या रब्बा !! एक नवचित्रपटसंगीत अभ्यासिका

सुहास..'s picture
सुहास.. in जनातलं, मनातलं
3 Sep 2010 - 3:38 pm

डिसक्लेमर : आमचा हा लेख वाचुन एखाद्याने कपाळावर हात मारुन 'या रब्बा' म्हणल्यास आम्ही जबाबदार नाही.

संगीताविषयी आम्हाला लहानपासुन प्रंचड प्रेम आणी आदर आहे, ते प्रेम भाषेच्या,प्रांताच्या,जातीच्या आधारवर विभागलेले नाही,मग ती संगीता जाधव असो वा जोशी,यच्च.संगीता असो वा कंदास्वामी नागार्जुना सिंथेल रेड्डी असो...अरे हे काय बोलतोय..सॉरी-सॉरी ..बाकी संगीता जाधव होती मात्र खंमग, म्हणजे कस सगळ जागच्या जागी,बांधा,नाक-डोळे,कांती,केशसंभार वगैरै कस एकदम बघत रहाव अस, एकदा तिला गाठुन (हो हो गाठुनच ,सध्या बया युरोपात 'जिलब्या' तळते असे एकुन आहे.) विचारायल हव की तुझ्या पत्रिकेत एकुण किती ग्रह आहेत ते ? म्हणजे बायकोला सांगुन त्या त्या ग्रहांची शांती करून घ्यायला,पण नको , स्साल ! ऊद्या टीव्हीवर 'मेरे काले घने लंबे बाल !! शनी ग्रह-शांती का कमाल !! किंवा 'कांती का निखार !! किसने लाई है ये बहार !! ये तो गुरु ग्रह-शांती की धार !! अश्या प्रकारच्या जाहिराती यायला सुरुवात व्हायची.

ईथे आधीच सध्याचे टीव्ही चॅनेलवरील कार्यक्रम पाहुन ,ईकड,बँगलोरच्या रूम वर टीव्ही घ्यावा की नाही असा प्रश्न विचाराधीन आहे,पुण्यात आम्ही चांगला फ्लॅट-स्क्रीनचा टीव्ही घेऊन स्वताच्या व माझ्या घरातील समस्त पुरुषवर्गावर पायावर धोंडा (धोंडा कसला !! आख्खा 'गोवर्धन'च म्हणा ना !!) पाडुन घेतला आहे.आमच्या घरातील टीव्हीचा ऊपयोग केवळ आमचे खिसे रिकामे करण्यासाठी होतो,आमच्या घरातील समस्त स्त्री-वर्ग संध्यासमयी ७ ते ११ या' प्राईम टाईमच्या वेळात अतिशय व्यस्त असतात,(अश्या वेळेस 'कमर्शियल ब्रेक' नावाचा प्रकार किती बरा वाटतो नाही),साड्यांचे पॅटर्न,पडद्याचे रंग, ड्रेस मटेरियल्स,दागिन्यांचे पॅटर्न वगैरै-वगैरै ,मग काय ? गेला आमच्या गरीब पाकिटाचा बळी!!

असो...

तर काय सांगत होतो ? हां !! संगीताविषयीच आमच लहानपासुनच प्रेम !!

आमच्या प्रेमाची सुरवात होते, ती मी ,तिशली 'ढ' मध्ये असताना, 'अमिताब'च्या 'आखीरी रास्ता'तल्या एका गाण्यापासुन ,त्यातल एक गाण 'वो जा रही है मेरी हिरोईन' मधील एक कडवं होत ..'ती : याद करो तुम फिल्मोंमै क्या-क्या सीन दिखाते है , तो : लेटके बाते करते है ,दौडके गाना गाते है ' यातील 'दौडके गाना गाते है' ही ओळ आम्ही वर्गात ,शिरा ताणुन-ताणुन म्हणत असु कारण आमच्या वर्गात एक सुमित्रा दोडके नावाची 'वजनदार'मुलगी होती. तसेच 'सांवतसरांचा' हिन्दी'चा तास व्हायच्या आधी 'तुम्हे गींतोमें ढा दुंगा,सावन को आने दो ' ही ओळीच मोठमोठ्याने लांबलचक पारायण करायचो. असो ते आमच बालपण होतं बालपणात विरलं,पुढे निसर्ग-नियमाने अंगाने मोठा झाल्यावर(आम्ही फक्त अंगानेच मोठे झालो आहोत असे काही मिपाकरांचे मत आहे .)आम्ही संगीतावर नितांत प्रेम करायला लागलो..पण मुद्दा आहे आजकालच्या हिन्दी चित्रपट संगीताविषयी..

हल्लीच संगीत 'टेक्नो' असत म्हणतात.म्हणजे संगीत आणी टेक्नॉलॉजीचा संगम , हाच संगम कधी-कधी सुसह्य होतो तर कधी-कधी कर्ण-कर्कश्श !! टेक्नो संगीताचा जन्म नेमका कधी,कसे कुठे झाला ते नक्की सांगता येणार नाही पण त्याचा उपयोग होण्याआधी आम्हाला 'मोहम्मद अजीज'ने गाणे गाऊन कानठाळल्याचे आठवते,रफीच्या आवाजात कोमलता आणी पौरुष्याच कमालीच मिश्रण होतं म्हणतात, त्यापैंकी ह्या गायकाने फक्त 'पौरुष्य' ऊचलले असावे बहुतेक ,कारण मला तो रोमॅन्टिक गाणे गाताणा देखील हिरोईनची गंचाडी पकडुन ,तिला बाहु-बेडकुळ्या दाखवत किंवा कचा-कचा दातओठ खात गाणे गातोय की काय असे वाटायचे.तर,आता हेच पहा ना'कामरान अकमलने गायलेल्या,'जन्नत चित्रपटातील 'चार दिनों का प्यार' च रिमिक्स वर्जन,सुसह्य असलं तरी , सहाव्या वेळेस मी ते एकु शकत नाही, याऊलट वेक-अप सिड या चित्रपटातलं, कविता सेठ नी गायीलेल्या 'ओ रे मनवा तु तो बांवरा है' ह्या ओळी मला भावुन जातातच, शिवाय कधीही एकु शकतो.

पण टेक्नोचा खरा उपयोग सुरु झाला ते रिमीक्सच्या जमान्यात, गाण्याची शक्ल कशी का असेना , तरुण पिढीला तो प्रकारच एकुण भावला म्हणा.तस रिमिक्स,डिजे-गिरी ही अतिशय अवघड कला आहे(ईट जस्ट नॉट अ गेम,वॉर ऑफ द डिजे एकदा अटेन्ड केलय मी). असो त्यातली किशोरच्या गाण्याला ,'कह दु तुम्हे'ला, रिमीक्स मारताना, डिजे अकीलला भयानक त्रास झाला असणार, कारण एखाद मिडीयम स्लो रोमॅन्टिक गाणं,'डान्स नंबर मध्ये बदलायच म्हणजे कमालच आहे.त्याच सुमारास सरेल गाणे ही येत असत.ऊदाहरणार्थ ' हॅरीसन फोर्डच्या 'विटनेस' चित्रपटावरुन कॉपी केलेला " जॉन अब्राहम च्या ' एका फडतुस 'पाप' नावाच्या चित्रपटातील (ईथे मी चित्रपटाला फडतुस म्हणतोय बर का ! जॉन ला नाही ,लगेच नंग्या तलवारी ऊपसुन,आमच्या खव चा खफ बनवायच कारण नाही.) 'लागी तुमसे मनकी लगन'ला जो काही सुर दिलाय'राहत फतेह खाननी की, गाण टेक्नो असुन देखील 'रिफ्रेशिंग' वाटत.त्याच सुमारास आलेल्या 'तुम तो ठहरे परदेसी ' ह्या अल्ताफ राजाच्या गीत-संग्रहानी धुमाकुळ घातला होता,अर्थात त्यातल्या एका गाण्यामधली शेरो-बाजी मला आवडली होती ब्वा !!
'तुम्हारे घर को दरवाजा है'
'लेकीन तुम्हे खतरे का अंदाजा नहीं है'
"हमें खतरे का अंदाजा है लेकीन'
'हमारे घर को दरवाजा नहीं है '
आँ!! आयला काय शेर आहे का काय ? अश्लीलतेच्या मर्यादा चांगल्याच गुंडाळुन परिणाम साधला गेला होता.मला भावला ईतंराना भावेलच असे नाही..

पण मला आजकालच्या हिन्दी गाण्यातली एक गोष्ट भावत नाही ती म्हणजे हिन्दीत घुसविलेले पंजाबी शब्द (आधी शाळेत पाली-हिन्दी-मराठी-ईग्रंजी शिका,चेन्नईला गेलो की तमीळ शिका,जर्मनीत होतो तर जर्मन शिका,कर्नाटकात आहे तर कन्नडा शिका ,आणी आता पंजाबी शिका ,शिका शिका,डोक्याचा पार 'वागळे' झालाय.), आधीचे गीतकार 'रब्बा' हा शब्द वापरायचे,हा शब्द 'डब्बा' ह्या शब्दाशी किती जवळीक साधतो ना !!काही गीतकार 'वैरिंया वै " वापरायचे,या एका शब्दाचे विमान आजही माझ्या डोक्यावरून जातं.काय अर्थ घ्यायचा त्या शब्दाचा, तो जन्मोजन्मीचा वैरी झालाय का ? (मेनुं हा ही शब्द ध्यानात गेण्यासारखा आहे, मला एकदा हॉटेलात एका सरदारने'मेनुं देना' म्हटल्यावर मी त्याला 'क्या दुं' असे विचारले होते.तो स्वताच हसुन-हसुन पागल झाला.)पण पुर्णं गाण्यात पंजाबी वापरायला सुरुवात केली ते दलेर मेहंदी ह्या गायकाने , मला त्याच्या प्रकाशित झालेल्या एका गाण्यात'तुनक तुनक धुन,तुनक तुनक धुन, ता ता ता' ह्या तीन-चार शब्दापैंकी ईतर काही ही आजवर कधीच कळलेले नाही, पुढे ही कळणार नाही (त्यातला एक शब्द तुंबेवारी तार !!पण माझ्यासारखेच बरेच जण असतील)पण ह्याच गाण्यावर गणपतीत' बेधुंद' होऊन नाचलो आहे.

त्यानंतर तर मेल्या पंजाब्यांनी तर ऊत आणला.त्यातलेच एक नाव म्हणजे 'जाझी बी'.केशसंभार आणी दाढी ठेवण्याची स्टाईल करताना स्वताच्याच चेहर्‍यावर किती अत्याचार करावेत याच जाझी बी एक ऊत्तम ऊदाहरण आहे(त्यापेक्षा ते स्वताच्या चेहर्‍याचे बोकड करून घेणारे एमबीएचे स्टडस बरे !!) तर, हा बाबाजी एका गाण्यात सुरवात करताना म्हणतो, 'जिन्ने मेरा दिल लुटीया,जिन्ने मेनुं मार सुटीया' अरे बाबा, मार सुटीया म्हणजे काय ? ती तुला धरून मारत सुटली आहे काय ? आणी जर ती खरोखरच मारत सुटली असे तर तिने योग्य तेच केले असे मी म्हणेन , हा असा अवतार केल्यावर दुसरं काय करणार ?

jazzy B

आताच्या संगीतात तर गीतकार काय लिहीतो तेच कळत नाही. आता हेच बघा ना शाहीद कपुर ,भदाड्या करिना बरोबर नाचताना म्हणतो'जग सारा-जग सारा निखर गया, जब प्यार हवादिंविच बिखर गया' त्यापुढे मौजा ही मौजा पर्यंत गीतकार नेमकं काय म्हणतो ? तेच कळत नाही.असो..पण काल परवा एक गाणं एकल 'मेरे नाल-मेरे नाल चल सोणीये, मेनु सोहनीं लगती है तेरी 'गल' सोणीये'.. काय्य्य ? नेमक काय आवडत म्हणालास ? आणी नाल म्हणजे कुट रं बाबा, नाल्यात घेऊन चाललायस का ? काय प्रकार आहे हा . तिच गत 'लव्ह आजकल'च्या 'गड्डी ते हस बोल वे नी जिन्द सारी डोल वे !!' काय संक्रात आहे ? गड्डी ते हस ? नेमक कुठ हसायच ? ईथेच आमच गाडं अडल तर पुढील लिरिक्सची एकायची काय मजा ? खर तर गाण्यात घेतलला टेक्नोमुळे,गाण एक खतरनाक 'डान्स नंबर' बनु शकत होतं, अगदी'स्टेप-अप'या ईग्रंजी चित्रपटातल्या 'डान्स नंबर' सारख,पण ह्या गाण्यात सैफ-दिपीकाला बंद पडलेल्या स्कूटरला किका मारताना पाहुन भर थेटरात एकटाच हसत होतो.

ह्याच वाटचालीत शिरलेला एक प्राणी म्हणजे मिख्खा(दलेरच्या बापाच्या सप्तपुत्रांपैंकींच शेंडेफळ),एक तर करकटनी वर्तुळ काढल्या टाईपची चेहर्‍याची ठेवण,एखाद्या वारुळावरुन लाखो मुंगळे खाली येत असावेत असा केश-संभार,कट्ट्यावर, बिल टेबलावर आल्यावर,नेमक पाकिट विसरुन आल्यामुळे,एखाद्याच्या चेहर्‍यावर जसा भाव येतो तसा पडेल चेहरा,एखाद्यानी पार्श्वभागावर सुई टोचल्यावर आपल्या तोंडुन जसा आवाज निघेल तसा आवाज(राखीचा मुका घेतल्यापासुन तर अजुन अतुलनीय झालाय.) असलेल्या ह्या महाभागाला 'गायक' म्हणणं म्हणजे भारतीय अभिजात संगीताचा,रागदारीचा अपमान करणेच होईल. नुकतीच एका किशोरच्या गाण्याची, 'अपनी तो ऐसै-तैसै' ची ,मध्ये-मध्ये 'ओ धन्नो-ओ धन्नो' म्हणुन वाट लावली. धन्य ते संगीत आणी धन्य ते संगीतकार !!

mika

जाता जाता : लेखात ऊल्लिखलेल्या लिंका गुगलवर स्वताच शोधायच्या आहेत, उगा नंदनोबा वा सहजोबांना त्रास द्यायचा नाही, लेख थोडीसी गम्मत जम्मत म्हणुन लिहीलेला आहे,भाषेचा अपमान करण्याचा हेतु नाही.

आजकालच्या मिपाच्या पध्दतीनुसार,
सुहास
vedevaakadelikhaana@gamil.com
सध्या मुक्काम कर्नाटक,बंगळुर येथे (चांगल जेवण बनवतो म्हणुन घरी यायच काही कारण नाही,गॅसची एकुलती एक शेगडी आमच्यापुरतीच मर्यादित आहे.)

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

3 Sep 2010 - 3:46 pm | पुष्करिणी

सह्हीच्...तो शेवटचा फोटू कसला अचाट आहे , किती राक्षसी भाव आहेत चेहर्‍यावर.

अजून एक मला न कळणारा शब्द म्हणजे 'शावा '; हा जरा हुच्च्भ्रू पंजू सेटिंग मधे बर्‍याच्दा असतो. ह्याचा अर्थ कोणाला माहित असल्यास कॄपया सांगा.

मिसळभोक्ता's picture

3 Sep 2010 - 9:49 pm | मिसळभोक्ता

तुम्हाला "शावा" माहिती नाही ? बर, मग "माहिया" ? नसणारच म्हणा..

ब्रिटिश टिंग्या's picture

3 Sep 2010 - 4:29 pm | ब्रिटिश टिंग्या

मस्त रे!

परिकथेतील राजकुमार's picture

3 Sep 2010 - 4:38 pm | परिकथेतील राजकुमार

हा हा हा ... तडाखेबाज चिरफाड रे सुहास्या.

पंजाबी बरोबरच आजकाल मध्ये मध्ये मराठी शब्द घुसडण्याची देखील फॅशन आली आहे, त्यावर पण लिहा जरा मालक. अजुन मजा येईल.

जागु's picture

3 Sep 2010 - 4:46 pm | जागु

सरदारने'मेनुं देना' म्हटल्यावर मी त्याला 'क्या दुं' असे विचारले होते

सह्हिच.
लिखाण आवडले.

इंटरनेटस्नेही's picture

3 Sep 2010 - 4:59 pm | इंटरनेटस्नेही

खरोखर छान लिहलंय __/\__

आजकालच्या मिपाच्या पध्दतीनुसार,

इंटरनेटप्रेमी
सध्या मुक्काम महाराष्ट्र,मुंबई येथे (रटाळ धागे काढतो म्हणून घरी यायचे काही काम नाही, तुमचा ही मेंदु नासेल!)

भाऊ पाटील's picture

3 Sep 2010 - 6:27 pm | भाऊ पाटील

कहर लेख आहे आणि बेक्कार फाडलाय.

एक तर करकटनी वर्तुळ काढल्या टाईपची चेहर्‍याची ठेवण,एखाद्या वारुळावरुन लाखो मुंगळे खाली येत असावेत असा केश-संभार

हे तर लै भारी. :)

सहज's picture

3 Sep 2010 - 6:46 pm | सहज

काय फाडलस, तोडलसं मित्रा!

मस्त लेख लिहला आहे मालक!

'बया युरोपात जिल्ब्या तळते आहे' सच्चे लेखन ते हे!

मेघवेडा's picture

3 Sep 2010 - 7:33 pm | मेघवेडा

=)) =)) =))

काय लिहिलंय.. लै भारी.. मिख्खाचं वर्णन शॉल्लेट! =)) =))

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Sep 2010 - 7:38 pm | llपुण्याचे पेशवेll

चायला, केवढं लांब हे तुझं. लेखन.
मस्तं झालंय रे.

प्रभो's picture

3 Sep 2010 - 7:57 pm | प्रभो

काटा लेख!

लै भारी लेखकराव! लेख आणि लेखाची श्टाईल दोन्ही आवडले आहे!

त्या मिकाच्या ('मक' कोण म्हणालं रे?) फोटोमुळे हाच लेख 'स्पा' यांना भयकथा म्हणून सप्रेम सादर करावा ही सुहास यांस आग्रहाची विनंती! ;-)

--असुर

अविनाशकुलकर्णी's picture

3 Sep 2010 - 9:58 pm | अविनाशकुलकर्णी

गाण्यांचे इस्लामी करण होत आहे...खुदा..अल्ला..बंदा. पागल सुलेमान . इंशाल्लाह....खुदाई...शब्द क्यामन झाले आहेत..हाय राम हद्दपार झाले आहे...अतिशय पध्दतशीर पणे हे सारे चालले आहे.... .

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2010 - 9:45 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत आहे. मध्यंतरी एका पंजाब्याने तर 'बुल्ला कि जाणा' का कायतरी म्हणून अध्यात्मिक गाणे काढले होते म्हणे. आता पोरिबाळींसमवेत अशी गाणी कशी ऐकायची बॉ!

मस्त कलंदर's picture

4 Sep 2010 - 9:54 am | मस्त कलंदर

अरे मेल्या.. ते भुला की जाणां मैं कौन हूँ होतं.
हां... आता तुला असलंच कायतरी ऐकायचे असेल तर कोण काय करणार???

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Sep 2010 - 9:57 am | llपुण्याचे पेशवेll

कदाचित पंजाबी शब्दोच्चार मराठी माणसांसारखे शुद्ध नसतिल.

मैत्र's picture

7 Sep 2010 - 2:04 pm | मैत्र

सुफी संत / कवी -- बुले शाह
http://en.wikipedia.org/wiki/Bulleh_Shah

संदीप चित्रे's picture

4 Sep 2010 - 1:43 am | संदीप चित्रे

चिरफाड मस्त जमलीय रे !
च्यायला ते 'ओ धन्नो.. ओ धन्नो' ऐकताना फारच चीड येते आणि ती चीड नुसती 'अपनी तो ऐसे तैसे...ची वाट लावण्याबद्दल नसते तर 'ओ धन्नो'च्या निमित्ताने 'धन्नो की आँखों में...'ह्या बेफाट गाण्याची मनातल्या मनात वाट लागते त्याबद्दल असते !

फारएन्ड's picture

4 Sep 2010 - 3:55 am | फारएन्ड

सही लिहीलंय :)

इरसाल's picture

4 Sep 2010 - 11:20 am | इरसाल

ते 'बुल्ला कि जाणा मे कौन' च आहे. बुल्ला हे बुले शाह नावाच्या संताला उद्देशून गायलेले सुफी प्रकारातले भक्ती महिमा असे गाणे आहे.

तिमा's picture

5 Sep 2010 - 12:10 pm | तिमा

लेख उत्तम झाला आहे.

हल्लीची गाणी ऐकताना मला र्‍हिदम शिवाय काहीच ऐकू येईनासं होतं.
आधी ती एफेम वरची वटवट डोक्यात जाते ती संपते तोच एक र्‍हिदम सुरू होतो. त्यानंतर कोणी एक गायक अवघड जागी चिमटे काढल्यासारखा विव्हळून अप्रासंगिक ताना घेतो. त्या फेड होत असतानाच कोणी इला अरूण टाईप गायिका (?) व्हल्गर आवाजात गाऊ लागते. गाण्याचे फ्युजन की मेंदूचे फ्युजन तेच कळेनासे होते. असे झाले की घरी येऊन मी ताबडतोब मदनमोहन - लता चे एखादे गाणे ऐकतो, तर कुठे जीवाला शांतता लाभते.

स्वाती दिनेश's picture

5 Sep 2010 - 12:43 pm | स्वाती दिनेश

धमाल लेख, मस्त..
स्वाती

पैसा's picture

7 Sep 2010 - 2:22 pm | पैसा

लेखाच्या शेवटी तुम्ही दिलेला ईमेल अ‍ॅड्रेस पहिल्यांदा लक्षात आला नाही. परत बघताना कळला! बाकी लेख मस्तच.

स्पा's picture

30 Jul 2012 - 3:50 pm | स्पा

=)) =)) =))

कपिलमुनी's picture

30 Jul 2012 - 5:18 pm | कपिलमुनी

तुस्सी तो कमाल कर गयांसी :)
तु मेम्नु नाल ईक गल दस्सां !!

कस जमत रे भौ तुला :)

स्पंदना's picture

30 Jul 2012 - 5:27 pm | स्पंदना

खरच काय गातात कळत नाही. अर्धमुर्ध तर इंग्लिशच असत अन ते हिंदाळुन हिंदाळुन अस म्हणतात की ..

बाकि सुहास..... लय भारी जमलय वेडेवाकडेलिखाण.

मोहनराव's picture

30 Jul 2012 - 6:05 pm | मोहनराव

तुस्सी ग्रेट हो!