एकच लख्ख अनंत किरण...

अर्धवट's picture
अर्धवट in जनातलं, मनातलं
26 Aug 2010 - 8:33 pm

तुम्हाला कधी टोचतो की नाही माहित नाही पण मला खुप टोचतो मखमली अंधार... परका अंधार आणि पोरका मी.... म्हणजे नेहेमीच नाही बरंका... कधी कधी कसा मस्त दुलइ सारखा असतो... हवी तेव्हा गुडुप ओढून घ्यावी तोंडावर... कंटाळा आला की खसकन् फेकुन द्यावी... सगळा सोहळा हजर तुमचं स्वागत करायला हसर्‍या चेहेर्‍यानं.

कधी कधी मात्र खुप गुदमरायला लावतो... अंधार्‍या डोहात बुडल्यासारखं वाटतं... जिव गुदमरतो अगदी... मग मी डोळे टक्क उघडे ठेउन झपाटल्यासारखा पाहात बसतो... नजरेनेच चाचपडत, तडफडत बसतो... तो तळाशी ही खेचत नाही आणि श्वासही घेउ देत नाही... कधी सोसतो.. कधी पोळतो.

पळताही येत नाही त्यापासुन.. सगळ्या श्वासातच गच्च भरुन राहिलायसं वाटतं... केविलवाणी अधांतरी धडपड... आणि मग हळुहळू शांतपणे सगळं थंडावत जाणार.. आणखी एक बळी आतल्या अंधाराचा...

म्हणुन एखादाच लख्ख किरण, पण नेहेमी असावा सोबत... आपला प्रकाश घेउन फिरावं आपल्याच आत... कधितरी श्वास कोंडला तर कामी येतो एखादाच लख्ख किरण...

एरवीच्या भगभगीत प्रकाशात नसेल महत्वाचा.... काळोखुन जात असेल... एखादाच लख्ख किरण... पण अशा अंधार्‍या समुद्रात दुप्पट वेगाने उसळतो ना... उजळतो ना सारं तुझंच अस्तित्व... एरवी दिसतं का एवढं सुंदर, भेसुर सावल्यांनी कुरूप झालेलं तुझं अंतरंग...

सगळ्या भेसूर सावल्या, सगळे भयाण भास... भेदायची ताकद नसेलही कदाचीत त्या किरणात... पण तशी ती तुझ्यात तरी कुठाय वेड्या... तुझ्या पुरता घेउन फिरायचा तो सतत.. जवळ ठेवायचा फक्त... किंमत नाही करायची कृतघ्नासारखी लगेच... तुझ्यापुरता आहेच ना तो शाश्वत... तुझ्या आयुष्याच्या टीचभर मापात का होइना..आहेच ना तो 'अनंत'.. एकच लख्ख अनंत किरण..

एखादाच बाबुजींचा स्वर...'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...'

एखादाच "ठकठकठक.. धनंजय माने आहेत का घरात... "

मुक्तकसद्भावना

प्रतिक्रिया

पैसा's picture

26 Aug 2010 - 9:29 pm | पैसा

तुमचं सगळंच लेखन छान लागतंय. या लेखाला कवितेची लय आहे, की ही गद्द्यात लिहिलेली कविता आहे?

धनंजय's picture

26 Aug 2010 - 10:59 pm | धनंजय

लय आहे खरी.

सहज's picture

27 Aug 2010 - 6:48 am | सहज

हा हा हा मला तर हे शब्द धनंजय यांच्या खास स्वरलयीत ऐकू येत आहेत. 'परकाऽ अंधाऽर .. आणी पोरका_मी'

विसोबा खेचर's picture

26 Aug 2010 - 9:30 pm | विसोबा खेचर

एरवीच्या भगभगीत प्रकाशात नसेल महत्वाचा.... काळोखुन जात असेल... एखादाच लख्ख किरण... पण अशा अंधार्‍या समुद्रात दुप्पट वेगाने उसळतो ना... उजळतो ना सारं तुझंच अस्तित्व... एरवी दिसतं का एवढं सुंदर, भेसुर सावल्यांनी कुरूप झालेलं तुझं अंतरंग..

अतिशय सुरेख मुक्तक...

-- मिपाचा दर्जा घसरला आहे वगैरे वगैरे वल्गनांना पूर्णविराम देणारं..!

अर्धवटराव, मुक्तक वाचून खरंच खूप छान वाटलं..!

एखादाच बाबुजींचा स्वर...'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा...'

जिथे संगीतातल्या सा-या पदव्या संपतात तिथे हे गाणे सुरू होते..!

धन्यवाद अर्धवटराव,

(बाबूजींचा शिष्य) तात्या.

मेघवेडा's picture

27 Aug 2010 - 12:32 am | मेघवेडा

अतिशय सुरेख मुक्तक...

-- मिपाचा दर्जा घसरला आहे वगैरे वगैरे वल्गनांना पूर्णविराम देणारं..!

असेच म्हणतो! प्रभ्याशीही सहमत आहे!

प्रभो's picture

26 Aug 2010 - 9:33 pm | प्रभो

अतिशय सुरेख मुक्तक...

*नाव बदल रे तू...अर्धवटा

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

26 Aug 2010 - 9:34 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

मला बर्‍याचदा वाटणार्‍या...एका unkonown feel ला तुम्ही शब्द दिलेत...
its like a Deja vu.......
हेच सारं...कधीतरी.. नाही अनेकदा..वाटुन गेलं आहे....
शब्दबद्ध केल्याबद्दल धन्यवाद...
सुन्दर....

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Aug 2010 - 9:37 pm | बिपिन कार्यकर्ते

छान

असुर's picture

26 Aug 2010 - 9:42 pm | असुर

>>>एखादाच "ठकठकठक.. धनंजय माने आहेत का घरात... "<<<
अगदी अगदी!! लै भारी. हा प्रकाशकिरण तर कायम अंधार उजळवून गेलाय! असले किरण आपण नेहेमीच म्यानात ठेवतो. दिसला अंधार, की चालवला एक किरण त्यावर तलवारीसारखा! मायला, हाय काय अन नाय काय!

आणि हाच लेख काढा म्हणून 'स्पा' ना द्या! त्याना फार गरज आहे याची!

--(अशोकमामांचा फ्यान) असुर

यशवंतकुलकर्णी's picture

27 Aug 2010 - 12:55 am | यशवंतकुलकर्णी

मौनाच्या अभेद्य काळ्या पत्थराआडून स्फूरणांच्या नाजुक झुळझुळीचे गीत असेच
चुकून-माकून कधीतरी येते..
पण हे गीत इतकं चंचल, की मुखड्याचा अर्थ लागतो न लागतो तोच त्यानं समदेखील गाठलेली असते..

असं वाटतंय मला...
ती अशीच एक कविता झाली होती मागे केव्हातरी

अर्धवट's picture

27 Aug 2010 - 10:19 am | अर्धवट

कवितेचा दुवा मिळेल का?

आनंदयात्री जसे मधूनच येऊन काही अफूबाज लेखन करतात, तसे हे लेखन झाले आहे (त्यांच्या लेखनाला एखाद्या चित्राची जोड असते; ती मात्र याला नाही, इतकाच फरक).
अर्थातच, लेखन आवडले. अशा लेखनानंतर लेखकाला आणि वाचल्यानंतर वाचकाला येणारा काहीसे 'हाय' झाल्याचा फील इतकाच काय तो त्याचा परिणाम.
प्रवासवर्णानानंतरचे हे एकदमच वेगळ्या धाटणीचे लेखन. लिहीत रहा; आम्ही वाचत राहू. तूर्तास इतकेच म्हणतो.
(आस्वादक)बेसनलाडू

स्पंदना's picture

27 Aug 2010 - 7:03 am | स्पंदना

___/\___

स्पा's picture

27 Aug 2010 - 10:21 am | स्पा

अतिशय सुन्दर........................

अर्धवट's picture

27 Aug 2010 - 10:27 am | अर्धवट

आर भा*..
हे तुझ्याच आत्महत्येच्या लेखावर लिवनार होतो प्रतिक्रिया म्हणुन.. पण म्हणलं तुला आणखी काय वाटलं तर पाप आमच्या डोस्क्यावर नको. ;)
म्हणुन वेगळं मुक्तक टाकलं...

स्पा's picture

27 Aug 2010 - 10:31 am | स्पा

म्हणूनच खूप आवडलं

एक अनामी's picture

29 Aug 2010 - 4:05 pm | एक अनामी

अप्रतिम...
कुठेतरी खोलवर भावनांचा कोलाहल माजला...
आपल्याच मनातील भावना वाचतोय असं वाटून गेलं...
अप्रतिम... अप्रतिम...

विलासराव's picture

29 Aug 2010 - 4:14 pm | विलासराव

स्स्स्स्स्स्स्स्स्स्ससही लिहीता तुम्ही तर.

स्वाती's picture

29 Aug 2010 - 6:57 pm | स्वाती

सुंदर मुक्तक!