लोकहो,
चैत्र शके १९३० हा महिना विविध ग्रहराशीप्रवेशांनी गाजणारा महिना आहे.
मंगळ आणि राहू असे दोन तापदायक ग्रह या महिन्यात राशी बदलत आहेत. नेपच्यून कुंभेत जातोय.
मिथुनेत गेले अनेक महिने ठाण मांडून बसलेला मंगळ आता कर्केत जाईल.
मिथुनराशीवाल्यांनी बिचार्यांनी खूप सोसले आहे. खरेतर साडेसाती संपल्यावर मधुमास येतो. पण शनीमहाराज गेले तरी मंगळमहाराज मिथुन राशीत ठाण मांडून होते. त्यात ते वक्री झाले, स्तंभी झाले आणि आता ३१ जानेवारीपासून मार्गी लागले आहेत. हा कुजस्तंभ फार वाईट असतो.
गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले. ते आता मोकळे होतील.
कर्कवाल्यांचे कायमच वांधे असतात. सध्या त्यांना साडेसाती चालू आहे. त्यात भर म्हणजे शनी सिंहेत वक्री आणि मंगळ मिथुनेत मार्गी. याला ज्योतिषशास्त्रात "पापकर्तरी" असे म्हणतात. कर्तरी म्हणजे कात्री. दोन पापग्रहांच्या कात्रीत कर्करास सापडलेली आहे.
त्यात आता मंगळराव राशीत येत आहेत. केतू सिंहेतून कर्केत येतोय. समोर राहुमहाराज आहेत. राहू मंगळ प्रतियोग कर्केतच घडणार आहे. काय करावे?
परमेश्वरा...... वाचव रे या धोंडोपंताला!!!!!
तर लोकहो, चैत्र महिन्यातील ग्रहराशीप्रवेश असे आहेत.
चैत्र शुक्लपक्ष:-
१) दिनांक १३/०४/२००८ रोजी सायंकाळी ०६ वाजून २९ मिनिटांनी रवि मेष राशीत प्रवेश करतो आहे. मेष ही रविची उच्च रास आहे.
२) दिनांक १४/०४/२००८ रोजी रात्री २९ वाजून ४९ मिनिटांनी म्हणजेच दिनांक १५ एप्रिल रोजी पहाटे ०५ वाजून ४९ मिनीटांनी बुध मेषेत येतो आहे.
चैत्र कृष्णपक्ष:-
१)दिनांक २४/०४/२००८ रोजी सायंकाळी ०६ वाजून ५७ मिनिटांनी नेपच्यून कुंभेत जातो आहे.
२) दिनांक २५/०४/२००८ रोजी रात्री ०९ वाजून ४० मिनिटांनी शुक्र मेषेत जातो आहे.
३) दिनांक २८/०४/२००८ रोजी दुपारी ०२ वाजून ४७ मिनिटांनी मंगळ कर्केत जातो आहे. ( ही ब्याद एकदा निघाली की सुटले बिचारे मिथुन वाले)
४) दिनांक २१/०४/२००८ रोजी सायंकाळी ०५ वाजून ४० मिनिटांनी बुध वृषभेत जातो आहे.
५) दिनांक ०५/०५/२००८ रोजी रात्री ०८ वाजून ०१ मिनिटांनी राहू मकरेत जातो आहे. (कुंभवाले सुटले)
६) दिनांक ०५/०५/२००८ रोजी रात्री ०८ वाजून ०१ मिनिटांनी केतू कर्केत जातो आहे.
आपला,
(गणकभास्कर) धोंडोपंत
प्रतिक्रिया
8 Apr 2008 - 6:15 pm | सन्दीप
हे जे आपन् राशिन बद्दल लिहिलेय ते इन्ग्रजि जन्म तारिके प्रमाने राशि घ्य्यच्या कि अध्याअक्शरा वरुन रास समाजायचि. क्रुपया खुलासा करावा.
सन्दीप
8 Apr 2008 - 6:21 pm | धमाल मुलगा
साडेसाती हे भारतीय भविष्यपध्दतीमध्येच असत॑...माझ्या माहितीनुसार तरी.
त्यामुळे आपल्या कुंडलीत पाहून रास जाणून घ्यावी.
-ध मा ल.
8 Apr 2008 - 6:26 pm | मनस्वी
अरे संदीप.. ते खुलासा वगैरे राहुदेत बाबा.. आधी तू टंकलेखन शिकून घे.
हघ्या.
अरे अगदी सोप्पय! टंकलेखन सहाय्य वर टिचकी मार. १०-१५ मिनिटांत एक्स्पर्ट (तरबेज) होशील.
9 Apr 2008 - 9:09 am | विसोबा खेचर
गेल्या काही महिन्यात अनेक मिथुनराशीच्या जातकांच्या पत्रिका आम्ही पाहिल्या. सर्व बिचारे हैराण झालेले. ते आता मोकळे होतील.
चला, बरं झालं! :)
कर्कवाल्यांचे कायमच वांधे असतात. सध्या त्यांना साडेसाती चालू आहे. त्यात भर म्हणजे शनी सिंहेत वक्री आणि मंगळ मिथुनेत मार्गी. याला ज्योतिषशास्त्रात "पापकर्तरी" असे म्हणतात. कर्तरी म्हणजे कात्री. दोन पापग्रहांच्या कात्रीत कर्करास सापडलेली आहे.
हम्म! तू म्हणतोस ते खरं आहे धोंड्या! गेली अनेक वर्ष अविवाहीत असणार्या माझ्या एका कर्कराशीच्या मित्राला अलिकडेच लग्न करायची बुद्धी झाली! :)
बाय द वे धोंड्या, मला एक सांग. सध्या मी एकदम एका 'आयटम' मुलीला पटवण्याच्या मागे आहे. (लग्नाकरता नाही हं! अशीच आपली हिंडण्याफिरण्याकरता! ;))
मुलगीही तशी फाकडू आणि बिनधास्त आहे. आपल्याशी बिनधास्त बोलते वगैरे! पण च्यामारी अजून, 'ग्यॅरेंटेड पटलीच आहे' असं म्हणता येणार नाही! काहीतरी उपाय सांग बाबा! :)
बाय द वे, जोक्स अपार्ट, परंतु लगे हाथ तुला अजून एक प्रश्न विचारतो. जरा तुझ्या व्यवसायाशी निगडित आहे. द्यावंसं वाटलं तरच उत्तर दे, सक्ति नाही.
तुझ्याकडे जी मंडळी येतात ती सगळी सांसारिक व्यापाने गांजलेलीच मंडळी येतात की माझ्यासारखे वशीकरणवालेही काही येतात? :)
आणि यात काही स्त्रियाही असतात का?
तात्या.
9 Apr 2008 - 2:34 pm | धोंडोपंत
तात्या,
तुमच्या "आयटम"च्या बाबतीतले प्रयत्न आता करायला घ्या. यश येईल.
आमच्याकडे येणारे जातक विविध प्रकारचे असतात. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे. कोणाला पैसा कसा मिळवावा हा, तर कोणाला पैसा कुठे ठेवावा हा.
कोणाला लग्न जमत नाही म्हणून चिंता कोणाला लग्न झालाय म्हणून चिंता.
कोणाला शिक्षणाची, कोणाला व्यवसायाची, कोणाला मुलांची, कोणाला प्रेयसीची, कोणाला प्रेयसी मिळत नाही याची, कोणाला घराची, कोणाला आरोग्याची, कोणाला भागिदारीची, कोणाला आईबापाची तर कोणाला भाऊबंदकीची चिंता.
त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात.
चालायचचं. आम्हांला त्या लोकांबद्दल सहानुभूती आहे. त्यामुळे आम्ही या बाबतीतही त्यांना प्रामाणिकपणे सल्ला देतो. जर काही शक्य असेल तर प्रयत्न कसे करावे, कधी करावे, काय करू नये हे सांगतो. अनेकांना त्याचा अनुभव येतो. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण निर्माण होतात.
आमचे काही स्नेही आम्हांला विचारतात, "पंत, तुम्ही या गोष्टींसाठी तुमची विद्या का वापरता?"
आमचे उत्तर एवढेच असते:-
खुदकुशी भी जुर्म है और मयकशी भी जुर्म
कौन क्या मुश्किल में है ये, जानता कोई नही.
आपला,
(लोकहितवादी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
9 Apr 2008 - 4:59 pm | विसोबा खेचर
त्याचप्रमाणे तू विचारल्यासारखे काही जणही येतात. दबक्या आवाजात बोलायला सुरूवात करतात. आधी इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात. त्यांची कशी शारीरिक आबाळ होतेय हे आम्हांला पटविण्याची धडपड करतात आणि मग हळूच ही पुडी सोडतात.
हा हा हा! बाय द वे, मी तुला हा प्रश्न दबकत दबकत वगैरे नाही हां विचारलेला! बिनधास्त, अगदी चारचौघांदेखत विचारला आहे! :)
आणि माझी शारिरीक आबाळ होते आहे, होत नाही, किंवा कसे, याबद्दल तुला खाजगीत काय ती माहिती आहेच! :)
आपला,
(खाऊनपिऊन सुखी!) तात्या.
:)
9 Apr 2008 - 5:35 pm | वरदा
आता एवढं सांगितलयत तर अजून एक सांगाल का? कन्या आणि सिंह राशीची साडेसाती चालू आहे असं मला गेल्या वर्षी सांगितलं होतं ती केव्हा संपेल? सॉरी जर मी फी भरून विचारायचा प्रश्न विचारत असेन तर नका देऊ उत्तर...
9 Apr 2008 - 6:08 pm | मनस्वी
10 Apr 2008 - 10:24 am | धोंडोपंत
वरदाताई,
कर्केची साडेसाती ०९/०९/२००९ रोजी संपते आहे.
सिंहेची साडेसाती १५/११/२०११ रोजी संपते आहे.
धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
10 Apr 2008 - 5:51 pm | वरदा
धन्यवाद काका...
काका मी कन्या राशीची माझी साडेसाती कधी संपणार?