनचा क्लार्क मनीष. त्याने मला पाहिले अन लगेचच म्हणाला, "फ़िजिऑलॉजी आयसीयु. पेशंट रखमाबाई संपतराव चव्हाण. वय ९५ वर्षे. रहाणार वडगांव बुद्रुक, सिंहगड रोड. मेलेली जिवंत झालीये. बरोबर मुलगा सोपान आहे. तो मजुरी करतो." त्याच्या हातात दहा रुपयांची नोट सरकावली, डोळा मारला अन तसाच धावत निघालो दुस-या मजल्यावरच्या फ़िजीऑलॉजी आयसीयुकडे. इशारा समजुन मनीषने आधीच फ़ोन उचलला होता, आमच्या ऑफ़िसच्या फ़ोटोग्राफ़रला बोलावुन घ्यायला.
सोपान तसा साधाभोळा मजुर वाटला. वर असेल पन्नाशीचे. "आम्ही मुळचे बीडचे. दुष्काळानं पोट भरायला इकडे आलो. सात पोरं मेली तेव्हा मायबापाला मी झालो. गावाकडं कुठली शाळा अन कुठलं शिकणं. ७८ च्या दुष्काळात आम्ही पुण्यात आलो अन ७९ मधे बाप मेला. मी विशीचा होतो तेव्हा. मजुरी करत करत जगलो. घरी बायको, तीन मुली अन मुलगा आहे. बायको पण मजुरी करते. दोन मुलींची लग्न झालीत अन उरलेली दोन मुलं शिकतात. आईचं अन बायकोचं फ़ारसं पटत नाही पण भांडण असं पण नाही. आई गेले तीन चार दिवस काहीच खातपीत नव्हती. आज सकाळी बायको कामावर गेली, मुलं शाळेला गेली अन कामावर जायला निघताना मी आईला सांगायला गेलो तर ती निपचीत पडलेली. डॊक्टरला बोलावलं तर तो म्हणाला मेलीये. इथं नातेवाईक कुणीच नाहीत. पोराला कळलं तर घर डोक्यावर घेईल म्हणुन गडबडीनं जाळायला नेलं तर तिथं पाय आपटायला लागली. मेली असती तर सुटलो असते सगळेच. आता दवाखान्याचा खर्च येणार," सोपान त्रागा करत होता. कशीतरी त्याची समजुत काढली की इथे दवाखान्यात पैसे घेत नाहित. तरी घरुन येणे जाणे होईल, भाडे खर्च होईल, मुलींना आधीच कळवलेय त्या धावत येतील अन खर्च होईल म्हणुन कुरकुरत होताच. मग न राहवुन त्याच्या खिशात एक पन्नासची नोट सारली अन कन्नी कापली.
तिथुन सरळ विश्रामबागवाड्यावरचं कॉर्पोरेशनचं जन्म मृत्यु नोंदणी ऑफ़िस गाठायचं ठरवलं. सोपानला वैकुंठचा डेथ पास तिथुनच मिळालेला असण्याची शक्यता होती. तिथंच रखमाबाईचं डेथ सर्टीफ़िकेट पण मिळालं असतं. जिना उतरत होतो तर समोरुन फ़ोटोग्राफ़र मच्छिंद्र येताना दिसला. मग जरा थांबलो. त्यानं आयसीयुच्या काचेतुन रखमाचा फ़ोटो काढला अन आम्ही निघालो. खाली आलो तर सीएमओच्या टेबलभोवती इतर दोन-तीन पत्रकार दिसले. बातमी फ़ुटली होती. आता वेगानं हालचाली करुन इतरांपेक्षा जास्त माहिती मिळवणं गरजेचं होतं. तसाच मच्छिंद्रचा हात धरुन मागं फ़िरलो अन दुस-या दारानं हॊस्पीटलबाहेर निघालो. माझी गाडी काढताना कुणी पत्रकार मला पाहु शकला असता. मग माझी गाडी तिथंच ठेऊन मच्छिंद्रची मोटारसायकल काढली. चलो विश्रामबागवाडा!
विश्रामबागवाड्यावरच्या अंधा-या कुबट ऒफ़िसमधे एका आळसटलेल्या क्लार्कसमोर बसुन रखमाबाईची कागदपत्र शोधली. त्यात डेथ सर्टिफ़िकेट होतंच. वडगांवच्याच एका डॉक्टरनं चतकोर आकाराच्या लेटरपॅडवर लिहिलेलं. रखमाबाईचा मृत्यु हृदयविकाराच्या झटक्यानं सकाळी साडेअकरा वाजता झाला असं गिरगिटलेलं अन त्याखाली डॊक्टरची त्याहुन अगम्य अक्षरातली सही. लेटरहेडवरुन डॉक्टरचा पत्ता मी लिहुन घेतला तोवर मच्छिंद्रनं लेटरहेडचे फ़ोटो घेऊन टाकले पण.
तसाच पुढे गेलो वैकुंठमधे. तिथे रामभाऊला धरला अन रखमाबाईचा डेथपास शोधला. रामभाऊनं सगळी हकीकत परत सांगीतली तोवर मच्छिंद्रनं डेथपासचे फ़ोटो घेऊन ठेवले. आता वडगांव गाठायला हवं. तसं ते सात-आठ किलोमीटरचं अंतर. मच्छिंद्र कुरकुरत होता पण त्याची गाडी पिदाडलीच. डोळ्यासमोर उद्याच्या पेपरमधली पहिल्या पानावरची बातमी तरळत होती. उन्ह, तहान कश्याची जाणीव होते कसली?
वडगांवमधे पोहोचलो अन दवाखाना शोधला तर पहिला अडथळा समोर आला. डॉक्टर दवाखाना बंद करुन घरी गेलेले. दवाखाना म्हणजे काय तर फ़ळकुटांच्या झडपांचं दार असलेलं एका जीर्ण कौलारु इमारतीतलं दुकान. बाहेर एक छोटा बोर्ड, त्यावर डॉक्टरचं नांव अन फॅमिली डॉक्टर (एमबीबीएस) असं रंगवलेलं. दवाखान्याच्या पाय-या अन रस्ता यांच्यामधे एक उघडं गटार. त्याची घाण आसमंतात पसरलेली. पलीकडं कचराकुंडी उपसणारी डुकरं अन त्यातच दोन तीन पोरं निसर्गविधी उरकायला बसलेली. कसातरी कंपाऊंडर शोधला अन त्याच्याकडुन डॉक्टरचा कात्रज भागातला घरचा पत्ता मिळवला. आता डॉक्टरला भेटायला कात्रज गाठायला हवं होतं. खरंतर उन्हातान्हातुन गाडी पिदाडुन जीव मेटाकुटीला आला होता पण पहिल्या पानाची बातमी म्हणजे खायचं काम नाही महाराजा!
आता इथवर आलोच आहे तर... म्हणत जरा आजुबाजुला चार ठिकाणी फ़िरलो. चार लोकांशी बोलुन डॉक्टरची माहिती घेतली. सगळे चांगलंच बोलत होते डॉक्टरबाबत. म्हणे तो एक वयस्कर माणुस होता. बरीच वर्षे गावाच्या टोकावरच्या त्या झोपडपट्टीत दवाखाना चालवत होता. कात्रजला त्याचा बंगला होता अन दुसरा दवाखानापण. पोरंबाळं परदेशात होती पण तो बिचारा रोज येऊन दवाखाना चालवायचा अन ब-याचदा गरीब पेशंटना फ़ुकट औषधंपण द्यायचा म्हणे.
सोपानशी बोलुन पण अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले होते. जवळच्याच डोंगरपायथ्याच्या झोपडपट्टीतली त्याची झोपडी शोधली तर तिथे कुलुप. बहुतेक सोपाननं बायको-मुलांना कळवलेलं नसावं. झोपडपट्टीत फ़क्त लहान मुलं नागडी उघडी पळत होती. शेवटी दोन चार म्हातारे कोतारे सापडले त्यांनी सांगीतलं सगळी तरुण माणसं कामाला गेली होती म्हणुन. सिंहगड रोड भागात बरीच बंगल्यांची, ओनरशीपची बांधकामं सुरु होती तिथे बहुतेक सगळे झोपडपट्टीवासी मजुरी करत. बहुतेक सगळेजण पर्वती, दांडेकर पुल, डायसप्लॉट भागातल्या झोपडपट्ट्यात भाड्याच्या झोपड्यातुन बरीच वर्षे राहिलेले अन स्वत:ची झोपडी मिळते, जवळपास कामं पण मिळतात म्हणुन गेल्या दोन तीन वर्षात वडगांवला स्थलांतरीत झालेले.
"लय चांगली होती म्हातारी. माळकरी होती. मुलगा,सुन, नातवंडात रमायची. कधी कुणाशी भांडण नाही, तंटा नाही. सोपान पण गुणाचा. कसलं व्यसन नाही त्याला. कुणाच्या अध्यात-मध्यात नसतो कधी. पोरांना त्यानं शाळेत घातलं, दोन पोरींची लग्न करुन दिली. आता त्या मुंबईला कुठंतरी असतात. तशी सोपानची बायकोपण बरीच. रंग उजळ आहे, नीटनेटकी रहाते पण चवचाल नाही," एक म्हातारबुवा सांगत होते.
"सकाळी सोपान घरी आला अन म्हणला अश्यानं असं झालं. मी जाऊन बघितलं तर म्हातारी मरुन पडलेली. सोपान मग डॉक्टरला घेऊन आला. डॉक्टरनं म्हातारी मेली सांगीतलं. सोपान म्हणाला मुलांची परिक्षा जवळ आलीये त्यांच्यापुढं रडारड नको. मलापण मुलींची लग्न, झोपडी बांधणं यामुळं बरच कर्ज झालंय अन कामावर खाडे परवडणार नाहीत. लवकर म्हातारीला फ़ुकावं हे चांगलं पण खांदा द्यायला कुणीच नाही. मग डॉक्टरनंच अॅम्ब्युलन्स बोलावली अन वैकुंठला न्यायला सांगीतलं," शेजारच्या दोन-तीन म्हाता-या म्हणाल्या. "म्हातारीचा नातवंडांवर लय जीव. दोन दिवसांपुर्वीच मला म्हणाली आता औक्ष सरत आलं. दुसरी काही इच्छा नाही पण लग्न झालेल्या नाती मरताना जवळ असल्या तर बरं," एक शेजीबाई म्हणाली.
मग तसाच पुढं कात्रजला गेलो वडगांवहुन न-हे मार्गे कात्रजला जाणा-या कच्च्या रस्त्याने गाडी ताणत. तिथं डॊक्टरचा बंगला शोधला. डॉक्टरसाहेब विश्रांती घेत होते पण कुणीतरी आलंय म्हणल्यावर उठुन बसले. सगळा प्रकार ऐकल्यावर ते हबकले. "अरे देवा! असं कसं झालं. हे शक्य नाही. मी स्वत: तपासलं होतं सकाळी तेव्हा बाई मेलेल्या होत्या," ते धास्तावलेल्या सुरात म्हणाले.
त्यांनी सांगीतलं, "सकाळी साडेअकराच्या सुमाराला बावरलेला सोपान मला भेटला अन सगळा प्रकार त्यानं सांगीतला. मी लगेचच त्याच्या झोपडीत गेलो अन म्हातारीला तपासलं. शेजारचे एकदोन म्हातारे लोक पण होते तिथं. मी पल्स पाहिली तर अबसेंट होती. म्हातारीचं अंग जड वाटत होतं पण आखडलं नव्हतं. नुकतीच गेलेली असावी. डोळे अर्धवट मिटलेले होते. पापण्या वर उचलुन बुबुळांवर टॉर्च मारला. जिवंत माणसांची बुबुळं अश्या उजेडाला रिअॅक्ट होतात पण म्हातारीचा रिस्पॉन्स नव्हता. स्टेथॅस्कोपनं तपासलं तर हार्ट बीट पण नव्हते. मी छाती दाबली तर फ़ुफ़्फ़ुसात अडकलेली हवा बाहेर आली पण परत तपासलं तर म्हातारीचं हार्ट सुरु नव्हतं. ती सगळी मृत्यु आल्याचीच लक्षणं होती पण सहसा आम्ही लगेच मृत्यु जाहीर करत नाही. मग मी सोपानला सांगुन दवाखान्यात परतलो. अर्ध्या तासानं परत झोपडपट्टीत गेलो तर परिस्थिती तशीच होती. मग मी डेथ सर्टीफ़िकेट दिलं."
हे सगळं होईपर्यंत पाच वाजले होते. मग ससुनला परतलो आणि म्हातारीवर उपचार करणा-या डॊक्टरना भेटलो. त्यांनी सांगीतलं म्हातारी अजुन अर्धवट बेशुद्धीतच होती आणी तिला ऑक्सीजन लावला होता. इंट्राव्हिनस ग्लुकोज पण लावलं होतं. रात्री म्हातारी कदाचित शुद्धीवर येण्याची शक्यता होती. मग ऑफ़िसला परतलो अन बातमी दिली. अपेक्षेप्रमाणेच सगळ्या वरिष्ठांच्या एक्साईटेड प्रतिक्रिया होत्या. बातमी पहिल्या पानावरच येणार होती. शेवटी मुडदे रोज जिवंत होत नाहीत हेच खरे.
दुस-या दिवशी सकाळी सहजच परत दवाखान्यात चक्कर मारली तर म्हातारीला आयसीयुमधुन नऊ नंबर वॉर्डात हलवलेले. सोपान, त्याची बायको, मुंबईवरुन आलेल्या मुली तिच्याभोवती जमलेल्या. म्हातारी डोळे उघडुन टकाटका पहात होती पण काहीच बोलत नव्हती.
त्या दिवशी रात्री नऊ वाजता ऒफ़िसमधे बातम्या संपवायची गडबड सुरु होती अन माझ्या डेस्कवरचा फ़ोन घणघणला. फ़ोनवर जितु होता. जितु आमच्या दाणेआळीतल्या गँगमधला, एका वेश्येचा मुलगा. माझ्याच शाळेत शिकला अन एक्सटर्नल स्टुडंट म्हणुन दहावी झाल्यावर ससुनमधे वॉर्डबॉय म्हणुन कामाला लागला. "भैय्या! वो बुढ्ढी मरके जिंदा हुई थी ना, तु जिसे देखने आया था आज. वो मर गई अभ्भीच," जितु सांगत होता. माझा माझ्याच कानावर विश्वास बसेना. शेवटी वॊर्डमधे परत फ़ोन लावला तर डॊक्टरनं बातमी खरी असल्याचं सांगीतलं.
सुन्न होऊन फ़ोन ठेवला. काहीच सुचत नव्हतं. मेलेली रखमा जिवंत कशी झाली? बरं जिवंत झाली तर फ़क्त एका दिवसासाठीच का? या सगळ्यात काही सूत्र होतं, की तो निव्वळ एक चमत्कारिक योगायोग होता. की ती मेलेली नसतानाच तिला मृत जाहिर केलं होतं? काय फ़लित होतं रखमाच्या या अजब रामकहाणीचं.
अचानक रखमाच्या शेजारणीनं उच्चारलेली वाक्य डोळ्यासमोर आली अन या सगळ्या प्रकाराचा रखमाला कसा फ़ायदाच झाला त्याचं गुढ उलगडलं. तिला जिवदान मिळालं अन त्यामुळं तिची अंतिम इच्छा पुर्ण होऊ शकली. अन आपोआपच माझी बोटं नवीन बातमी टंकु लागली...
"द न्यु लीज ऑफ़ लाईफ़ फॉर रखमाबाई, हु वॉज व्हर्च्युअली रिइन्कार्सिनेटेड अॅज शी वॉज अबाऊट टु बी लेड ऑन फ़र्नेस अॅट वैकुंठ क्रिमेटोरियम आफ़्टर बिईंग सर्टीफ़ाईड डेड यस्टरडे, लास्टेड फॉर जस्ट ओव्हर २४ अवर्स. रखमाबाई डाईड धिस इव्हिनिंग व्हाईल अंडरगोइंग ट्रीटमेंट अॅट ससून हॊस्पीटल. शॉर्ट इट मे हॅव बीन, बट द न्यु लीज ऑफ़ लाईफ़ वॉज द ओन्ली चान्स टु फुलफिल रखमाबाईज लास्ट विश. रखमाबाई स्पेंट सेव्हरल अवर्स विथ हर मॆरीड ग्रॆंडडॊटर्स, समथिंग नेबर्स से शी क्रेव्हड फॉर, बिफ़ोर द मेडीकोज फ्रॉम ससून हॉस्पीटल प्रोक्लेम्ड हर डेड...."
प्रतिक्रिया
5 Sep 2010 - 11:18 pm | मी-सौरभ
ही बातमी वाचली होती अन् डॉक्टरला शिव्या पण घातल्या होत्या..
त्यामागची कथा आज कळाली.
5 Sep 2010 - 11:24 pm | श्रावण मोडक
आह्ह... अनुभव विरळाच! छान लिहिला आहेच!
5 Sep 2010 - 11:43 pm | अर्धवट
खरंच वेगळंच जग तुम्हा लोकांच... खुप मस्त लिहिलय.. असं आयुष्य किती स्वरूपात सामोरं येत असेल नाहि रोज..
6 Sep 2010 - 7:48 pm | विसोबा खेचर
सहमत..
मस्त लिहिलंय...
तात्या.
6 Sep 2010 - 12:07 am | शिल्पा ब
बापरे!!! जिवंत म्हतारीलाच जाळायला चालले होते...
बाकी कथालेखन छान..
6 Sep 2010 - 1:13 am | इंटरनेटस्नेही
क्या बात है! मस्तचं...!
6 Sep 2010 - 1:42 am | राजेश घासकडवी
जगावेगळा प्रसंग, तो पाकळी पाकळीने उलगडणाऱ्या पत्रकाराच्या मागोव्याचा मागोवा.
अजून येऊ द्यात.
6 Sep 2010 - 8:14 am | सहज
अतिशय छान लिहले आहे.
6 Sep 2010 - 12:42 pm | निखिल देशपांडे
अरे वा इंटरेस्टिंग बातमी...
एकदम खुलवुन लिहिली आहे कथा
6 Sep 2010 - 12:48 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्तंच. घटना पेपरात वाचली होती. पण पुढचं माहीत नाही की लगेच २४ तासांत परत त्या वारल्या पण होत्या. पण आधीचं लक्षात आहे.
6 Sep 2010 - 2:25 pm | समंजस
विलक्षण प्रसंग!
सत्य परंतू स्पष्टीकरण मिळवायला कठीण असा प्रसंग!
6 Sep 2010 - 3:53 pm | स्वाती दिनेश
एकदम वेगळाच अनुभव!
स्वाती
6 Sep 2010 - 5:39 pm | विसुनाना
डॉक्टरने अर्धा तास वाट पाहून मृत घोषित केलेली बाई परत जिवंत कशी काय झाली?
डॉक्टर तरी कशाला खोटे बोलेल? त्याचा काय फायदा होता?
वेगळाच अनुभव..
6 Sep 2010 - 5:49 pm | धमाल मुलगा
ह्म्म्म....
र ख मा बा ई!
मिष्टर केसकर, आत्ता कुठे तुमच्या पोतडीचं तोंड किंचित सैल केलं बुवा तुम्ही.
आता अशाच आणखी खुप 'बिहाईन्ड द पिक्चर' गोष्टी यायची वाट पाहू ना?
बाकी, लेखनशैलीबद्दल वगैरे आम्ही पामरांनी काय बोलावं. :)
6 Sep 2010 - 7:55 pm | पैसा
ही बातमीची बातमी मस्त आहे. आतापर्यंत आमचा असा गैरसमज होता की मिडियावाले बातम्या देऊन मोकळे होतात. त्याच्या मुळाशी असलेल्या माणसापर्यंत कधी पोचत नाहीत.
6 Sep 2010 - 8:57 pm | शाहरुख
काहीतरी भानगड असावी असे मला शेवटपर्यंत वाटत होते :-)
6 Sep 2010 - 9:27 pm | चतुरंग
डॉक्टरही अनुभवी वाटतो आणि पुन्हा येऊन तपासून सर्टिफाय केलं असं म्हणतोय शिवाय फसवाफसवी करुन तसा त्याचा किंवा इतर कोणा नातेवाईकांचा काही फायदा दिसत नाही. खरेच म्हातारीची नातींना भेटायची तीव्र इच्छा कामी आली म्हणायची!
अजून एकेक अनुभव काढा राव बाहेर.
(आचंबित)चतुरंग
6 Sep 2010 - 10:56 pm | बिपिन कार्यकर्ते
वेगळाच अनुभव. प्रसन्नचं लेखन नेहमीच आवडतं. अजून वाचायला उत्सुक. कधी लिहितोस?
7 Sep 2010 - 11:21 am | सुहास..
आत्ता कुठे तुमच्या पोतडीचं तोंड किंचित सैल केलं बुवा तुम्ही. >>
अगदी असेच म्हणतो .....
पण प्रसनदा ..गल्ली चुकली की काय ?