मी (गंभीर) मराठी

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
10 Apr 2008 - 6:42 pm

मराठी भाषेच्या शुध्दतेचा आग्रह धरण्यावर ' मी मराठी' या लेखात मी मिसळपावावर उपहासाने लिहिले होते. त्यावर बर्‍याच जणांचे प्रतिसाद आले. " त्यातला विनोदाचा भाग सोडला तरी हा लेख गंभीरपणे विचार करायला प्रवृत्त करतो." अशा प्रकारचे कोणीतरी लिहिले होते. असा थोडासा 'गंभीर विचार' मी लेख लिहिण्यापूर्वीच केलेला होता. हातासरशी तो सांगून टाकावा, त्यासाठी उगाच वाचकांच्या डोक्याला वेगळा शीण नको म्हणून मीच त्यावर एक गंभीर स्वरूपाचा
प्रतिसाद लिहिला. पण बहुधा कोणीच तो वाचला नसावा. ते ही तसे बरोबरच आहे. मिसळ तयार झाल्यावर ती लगेचच फस्त करतात. ती शिळी झाल्यानंतर कोणीही तिच्याकडे पहात नाही. पण आपला तोकडा विचार वाचकांपर्यंत पोचावा यासाठी मी माझा (झालेला) वडा थोडा कुस्करून आणि त्यावर नव्याने शेव, कांदा, कोथिंबीर वगैरे पसरून, वर लिंबू पिळून एक नवी डिश तयार करून आणली आहे.

मी कांही भाषातज्ञ नाही. पण मला असे वाटते की कोणतीही जीवंत भाषा एकाद्या साचलेल्या पाण्याच्या डबक्यासारखी नसते. मागून आलेल्या प्रवाहातले थोडे पाणी आणि त्यातला गाळ कांठावर पसरवत आणि नवे ओहोळ, ओढे, नाले वगैरेमधून आलेल्या प्रवाहांना सामावून घेत नदीचा प्रवाह जसा पुढे जात असतो त्याचप्रमाणे उपयोगात नसलेले शब्दप्रयोग गाळून टाकत व निनिराळ्या श्रोतांमधून नवनवे शब्दप्रयोग घेत भाषा वहात असते. आज मी जे शब्दप्रयोग आपल्या
बोलण्यात व लिखाणात वापरतो ते सारे मी कुठे ना कुठे कधी ना कधी पुनःपुनः ऐकलेले किंवा वाचलेले असतात. सतत उपयोग होत असल्यामुळे ते चलनात असतात. उपयोग कमी झाल्यानंतर ते बाहेर फेकले जातात. त्याचप्रमाणे जीवनशैलीतील बदल, वाचन, प्रसारमाध्यमे आणि इतर लोकांशी होणारा संपर्क इत्यादींमधून त्यात अनेक नवनवे शब्द समाविष्ट होत राहतात. ही प्रक्रिया अत्यंत संथपणे आणि बिनबोभाटपणे सतत चाललेली असते.

यासाठी एक अगदी रोजच्या बोलण्यातले उदाहरण देतो. पन्नास वर्षांपूर्वी मी ज्या भागात रहात होतो त्या काळात तिथल्या बहुतेक प्रौढ स्त्रिया 'लुगडे' नेसत असत, तरुणी 'गोल पातळ' नेसत आणि लहान मुली 'परकर पालके' घालत. 'साडी' हा शब्द तेंव्हा फारसा प्रचारात नव्हता. खरे वाटत नसेल पन्नाशीच्या दशकातले राजा परांजप्यांचे मराठी चित्रपट लक्षपूर्वक पहावेत. लहान मुलींसाठी हौसेने फ्रॉक, स्कर्ट, पंजाबी ड्रेस वगैरे फॅशनेबल कपडे शिवत असत. या रोजच्या
वापरातल्या वस्त्रांच्या कापडाचा पोत, वीण, रंग, त्यावरील नक्षीकाम, किंमत, टिकाऊपणा वगैरेंची चर्चा, त्यांचे कौतुक किंवा हेटाळणी, त्यांची निवड करण्यापासून ते अखेरीस बोहारणीला देण्यापर्यंत त्यांवर घरात होत असलेल्या क्रिया यांच्या संदर्भात हे शब्द रोजच कानावर पडत असत आणि बोलण्यात येत असत. आज पन्नास वर्षांनंतर मी ज्या सामाजिक स्तरात वावरतो आहे तिथे लहानपणचे हे ओळखीचे शब्द आता माझ्या कानावर फारसे येतच नाहीत.

'लुगडे' नेसणार्‍या स्त्रियांची पिढी काळाआड गेली. 'गोल पातळ' जाऊन आलेली 'साडी' मध्यमवयीन व प्रौढ महिला नेसतात. बहुतेक तरुण मुली जीन्स किंवा कॅप्री आणि टॉप घालतात. पंजाबी ड्रेस आता 'पंजाबी' राहिला नाही, 'सलवार कमीज' किंवा 'सलवार सूट' या नांवाने तो सर्वच वयोगटात वापरला जातो. फ्रॉक, स्कर्ट आणि त्यांचे मिनि, मॅक्सी, मिडी वगैरे अनंत प्रकार येत आणि जात असतात. राजस्थानी, गुजराती किंवा लमाणी पध्दतीच्या कपड्यांचाही क्वचित कधी वापर दिसतो. नव्या पिढीतल्या मुली 'फंक्शन' किंवा 'ऑकेजन' च्या निमित्याने कधी कधी साडीही 'घालतात' . आणखी तीन चार दशकांनंतरही कोणत्या ना कोणत्या नांवाने
साडी शिल्लक राहील पण 'नेसणे' हा शब्द कदाचित राहणार नाही असा माझा अंदाज आहे.

आपण ठरवू किंवा न ठरवू, बोलत असतांना आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररित्या व्यक्त होतात. त्या वेळेस आपण व्याकरणाचा किंवा भाषाशुध्दतेचा विचार करत नाही. आपले सांगणे ऐकणार्‍याला लगेच समजणे हे जास्त महत्वाचे असते. माझे आईवडील ज्या बोलीत माझ्या लहानपणी बोलत असत, त्या नंतरच्या काळात ज्या प्रकारे मी माझ्या मुलांशी बोलत होतो आणि आज ज्या भाषेत ते त्यांच्या मुलांशी संभाषण करतात या मराठी भाषेच्याच तीन भिन्न तर्‍हा मी एकाच आयुष्यात पाहिल्या आहेत. 'हंडा', 'कळशी', 'बिंदगी' असे जुने शब्द माझ्या बोलण्यात कधी आले नाहीत कारण त्या वस्तूंना माझ्या घरात स्थान नव्हते, तसेच ' सीडी' , ' मॉल' , 'रिमोट' आदि शब्दही आले नाहीत कारण त्या संकल्पनासुध्दा तेंव्हा अस्तित्वात नव्हत्या.

आपले लेखन वाचणारे अनेक लोक असतात. (निदान अशी सोयिस्कर समजूत करून घ्यायला काय हरकत आहे?) आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच त्यातून जास्तीत जास्त लोकांना कळावा यासाठी लेखनाच्या भाषेत शुध्दलेखनाच्या नियमांचे शक्य तितके पालन करणे आवश्यक असते. त्याचबरोबर त्यात वापरलेले शब्द मूळ मराठी आहेत (म्हणजे नेमके काय?), संस्कृतजन्य आहेत, आपल्याच देशातल्या परप्रांतातून आले आहेत की परदेशातून आले आहेत यापेक्षाही किती लोकांना ते समजतील याकडे अधिक लक्ष द्यायला हवे असे आपले मला वाटते.

जीवंत भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी हे मी वर सांगितलेच आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे इंग्रजी भाषा तशी आहे. कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात कितीतरी नवे शब्द आले आहेत आणि 'रन', 'सेव्ह', 'डिफॉल्ट', 'स्क्रॅप' आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत. चॅटिंगसाठी तर नवी लिपीच तयार झाली आहे असे म्हणता येईल. आपण ते सगळे अगदी सहजपणे वापरतो. त्यांऐवजी मराठीत 'धांवा', 'वाचवा' वगैरे म्हणतांना निदान माझी जीभ तरी अडखळेल. उद्या एका मराठी माणसाने नव्याच तंत्रज्ञानावर आधारलेली एकादी नवी गोष्ट बाजारात आणली आणि सुरुवातीपासूनच तिचा वापर करतांना 'उचला', 'ठेवा', 'थांबा', 'चला', 'दाबा', 'सोडा' अशा सोप्या शब्दांचा प्रयोग केला तर त्या शब्दांचा उपयोग करायला मला मनापासून आवडेल. पण सध्या तरी जी गोष्ट ज्या नांवाने माझ्यापर्यंत पोचली त्या नांवाला चमत्कारिक वाटणारे प्रतिशब्द न शोधता त्या नांवाचाच मराठी भाषेत समावेश करावा असे माझे मत आहे.

भाषालेखमत

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

10 Apr 2008 - 6:57 pm | विजुभाऊ

पण सध्या तरी जी गोष्ट ज्या नांवाने माझ्यापर्यंत पोचली त्या नांवाला चमत्कारिक वाटणारे प्रतिशब्द न शोधता त्या नांवाचाच मराठी भाषेत समावेश करावा
बरोबर आहे. एखादी भाषा टिकते / वाढते ती तिचा शुद्धपणा जपत/ सोवळे सांभळत बसल्यामुळे नव्हे तर रोज नवे नवे शब्द आत्मसात केल्यामुळे. मार्क टुली हा ब्रिटिश पत्रकार बी बी सी वर भारताबद्दल लिहायचा. त्याने एकदा एका हिन्दी माणसाची मुलाखत घेतान हिन्दी नसणारा शब्द वापरला तेंव्हा त्या हिन्दी माणसाने त्या शब्दाबद्दल त्याला टोकले. आपने जि लब्ज इस्तेमाल किय वि हिन्दी मे नही है,
त्यावर मार्क टुली म्हणाला " अगर नही है तो अब होगा"
हिन्दी चे या बाबत कौतुक करावे तेवढे थोडे आहे. ते लोक इंग्लीश शब्द किती सहज पणे त्यावर हिन्दी साज चढवुन आत्मसात करतात.
उदा: तकनीक्... हा टेकनीक चे हिन्दी रूप आहे
त्रासदी ...ट्रॅजेडी...उदा: भोपाल गैस त्रासदी.
आपण मात्र बसलो आहोत्...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक असले महा शब्द शोधत.
पाहुया आपण नवे सोपे शब्द प्रचलात आणुया मिपा व तत्सम संस्थळे या बाबतीत खूप महत्वाची भूमिका बजावतील

प्राजु's picture

10 Apr 2008 - 7:18 pm | प्राजु

विजुभाऊ म्हणतात ते बरोबर आहे.

जीवंत भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी .
हे धोरण सगळ्याच भाषांना लागू पडते. पण मराठी सारखी भाषा मात्र कळफलक, संस्थळ आशा काहिशा शब्दांमध्येच अडकल्यामुळे थोडी जड वाटते.
माझा मुलगा (वय वर्षे ४)सध्या जी मराठी बोलतो बर्‍याचदा त्याचा प्रयत्न नीट मराठी बोलण्याकडे असतो. पण त्याला गोष्टी सांगताना, ज्या वस्तू त्याने पाहिलेल्या नाहीत त्यांना त्याच्या महितितील वस्तूंनी रिप्लेस करावे लागते. म्हणजे बिरबलाची खिचडी सांगताना, त्याला चूलीच्या भरपूर वरती त्याने एका दोराने खिचडीचे मडके टांगून ठेवले होते या ऐवजी त्याने गॅस पेटवला होता आणि खिचडी करण्याचा कूकर मात्र तिकडे लांब डायनिंग टेबल वर होता... असे सांगावे लागते. त्याने चूल किंवा मडके पाहिलेच नसेल तर त्या गोष्टीचा अर्थ तो समजू शकणार नाही अशी माझी भावना आहे...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सचिन's picture

10 Apr 2008 - 10:26 pm | सचिन

"आनंदघन" यांच्याशी संपूर्ण सहमत आहे.
भाषा जिवंत आणि प्रवाही राहाण्यासाठी इतर भाषांमधले शब्द तिने आत्मसात करायला हवेतच...पण हे होत असताना त्या भाषेचे स्वत्व हरपणार नाही याची काळजी घेतली जायला हवी. (नाहीतर मराठी WORDS REMEMBER करायला DIFFICULT होतं ). आज मी सुद्धा जेव्हा माझ्या आईशी, वडिलांशी किंवा कोल्हापूरच्या काकांशी बोलतो, तेव्हा वाटतं की ते मराठी बोलत आहेत, आणि मी कुठलीतरी "प्रदूषित" भाषा बोलतोय. साधे व्यवहारातले मराठी शब्दही सुचत नाहीत...आणि त्यांचं मराठी काही "कळफलक, संस्थळ" प्रकारातलं नसतं. उदहरणार्थ, "वास्तविक" किंवा "वास्तविक पाहता.." असा शब्द ते वापरतात, पण मी मात्र "ACTUALLY" म्हणतो.
ते म्हणतात आम्ही "रांगेत तिष्ठत होतो", मी मात्र " LINE मधे BORE होतो". मुख्य म्हणजे, ते काही मुद्दाम शुद्ध मराठी बोलूया म्हणून बोलत नसतात...ते नैसर्गिकच असतं. ऑफिस, फाईल, कॉम्प्युटर..हे आपण टाळू शकत नाही, पण वर उल्लेख केलेले किंवा अजूनही त्यासारखे अनेक शब्द आपण वापरू शकतोच ना ? त्यामुळे माझ्या मते भाषा जिवंत राहील, आणि अटळ असलेले परभाषेतील शब्द वापरल्याने ती प्रवाही राहील.
शेवटी असं म्हणेन, की आपल्या भाषेत अभिमानाने बोलता आले पाहिजे...पण तो दुराग्रह नसावा.
...आणि शुध्दलेखनाच्या बाबतीत बोलायचे झाले, तर ..नकोच ! एक आख्खे नवे "संस्थळ" काढावे लागेल !!

चित्रा's picture

11 Apr 2008 - 2:42 am | चित्रा

बर्‍याचशा मतांशी सहमत! मला वाटते की रोजच्या व्यवहारात काही इंग्रजी शब्द वापरायला हरकत नाही, पण नुकतेच महाराष्ट्र टाईम्स या वृत्तपत्रात " फेस्टिवल", "थीम", ज्वेलरी", "शूज", "ट्रॅडिशनल", "फॅशन", "आउटफिटस" हे इंग्रजी शब्द होते. सात वाक्यात सात शब्द इंग्रजी. याची काही गरज आहे का असे वाटले. दागिने, पारंपारिक, असे रूढ शब्द वापरता आले असते.

इतर बातम्यांमधील शब्द -
गिफ्ट, हार्टशेप, स्पेशल गिफ्ट्सवरचे डिस्काऊंट,
फ्लोअरिंग, मार्बल..

अजून एक -
कॉस्मेटोलॉजी आणि डर्मो सर्जरी , "ट्रेनरपदाची ", नॅशनल आणि इण्टरनॅशनल असोसिएशनच्या अनेक एलिट पॅनेलवरही . "
'एजिंग' , लेझर ट्रीटमेण्ट्स, लेझर फोटो रेज्युव्हेनेशन , "या ट्रीटमेण्टमुळे त्वचा सॉफ्ट होते, "पिग्मेण्टेशन, रिंकल्स, स्कार्स रोखण्यास मदत होते.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2927333.cms

हे एवढे अमराठी (इंग्लिश) शब्द वापरण्याची गरज आहे का? वरील शब्दांसाठी भेट, बदामी (किंवा हृदयाकृती), खास भेटवस्तूंवरच्या सवलती इत्यादी शब्द वापरले तर काही चुकते का?

शक्य तेथे सोपे मराठी प्रतिशब्द तयार करावेत आणि ते वापरावेत - असे मला वाटते. काही शब्द तयार करूनही प्रचलित होणार नाहीत, पण काही सोपे असतील ते नक्कीच वापरले जातील. असे शब्द अंगवळणी पडायला सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे असे वाटते. व्य. नि. /खरडवही हे शब्द किती पटकन उपयोगात आले - त्याचे कारण ते सोपे आहेत.

आनंद घारे's picture

11 Apr 2008 - 8:37 am | आनंद घारे

१. लिहिणार्‍याला ते परकीय शब्द आधिक ओळखीचे वाटतात.
किंवा
२. ते शब्द वाचकाला पटकन समजतील असे त्याला वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

21 Apr 2008 - 3:10 pm | प्रभाकर पेठकर

...कळफलक / पटल / अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक

कळफलक आणि पटल हे शब्द समजायला आणि उच्चारायलाही कठीण नाहीत. 'अग्निरथ आवकजावकविश्राम्धाम स्थानक' ह्याला 'स्थानक' हा सर्वांना समजणारा प्रचलित शब्द आहेच.

शब्द समजायला/उच्चारायला सोपे असावेत परंतु मराठी भाषेतील शब्दांचाच शक्यतो उपयोग करावा.